जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देव एका अपरिचित गावात वाढला डेविड मॅथिस

जुन्या करारात नाझरेथ गावाचा कुठेच उल्लेख नाही.

सर्व वंशावळ्या व ऐतिहासिक वृत्तांताचा विचार करा आणि आज तरी आपल्याला दिसते की त्यामध्ये जरी देश, भूगोल आणि जागा याबद्दल काळजीपूर्वक लक्ष दिले आहे तरी ह्या जुन्या वसाहतीचा व त्याचा विभाग अप्रसिद्ध असून त्याचा एकदाही उल्लेख झालेला नाही.

नाझरेथ हे एक दुर्लक्षित, मामुली गाव होते, गालीलकर सुद्धा तिथे विशेष फिरकत नसत. जेव्हा मनात कपट नसलेल्या नथानिएलने एका मित्राला येशूसबंधी विचारले तेव्हा त्याने पहिल्या शतकातील प्रचलित असलेली प्रतिक्रियाच व्यक्त केली  “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” योहान १:४६

तरी या निद्रिस्त गावात त्याच्या वडिलांची व आईची गोष्ट सुरू झाली आणि परतली. ते नाझरेथकर होते. आणि लवकरच त्याचे शत्रू आणि भुतेही त्याच्या या पात्रतेवर धूळ फेकणार होती.
“नाझरेथचा येशू”

तीस वर्षे अप्रसिद्ध

येशूचे आईवडील बेथलेहेममध्ये नावनिशीसाठी प्रवासी म्हणून आले. त्याचा जन्म त्या सन्मान्य बेथलेहेमात झाला. पण ते तेथे राहणार नव्हते. ते आपल्या देशी परतले (मत्तय २:२३). “नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नासरेथ येथे परत गेले (लूक २:३९).

तसेच १२व्या वर्षीच्या त्याच्या मंदिराच्या संस्मरणीय भेटीनंतर लूक आपल्याला सांगतो की तो आपल्या आईबापांसोबत “यरूशलेमेतून खाली गेला.” आणि तो खाली गेला हे निश्चित फक्त भौगोलिकदृष्ट्या नाही तर सामाजिकदृष्ट्या सुद्धा. आणि देहधारणामध्ये स्वत:ला रिते करण्याच्या नमुन्यामध्ये देवाचा पुत्र “त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला” (लूक २:५१).

नव्या कराराबाहेरच्या संदर्भात पुरातन नाझरेथ गावाबद्दल फारच कमी माहिती मिळते – कारण ते एक छोटेसे गाव होते. पहिल्या शतकातील प्रमुख व्यक्ती कधी त्याच्याबद्दल बोलल्या नाहीत किंवा त्याची माहिती जपून ठेवण्याइतकी ठळक प्रसिद्धी त्याला मिळू शकली नाही.

तरीही देवाच्या सुज्ञ आणि जगाला लाजवणाऱ्या आपल्या पुत्राच्या योजनेमध्ये त्याच्या नम्रतेचा व आईबापांच्या अधीन असण्याच्या भाग असा होता की जेथे देशाचे खूप कार्य घडत असे ते शहरातील मोठे मंदिर सोडून तो त्या छोट्याशा नाझरेथ गावी खाली जाऊन तीस वर्षेपर्यंत एक अप्रसिध्द जीवन जगणार होता. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध होईपर्यंत तो येथेच असणार होता (मत्तय ४:१३). आणि नाजरेथ हे जरी आडवळणी असलेले, यरूशलेमापेक्षा साध्या राहणीचे खेडे असले तरी त्यापेक्षा त्याच्या उरलेल्या सर्व जीवनात नाझरेथ हा एक कलंक म्हणून त्याला चिकटून राहणार होता.

नाझरेथातून काही उत्तम निघू शकते काय?

“ते नाझरेथ येथे आले.”

यहूदी लोकांमध्ये नाझरेथची प्रसिद्धी फारच कमी होतीच पण इस्राएलच्या बाहेर ह्या गावाचे नावही लोकांना ठाऊक नव्हते. यामुळे प्रत्येक शुभवर्तमानाच्या लेखकाला नाझरेथचा प्रथम उल्लेख करताना – गालीलातील गाव – असे स्पष्टीकरण करावे लागले (मत्तय २:२३; मार्क १:९, लूक १:२६).

आज आपण बेथलेहेमची गाणी गातो. ते यरूशलेमपेक्षा छोटे असले तरी ते शहर होते, त्याला इतिहास होता व “दाविदाचे नगर” म्हटले जात होते. नाझरेथ? नाझरेथातून काही उत्तम निघू शकते काय?

आपल्या जगातील जीवनात येशूने स्वत:ला “नाझरेथकर येशू” असे म्हणवून घेतले नाही. त्याच्या शिष्यांनी क्वचितच त्याला तसे म्हटले (योहान १:४५). प्रामुख्याने त्याला अपरिचित असणारा समुदाय (मत्तय २१:११, २६:७१; मार्क १०:४७; लूक १८:३७), त्याचे शत्रू  आणि भुते (मार्क १:२४; लूक ४:३४), खोटे साक्षीदार (प्रेषित ६:१४) आणि त्याला धरून देणाऱ्यासोबत आलेले सैनिक यांनी त्याला तसे म्हटले. जरी अनेकांनी त्याच्या गावामुळे त्याला तुच्छ लेखले असले तरी इतर नाझरेथकरांनी लवकरच त्याला सोडून दिले, गावाबाहेर काढले आणि त्याला कड्यावरून ढकलण्याची धमकी दिली (लूक ४:२८-३०).

जेव्हा त्याच्या शत्रूंच्या ओठावर त्याचे नाव असेल आणि त्यांना त्याची मानहानी करायची आहे तेव्हा ते त्याला “नाझरेथचा येशू” असे म्हणण्याची अपेक्षा करा. आणि जर नथानिएलचे उद्गार, व शत्रू अन् भुतांनी ओकलेले गरळ पुरेसे नसेल तर पिलाताने त्याचा उपहास करताना लेख लिहिला  “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” (योहान १९:१९). त्याने स्वत:ला मरणापर्यंत लीन केले – वधस्तंभावरील मरणापर्यंत.

नाझरेथचा येशू

नाझरेथचे वैभव

पण नाझरेथची कहाणी या मानहानीत संपत नाही. त्याच्या पित्याला पतन झालेल्या लोकांचा उद्धार करणे योग्य वाटलेच पण जेव्हा त्याने त्या नाझरेथकराला मरणातून उठवले तेव्हा त्या क्षुद्र गावालाही वर आणले. – फक्त त्याच्या शरमेतून नाही तर त्याला अतुलनीय गौरव दिले.

प्रथम ते कबरेपाशी असलेल्या देवदूताकडून आले: “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे तो येथे नाही” (मार्क १६:६). गेली तीन दशके पुढे येत असलेल्या वधस्तंभामुळे नाझरेथकर हे शीर्षक एका कडू चवीसारखे होते. आता सर्व काही उलटले गेले होते. आत्म्याद्वारे झालेल्या रूपांतराने पेत्राची चव आता बदलून गेली व सेवेमध्ये आता तेच शीर्षक  तो वापरू लागला. “वधस्तंभावर गेलेला, पुनरुत्थित येशू हा दुसरा कोणी नसून नाझरेथकर” च होता (प्रेषित २:२२). पेत्राने लंगड्या मनुष्याला “नाझरेथकर येशूच्या नावाने” बरे केले (प्रेषित ३:६). आणि जे सर्व ऐकत होते त्यांना हे नाव घोषित केले (पेषित ४:१०). कैसरिया येथे विदेशी लोकांना त्याने देवाचा अभिषिक्त “नासोरी येशू”  याचीच सुवार्ता सांगितली (प्रेषित १०:३८).

मग तार्ससच्या पौलाने कबूल केले की “मलाही खरोखर वाटत असे की, नासोरी येशूच्या नावाविरुद्ध पुष्कळ गोष्टी कराव्यात” (प्रेषित २६:९). येथे खुद्द येशूने हे मानाचे शीर्षक स्वत:ची ओळख करून देताना लावले  (प्रेषित २२ :८).

देव नाझरेथ येथे वाढला

देव स्वत: गालीलातील एका अपरिचित गावात वाढला. तो यरूशलेमातून खाली आला. तो स्वत:ला नम्र करत कबरेकडे खाली गेला. आणि आपल्या विजयासोबत त्याने नाझरेथला वर आणले. तसे आपल्यातले कित्येक जण आपल्या बालिश कल्पनेत आपापल्या नाझरेथविषयी एक प्रकारचा मनात अवमान बाळगतो? आपल्या सैराट अभिमानामध्ये आपण अशा उंचीवर पोंचलो आहोत का की आपल्या साध्या सुरुवातीचा आपल्याला विसर पडला आहे? पण देव आपल्या नाझरेथचे काय करत असेल? आपल्याला जे दिवस आणि दशके व्यर्थ वाटली त्यांचा तो कसा उद्धार करत असेल?

आपल्या प्रभूने पूर्ण देव व परिपूर्ण मानव असताना मोठ्या शहराकडे न जाता किंवा जेथे मोठ्या कारवाया होतात ते ठिकाण निवडले नाही हे किती लक्षणीय आहे. त्याऐवजी त्याने आपले जवळजवळ सर्व आयुष्य व सार्वजनिक सेवा यरूशलेमसाठी राखून न ठेवता स्वत:ला नम्रतेने गालीलमधील लोकांनी टाकलेल्या नाझरेथमध्ये ठेवले.

नथानिएलच्या प्रश्नाचे उत्तर एक जबरदस्त “होय” असेच आहे. आणि फक्त उत्तमच नाही, सर्वात उत्तम आणि महान.  कारण आपल्या प्रभूला आपल्याला वाटणार नाही अशा ठिकाणातून त्याचे उत्तम ते निर्माण करायला आवडते. जेव्हा तो आपल्या कहाणीच्या अपरिचित ठिकाणातून त्याचे निवडलेले मार्ग आणि सर्वोत्तम चांगले बाहेर काढतो तेव्हा आपल्याला नवल वाटू नये.

 

Previous Article

उत्तर न मिळालेल्या प्रत्येक प्रार्थनेसाठी ग्रेग मोर्स

Next Article

देवावरआशा ठेवण्याचे धाडस करा मार्क रोगॉप

You might be interested in …

 धर्मजागृतीमध्ये नक्की काय घडले?

   संकलन – लीना विल्यम्स प्रोटेस्टंट धर्मजागृती हे रोमन कॅथोलिक चर्चच्या संपूर्ण ताबा ठेवणाऱ्या एकाधिकारी व दुरुपयोगी राजकारभाराविरुध्द  युरोपमध्ये दूरवर (व्यापक) पसरलेल्या ईश्वर परिज्ञानाचे (तत्त्वाचे) बंड होय. जर्मनीमध्ये मार्टिन लूथर,  स्वित्झर्लंडमध्ये अलरीच झ्विन्गली आणि फ्रान्समध्ये […]

गर्वाची सात मार्मिक लक्षणे फेबियन हार्फोर्ड

गर्व तुम्हाला ठार करेल. कायमसाठी. गर्व हे असे पाप आहे की ते तुम्हाला आपल्या तारणाऱ्याकडे आक्रोश करण्यापासून दूर ठेवते. ज्यांना आपण निरोगी आहोत असे वाटते ते डॉक्टरांकडे पाहणारही नाहीत. गर्व हा जितका गंभीर आहे तितकेच […]

तू माझा त्याग का केलास?

लेखक: डॉनल्ड मॅकलॉड नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, ‘एलोई, एलोई, लमा सबखथनी,’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?’ मार्क १५:३४. इथपर्यंत येशूला क्रूसावर खिळण्याचा वृत्तांत त्याच्या शारीरिक दु:खसहनाकडे केंद्रित […]