नवम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्तजयंती एकाच दिवसासाठी पुरेशी नाही लेखक : अॅन्द्रीयस कोसनबर्गर

जगभरचे ख्रिस्ती व ख्रिस्ती नसलेले लोकही नाताळ साजरा करतात. ह्या दिवशी येशू जो मशीहा हा यहूदीयाच्या एका छोट्याश्या बेथलेहेम गावात जन्माला आला. येशूचा जन्म २५ डिसेंबरला झाला असो व नसो त्याचा जन्मदिन हा सर्व इतिहासात व जगभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो.

पण या सणाची  पूर्वतयारी काही चर्चेसमध्ये सर्व डिसेंबर महिना केली जाते, ज्याला अॅडव्हेंट असे म्हणतात. तर असा स्मरणोत्सव करून ह्या ख्रिस्तजन्माच्या सोहळ्याला पुष्टी देण्याची गरज आहे का? जर तुम्ही मत्तय व लूकाच्या शुभवर्तमानातील येशूच्या जन्माच्या वृतान्ताचा आढावा घेतला आणि योहानाच्या शुभवर्तमानाची प्रस्तावना वाचली तर तुमच्या लक्षात येईल की मशीहाच्या आगमनाची घोषणा बऱ्याच पूर्वीपासून संदेष्ट्यांनी तसेच मोशेच्या पहिल्या पाच पुस्तकांतूनही केली गेली आहे. यावरून दिसते की पहिल्या शतकातले बरेच यहूदी येशूच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत होते.

पूर्वीच्या काळापासूनची अपेक्षा

मशीहाच्या २०००वर्षांपूर्वीच्या जन्माने संपूर्ण बायबलमधल्या कथानकाचा परमोच्च बिंदू गाठला जातो. आदाम आणि हवेने खाल्लेले मनाई केलेले फळ पचण्यापूर्वीच देवाने सापाचे डोके ठेचणारे एक संतान येण्याचे अभिवचन उच्चारले (उत्पत्ती ३:१५). त्यानंतर येशूच्या जन्माच्या सुमारे  २१०० वर्षांपूर्वी देवाने एक कुटुंब निवडले – अब्राहामाचे. ते यासाठी की त्याचा पुत्र इसहाक व त्याचे वंशज (यामध्ये याकोब ज्याचे नाव इस्राएल असे बदलले गेले) हे सर्व राष्ट्रांसाठी आशीर्वादाचे साधन व्हावे.

त्यानंतर १००० वर्षांनी सुमारे ख्रिस्तपूर्व १००० मध्ये देवाने दावीद राजाला सर्व इस्राएल लोकांचा राजा होण्यासाठी निवडले. मशीहा हा फक्त अब्राहामाच्याच नव्हे तर दाविदाच्याही वंशात जन्मणार होता. दाविदाला “देवाच्या मनासारखा मनुष्य” असे म्हटले गेले. तरीही तो परिपूर्ण नव्हता, त्याने व्यभिचार केला व त्यामुळे त्याच्या राज्याच्या अखेरीस त्याचा अंत झाला. यामुळे दिसून येते की मशीहाचे अभिवचन दाविदामध्ये पूर्ण होणार नव्हते किंवा त्याचा पुत्र शलमोन याच्यातही पूर्ण होणार नव्हते. कारण त्याने परदेशी स्त्रिया बायका केल्याने दु:खद रीतीने त्याचे पतन झाले.

शेकडो वर्षे वाट पाहणे

आता परिस्थिती सुधारण्यापुर्वी ती हळूहळू अधिकच बिघडत गेली. प्रथम शलमोनाच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झाले. त्यानंतर इस्राएल (उत्तर) आणि यहूदा (दक्षिण) यांना परदेशी राजांनी पाडाव करून बंदिवासात नेले. इस्राएलाचा अश्शुरचा बंदिवास ख्रि. पू. ७२२ मध्ये झाला आणि यहूद्यांचा ख्रि.पू ६०६ ते ५८६ दरम्यान तीन भागांमध्ये घडला, ज्यामुळे इस्राएलांना शिक्षा मिळाली व ते नमवले गेले. सत्तर वर्षांच्या बंदीवासानंतर काही जण पवित्र देशात परतले. पण दाविदाच्या राज्याचे वैभवी दिवस केव्हाच निघून गेले होते.

शलमोनाचे मंदिर पुन्हा बांधले गेले (त्याला दुसरे मंदिर म्हटले गेले).  पण ह्या नव्या  पर्वामध्ये संदेष्ट्यांचा आवाज हळूहळू कमी होत गेला. त्यानंतर मक्काबी या क्रांतीकारी लोकांनी परदेशी अधिपतींपासून इस्राएलला बऱ्याच प्रमाणात राजकीय स्वातंत्र्य पुन्हा मिळवून दिले. तरी याजक लोक हे अधिकाधिक भ्रष्ट होऊ लागले. इतके की कुमरान नावाच्या एका गटाने अत्यंत  तिरस्काराने  पवित्र देशाच्या परिस्थितीकडे पाठ फिरवली आणि मृत समुद्राजवळील भागात आपली वस्ती केली ( हा कुमरान समाज डेड सी स्क्रोलसाठी प्रसिध्द आहे).

बराच काळ अपेक्षा केलेला जन्म

या सर्वांमुळे मशीहा येण्यासाठी व्यासपीठ तयार झाले. जेव्हा मत्तय आपल्या शुभवर्तमानाची सुरुवात करतो तेव्हा तो येशूचा परिचय अब्राहामाचा पुत्र, दाविदाचा पुत्र अशी सुरुवात करून देतो. तो येशूची वंशावळ चौदा पिढ्यांच्या तीन भागात सादर करतो. अब्राहाम ते दावीद, दावीद ते बंदिवास आणि बंदिवास ते येशू असे तीन भाग तो करतो. तसेच लूक दाखवतो की येशूमध्ये आदामाचा पुत्र, देवाचा पुत्र व पूर्वीच्या काळापासूनची अनेक भविष्ये यांची पूर्तता केली गेली आहे.
शेवटी योहान रेखाटतो की येशू प्रारंभापासून असलेला देवाचा शब्द येशूमध्ये देहधारी झाला.

तर हा मशीहाच्या येण्याचा साचा बायबलच्या लेखकांनी इस्राएल लोकांच्या कहाणीद्वारे व येशूच्या कहाणीद्वारे उलगडून सादर केला आहे. ज्यांनी ख्रिस्तजन्माचा संदेश कवटाळला आहे – येशू हा कुमारीपासून जन्मलेला, इस्राएलांचा उद्धार करणारा व जगाचा तारणारा आहे – त्यांच्यासाठी ह्या गोष्टीचा पुढचा भाग असा आहे की ही उद्धाराची गोष्ट स्वीकारली गेली आहे व सर्व जगापर्यंत पोचून येशूकडे येण्यासाठी पाचारण करण्याचे कार्य करीत आहे.
ख्रिस्तजन्म सोहळा हा ह्या बराच काळ वाट पाहिलेल्या मशीहाच्या जन्माची वेळ दाखवतो, पण येशूमध्ये त्याचा जन्म झाला त्या दिवसापेक्षा बरेच अधिक काही आहे.

ख्रिस्तजन्माची याहून मोठी गोष्ट

येथे आरंभी सांगितलेला अॅडव्हेंटचा भाग येतो. अनेक पंथाच्या परंपरांनी  ख्रिस्तजयंतीची (नाताळाची) वाट पाहण्याचे निरनिराळे मार्ग प्रगत केले. त्यामागची धारणाही चांगली आहे: येशूचा जन्म हा काही एका पोकळीत झाला नाही. त्याचे येणे हे अनेक शतके, सहस्त्र वर्षे येणारा मशीहा व जगाच्या तारणारा याची वाट पाहण्याची परिपूर्ती होती.

देवाने त्याच्या लोकांना अभिवचन दिलेली ही मोठी गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला लूकाने दिलेल्या नाताळाच्या गोष्टीच्या वृत्तांतात दूताने केलेली घोषणा समजते. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, “भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो; ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे” (लूक २:१०-११).

हे  सर्वसामान्य बालक नाही. आणि हा सर्वसामान्य जन्मही नाही. हे खुद्द देवाचे मानवी देहामध्ये येणे आहे. जगाच्या इतिहासामध्ये हे सर्वात महत्त्वाचे आगमन आहे. आपल्या लोकांची पाप, दु:ख, नाश, आणि मृत्यू यापासून सुटका करण्याची देवाच्या शुभवर्तमानाची जगातील ही सुरुवात आहे. आणि हे फक्त एका दिवसाच्या उत्सवापुरते मर्यादित ठेवून त्याचा गौरव पुरेसा दिसत नाही.

ख्रिस्तजयंतीच्या एका दिवसाच्या आठवणीला एक महिन्याची पूर्वतयारी साजेशी आहे. देव स्वत: त्याच्या लोकांना त्यांच्या पापापासून सोडवण्यासाठी आला  ह्या गोष्टीमुळे आपण सर्व अनंतकाळ नवल करू. आणि याची सुरुवात अशा  पूर्वतयारीने करणे हे उचित आहे.

 

 

 

 

Previous Article

धडा ३३. १ योहान ५:२०,२१ स्टीफन विल्यम्स

Next Article

तुमच्या मुलांना तुम्ही कोणत्या झाडाबद्दल सांगणार? लेखक : पॉल ट्रीप

You might be interested in …

तुम्ही विश्वास ठेऊ शकाल अशा सात लबाड्या मॅट रीगन

एका आजारी मुलाला त्याचे आजोबा प्रिन्सेस ब्राईड हे गोष्टीचे पुस्तक वाचून दाखवत होते. त्यामध्ये ह्या राजकन्येवर अन्यायामागून अन्याय घडत जातात व एका दुष्ट राजपुत्राशी लग्न करण्याची बळजबरी तिच्यावर केली जाते याचे वर्णन होते. तो मुलगा […]

नंदनवनात कुरकुर

असमाधानावर विजय कसा मिळवावा                                                                                                                                                                  लेखक : स्कॉट हबर्ड १४ जून २००० हा दिवस माझ्या स्मरणातून कधीही पुसणार नाही. कारण त्यापूर्वीची दोन वर्षे मी असमाधान, शंका आणि रोगट आत्मनिरीक्षण यांच्या आध्यात्मिक शुष्क भूमीत भरकटत होतो. […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ (१७२६ ते १७९७)

संकलन – क्रॉसी उर्टेकर  लेखांक ४  कार्यपद्धती –  येशूने वापरलेल्या पद्धतीप्रमाणे श्वार्टझ् दोघादोघांना जोडीने सुवार्ताकार्याच्या कामगिरीवर पाठवत असे. त्या ठिकाणी सभा भरवून उपदेश केल्यावर ते सल्लामसलत करीत. तेथे त्यांचे आदराने स्वागत होऊन त्यांनी आपल्या गावी […]