Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 20, 2019 in जीवन प्रकाश

देवावरआशा ठेवण्याचे धाडस करा                                                     मार्क रोगॉप

देवावरआशा ठेवण्याचे धाडस करा मार्क रोगॉप

ह्या जगामध्ये आपण आक्रोश करतच जन्माला येतो. जरी आपल्या कोणालाच तो क्षण आठवत नाही तरी आपल्या मातेच्या उदरातली ते उबदार आणि सुरक्षित सीमा सोडताना आपण एक मोठा विरोध करत ते मोठे रडणे करतो. हंबरडा फोडतच आपण आगमन करतो. रडणे हे मानवी आहे.

तरीही निर्मित रचनेमध्ये दु:ख प्रगट करणारे फक्त आपणच नाहीत. प्रेषित पौल म्हणतो की संपूर्ण सृष्टी कण्हत आहे (रोम ८:२२). आदामाच्या पतनाबरोबर पापाचे भग्न परिणाम सृष्टीलाही लागू झाले. जगात सर्व काही बरोबर नाही ही आठवण देणारी अखेरची गोष्ट म्हणजे मृत्यू. पण आणखी इतर उदाहरणेही आहेत: कॅन्सर, व्यसन, अपयशी विवाह, नातेसंबंधातील संघर्ष, एकटेपणा, मारहाण इ.

जन्मानंतर आपले रडायचे थांबत नाही. ते चालूच राहते कारण जग हे भंग पावले आहे. अश्रू आणि दु:ख हे मानवी जीवनाचा भाग असले तरी या भग्न जगातून चालत असताना एक सतत दुर्लक्षित असलेली  प्रार्थनेची भाषा आहे : विलाप.

विलाप काय आहे?

विलाप आणि रडणे हे समान नाही. ते वेगळे आहे. आणि ते एकमेवपणे ख्रिस्ती आहे.

बायबलमध्ये दु:खाची गाणी ठिकठिकाणी आहेत. स्तोत्रातील एक तृतीयांश स्तोत्रे ही विलापगीते आहेत. विलापगीताचे पुस्तक हे यरूशलेमच्या नाशामुळे रडत आहे. येशूने आपल्या जीवनाच्या शेवटच्या तासांमध्ये विलाप केला .

पण विलाप हा रडण्यापेक्षा वेगळा आहे कारण तो एक प्रार्थनेचा प्रकार आहे. तो फक्त दु:ख व्यक्त करणे किंवा भावना प्रकट करून देण्यापेक्षा काही अधिक आहे. विलाप हा देवाला वेदनेविषयी सांगतो. आणि त्याला एकच हेतू आहे: भरवसा. ते देवाने दिलेले आमंत्रण आहे. आपली भीती, निराशा, दु:ख त्याच्यापुढे ओतून देऊन देवावरील आपल्या आत्मविश्वासात चैतन्य आणण्याचा हेतू.

विलापाचे  चार  घटक

स्तोत्र १३ मध्ये दाखवल्यानुसार बहुतेक विलापामध्ये चार आवश्यक घटक असतात.

देवाकडे वळा

बहुतेक विलाप हा देवाला हाक मारून सुरवात करतो. “हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार” (स्तोत्र १३:१)? मुद्दा हा आहे की दु:खामध्ये असलेली व्यक्ती जे घडत आहे त्यासंबंधी देवाशी बोलण्याचे निवडते.

 

तुमच्या तक्रारी आणा

प्रत्येक विलापामध्ये काहीतरी तक्रार असतेच. “ मी कोठवर आपल्या मनात बेत योजत राहावे आणि दिवसभर हृदयात दुःख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार” (स्तोत्र १३:२)? पापी वृत्तीने आपला राग ओकण्याऐवजी, बायबलनुसार असलेला विलाप हा नम्रतेने आपल्या जिवाला झालेली  वेदना व निराशा कबूल करतो.

धैर्याने मदत मागा

वेदनेत असताना देवाची मदत मागणे ही विश्वासाची कृती आहे. “हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे पाहा, मला उत्तर दे; मला मृत्युनिद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर; नाहीतर ‘मी ह्याला जिंकले’ असे माझा वैरी म्हणेल; आणि मी ढळलो असता माझे शत्रू उल्लासतील” (स्तोत्र १३: ३-४).
प्रकट न केलेले दु:ख हे एक मरणदायी शांतता निर्माण करून आपल्याला निराशेत लोटते (पुढे काहीच आशा नाही) किंवा आपल्याला परिस्थिती नाकारायला लावते (सर्वकाही ठीक होईल). पण विलाप हा आपण मदत मागत असताना आपल्याला देवाच्या अभिवचनावर आशा धरायला, धैर्य धरण्यास आमंत्रण देतो.

देवावर भरवसा ठेवण्याची निवड करा

आपल्या विलापामध्ये  गाठायचे हेच अंतिम स्थळ आहे. सर्व रस्ते इथेच समाप्त होतात. “ मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे; माझे हृदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्लासेल. परमेश्वराने माझ्यावर फार उपकार केले आहेत, म्हणून मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन” (स्तोत्र १३:५,६).

आपल्या दु:खाच्या निरनिराळ्या पातळ्यांवर आपण जेव्हा भग्न जीवनातून मार्गक्रमण करत असतो तेव्हा हीच प्रार्थनेची भाषा आपल्याला आपला देवावरचा भरवसा संजीवित करायला प्रेरणा देते. पापाने बरबटलेल्या जगात राहत असताना विलाप ही देवाच्या लोकांची प्रार्थनेची भाषा आहे. त्याच्या सार्वभौम काळजीमध्ये आपली आशा पल्लवित करताना आपण आपली दु:खे देवाला अशा रीतीने सांगत असतो.

विलाप हा ख्रिस्ती का आहे?

विलापाची सवय ही एखादी व्यक्ती करू शकणारी सर्वात देवमान्य कृती आहे. कठीण जीवन आणि देवाच्या सार्वभौमत्वावरचा विश्वास ह्या दोन टोकांमध्ये विलाप ही जिवंत लोकांची भाषा आहे. जे लोक येशू येणार आणि सर्व यथास्थित करणार याची वाट पाहत आहेत त्यांच्या प्रार्थनेचा हा मसूदा आहे.

ख्रिस्ती लोक फक्त दु:ख करत बसत नाहीत ते देवाने या दु:खाचा शेवट करावा यासाठी अधीरतेने वाट पाहतात.

विलापाच्या प्रार्थनेला विश्वासाची जोड असते. पापी वृत्तीने रागावण्यापेक्षा किंवा कटू होण्याऐवजी देवाशी बोलण्यासाठी बायबलमधून मिळालेली असलेली खात्री लागते.  तुमच्या जिवाचे गोंधळलेले संघर्ष त्याच्यापुढे ठेऊन देवाला पुन्हा पुन्हा मदतीची विनवणी करण्यास देवाच्या शिक्षणात मुळावले असणे अपेक्षित आहे. जेव्हा दु:ख तुम्हाला देवापासून दूर पळायचा मोह घालते तेव्हा विलाप देवाकडे वळतो.

विलाप हा बायबलच्या भिंगातून जगाचे स्पष्टीकरण करतो. ख्रिस्ती लोक विलाप करतात कारण देवाच्या योजनेचा मोठा भाग आपल्याला माहीत आहे:  निर्मिती, पतन, उध्दार आणि पुन:स्थापना. सर्व विलापांचे उगम /मूळ आपल्याला माहीत आहे : पाप. आणि प्रगटीकरणामध्ये आपण सर्व विलापांचा शेवट होणार आहे यासबंधी वाचतो. “‘तो’ त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रू पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट हे नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या” (प्रगटी२१:४).

यामुळे ख्रिस्ती जन जगाच्या भग्नतेसाठीच दु:ख करत नाहीत तर आपण जेव्हा सर्व रडणे संपेल त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आपण विचारतो, “हे परमेश्वरा, तू मला कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू माझ्यापासून आपले मुख कोठवर लपवणार?” (स्तोत्र १३:१) कोणीही रडू शकते. पण ख्रिस्ती लोकच विश्वासूपणे विलाप करू शकतात.

विलाप करण्यास शिका

जीवन हे दु:खांनी भरलेले असल्याने आणि बायबल हे देवाच्या योजनेसंबधी स्पष्ट असल्याने ख्रिस्ती लोकांनी विलाप करायलाच हवा. आपण देवाजवळ आपली दु:खे आणि संघर्ष यासंबंधी नियमितपणे बोलले पाहिजे. ख्रिस्ती जनांनी विलाप करण्याचे शिकायला हवे.

ह्याची सुरुवात करण्यासाठी स्तोत्रातील विलाप अधिक नियमितपणे वाचायला हवा. स्तोत्र १०, १३, २२ आणि ७७ ही वाचून सुरवात करा. वैयक्तिक दु:खे आणि सामायिक यातना यासाठी तुम्हाला विलापाची स्तोत्रे सापडतील. काही विलाप हे पश्चात्तापासाठी आहेत तर काही जेव्हा तुम्ही न्यायासाठी उत्सुकतेने अपेक्षा करतात त्यासाठी आहेत. जसजसे तुम्ही ही स्तोत्रे वाचत जाल तसे यातील काही विधाने तुमची स्वत:ची बनतील. जे शब्द तुम्ही वाचत आहात ते तुमच्याशी किती जुळते आहेत हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विलाप हे लवकरच वैयक्तिक बनतात.

दुसरा प्रकार म्हणजे एखाद्या विलापाच्या स्तोत्रांचा अभ्यास करायचा आणि त्यावेळी मी वर दिलेले चारही मुद्दे त्यामध्ये शोधायचे: देवाकडे वळणे, तुमच्या तक्रारी आणणे, धैर्याने मागणे, आणि भरवसा ठेवण्याचे निवडणे. ह्या प्रत्येक घटकाची उदाहरणे तुम्हाला मिळू लागल्यावर तुमच्या स्वत:चे विलाप लिहिण्याचा विचार करा. देवाला तुमचा झगडा सांगत असताना विषयाच्या ओघाचे तुम्हाला आकलन होते का ते पाहा. लक्षात घ्या की प्रत्येक स्तोत्र हे संघर्षाला तोंड देणाऱ्या खऱ्याखुऱ्या व्यक्तीने लिहिले आहे. तुमचा विलाप लिहिणे हे बायबलमधील सिद्धांत आणि खऱ्याखुऱ्या भावना यांचा सुंदर मिलाफ करते.

येशू पुन्हा येईपर्यंत अश्रू हे जगाचे चिन्ह राहीलच. मुले जन्माला येत राहतील आणि त्यांचा पहिला आक्रोश हा भग्न जगामध्ये येण्याची घोषणा असेल. रडणे हे मानवी आहे पण विलाप हा ख्रिस्ती आहे.