जॉन ब्लूम
(रेव्ह. वि. आ. सत्राळकर यांनी “ जॉय टू द वर्ल्ड” या गीताचे केलेले मराठीकरण शेवटी दिले आहे.)
“ जॉय टू द वर्ल्ड” ख्रिस्तजयंतीच्या या सुप्रसिद्ध आणि आवडत्या गाण्याने गेल्या वर्षी ३०० वर्षे पूर्ण केली. गीतकार ऐझॅक वॉटस् (१६७४-१७४८) ह्यांच्या मनात त्यावेळी बहुतेक ख्रिस्तजयंतीचा विचार नसावा. स्तोत्र ९८ वर आधारित असलेले ह्या गीताचे शीर्षक होते – “मशीहाचे आगमन व त्याचे राज्य.” त्यावेळी वॉटस् येशूच्या दुसऱ्या येण्याचा विचार करत होते. या गीताचे शब्द ख्रिस्ताबद्दलचे सत्य साजरे करतात. आरंभीचे शब्द ख्रिस्तजन्माची आठवण करून देतात. आणि नंतर आपल्या पुढील धन्य आशेकडे (तीत २:१३) निर्देश करतात.
प्रभू आला
ख्रिस्तजन्मदिनी “हर्ष जगा प्रभू आला” हे गाणे अगदी योग्य आहे. होय तो आला आहे. आणि पहिल्या वेळी तो का आला? “आशीर्वादा आला द्याया, शापाला नाशाया.” येशूने जन्म घेतला यासाठी की त्याच्या लोकांसाठी व त्याच्या जगासाठी खंडणी भरून द्यावी. यामुळेच नवीन करारातील ख्रिस्ताविषयीचे संदर्भ खास करून भविष्याकडे लक्ष लावतात. ख्रिस्तजन्म हा पुढे काय होणार यासबंधी आहे.
- जेव्हा देवदूताने मरीयेची भेट घेतली तेव्हा आश्चर्यकारक रीतीने तिची गर्भधारणा होणार असल्याचे सांगून तो म्हणाला, “तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही” (लूक १:३२-३३).
- जेव्हा देवदूताने योसेफाला स्वप्नात दर्शन दिले तेव्हा त्याने सांगितले की मरीयेच्या उदरातील बालक “आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील” (मत्तय १:२१).
- जेव्हा देवदूताने मेंढपाळांना येशूच्या जन्माची वार्ता सांगितली तेव्हा म्हटले, “तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. (लूक २:११). – हे बालक त्यांना तारण देणार होते.
- शिमोनाने मंदिरात मरीयेशी बोलताना म्हटले, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे; ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल” (लूक २:३४-३५)
- पौलाने फिलीपैकरांस लिहिले की, ‘येशू हा मनुष्याच्या प्रतिरूपाचा झाला’ यासाठी त्याला ‘वधस्तंभावरचे मरण’ सहन करता यावे आणि मग त्याला ‘अत्युच्च’ केले जावे आणि प्रत्येकाने तो ‘प्रभू’ आहे असे कबूल करावे (फिली. २:७-११).
होय आपण आनंदाने गाऊ या की, “ हर्ष जगा प्रभू आला… आशीर्वादा आला द्याया.” त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी शापामुळे असलेले सृष्टीचे कण्हणे नष्ट करायला (रोम ८:२०,२२) अखेरीस तो येईल. पण त्याच्या पहिल्या आगमनाच्या वेळच्या वधस्तंभांशिवाय हा शाप उलटणार नव्हता आणि त्याचे आशीर्वाद वाहणार नव्हते. कारण वधस्तंभातच प्रभूने त्याच्या तारणाची ओळख करून दिली.
“देवाने राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्राएलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे (स्तोत्र ९८:२,३).”
जेव्हा ख्रिस्तजन्मदिनी आपण “प्रभू आला” असे गातो तेव्हा आपण भूतकाळ साजरा करतो कारण त्याचा भविष्यासाठी जो अर्थ आहे त्यामुळे.
तारणारा राज्य करतो
पण ख्रिस्तजयंतीला “हर्ष जगा प्रभू राजा” असे आपण गाऊ शकतो का? आपल्याला ठाऊक आहे की जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा तो राज्य करील, आणि “प्रत्येक गुडघा त्याच्यापुढे टेकेल आणि प्रत्येक जिव्हा त्याला प्रभू असे कबूल करील” (फिली.२:१०-११). पण सध्या येशू कोणत्या प्रकारे राज्य करतो? कारण ज्या जगात आपण राहतो ते किती दुष्टपणा, आपत्ती, दु:खे यांनी भरून गेले आहे आणि “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे” (१ योहान ५:१९). शास्त्रलेख स्पष्ट म्हणतात: “परमेश्वर जगावर व सर्व लोकांवर राज्य करतो” (स्तोत्र ९६:१०) आणि “तुझे राजासन… युगानुयुगाचे आहे” (स्तोत्र ४५:६). ‘सर्व पिढ्यांसाठी तू खरा आहेस’ ही यिर्मयाने केलेली घोषणा सर्व काळासाठी आहे- जरी दुष्टता सर्वत्र बेबंद असली तरी. आपली नश्वरता, अत्यंत मर्यादित दृष्टिकोन यामुळे कित्येकदा या युगात जीवनाचा अर्थ समजत नाही आणि आपण कण्हतो. पण या सर्वांवर प्रभू राज्य करतो.
पण आताचे येशूचे राज्य आणि दुसऱ्या येण्याच्या वेळी त्याचे राज्य यामध्ये अफाट अंतर आहे. आताच्या येशूच्या राज्याचे वर्णन करताना पौल म्हणतो, आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे ( १ करिंथ १५:२५). हे तो स्तोत्र ११० मधून थेट घेतो. माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.” परमेश्वर तुझे बलवेत्र सीयोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.” (स्तोत्र ११०:१-२)
होय. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळी “प्रभू राजा” हे आपण मोठ्या हर्षाने गाऊ. त्यावेळी स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली सर्व त्याचा अधिकार मान्य करतील (फिली. २:१०). आणि उध्दरलेले आणि नवी सृष्टी हे गीत पुन्हा पुन्हा गातील. पण या पतित आणि भ्रष्ट युगामध्ये आपला तारणारा सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून (प्रकटी. ५:९) त्याने आपल्या रक्ताने ज्यांना विकत घेतले आहे त्यांना तो बोलावत आहे. आपल्या शत्रूंच्या मध्ये त्याचे राज्य स्थापत आहे व स्थिर करत आहे (लूक १७:२१), अगदी दाविदाने स्तोत्र ११० मध्ये भाकित केल्याप्रमाणेच. याचा अर्थ त्याच्या राज्याच्या दोन्ही कालखंडात आपण हे गाऊ शकतो की, “परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे” (स्तोत्र ९८:१).
जेव्हा ख्रिस्तजन्मदिनी आपण तारणारा राज्य करतो असे गातो तेव्हा अश्रू ढाळत आता जे आता सत्य आहे ते साजरे करतो आणि भविष्यात जो अमाप आनंद असणार त्याची आशा धरतो.
सत्य आणि कृपा
“प्रभू आला, प्रभू राजा” यामुळे आपण गातो की तो कृपा आणि सत्याने राज्य करतो. हे आता सत्य आहे आणि पुढे जेव्हा त्याचे राज्य कळसाला पोचेल तेव्हाही सत्य असणार.
या गीताच्या शब्दात आपण योहानाचे शब्द ऐकतो. “कृपा व सत्य ही येशुद्वारे आली” ( योहान १:१७). येथे योहान हा येशूच्या दुसऱ्या येण्यासबंधी बोलत नव्हता तर पहिल्या. या जगात येशू “एकमेव सत्य” असा जन्माला आला (योहान १४:६). आणि सत्याची साक्ष धारण करण्यास आला (योहान १८:३७). त्याचे पहिले येणे हे न्यायासाठी नव्हते तर क्षमेची कृपा व तारणाची देणगी यासाठी होते. मी जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे” (योहान १२:४७).
पण त्याच्या दुसऱ्या येण्याचे वेळी तो जगाचा न्याय करण्यासाठी येईल. “तो जगाचा न्याय यथार्थतेने करील, व लोकांचा न्याय सरळपणे करील” (स्तोत्र ९८:९). येशूने म्हटले, “न्याय करण्याचे सर्व काम पित्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे” (योहान ५:२२). त्याच्या पहिल्या आगमनाच्या वेळेच्या वधस्तंभामुळे, येशू त्याच्या दुसऱ्या आगमन काळी जो न्याय आणणार तो नीती व कृपेचा असणार. त्याचा न्याय आणि दया हे त्याच्या राज्याचे नेहमीच – आता आणि येणाऱ्या युगात- वैशिष्ट्य असणार.
त्याच्या प्रीतीचे आश्चर्य
ऐझॅक वॉटस् यांनी जरी दुसरे येणे मनात धरून हे गीत लिहिले असले तरी ख्रिस्तजन्मदिनी हे गीत गाणे वैभवी आहे. कारण येशूचा पहिल्या येण्याचा जो अर्थ आपल्याला समजला आहे त्यामुळे आनंद व आशेने भरून हे गीत आपण गाऊ शकतो.
येशू प्रथम आला ते ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ आणि तो येईल ते ‘जे त्याची वाट पाहतात’ त्यांच्यासाठी (इब्री९:२८). हे त्याच्या प्रीतीचे आश्चर्य आहे. देवपित्याने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, आणि पुत्राने आपल्यावर एवढी प्रीती केली की त्याने स्वत:हून आपल्यासाठी प्राण दिला, यासाठी की आपला नाश होऊ नये तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावे (योहान ३:१६. १५:१३). ख्रिस्ताचे पहिले आगमन ही फक्त सुरुवात आहे. ती शेवटाची सुरुवात आहे. – ज्या सर्व गोष्टी संपाव्या आणि ज्यांची सुरुवात व्हावी असे आपल्याला वाटते. आणि या सगळ्या अपेक्षा येशूमध्ये आहेत (स्तोत्र ११०:१; योहान १७:२४). ख्रिस्तजन्मदिन जगात आनंद आणतो कारण या जगाला तो जे अभिवचन देतो त्यामुळे. हे आपल्याला त्या गौरवी आशेकडे निर्देश करते जी आपल्या आशेची पूर्तता असेल (तीत: २:१३).
“ आमेन. ये, प्रभू येशू, ये” (प्रकटी २२:२०).
(रेव्ह. वि. आ. सत्राळकर यांनी “ जॉय टू द वर्ल्ड” या गीताचे केलेले मराठीकरण.)
- हर्ष जग प्रभू आला, नमा हो त्याजला
ह्रदी जागा करा त्याला, मोदे गा गीताला - हर्ष जगा प्रभू राजा, नमा हो त्याजला
नभी, नगी, जळा, स्थळा, पुन्हा गा गीताला - जा, जा अघा तसे दु:खा, निघोनी कंटका
आशीर्वादा आला द्याया, शापाला नाशाया - राज्यात सत्य वानिती, जनी सदा स्तुती
दया नीती, कृपा, शांती सदैव नांदती
Social