Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 9, 2021 in जीवन प्रकाश

देव तुम्हाला एकेक दिवस राखतो

देव तुम्हाला एकेक दिवस राखतो

वनिथा रिस्नर

गेल्या वर्षाच्या आरंभी मी तयार होत असताना माझे हात अचानक एकदमच गळून गेले.

मला स्वत:हून माझे कपडेही बदलता येईनात. मी थकून गेले होते आणि तेव्हा सकाळचे नऊ पण वाजले नव्हते. मला पोलिओनंतरच्या परिणामांचा त्रास होतो. आणि कोणत्या दिवशी कोणती नवी वेदना आता मला ग्रासून टाकेल याची मला कधी खात्री नसते. असेच जगात राहायला मला नको होते. आजचा दिवस माझ्यासाठी काय घेऊन येणार होता?

मी प्रभूला हाक मारली आणि त्याला म्हटले, हे सगळे मला अन्यायकारक वाटते. शेवटी मी त्याला सांगून टाकले, “आता आयुष्यभर असे जगणे मला शक्य नाही. मला हे करताच येणार नाही.” मला निराश वाटले, राग आला आणि दु:खाने मी भारावून गेले. मला कळत होते की हे विचार देवविरहित आहेत, पण मला खरंच असंच वाटत होतं. अशा शारीरिक संघर्षासोबत माझं उरलेलं आयुष्य व्यतीत करणं ही कल्पनाच मला सहन होईना.

त्यामध्ये

माझ्या विलापानंतर मी शांत झाले. मला जे म्हणायचं ते सर्व मी बोलून घेतलं होतं. मग मी वाट पाहू लागले.  देवाकडून काही प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा मी करीत होते की काय हे मला माहीत नाही, पण मला ठाऊक होते की मी शांत राहून ऐकण्याची गरज आहे.

नंतर माझ्या मनात विचार आला; सर्व जीवनभर नव्हे पण आजचा दिवस तरी मला काढता येईल. ह्या विचाराने मला जरा शांत वाटले. माझी परिस्थिती बदलली नव्हती पण मला खूपच वेगळे वाटू लागले. आजच्या ह्या अगदी सूक्ष्म काळावर मी लक्ष केंद्रित करू शकत होते. आजचा दिवस पार करण्यासारखा होता. माझ्या उरलेल्या आयुष्यापेक्षा आजचा दिवस भीतीदायक नव्हता.

त्यानंतर मला खूपच शांत वाटले. मग मी विचार करू लागले; हे विचार देवाच्या विचारांना धरून आहेत का? देवाच्या स्वभावाला धरून आहेत का? बायबलमधील काही वचने यावर उजेड पाडतात का?

रोजची भाकर

मला प्रभूने शिकवलेली प्रार्थना आठवली, “आमची रोजची भाकर आज आम्हांस दे” (मत्तय ६:११). देव आपल्या गरजा आज पुरवील. त्याची कृपा आजसाठी उपलब्ध आहे. आपल्याला भविष्याची काळजी करायची नाही, उद्याची पण नाही, कारण  “ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे” (मत्तय ६:३४).

भविष्य हे देवाच्या हातात आहे. उद्याचा दिवस कदाचित आनंद आणि आश्चर्यही आणू शकेल (स्तोत्र ३०:५).  कारण  त्याची दया रोज सकाळी नवी होते आणि  देवाला काहीच अशक्य होणार नाही” (विलापगीत ३:२२-२३; लूक १:३७).

सारफथ येथील विधवेला जितके दिवस गरज होती तितके दिवस दररोज पीठ आणि तेलाचा आश्चर्यकारक रीतीने पुरवठा केला गेला (१ राजे १७:१४-१६). हिज्कीया राजाने प्रार्थना केली आणि १८५,००० अश्शूरी सैन्याचा प्रभूच्या दूताने संहार केला –  इस्रायेली लढाईला गेलेले नसताना. गीदोनाने मिद्यानी लोकांच्या अफाट सैन्याचा केवळ तीनशे लोकांनिशी पराभव केला (शास्ते ७:१-२५). मानवी दृष्टीने यांपैकी कोणालाच त्यांच्या परिस्थितीतून सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. आणि बहुधा आपल्यालाही दिसत नसतो. पण देवाला जे विश्वास बाळगतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे” (मार्क ९:२३).

देवाने मला खात्री दिली की मी भविष्याविषयी निराश होण्याची गरज नाही. पण मी त्याच्यावर भरवसा ठेवला तर परिस्थिती बदलेल असे काही आश्वासन तो देत नव्हता. मी आजचा दिवस निभावून जाण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवायला आणि उद्यासाठी त्याच्यावर भरवसा ठेवायला तो मला सांगत होता.

आनंद करा, प्रार्थना करा, उपकार माना

पण आज, आज मी कसे निभावणार? मी विचारात पडले. आजचा दिवस अजूनही त्याच्या सर्व अडचणींसह माझ्यापुढे उभा आहे.  “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते” (२ करिंथ १२:९-१०) या वचनाची मला आठवण करून देण्यात आली. मी त्याची वाट पाहण्याची गरज होती आणि तो मला शक्ती देऊन माझ्या गरजा पुरवणार होता (यशया ४०:३०,३१; फिलीपै. ४:१९). “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो” (स्तोत्र ३४:१८). मी जर देवाजवळ गेले तर  तो माझ्याजवळ येईल” (याकोब ४:८).

आजच्या दिवसातून जात असताना देव जे करत होता त्यामध्ये मी आनंद करण्याची, निरंतर प्रार्थना करण्याची आणि सर्व प्रसंगी उपकारस्तुती करण्याची गरज आहे – हे समजून की ही देवाची माझ्यासाठी इच्छा आहे (१ थेस्स. ५:१६-१८).

एकेक श्वास

परीक्षेमध्ये आनंद करणे माझ्यासाठी सोपे नाही. त्या सर्वामध्ये देव काय करत आहे याकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे मला भाग पडते. माझ्या परीक्षा कठीण आणि न संपणाऱ्या असल्या तरी त्या “तात्कालिक व हलकी संकटे आहेत आणि ती माझ्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करतात” (२ करिंथ ४:१७)  अशी मला स्वत:ला आठवण करून द्यावी लागते.

जेव्हा माझे झगडे संपत नाहीत असे वाटते तेव्हा ते मला रोजन् रोज, क्षणोक्षणी, प्रत्येक श्वासागणिक देवावर भरवसा ठेवण्यास सक्ती करतात. माझे दु:ख, शारीरिक, भावनिक अथवा आध्यात्मिक असो ते माझे लक्ष वेधून घेते. हे लक्ष मी माझ्यावर केंद्रित करू शकते  व निराशेत डुबून जाऊ शकते किंवा माझे विचार मी येशूकडे वळवू शकते व त्याला कृपा द्यावी म्हणून विचारू शकते.

देवाशी  क्षणोक्षणी होणारा तो संवाद मला बदलू लागतो. त्याचा पुरवठा आणि त्याचे गौरव हे मी कधी नाही त्या प्रकारे पाहू शकते (२ करिंथ ३:१८). दु:खसहन मला देवाच्या सान्निध्यात ठेवण्याचा अद्वितीय मार्ग आहे , त्याचे गौरव पाहत राहणे. कारण मी सतत त्याच्याकडे रडत असते.

चोहोकडून संकटे पण कोंडमारा झाला नाही

माझा दिवस कसा सरला? खरं सांगू? खूपच खडतर. माझ्या पतीने- जोवेलने मला कपडे बदलायला मदत केली. मला मसाज थेरपीची अत्यंत गरज होती आणि  मी तेथपर्यंत माझ्यासाठी खास बनवलेली कर चालवून जाऊ शकले. थेरपीस्ट दारातच माझी वाट पाहत उभी होती आणि तिने मला आधार देऊन आत नेले – असे तिने पूर्वी कधीच केले नव्हते. देव माझा कसा पुरवठा करत आहे हे मला लगेचच दिसले.

घरी आल्यावर जोवेलने मला जे काही लागत होते ते सर्व आणले. पण मला हवे तसेच काही सर्व घडत नव्हते. मला लक्ष केंद्रित करायला त्रास होत होता. मला राहून राहून वेदना होत होत्या. मला हताश आणि अशक्त वाटत होते.

मी एकच करू शकत होते, देवाकडे धावा करून पुढची गोष्ट करणे. “आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही” (२ करिंथ ४:८-९). ह्याचा अर्थ मला अधिक स्पष्टपणे समजला.

फक्त आज

माझी शक्ती आणि दु:ख यांची भरती – ओहोटी रोज चालू असते. यामुळे आता काय होणार हे मी रात्री झोपायला जाऊपर्यंत सांगू शकत नाही. हे माझ्या भावनिक दु:खाबाबतही खरे आहे. पण जरी दु:खाचा दिवस असला तरी मला यामुळे समाधान मिळते की की माझ्या उरलेल्या सर्व आयुष्यभर मी अशा दु:खात व अशक्तपणात राहावे अशी देवाची इच्छा नाही. तो मला फक्त आज त्यामध्ये राहा असे सांगतो. काही दिवशी तो मागणी आणि कल्पना यांपेक्षा भरपूर पुरवतो (इफिस ३:२०) आणि इतर दिवशी तो मला तुफानात टिकवून धरतो.

पण दर दिवशी तो मला ज्याची गरज आहे ते पुरवील.