दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाची प्रीती लेखक: जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

 

“ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय? उलट ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो” (रोम ८:३५, ३७).

या लेखात आपण देवाच्या प्रीतीवर पाहू या. विश्वासीयांची मुले भरकटली गेली की आपण देवाच्या प्रीतीबाबत प्रश्न करतो. मुलांवर वाईट संकटे आली तर आपण देवाला म्हणतो, “तू ज्या पद्धतीने माझ्या मुलाला वागवत आहेस, तसे मी वागवणार नाही. अखेर आपल्याला या वक्तव्याबद्दल पश्चात्ताप करावा लागतो. संपन्नावस्थेत देवाची प्रीती जितकी ज्वलंत असते, तितकीच विपन्नावस्थेतही ती खरी असते. देवाच्या सार्वभौमत्वावर विश्वास ठेवावा तसतसा त्याबद्दल प्रश्न करण्याचा आपल्याला मोह होतो. आपल्याला वाटते, देव जर या आपत्तीवर ताबा ठेऊन आहे, तर मग तो काहीतरी करू शकत असूनही का काहीच करत नाही? मग हा सार्वभौम देव चांगला नाही असे म्हणण्याचा मोह होतो. सैतानाने प्रथम देवाच्या चांगुलपणावरच आक्षेप घेतला. तो सैतानच आपल्या मनात विचार घालतो की देव स्वर्गात बसून आपल्या आपत्तीकडे पाहून उपहास करीत आहे. देवाचे सार्वभौमत्व व चांगुलपणा यातून आपण निवड करायची नसते. देवाचे वचन त्याचे सार्वभौमत्व व चांगुलपणा दोन्ही समान लेखते. त्याचे वात्सल्य, प्रेम, व सार्वभौमत्व बायबलच्या पानापानात आढळते. योहान म्हणतो, “देव प्रीती आहे” (१ योहान ४:८), “देव प्रकाश आहे” (१ योहान १:५). म्हणजे देव पवित्र आहे. त्यामध्ये त्याचे हे गुण समाविष्ट होतात. पवित्रता हा गुण त्याच्यापासून विभक्त होऊ शकत नाही. तो प्रीती असल्याने चांगुलपणा हा त्याच्या स्वभावाचा एक भाग आहे. तो आपल्या निर्मितीला दया दाखवतो. स्तोत्र १४५: ७-९ व १७ मध्ये त्याच्या विपुल चांगुलपणाचे वर्णन आहे. यहेज्केल ३३:११ म्हणते, “कोणी दुर्जन मरावा यात मला संतोष नाही असे प्रभू म्हणतो.”  पहा, हा त्याचा चांगुलपणा! एकामागून एक जेव्हा आपत्ती येतात तेव्हा देवाच्या प्रीतीविषयी शंका घेण्याचा आपल्याला मोह होतो. शंकांद्वारे आपला लढा चालूच असतो. त्यामध्ये सैतान देवाविरुद्ध आपल्याकडे दोषारोप करत असतो आणि म्हणतो, “देवाचे तुझ्यावर प्रेम असते तर त्याने हे घडू दिले नसते. देवाचे सार्वभौमत्व यापेक्षा त्याच्या प्रीतीवरच  सैतान अधिक हल्ले करतो. असे मोह आपल्यावर येणारच. पण देवावर भरवसा टाकून आपण त्याचा आदर करावा. आणि या विचारांना आपल्या मनात घर करू देऊ नये. देवाच्या चांगुलपणाला प्रश्न करणे म्हणजे देवापेक्षा माणसालाच अधिक काळजी आहे असे दर्शवून त्याला देवापेक्षा चांगले लेखणे होय. प्रश्न करण्याच्या मोहामुळे हाच घाला येतो की आपण देवाला नाकारतो.

आपल्या मुलांवर आपत्ती आली म्हणजे आपण देवाविषयी शंका घेतो. आपणच आपल्या मुलांची जास्त काळजी घेतो असे दाखवतो आणि स्वत:ला देवापेक्षा अधिक दयाळू समजतो. अधिक काळ आपत्ती राहिली की आपण असेच करतो. आरंभी ईयोबही म्हणाला, “परमेश्वराने दिले परमेश्वराने नेले धन्य त्याचे नाम.” (ईयोब १:२१). नंतर तो देवाच्या चांगुलपणावर प्रश्न करीत राहिला आणि म्हणाला, “देव मला न्याय देणे नाकारत आहे”  “मानव देवाला संतुष्ट करू पाहतो तेव्हा त्याला काही प्राप्त होत नाही” असे अखेर तो म्हणाला (ईयोब ३४:५-९). जर देव प्रीतीत व चांगुलपणात परिपूर्ण असून त्यात वैपुल्य दाखवतो तर आपण सैतानाला का बळी पडावे? देवाच्या चांगुलपणाला का प्रश्न करावा? त्यासाठी कोणती सत्ये मनात दृढ धरावीत? जी आपण मोहाविरुद्ध शस्त्र म्हणून वापरू शकू?
१) देवाची कालवरीवरील प्रीती २) ख्रिस्तामधील देवाची प्रीती ३) देवाची सार्वभौम प्रीती

देवाची कालवरीवरील प्रीती
देवाने आपल्या पुत्राला मानवाच्या पापांसाठी मरू दिले. त्याद्वारे आपली प्रीती प्रकट केली. हा त्याच्या प्रीतीचा महान पुरावा आहे. “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठवले. यासाठी की त्याच्याद्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे. यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. “प्रीती म्हणावी तर हीच. आपण देवावर रिती केली असे नाही तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीती केली व तुमच्या आमच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून स्वपुत्राला पाठवले” (१ योहान ४:९,१०). आपत्तीपासून सुटका मिळणे ही आपली मुख्य गरज नाही. देवाशी ताटातूट होणे हे संकट जगातील सर्व संकटापेक्षा मोठे संकट आहे. तसेच आपली नावे स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात लिहिली गेली आहेत यापेक्षा जगामध्ये कोणताच मोठा आनंद नाही (लूक १०:२०). जगातील कोणतीच आपत्ती नरकातील आपत्तीपेक्षा मोठी नाही.

जेव्हा योहान म्हणतो, आपल्या पुत्रास पाठवून देवाने आपली प्रीती प्रकट केली, तेव्हा तो म्हणतो की, देवाने आपली प्रीती व्यक्त करून मानवाची मोठी गरज भागवली. कोणतीच गरज या गरजेपुढे मोठी नाही. कालवरी हे अत्यंत परिपूर्ण प्रीतीचे द्योतक आहे. त्यासाठी देवाला जी अमर्याद किंमत मोजावी लागली ती म्हणजे आपला स्वत:चा पुत्र. दोघांनाही महान किंमत मोजावी लागली. देवाला आपला पुत्र द्यावा लागला. पुत्राला आपला जीव द्यावा लागला. प्रीतीचा गुण आहे “स्वत:चा त्याग.”  तो दोघांनाही करावा लागला. तो कोणासाठी? त्याचेच कालवरीवर दर्शन झाले. देवाने ज्यांच्यावर प्रीती केली ते कशा अवस्थेत आहेत ते पाहा. “देव आपल्यावरच्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला” (रोम ५:८). स्वत:ला धार्मिक व नीतिमान समजणारऱ्यांना हे वाक्य जड जाते. आम्ही पापी असता देवाने आमच्यावर प्रीती केली. देव आमच्याकडे पापी म्हणून पाहतो, आपणही स्वत:कडे  देवाच्या नजरेतून पापी म्हणून पाहावे. आपण समाजाला कितीही चांगले दिसत असू , पौल म्हणतो,
“तुम्ही आपले अपराध व पातके यांत मृत झाला होता” (इफिस २:१). यहेज्केल ३७ मध्ये शुष्क अस्थींच्या खोऱ्याचा दृष्टांत दिला आहे. तारणापूर्वीच्या आपल्या अवस्थेचे ते दृश्य आहे. तारणापूर्वी आपण कितीही धार्मिक असलो तरी त्या शुष्क अस्थींच्या दिगाऱ्याप्रमाणे आहोत. “आम्ही आपापला मार्ग धरला होता.” इफिस २:२ नुसार अंधकाराच्या जगाचा अधिपती सैतान याला आपण अनुसरत होतो, त्याच्या सत्तेखाली आपण होतो. प्रे. कृ. २६:१८, कलसै १:१३ नुसार पापी स्वभावाच्या वासना पूर्ण करण्यात आपले आयुष्य घालवले (इफिस २:३). स्वत:च्या इच्छा, आकांक्षा, सुखाच्या पूर्तीसाठी जगलो आणि देवाच्या क्रोधाची प्रजा झालो. देवाचा क्रोध सत्य आहे. तो सर्वांची पारख करणारा आहे. ही गोष्ट आपण नजरेसमोरून जाऊ देऊ नये. पवित्र नीतिमान देवाविरुध्द आपण पाप केले आहे. स्वेच्छेने त्याच्या आज्ञा मोडल्या. बंड केले, त्याचे नीतिनियम बिघडवले आणि देवाने प्रकट केलेल्या त्याच्या इच्छेविरुध्द वागलो. म्हणून आपण देवाच्या क्रोधाची प्रजा होणे सार्थच आहे. आपली ही पापी अवस्था समजली तरच आपल्याला देवाच्या प्रीतीची खोली समजेल. त्याने केवळ पुत्र दिला एवढेच नव्हे तर त्याला त्याने मरायला पाठवले. देवाच्या प्रीतीबद्दल प्रश्न आला की प्रथम स्वत:ला प्रश्न करावा, आपण कसे व कोण आहोत? त्याच्या प्रीतीवर आपण हक्काने दावा करू शकत नाही. त्याच्या चांगुलपणाची जराही अपेक्षा करू शकत नाही. आपली ती पात्रताच नाही. आपण पूर्णपणे अपात्र असताना देवाने आपल्यावर प्रीती केली. त्याच्या प्रीतीचा आग्रह धरायला आपल्या ठायी काहीच नव्हते. जेव्हा जेव्हा देवाच्या प्रीतीविषयी प्रश्न पडेल तेव्हा तेव्हा त्याच्या वधस्तंभापाशी जावे आणि असा विचार करावा: मी शत्रू असता देवाने माझ्यावर प्रीती केली व माझ्यासाठी मरायला आपला पुत्र पाठवला. नक्कीच माझी काळजी घेण्याइतकी तो माझ्यावर प्रीती करतो. आता तर मी त्याचे मूल आहे. वधस्तंभापर्यंतची टोकाची प्रीती केल्यावर माझ्या आपत्तीच्या काळात तो माझ्यावर प्रीती करणार नाही हे अशक्य आहे. एवढा अमोल पुत्र त्याने बक्षीस दिला. तर माझ्या कल्याणासाठी तो सर्व काही देऊन टाकील. असा तर्कशुद्ध स्पष्ट विचार आपण करावा. विपत्काली मी देवावर कसा विश्वास ठेवायचा?  देवाच्या वचनात प्रकट झालेले त्याचे सार्वभौमत्व, ज्ञान, प्रीती या सत्यांवर आपले मन केंद्रित करायचे. तर्कशुद्ध विचार करायचे. भावनांच्या आहारी जायचे नाही. वचनातील सत्यांना आपला ताबा द्यायचा. आपल्या भावनांना त्या वचनांचे दास बनवायचे. याचा अर्थ आपल्याला वेदना, डोकेदुखी, मनोव्यथा जाणवणार नाहीत असे नाही. त्या तीव्रतेने जाणवतील. त्या दाबून धरून गिळायच्या नाहीत. पण देवाविषयी कठोर कटुता धरण करायची नाही. दु:ख निराशेच्या काळात वचनावर मनापासून विचार करायचा. रोम ८:३२ म्हणते, “ज्याने आपल्या पुत्रासही न राखून ठेवता सर्वांसाठी दिले तो त्याबरोबर सर्व काही विपुलपणे कसा देणार नाही?” जो देव महान दान देऊ शकतो, तो त्यापेक्षा कमी दाने का देणार नाही? माझ्या तारणाच्या महान गरजेला देवाची प्रीती पुरेशी होते तर माझ्या छोट्या गरजांना ती नक्कीच पुरेशी आहे. ही आपली पक्की खात्री हवी. कोणतीही आपत्ती मला देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. पौलाने वचनातून ही सत्ये अभ्यासली तशी आपणही मनाने, बुद्धीने या वचनांवर मनन करावे व तर्कशुद्ध विचार करावा.

पुढे चालू

Previous Article

धडा २८. १ योहान ५: १०-१२ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा २९. १ योहान ५ : १३-१५ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]

तू माझा त्याग का केलास?

लेखक: डॉनल्ड मॅकलॉइड नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास’” (मार्क १५:३४)? इथपर्यंत येशूला क्रूसावर खिळण्याचा वृत्तांत त्याच्या शारीरिक दु:खसहनाकडे केंद्रित […]

सिरियन चर्च आणि रोम

सोळावे शतक प्रकरण ७  भारतातील ख्रिस्ती धर्म व युरोपातील ख्रिस्ती धर्म यात मूलभूत फरक आढळतो. परस्पर विरोधी मतांवरून युरोपातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये झगडे झाले तसे भारतात आढळत नाही. कारण भारतात पाश्चात्य मंडळ्यांचा एकच शत्रू होता व […]