Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 26, 2021 in जीवन प्रकाश

उगम शोधताना

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

   अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

प्रकरण १९ खंडणी

मार्क १०:४५

येशू मरण पावला. पण विनाकारण नव्हे. तो बहुतांसाठी खंडणी भरून देण्यासाठी मरण पावला. याविषयी अनेक प्रसंगी तो बोलला. त्याच्या अनुयायांनी कसे जीवन जगावे याविषयीच्या शिकवणीत त्याने हा विषय गुंफला आहे. आपल्याला स्वाभाविकपणे जे वाटेल त्याच्या हे नेहमीच विरुद्ध असते. असेच काहीसे खालील वचनांवर आम्ही काम करीत असता घडले.

“जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहातो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे (मार्क १०: ४ ४५).

‘खंडणी’ साठी काय शब्द? …खंडणी हे संपूर्ण सुवार्ता संदेशाचे मूळ ‘बेटे’ आहे. बरोबरीचे सगळे तर शून्यात बघत होते. त्यांना कळले की मी शब्द शोधत आहे. त्यासाठी खूप उहापोह करावा लागतच असे.

‘ मी कशाचा तरी विचार करत आहे. आणि ते तुम्ही ओळखलेच पाहिजे.’

‘ आम्हाला काही हिंट द्या ना.’

‘ मी प्रयत्न करतो. पूर्वी तुमच्या लढाया चालायच्या तेव्हा तुम्ही लोक कैद करून आणायचा ना?’

‘हो.’

‘ असे कधी होत असे का, की तुम्ही एखादा मनुष्य किंवा स्त्री किंवा मूल सोडून देण्यासाठी त्या बदल्यात शंखशिंपले किंवा डुक्कर किंवा अशा काहीही वस्तू घेऊन त्यांच्यावर व्यापार करीत असायचा?’

माझा प्रश्न त्यांना मूर्खपणाचा वाटला. त्यांच्यात मोठा हशा पिकला. कारण त्यांच्या लढाया म्हणजे केवळ मृत्यू व रक्तपातानेच शेवट व्हायचा.

हेपलला मला काय म्हणायचे आहे ते लक्षात आले. तो म्हणाला, “आम्ही असेच नाही पण याप्रमाणे दुसरे काहीतरी करतो.”

ते आम्ही शत्रुंसंबंधात नाही पण घराण्यांमध्ये करतो. त्याला ‘डुपुटॅपौ’ म्हणतात.

हा शब्द मला माहीत होता. त्याचा अर्थ ‘व्यापार’ असा होता.

‘मला त्याविषयी जरा अधिक काही सांग ना,’ मी त्याला म्हणालो.

तो म्हणाला ‘तुम्ही जाणताच आम्हाला कसे सर्व फिट्टम फाट करून समान ठेवायचे असते! पण काही वेळा आम्ही तशी समानता पुरतेपणे राखू शकत नाही, कारण आमचे स्वत:चे लोक त्यात गुंतलेले असतात. वौटाले संबंधात असेच झाले होते,’

‘वौटाले संबंधात काय झाले होते?’

तो पुढे सांगू लागला. “काही दिवसांपूर्वी आम्ही नवीन बाग तयार करत होतो. त्यासाठी वौटाले एक मोठ्ठे झाड तोडत होता. त्याच उतरणीवर खाली एक बाई सेगोवर काम करत होती. दोघांनाही माहीत होते की कोण कोठे काम करत आहे. त्याने तिला पुष्कळ वेळा तेथून  बाजूला व्हायचा इशारा दिला. तिला कल्पना होती की ते झाड पडायला अजून अवधी आहे. म्हणून तिने थोडा वेळ काम चालू ठेवण्याचे ठरवले. मग काही वेळाने वौटालेने तिला ओरडून धोक्याचा इशारा दिला. तरी तिने काम आटोपते घेतले नाही. दोघांच्या अपेक्षेपेक्षा लवकर त्या झाडाचा कडकड आवाज येऊन ते अचानक कोसळू लागले. आता ती पळू लागली, पण वाट खडतर असल्याने तिला दूर जायला विलंब लागला आणि झाड तिच्यावरच कोसळले. तिची कवटी फुटली आणि ती मरण पावली. भयानक आक्रोश सुरू झाला. वौटाले झाडावरून तातडीने उतरला. आणि वेगाने धावत जाऊन आपल्या आप्ताच्या घरच्या चावडीत लपला. त्या मृत स्त्रीचे आप्त तीरकमठे, कुऱ्हाडी घेऊन ऐक्याने जमले व  त्यांनी  वौटालेच्या लोकांच्या चावडीकडे  कूच केले. आणि न्याय मागत आरोळ्या देत ओरडा आरडा करत त्यांच्या चावडीसमोर उभे राहिले. वौटालेकडून मारल्या गेलेल्या बाईच्या जीवाबद्दल ते वौटालेचा जीव मागू लागले.  “पण तो तर एक अपघात होता ना?” त्याचे भाऊ आतूनच ओरडले.

“ते काहीही असो. त्यानेच हे केले ना?”

“पण त्याने इशारा दिला होता.” त्यांनी दरडावले.

“ते काहीही असो.” त्यांनी प्रत्युत्तर दिले.

वौटाले बाहेर आलाच नाही पण काही वेळाने त्याचे भाऊ बाहेर आले. त्यांनी सोबत मौल्यवान वस्तू आणल्या व त्यांच्यासमोर टाकू लागले. झाडाच्या सालीचे कापड, शंख-शिंपले, लाल कापड, कुऱ्हाडी, विळे, मीठ. या वस्तू ते  हिंसक किंवा आणीबाणीच्या प्रसंगीच बाहेर काढतात. त्यांनी जमीनीत एक दंडूका रोवून त्यांना देण्यासाठी त्याला एक डुक्करही बांधले. दोन्ही बाजूंनी ओरडा चालूच होता. कितीही देऊन त्यांचे समाधान होत नव्हते. अखेर त्या बाईकडची एक व्यक्ती ओरडली, “सुपौ !आता बस्स !”

मग चावडीचा पुढारी म्हणाला, “डुपुटापौ’ व्यवहार झाला.. तेव्हा ते सर्व पूर्ण झाले. हा व्यापार संपला होता. शोकग्रस्त भावांनी ते डुक्कर व सर्व मौल्यवान वस्तु काठ्यांवर वाहून घरी नेल्या. वौटाले मोकळेपणाने व निर्भयतेने नित्याचे जीवन जगण्यास मोकळा झाला. “आता हा शब्द या वचनात कसा वापरायचा? आपण मरणाच्या धोक्यात होतो. पण येशूने व्यवहार केला. त्याने प्राण दिला आणि आपल्याला मोकळे केल्याने आपल्याला जीवदान मिळाले.”

“डुपुटापौ- व्यवहार संपला.” हेपल म्हणाला, आणि देव म्हणाला, “सुपौ. बस्स झाले.”

“अगदी बरोबर!”

“हे विश्वास ठेवायला कठीण आहे.” एक वृद्ध म्हणाला.

 “काय कठीण आहे?”

या वचनात व्यवहार डुपुटापौ येशू या व्यक्तीचा होत होता… आम्ही तर पूर्वी भावासाठी खूप मोठा व्यवहार करायचो. पण व्यक्ती कधी देत नव्हतो. आणि असे कोणी स्वत:ला देणारही नाही.” त्याने चौफेर नजर फिरवली. त्याने मोठ्ठा उसासा टाकला. हे पचवायला फारच कठीण आहे असे तो सूचित करत होता. जेव्हा एखाद्या गोष्टीचा खोल परिणाम झाल्यावर ते नेहमी बोलत ते तो बोलला , “एवढे रुचकर बोलणे ऐकून आमचा जीव मरणप्राय कासावीस होत आहे ’. आपण म्हणू, माझी आतडी तुटत आहेत.