Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on दिसम्बर 15, 2020 in जीवन प्रकाश

गव्हाणी

गव्हाणी

वनीथा रिस्नर

माझ्या मैत्रिणीच्या घरी काचेची प्लेट काउंटरवर ठेवण्याची धडपड करताना माझ्या हातातून ती पडली व फुटली. माझे हात नीट चालत नाहीत त्यामुळे मला काय करता येते आणि नाही याचा अंदाज येत नाही. मला तिला भांडी उरकण्यासाठी मदत करायची होती  पण मी अजूनच काम वाढवून ठेवले होते. त्यानंतर मला खिन्न वाटू लागले, आपण प्रथम जायलाच नको होते तिच्या घरी. जेव्हा मी ख्रिस्ताला माझे जीवन वाहून टाकले तेव्हा मला वाटले होते की तो माझा उपयोग करून घेणार आहे. पण माझ्या शक्तीने मी त्याची सेवा करणार अशी माझी अपेक्षा होती – माझ्या कमकुवतपणातून नव्हे. जेव्हा तुम्हाला अपुरे वाटते तेव्हा सेवा करणे कठीण असते.

माझ्या या निराशेमध्ये मी ख्रिस्तजन्माची कहाणी वाचायला सुरुवात केली. मरीयेला कसे वाटले असेल याची कल्पना करायचा प्रयत्न मी करत होते.

मरीयेसाठी देवाच्या पुत्राचा गर्भ वाढवणे हे फार महागात पडले असेल. ती कुमारी आहे यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नसणार. लग्नापूर्वीचे तिचे गर्भारपण ही निंदनीय बाब होती. ज्या कोणाचा तिच्याशी संबंध होता त्या सर्वांची बदनामी होत होती. तरी देवाने हे करण्यासाठी तिला पाचारण केले होते. आपल्या लोकांवर आणि राष्ट्रांवर अनंतकाल राज्य करेल अशा आपल्या मौल्यवान पुत्राचे गर्भारपण  स्वीकारण्याची जबाबदारी देवाने तिच्यावर सोपवली होती.

मरीयेला एक आश्चर्यकारक सन्मान दिला गेला. यामुळे येशूच्या जन्मापूर्वी काहीतरी स्मरणीय गोष्ट घडेल अशी  अपेक्षा तिने केली असावी. जगिक राजे असे प्रसंग डामडौलात साजरे करत असत. मग देवाच्या पुत्रासाठी किती अधिक अपेक्षा असेल?

चाऱ्यासाठीचे एक ओबडधोबड पात्र

यामुळे जेव्हा मरीया तिच्या गर्भारपणाच्या अखेरच्या पायरीतून आठ मैलांवर असलेल्या बेथलेहेमाकडे जात होती तेव्हा तिला निराश वाटले असणार. सोबत मदत करायला तिच्या वाग्दत्त पतीशिवाय दुसरे कोणीच नाही. बायबल त्यांच्याकडे गाढव असल्याचा उल्लेखही करत नाही. आपल्याला ती गाढवावर बसून गेल्याची कल्पना आवडते.

योसेफाचे कुटुंब कोठे होते? ते सुद्धा बेथलेहेमाला नावनिशीसाठी गेले असणार पण ते या तरुण जोडप्यासोबत गेलेले दिसत नाहीत. मरीया आणि योसेफ यांची कुटुंबे त्यांना सोबत घेण्यास तयार नव्हती की काय? आपल्याला एवढेच सांगितले आहे की हे दांपत्य एकत्र गेले आणि त्यांना राहायला एका गोठयाशिवाय कोठेही जागा मिळाली नाही.

आणि जेव्हा तिची प्रसूती होत होती तेव्हा देव काहीतरी का करत नाही असा विचार तिच्या मनात आला असेल का? शास्त्रलेख एवढेच सांगतात की हा जन्म अगदी सामान्य रीतीचा होता. सर्वच बाळांचा जन्म रक्ताळलेला, गचाळ असतो. आणि मग त्याला त्यांच्या रीतीप्रमाणे बाळंत्यात गुंडाळून ठेवले. सगळे काही ठराविक, अगदी मानवी.

आता त्याला कुठे ठेवायचे? अशा कौटुंबिक समाजामध्ये बहुतेक स्त्रियांभोवती  नातेवाईकांचा गराडा असे – नव्या बाळाची शुश्रुषा करण्यासाठी. पण मरीया आणि योसेफ एकटेच होते – थकून गेलेले. आता या जनावरांच्या गोठ्यात या नवजात बालकाला कुठे झोपवायचे?
त्यांनी गव्हाणीची निवड केली. जनावरांना चारा घालण्याचे एक ओबडधोबड पात्र. त्या परिस्थितीत हीच त्यांची उत्तम निवड होती.

मेंढपाळांना दिलेली खूण

मरीयेने जेव्हा येशूबाळाला गव्हाणीत ठेवले तेव्हा तिच्या मनात काय विचार आले असतील बरे? त्याला तिथे ठेवताना ती घुटमळली असेल का? तिला सुरक्षित वाटले असेल का? ती जनावरे अन्नाच्या शोधात गव्हाणीजवळ आली असतील तर त्यांना ह्या दोघांनी हाकून लावले असेल का? ती गव्हाणी पाहून त्यांच्या असहाय परिस्थितीची तिला अधिकच जाणीव झाली असेल का? जेव्हा आपल्या झोपलेल्या बाळाला ती पाहत होती तेव्हा ही खरंच देवाची योजना आहे की काय असा विचार तिच्या मनात आला असेल का?

आणि मग मेंढपाळ आले. त्यांनी या तरुण जोडप्याला घडलेली सर्व हकीगत सांगितली. देवदूतांनी त्याच्या जन्माची घोषणा केली आणि देवाच्या गौरवाचे गीत गायले होते.

मेंढपाळांची हकीगत ऐकून मरीयेच्या अंगावर रोमांच उभे राहिले असतील. जरी या जन्माच्या वेळी मरीया आणि योसेफ एकटेच होते तरी स्वर्ग आनंद करत होता आणि स्वर्गीय यजमानांनी मेंढपाळांना जाऊन येशूची भक्ती करण्यास सांगितले होते. तिला खात्री देत की हा खरोखरीच देवाचा पुत्र आहे.

आणि मेंढपाळांना ते कसे सापडले? हाच तारणारा हे त्यांना कसे समजले?

गव्हाणी. हेच बाळ ख्रिस्त आहे हे त्यांना गव्हाणीमुळे समजले. ही देवापासून मिळालेली खूण होती. देवद्तांनी सांगितले होते “आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२).

बेथलेहेमात त्या रात्री दुसरी बाळेही जन्मली असतील. आणि त्यांना बाळंत्याने गुंडाळले असेलही. पण दुसरे कोणतेच बाळ गव्हाणीमध्ये निजवले गेले नव्हते.

ही गचाळ, घाणेरडी, दुर्गंधी येणारी, चारा ठेवण्याची गव्हाणी एक खूण होती जी देवाने मेंढपाळांना तारणारा कुठे निजला आहे हे दाखवण्यासाठी वापरली.

देवनियोजित गोंधळ

बायबलमधील चिन्हे /खुणा या महत्त्वाच्या असत. गीदोनाची खूण होते ओली लोकर – कोरडी जमीन आणि नंतर त्याउलट. हिज्कीयाची खूण होती शंकूयंत्राची मागे उतरलेली सावली. आहाजाला दिलेली खूण होती कुमारी गर्भवती होईल. ह्या सर्व खुणा चमत्कार होते. असामान्य आणि अनैसर्गिक.

आणि जसे मरीयेने येशूला गव्हाणीत झोपवले तेव्हा तिला स्वत:ला सुद्धा ते अनैसर्गिक वाटले असेल. गव्हाणीत बाळ सापडण्याची अपेक्षा कोणीच करणार नाही. आणि देवाचा पुत्र तर नाहीच नाही. ही खूण  इतर सर्व खुणांप्रमाणेच लक्षणीय होती.

जेव्हा मेंढपाळांनी मरीयेला ही खूण सांगितली तेव्हा तिला एक आश्चर्यकारक खात्री मिळाली असेल. गव्हाणी ही पहिल्यापासून देवाची योजना होती. तिला देवाने पाहून ठेवले होते.

कदाचित मेंढपाळांप्रमाणेच मरीयेलाही खुणेची गरज होती. ती देवाच्या इच्छेमध्येच आहे याच्या खात्रीसाठी. देव तिच्याबरोबर होता आणि अजूनही तो तिचा उपयोग करून घेत होता.

देवाकडून एक विचित्र खात्री

आपल्या सर्वांना अशी खात्री हवी असते. आपल्या नैसर्गिक जगामध्ये जेव्हा सर्व सुरळीत चाललेले असते तेव्हा  आपले निर्णय योग्य आहेत अशी खात्री आपण बाळगतो. कारण ते योग्य स्थळी पोचलेले असतात.
पण जेव्हा परिस्थिती अगदीच बिकट होत जाते तेव्हा देवाच्या राज्यात आहोत या खात्रीबद्दलचे काय? आपल्याला हवे त्याच्याविरुद्ध मिळाले? इतका नमवणारा अनुभव?   

आपल्या एकाकी ठिकाणी देव आपल्याबरोबर आहे याच्या खात्रीबद्द्ल काय? जर गव्हाणी हीच खात्री असेल तर काय?

जेव्हा आपण काहीतरी सुंदर होण्याची अपेक्षा करताना आपली स्वप्ने व योजना धुळीस मिळतात आणि आपले जीवन दीन आणि अस्पष्ट दिसू लागते तेव्हा आपण देवाला अगदी हव्या त्याच ठिकाणी असण्याची शक्यता असते. येथे तो आपला अधिक वापर करून घेऊ शकतो.
आपल्या गहन दु:खामध्ये देव कार्यरत असतो.

म्हणून माझा कमकुवतपणा व निराशा यासबंधी जेव्हा मी शोक करू लागते तेव्हा मी गव्हाणीची आठवण करते. माझे दु:खसहन काही आकर्षक नाहीये. कुणाचेच नसते. ते गोंधळलेले, यातनामय आणि नमवणारे असते. आणि तरीही त्यामध्ये देवाचे गौरव होते.

आपल्या दु:खाचा  देव कसा वापर करून घेतो हे गव्हाणी लख्ख करते. आपली, दीनता, ज्या गोष्टी बदलाव्या अशी आपण अपेक्षा करतो, तुच्छ आणि हीन अशा गोष्टींद्वारे देव स्वत:ला गौरव मिळवून देतो. देवाचे राज्य उरफाटे आहे. जे शेवटचे ते पहिले, जे दुर्बल ते समर्थ, आणि जे मूर्ख ते ज्ञान्यांना लाजवणारे.
आणि देवाचा देहधारी पुत्र गव्हाणीत ठेवला गेला.

        स्वर्गातील  असंख्य देवदूतांसमवेत आपणही देवाची स्तुती करत म्हणू या, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती” (लूक २:१४).