जनवरी 9, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

गर्वाची सात मार्मिक लक्षणे फेबियन हार्फोर्ड

गर्व तुम्हाला ठार करेल. कायमसाठी. गर्व हे असे पाप आहे की ते तुम्हाला आपल्या तारणाऱ्याकडे आक्रोश करण्यापासून दूर ठेवते. ज्यांना आपण निरोगी आहोत असे वाटते ते डॉक्टरांकडे पाहणारही नाहीत.

गर्व हा जितका गंभीर आहे तितकेच त्याच्यावर नेमके बोट ठेवणे कठीण जाते. जेव्हा आपल्या अंत:करणाची चिकित्सा केली जाते तेव्हा आपल्यापैकी ज्यांना हा गर्वाचा रोग झालाय त्यांना तो आजार शोधून लढणे हे एक आव्हान असते. गर्व हा तुमच्या दृष्टिकोनाला संसर्ग करतो. त्यामुळे आपण आपल्याला रंगीत भिंगातून पाहतो व वास्तव पाहण्यापासून आपला दृष्टिकोन विकृत केला जातो. पापामधली आपली कुरूपतासुद्धा हा गर्व सुंदर व प्रशंसायुक्त चितारते.

आपल्या ह्रदयात गर्व दिसत नाही म्हणून आपला गर्वाविरुध्द झगडा नाही असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. माझं वागणं किती चांगलं आहे असे वाटून माझ्या पाठीवर थाप मारणारे माझे सुखदायी क्षणच मला अधिक धोक्याचे वाटायला हवेत. ख्रिस्ताची नम्रता धरण करून आणि माझ्यामध्ये काही चांगले वसत नाही याची आठवण ठेवून माझ्या ह्रदयातील गुप्त गर्व आणि त्याची लक्षणे शोधून काढणारा चष्मा मी वापरायला हवा.

जोनाथन एडवर्डस यांनी गर्वाची लागण झाल्याने दिसणाऱ्या सात लक्षणांची यादी नमूद केली आहे.

१. दोष काढणे

गर्व हा आपण आपल्यामध्ये पाहू शकणारी दुष्टता बाजूला सारतो इतकेच नाही तो इतरांमध्ये असलेला देवाचा चांगुलपणासुद्धा आपल्याला दिसू देत नाही. आपण तो चांगुलपणा उचलून बाजूला काढतो व फक्त त्यांच्या चुकाच आपल्याला दिसू लागतात.

जेव्हा मी उपदेशाची तयारी करत असतो किंवा एखाद्या परिच्छेदाचा अभ्यास करत असतो तेव्हा आत्मा माझ्या ह्रदयात करत असलेली शस्त्रक्रिया टाळण्याचा भयानक मोह गर्व माझ्यामध्ये घालतो. त्याऐवजी तो मला सांगतो की, मी एक एक छान मानसिक लेख लिहावा किंवा ज्यांना हे ऐकण्याची गरज आहे त्यांच्यासाठी मी तो उपदेश करावा.

“इतर विश्वासी जनांच्या चुका शोधत राहणारी व्यक्ती आध्यात्मिकरित्या गर्विष्ठ आहे हेच दिसून येते… खऱ्या नम्र ख्रिस्ती व्यक्तीला आपल्या जीवनात इतके कार्य होण्याची गरज असते की तिला स्वत:मध्ये कितीतरी दुष्टता दिसते. दुसऱ्यामध्ये काय चालले ह्यासाठी तिला वेळ नसतो.”  – जोनाथन एडवर्डस

२. कठोर आत्मा

ज्याला ह्रदयामध्ये  गर्वाच्या रोगाची लागण झाली आहे तो इतरांच्या पापाबद्दल आकस, चीड, निराशा किंवा न्याय करत बोलतो. गर्व म्हणजे दुसऱ्यांचे झगडणे कमी लेखून त्यांच्यावर दबा धरून बसण्याची वृत्ती. आपण आपल्या बायकोच्या ‘वेडेपणा’ चा विनोद सांगत असताना हीच वृत्ती तेथे असते. आपल्या मित्रांसाठी हताश होऊन वर फेकलेल्या प्रार्थनांमधून सुद्धा ही वृत्ती कळून येते.

पुन्हा जोनाथन एडवर्डस यांनी म्हटले आहे, “आपण ख्रिस्ती निव्वळ कीटक आहोत म्हणून आपण एकमेकांना ख्रिस्ताप्रमाणेच अत्यंत नम्रतेने व कनवाळूपणे वागवण्याची गरज आहे.”

३. वरपांगीपणा

जेव्हा गर्व आपल्यामध्ये राहतो तेव्हा आपल्याला आपल्या ह्रदयाची सत्यता जाणून घेण्यापेक्षा इतर लोक आपल्याविषयी काय बोलतात याकडे आपले लक्ष असते. इतरांना आपल्यामध्ये जी पापे दिसतात त्यांच्याशी आपण झगडा करू, पण जी पापे कोणी पाहत नाहीत त्यांच्याशी आपण समझोता करतो. ज्याविषयी आपण उघडपणे जबाबदार असतो अशा बाबतीत आपण पवित्रता आणण्याचा प्रयत्न करतो पण एकांतात ज्या शिस्तीची गरज आहे त्याची आपण फिकीर करत नाही.

४. बचावात्मक पवित्रा

जे ख्रिस्ताच्या नितीमत्त्वाच्या सामर्थ्यातच केवळ उभे असतात त्यांना लोकांकडून किंवा सैतानाकडून हल्ले झाले तरी एक निश्चित असे आश्रयाचे ठिकाण असते. एखाद्याने हल्ला केला किंवा दोष दिला तर समतोल गमावणे किंवा बचावाचा पवित्रा घेणे ही खरी नम्रता नाही. तर चांगले करत राहणे आणि आपल्या विश्वासू निर्माणकर्त्याच्या हाती आपला जीव सोपवणे ही खरी नम्रता आहे.

एडवर्डस म्हणतात, “जग जितके नम्र ख्रिस्ती व्यक्तीच्या विरुध्द जाईल तितकी ती अधिक शांत राहील. पण जेव्हा ती आपल्या प्रार्थनेच्या खोलीत जाईल तेव्हा मात्र ती शांत राहणार नाही.”

५. देवासमोर गृहीत धरून चालणे

नम्रता ही ख्रिस्तामध्ये असलेल्या खात्रीसह देवाकडे नम्रपणे जाते.  त्यामध्ये जर ‘नम्र’ किंवा ‘खात्री’ यांपैकी एक शब्द नसेल तर आपल्याला नक्कीच गर्वाची बाधा झालेली आहे. आपल्यापैकी काहीजण देवासमोर फारच धिटाईने जातात. पण जर आपण काळजीपूर्वक गेलो नाही तर तो देव आहे हे आपण विसरून जाऊ शकतो.

जोनाथन एडवर्डस यांनी म्हटले आहे: “ काही जण देवासमोर मोठ्या हर्षाने येताना स्तोत्र २:११ मध्ये दिलेल्या त्याच्या अधिकाराला विसरून जातात. “भीड धरून परमेश्वराची सेवा करा, कंपित होऊन हर्ष करा.”

आपल्यापैकी इतर काही जणांना देवासमोर जाताना अजिबात  धैर्य नसते. हे कदाचित नम्रतेचे वाटेल पण हे गर्वाचेच दुसरे लक्षण आहे. त्या क्षणांमध्ये आपण असे म्हणतो की आमची पापे देवाच्या कृपेपेक्षा जास्त मोठी आहेत असे आम्हाला वाटते. आपण ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल संशय व्यक्त करतो. आपण ख्रिस्ताऐवजी आपल्याकडेच पाहत राहतो.

६. इतरांनी लक्ष द्यावे म्हणून अधीर

गर्व हा लक्ष वेधून घेण्यासाठी, मानासाठी व इतर सर्व प्रकारच्या भक्तीच्या प्रकारासाठी भुकेला असतो. कोणी स्वत:चीच वाखाणणी केली तर ते निर्लज्जपणाचे वाटते. कधीकधी आपण कोणाला ‘नाही’ म्हणत नाही कारण लोकांना आपली गरज वाटावी हे आपल्याला हवे असते. कदाचित ते आपल्या इच्छेने पछाडले जाणे असेल. उदा. महागडी गाडी, सुंदर घर, कामावर मोठे पद: हे सर्व मनुष्याकडून गौरव मिळावा म्हणून असते, देवाकडून नव्हे.

७. इतरांकडे दुर्लक्ष करणे

गर्व हा इतरांपेक्षा काही लोकांना जास्त प्राधान्य देतो. जग ज्या लोकांना मान देते त्यांची तो अधिक किंमत करतो. त्यांच्या शब्दांची, गरजांची, इच्छांची वाजवीपेक्षा अधिक किंमत करतो. जेव्हा अधिकारावर असलेले लोक मला ओळखतात तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. आपण जाणीवपूर्वक किंवा न जाणता जे कमकुवत, गैरसोय करतात, आकर्षित नसतात त्यांना टाळतो कारण ते आपल्याला काही देऊ करत नाहीत.

कदाचित आपल्याला वाटते त्यापेक्षा अधिक लोक गर्वाशी झगडत आहेत.

गर्विष्ठ व्यक्तीसाठी पण एक चांगली बातमी आहे. आपला गर्व कबूल करणे हे तो नष्ट करण्याची पाहिली पायरी आहे. याचा अर्थ युद्धाला सुरुवात झाली आहे. कारण जेव्हा देवाचा आत्मा कार्य करू लागतो, आपल्याला नमवू लागतो तेव्हाच आपण आपल्या डोळ्यांवरची गर्वाची भिंगे काढू शकतो आणि स्वत:ला स्पष्टपणे पाहू शकतो. आपला आजार ओळखून त्यावरचा उपाय शोधू लगतो.

देवाच्या कृपेने आपण पुन्हा एकदा त्या गौरवी सुवार्तेकडे वळू शकतो. आपला गर्व मान्य करून आणि त्याने दाखवलेल्या लपण्याच्या जागा सोडून देऊन देवाला सर्वस्व मानू शकतो. जसे माझा लपलेला गर्व मला नाशाकडे नेत होता तसाच माझा मान्य केलेला गर्व मला जीवनाकडे नेतो व ख्रिस्ताच्या नीतीमत्तेला घट्ट धरून राहण्यास मदत करतो.

“हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण. माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालव” (स्तोत्र १३९:२३-२४).

 

Previous Article

उगम शोधताना नील अॅन्डरसन व हयात मूर

Next Article

देव नेहमीच मेज तयार करतो मार्शल सीगल

You might be interested in …

ख्रिस्ती व्यक्तीसारखी योजना करा

स्कॉट हबर्ड जे योजना करतात ते देवासारखी कृती करतात. ज्या निर्मात्याने हे विश्व सहा दिवसाच्या आराखड्यानुसार बनवले त्याच्यासारखे आपण काही प्रमाणात दिसू लागतो. “मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले”  ( २ राजे १९:२५) […]

तुमच्या मुलांना तुम्ही कोणत्या झाडाबद्दल सांगणार?

पॉल ट्रीप उजेडण्यापूर्वी जेव्हा आम्ही अंधारात बसायचो तेव्हाचे ते क्षण माझ्या कुटुंबाला खूप आवडायचे. दरवर्षी माझी मुले माझ्यामागे लागायची की आपण ते कधी करणार?  एकमेकांमध्ये ती चर्चा करायची की ते किती मोठे असणार आहे? मग […]

एक गोष्ट तुम्ही कधीही गमावू नका

जॉन ब्लूम देवाने तुम्हाला सर्वात प्रथम जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तुम्ही दक्ष कारभारी असावे. यामध्ये सर्व गोष्टींहून अधिक राखायची एक प्रमुख बाब आहे. तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ती म्हणजे: तुमचा जीव […]