Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 2, 2021 in जीवन प्रकाश

आत्म्याचे फळ ममता /दयाळूपणा

आत्म्याचे फळ ममता /दयाळूपणा

स्टीफन व्हीटमर

ममता किंवा दयाळूपणाचा (kindness) दर्जा कमी केला जातो.  दयाळूपणा/ममता म्हणजे काहीतरी आनंददायी, सुंदर असून जसे काही त्याचा संबंध नेहमी हसतमुख असण्याशी आहे अशी आपली धारणा असते. अशा व्यक्तीचे सर्वांशी जमते, ती कुणाला दुखवत नाही असा त्यामागे अर्थ असतो. हा एक नेहमीचा सामान्य गुण आहे असे आपल्याला वाटते.

पण बायबलचे दयाळूपणा/ममता  संबंधीचे चित्र अगदी वेगळे आणि लक्षवेधक आहे.

ममता/दयाळूपणा हा दैवी गुण आहे

जेव्हा आपण खरा प्रेषित असल्याचा दावा पौलाने करिंथ येथील मंडळीला केला तेव्हा त्यासाठी त्याने त्याने शुभवर्तमानासाठी जी जी संकटे सोसली होती त्याची तपशीलवार यादी दिली. आणि ही दु:खे सहन करताना देवाने त्याला जे आंतरिक आध्यात्मिक जीवन दिले व देवाने त्याच्या जीवनात जे आध्यात्मिक फळ निर्माण केले त्याबद्दल तो सांगतो (२ करिंथ ६:१-१३). आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या आध्यात्मिक फळामध्ये दयाळूपणा / ममतेचा उल्लेख आहे. “मी प्रेषित आहे याचा पुरावा तुम्हाला हवाय का?” आणि उत्तरादाखल तो म्हणतो “ हा इथे आहे. मी दयाळू आहे”

खरी ममता आत्म्याद्वारे उत्पन्न केली जाते (गलती ५:२२).  देवाकडून मिळालेले आणि इतरांसाठी असलेले ते उदार ह्र्दय आहे – मग त्यासाठी त्यांची लायकी नसली आणि त्यांनी आपली परतफेड केली नाही तरी. देव अशाच रीतीने आपल्याशी दयाळूपणे वागतो. “ देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे” (रोम. २:४) याचा अर्थ ते अजून त्याच्याकडे वळले नाहीत असा आहे आणि ते अजूनही ते त्याचे शत्रू आहेत.

यामुळे आपण आपल्या शत्रूवर प्रीती करून  देवाच्या  दयाळूपणाचे अनुकरण करतो. येशूने म्हटले, “तुम्ही तर आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा” (लूक ६:३५,३६). आपला दयाळूपणा आपल्या पित्याचे ह्रदय प्रकट करतो. “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा” (इफिस ४:३२). दयाळूपणा कित्येक वेळा फार आनंद देणारा नसतो. खरं तर कधी तो डोक्यावर आघात केल्यासारखा वाटतो. “नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन” (स्तोत्र १४१:५). येशू परूश्यांना सापाची पिल्ले असे म्हणाला. हे ऐकायला चांगले वाटत नाही पण ते दयाळूपणाचे होते कारण तो त्यांचे पाप उघड करत होता. दयाळू सर्जन  हा तुमच्या कर्करोगामध्ये खोलवर कापतो.

दयाळूपणा हा सामर्थ्यशाली असतो

रोझारिया बटरफिल्ड ही पूर्वी एक लीस्बीयन (समलिंगी संभोगी स्त्री) होती आणि नंतर ती एक समर्पित ख्रिस्ती झाली. आपल्या आठवणी लिहिताना ती म्हणते, “मी ख्रिस्ती नव्हते तेव्हा सुवार्तावादी ख्रिस्ती हे फारसे विचारी नसतात, ते इतरांना दोषी ठरवतात, तिरस्कार  करतात, आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या बाबींची त्यांना भीती वाटते असा प्रभाव माझ्यावर पडला होता.” त्यावेळी तिने वर्तमानपत्रात सुवार्तावादी ख्रिस्ती लोकांवर एक टीकात्मक लेख प्रसिध्द केला. त्यानंतर तिला दोन टोकांचे असंख्य प्रतिसाद मिळाले. तिने तिच्या डेस्कवर दोन बॉक्स ठेवले. आणि त्या प्रतिसादांची छाननी केली. एकात तिरस्करणीय पत्रे तर दुसऱ्यात तिला पुष्टी देणारी पत्रे.

नंतर तिला एका स्थानिक पाळकांकडून एक दोन पानी प्रतिसाद मिळाला. “ते एक दयाळू आणि पुसतास करणारे पत्र होते” ती म्हणते. “त्यामध्ये एक कळकळ आणि सौजन्य होते व सोबत शोध घेणारे प्रश्नही होते.”  ते पत्र कोणत्या बॉक्स मध्ये टाकावे हे तिला कळेना म्हणून ते सात दिवस तिच्या डेस्कवरच पडून होते. “ते मला मिळालेले विरोध  करणारे तरी अत्यंत दयाळू असे एकमेव पत्र होते.” त्याचा सूर असा दाखवत होता की हा लेखक तिच्या विरोधात नव्हता.

अखेरीस तिने त्या पाळकाशी संपर्क साधला आणि त्याच्याशी व त्याच्या पत्नीशी मैत्री जोडली. “ते माझ्याशी अशा रीतीने बोलत असत की ते मला खोडून टाकत आहेत असे मला कधीच वाटले नाही.” ही त्यांची मैत्री तिला विश्वासात आणण्याच्या  मार्गावर एक महत्त्वाचा दुवा ठरली.

आपण दयाळू आहोत का?

बायबलमधील साक्ष आणि रोझारियाची साक्ष यामुळे आपण या बाबतीत कसे आहोत असा विचार करायला भाग पडावे. आपल्याभोवती जे आहेत त्यांच्याशी आपला उदारपणे वागण्याकडे कल असतो की आपण त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल आपण निष्ठूरपणे बोलतो?

आपल्यापैकी काही जण टॅलेंट शो किंवा स्पोर्ट पाहताना त्यांच्या चुकांवर, दिसण्यावर ताशेरे झोडण्याची  संधी सोडत नाही. आपले ताशेरे हेच आपली करमणूक होऊन बसतात. आपल्यातील काही इतर जणांसाठी रोज वाहनाने प्रवास करणे ही दयाळूपणासाठी मोठी कसोटी असते. मी इतर वाहन चालकांकडे उदारपणे पाहतो का? आता जो मला अडवून, ओलांडून गेला आणि आता जो सारखा हॉर्न वाहवून मला वेग वाढवायला लावतोय त्याच्याशीही?

आपल्यापैकी काही जणांना मान्य करावे लागेल की आपण आपली शा‍ब्दिक सुरी क्रूर टोमणे मारून बऱ्याच वेळा इतरांमध्ये खुपसतो. आपल्या बोलण्याचा तसा अर्थ नसला तरी  ते बोलून आपल्या आपण इतरांना खोलवर इजा करतो.

दयाळूपणा ही छोटी गोष्ट आहे. पण ती आपल्या जीवनात आणि आपल्या सभोवती असलेल्यांच्या जीवनात अद्भुत फळ देते. “जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात”  (नीती २१:२१)

जेव्हा आपण पवित्र आत्म्याला विचारतो की माझ्यामध्ये दयाळू ह्रदय उत्पन्न कर आणि ते माझ्या दयाळू मुखातून वाहू दे तेव्हा दैवी कामासाठी आपण स्वत:ला खुले करतो.