एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण ३ (पूर्वार्ध)
माझी येथवरच्या वाटचालीची पार्श्वभूमी या लेखांकात सांगू इच्छितो. हा प्रकल्प सुरू करण्याच्या पहिल्या दिवशीच मी स्वत:ला प्रश्न केला होता, ‘मी खरेच हे करू शकेन का’ आमच्या वस्तीपासून जवळच असलेल्या आमच्या ऑफिसला या लोकांनी बायबल खोली असे नाव पाडले होते. पहाटेच मी तिथे हजर होतो. समोरच दाट वृक्षवल्लीने अच्छादलेल्या पर्वतरांगांनी धुक्याची चादर पांघरली असून तेथून बोचरे गार वारे वाहत होते.
अशा आदर्श ठिकाणी काम करायचे माझे कॉलेजपासूनचे स्वप्न होते. मैदानात राहायचे, आणि उघड्यावर काम करायचे. अशा माझ्या आवडीच्या जागी मी उभा होतो. येथील कच्चा माल वापरून मी स्वत: माझे घर बांधून लाकडी फर्निचरसह थाटले होते. कशाची कमतरता नव्हती. माझ्या आवडीप्रमाणे मनमिळाऊ लोकांना तेथे वावर होता. वचनाच्या अभ्यासाची मला भूक होती. त्यातील संदेश जाणून घेऊन तो जीवनाला लागू करून घ्यायची सवय होती. पण इतके दिवस ज्या योजना, स्वप्ने व प्रार्थनांविषयी मी बोलत होतो, ते सर्व मी खरोखरच पूर्णत्वाला नेऊ शकणार होतो का? अमेरिकेतील विद्यापीठांत शिक्षण घेत असताना देखील माझे मिशनरी होण्याने स्वप्न कायम होते. त्याची कारणेही रास्तच होती. मी तारलेला विश्वासी होतो. सक्षम होतो. जगभर कामकऱ्यांची प्रभूला गरज होती. मी या कामी का भाग घेतला नाही असे विश्वासी जनांनी विचारल्यास माझ्यापाशी उत्तर नव्हते. त्यात बायबल भाषांतर करण्याचा माझा दृष्टांत पक्का होता. अशा वेळी मला कॅरल भेटली. तिचे व माझे विचार व योजना पुरत्या जुळत होत्या. त्यामुळे आम्ही विवाहबद्ध झालो. भाषाविज्ञानाचे अवघड प्रशिक्षणाचे दिव्य आम्ही पार पाडले आणि विक्लिफ बायबल कौन्सिलचे सभासदत्व मिळवले. तेथे आम्हाला विविध संस्कृतींचे, जीवनमानाचे, जंगल-जीवनाचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर आम्ही मंडळ्यांमधून
संदेश देऊ लागलो. आमच्या भावी योजना सांगू लागलो. आम्ही पृथ्वीच्या गोलार्धात कोठेही जाऊ इच्छित होतो. मग अशा काही घटना घडल्या की कोठे जावे याचा आम्हाला शोध लागला. पापुआ न्यू गिनी आमच्या डोक्यात घोळू लागले. तेथे ५०० हून अधिक भिन्नभिन्न अलिखित भाषा होत्या. आता हा आकडा ८०० वर गेला आहे. इतर भाषांतरकारांकडून समजले होते की हे स्थळ अत्यंत निसर्गरम्य आहे. लोक खूप छान आहेत. पण जीवनमान थोडे अवघड आहे. सर्व तयारी करून निघण्यात दीड वर्ष गेले. तेव्हा हीथर पाच वर्षांची व डॅन दोन वर्षांचा होता. दुसरी दोघे पापुआमध्ये जन्मली. उष्णकटिबंधाच्या प्रदेशात स्थायिक होणे सोपे नव्हते. आघात तर होणारच होते.
प्रथम नवीन मिशनरींची सोय वर्षभर उकारम्पा या शहरवजा आरामदायक ठिकाणी असलेल्या मिशन ठाण्यावर केली जात असे. तेथील कर्मचारी उत्तम देखभाल करत. तेथे प्रचलित बोली भाषा आम्हाला शिकवली जात होती.
अशा वेळी तेथे कॅरल आजारी पडली. इतकी की जगते की मरते याची शाश्वती नव्हती. मला वाटले आपली काही येथे तग लागणार नाही. कॅरल झपाट्याने अशक्त होत चालली होती आणि आजाराचे नेमके निदान होत नव्हते. एका सकाळी एक मैत्रिण भेटायला आली. तिने प्रख्यात डॉक्टर डेविड लिथगॉवशी संपर्क साधला. ते आता वैद्यकीय सेवा सोडून बायबल भाषांतराचे काम करत होते. तिला तपासताच त्यांनी ताबडतोब तिला दवाखान्यात हलवायला सांगितले. तिच्या काखेत पुरळ आले होते. ते बरे होत नव्हते. आता तो भाग कोळशासारखा काळा पडला होता. मुलांना मित्राच्या घरी सोडले. तिला झोपवून विमानाने नेणे भाग होते. पण ही सोय उपलब्ध न झाल्याने गोरोकाच्या दोन तासांच्या प्रवासाला स्टेशनव्हॅगनने निघालो. तिच्या तोंडातील पुरळ फार वेगाने वाढत होते. तिची आग व वेदना शमवायला मी रस्त्याने तिच्या तोंडात एकसारखा बर्फाचे खडे ठेवत होतो. येथवर कॅरलने दम धरला. पण डॉक्टरसमोर येताच ती कोमात गेली. त्या क्षणी ती जगेल की मरेल याची कोणीच शाश्वती देत नव्हते. मी प्रचंड अस्वस्थ व धास्तावलेला होतो. तिला सेप्टिसेमिया झाला होता. तिच्या हाडांतील मगज पांढऱ्या पेशी तयार करत नव्हता. त्यामुळे कोणत्याही जंतूंची लागलीच लागण होत होती. त्यामुळे हे पुरळ वाढून गॅंगरीन सुरू झाले होते. त्यात मलेरीयाच्या औषधांची ॲलर्जी असल्याने तिची औषधे बदलली होती. प्रार्थनेखेरीज कोणताच पर्याय नव्हता. उकारम्पातील, अमेरिकेतील लोक व बातमी कळेल तसे जगभरचे लोक तिच्यासाठी प्रार्थना करत होते. कित्येक दिवस ती कोमातून बाहेर येण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. रोज रक्ताची तपासणी होत असे पण रिपोर्टमध्ये काही फरक नव्हता. रोज मी आशाळभूतपणे चांगल्या बातमीची वाट पाहत होतो. एकदा का पांढऱ्या पेशी तयार होण्याच्या प्रक्रिया बंद पडली की कोणी काही करू शकणार नव्हते. मी तिच्या बिछान्यापाशी बसून तिच्याशी बोलून, वाद्य वाजवून गाणी गात होतो, प्रार्थना करत होतो. काही दिवसांनी ती पूर्णपणे पिवळी पडली. एक दिवस बातमी आली, आज तिच्या पांढऱ्या पेशी वाढून ८०० वर आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना केवढा आनंद झाला होता! त्या आठवड्याच्या अखेरीस ती शुद्धीवर आली. अजून गॅंगरीनचे अस्तित्व होतेच. शस्त्रक्रिया करून गॅंगरीन काढून टाकले. त्वचेचे कलम करून व्रण बुजवले. तीन महिने ती दवाखान्यात होती. हाताची अजून पूर्ण हलचाल होत नव्हती. पूर्ण बरे व्हायला तिला एक वर्ष लागले. पापुआ न्यू गिनीचे डॉक्टर्स, नर्सेस व सर्व कर्मचाऱ्यांच्या टीमच्या अथक परिश्रमाबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी होतो. त्यांनी कितीतरी वेळा तिला रक्तदानही केले होते. पुढे आमच्या लक्षात आले की त्यानंतर कॅरलला कोणत्याच आजाराची लागण होत नव्हती. कारण तेथील रहिवाशांचे रक्त तिच्यामध्ये असल्याचा हा परिणाम होता. कॅरलच्या पांढऱ्या पेशी पूर्ववत झाल्याचे श्रेय आम्ही केवळ प्रभूला आणि विश्वासी जनांच्या प्रार्थनांनाच देतो. तेथील प्रमुख डॉक्टरांनीही कबूल केले की हा एक चमत्कारच झाला आहे. आम्हीही मान्य केले की ही आमची फार मोठी कसोटी होती. ज्या कार्यासाठी आम्ही आलो होतो, ते होऊ नये म्हणून हा प्रचंड अडथळा आला होता.
कॅरल बरी होताच आमचे मिशनक्षेत्र निवडण्यासाठी आम्ही नकाशाचा अभ्यास करू लागलो. ऑस्ट्रेलियाचे मिशनरी ॲलेक्स विन्सेंट या फोलोपा दुभाष्यासोबत मी १० दिवस तेथील डोंगराळ भागांत पायी फिरलो. तेथे स्थायिक होण्यासाठी सरकारी परवानगीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली. फुकुटाओ हे ३५० झोपड्यांचे गाव होते. ते आम्ही वस्तीसाठी निवडले. तेथील लोकांशी बोललो. त्यांचा पाहुणचार घेतला.
आसपासच्या बऱ्याच गावांना भेटी दिल्या. आम्ही तेथे राहायला यावे अशी गावकऱ्यांची मनापासून इच्छा असल्याचे त्यांच्या चर्चेवरून व हावभावांवरून आम्हाला समजले. त्यांच्यामध्ये ओवारापे अली हा एक वयस्कर प्रतिष्ठित व्यक्ती होता. तो सनातनी वृत्तीचा वाटला. त्याच्या शब्दाला मान होता. या तिऱ्हाईत व्यक्तीने येथे का येऊन राहावे याला अजूनही त्याचा आक्षेप होता. कारण आम्ही येथे येऊन राहावे असे तेथे आकर्षक असे काही नव्हते म्हणून त्याला खटकत होते. मी स्पष्ट केले की मला त्यांची भाषा व जीवनशैली शिकायची आहे व बायबलचे भाषांतरही करायचे आहे. यासाठी की त्यांना स्वत:ला वैयक्तिकरित्या देवाचे वचन समजावे व त्यांची देवाशी ओळख व्हावी. पण त्याचा माझ्या या बोलण्यावर विश्वास बसला नाही. तो संमती न दर्शवता तडक निघून गेला. यातून मी काय अर्थ काढावा ते मला समजेना. पण बाकी सारी मंडळी म्हणाली, तुम्हाला देवाने येथे आणले आहे. (क्रमश:)
Social