जनवरी 29, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आपला मृत्यू पुढे ठेपला असता कसे जगावे

वनिथा रिस्नर

आपण लवकरच मरणार आहोत हे ठाऊक असताना आपण कसे जगावे?

अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एक दिवस आपण मरणार आहोत. पण आपल्याला लवकरच मरण येणार आहे – आपल्याला जर काही आठवडे, महिने किंवा काही वर्षेच उरली असतील तर आपले रोजचे जीवन त्यामुळे कसे बदलले जाईल? या जगामध्ये आपल्याला अधिक वेळ नाही हे ठाऊक असलेल्या व्यक्तींपासून आपण काय शिकू शकतो?

माझे पती हे विधुर होते आणि त्यांची पहिली प्रिय पत्नी – बार्ब हिने कॅन्सरशी धैर्याने  मुकाबला करत असताना त्यांना देवाच्या जवळ कसे यावे व प्रत्येक दिवस कसा ह्रदयात जतन करावा हे शिकवले. तिच्या अखेरच्या दिवसात त्यांचे पाळक म्हणाले, “आपण सगळे बार्ब बरी व्हावी आणि देवाने काही चमत्कार करावा अशी प्रार्थना करत होतो पण याहून मोठा चमत्कार हा आरोग्यदान नसून एखादी व्यक्ती मरणाला तोंड देताना  देवावर कसा भरवसा ठेवते आणि विश्वासूपणे कसे जगते हे पाहणे हा आहे.

गेल्या वर्षी पॅट्रिक या माझ्या वाचकाने मला त्याच्या दिवंगत पत्नीने लिहिलेले एक पत्र मला पाठवले. बेकीला सुद्धा कॅन्सर झाला होता आणि ३१ डिसेंबर २००० ला ती प्रभूकडे गेली. तिची वृत्ती बायबलमधील संतांसारखी होती आणि तिचे प्रभूवर लक्ष केंद्रित असल्याचे पाहून मला खूपच उत्तेजन मिळाले. ती धीराने आपली शर्यत धावत होती आणि प्रत्येक दिवस हेतुपूर्वक व कृतज्ञतापूर्वक जगत होती. आपला कॅन्सर आता शरीरात पसरला आहे हे समजल्यावर काही दिवसांनीच तिने एका व्यक्तीला पत्र लिहिले आणि  पॅट्रिकने ते पत्र प्रसिध्द करण्यास मला परवानगी दिली. त्यात लिहिले होते:

ख्रिस्तातील प्रिय बहिणीस,

आपल्या एका मैत्रिणीने मला तुझ्याशी पत्रव्यवहार करावा असे सुचवले. तिला माहीत आहे की मी कॅन्सरमधून उठले आहे व तुझ्या झगडण्यामध्ये मी तुला काही उत्तेजनपर शब्द देऊ शकेन असे तिला वाटले. तिच्या पत्राची वेळ उपरोधाची होती. त्याच दिवशी सकाळी मला समजले की माझा कॅन्सरच्या गाठी माझ्या पोटामध्ये पसरल्या आहेत. दोन दिवसांनी मला सांगण्यात आले की तो माझ्या फुप्पुसातही पसरला आहे. हे मी तुला निराश करण्यासाठी लिहीत नाही तर तुला माहीत करून देण्यासाठी की मी पण तुझ्यासारखीच गाळात अडकली आहे. हे शब्द मागल्या आठवणीतून नाही तर सध्याच्या वास्तवातून येत आहेत.

प्रथम मी विचार केला की आपल्या मैत्रिणीच्या विनंतीला मी प्रतिसाद द्यायला नको. नंतर मला दिसू लागले की ही वेळ किती प्रभूकडून योजल्यासारखी आहे. आता ही माझी संधी आहे की मी ‘लढ्याची  योजना’ स्पष्ट मांडावी.  असं करणं माझ्यासाठी पण चांगलं आहे आणि त्यामुळे तुलाही त्याचा फायदा होईल अशी आशा आहे.

१. आपल्या सर्व लढाया या मनात होत असतात हे जाणून घेऊन मी जो सर्वसमर्थ आणि दयाळू देव त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निवडले. बायबल सांगते की त्याचे नाव एल एल्योन- सर्वोच्च देव असे आहे. माझ्या जीवनात अशी कोणतीच गोष्ट येऊ शकत नाही जी प्रथम देवाच्या प्रेमाच्या बोटांमधून चाळून पडलेली नाही. पृथ्वीचा पाया घालण्यापूर्वी देवाला ठाऊक होतं की मला कॅन्सर होणार आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी लागणाऱ्या साधनांची तरतूद त्याने पूर्वीच केली आहे. माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या परीक्षेत देवाची योजना अशी आहे की मी विजयी व्हावे, पराभूत होऊ नये.

२. हा आजार मी एक देणगी म्हणून स्वीकारला आहे. मान्य आहे की एका दहा गियरच्या सायकलची अपेक्षा करत होते पण त्याऐवजी एक वही बक्षीस मिळाली. पण तरीही ते बक्षीसच आहे. हा वेळ देवाच्या अगदी जवळ येण्याचा, त्याचा पूर्णपणे अनुभव घेण्याचा, जीवनातील साधे आनंद अनुभवण्याचा आणि ज्या गोष्टी खऱ्या रीतीने महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. मी रोज न रोज देवाला या कॅन्सरच्या देणगीसाठी उपकार मागेन.

३. जरी हा कॅन्सर माझ्या जीवनातील सर्व काही व्यापू पाहतो तरी मी स्वत:ला बुडू देणार नाही. मी दररोज कोणापर्यंत तरी पोचणार – पत्राद्वारे, उत्तेजन देऊन, सेवेच्या कृत्यांनी किंवा प्रार्थनेद्वारे.

४. मी माझ्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही. ( सध्या तर त्या अगदी बेभाम धावत आहेत.) जशी गरज पडेल तसे मी रडत राहीन आणि माझ्या भावनांना वाट करून देईन, पण मी त्यांना माझ्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही.

५. मला  जे काही होतंय ते मी दुसऱ्यांना सांगेन आणि त्यांच्या आधार व प्रार्थनांवर अवलंबून राहीन. हे मी एकटी करू शकत नाही. पण इतरांना माझी सेवा करून मिळणाऱ्या आशीर्वादापासून मी वंचित करणार नाही.

६.  मी अल्प- काळासाठी व दीर्घ काळासाठी उद्दिष्टे करीन  म्हणजे भविष्यात पुढे पाहण्यासाठी काही तरी असेल. उदा. जून २००१ ला माझ्या आईबाबांच्या ५० व्या लग्नाच्या वाढदिवसाला हजर राहण्याची माझी योजना आहे. येत्या वर्षात आमच्या मुलाला डिस्ने वर्ल्डला घेऊन जाण्याची माझी योजना आहे. माझी व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी काही कोर्सेस करण्याच्या योजना मी करत आहे.

७. हसण्यासाठी मी दररोज काहीना काही कारण शोधणार. (मग कार्टूनच्या पुस्तकात पैसे खर्च करावे लागले तरी चालेल.)

८. माझे जीवन शक्य तितके सामान्य राखण्याचा मी प्रयत्न करीन. मला शारीरिक शक्ती आहे तोपर्यंत मी दररोजची कामे व जबाबदाऱ्या पार पाडत राहीन. यामुळे जीवनाच्या सामान्य बाबी मला अनुभवता येतील आणि स्वत:ची कींव करणे व अंतर्मुख होत जाण्यापासून माझा बचाव होईल.

पॅटी, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. तू प्रामाणिक व निर्दोष  (फिली. १:१०) असावेस म्हणून.  प्रामाणिक हा शब्द ग्रीक भाषेत त्या काळी बाजारात होणार्‍या चुकीच्या व्यवहारातून निष्पन्न झाला  आहे. आज आपण जसे प्लास्टिक वापरतो तसे त्या काळात प्रत्येक जण अनेक  कामांसाठी मातीची भांडी वापरत असत. ही भांडी चांगल्या रीतीने बनवणे महत्त्वाचे काम असे. बहुतेक भांडी चांगली बनवली जात. पण काही बेईमानी कुंभार असत. त्यांना एखाद्या भांड्याला तडे गेल्याचे आढळे. ते भांडे फेकून देण्याऐवजी ते तो तडा बुजवण्यासाठी मेणाने भरून टाकत. जर ते भांडे त्या दिवशी लवकर खपले गेले तर ते चालून जात असे. पण तिथल्या कडक उन्हामध्ये अधिक वेळ राहिल्यास ते मेण वितळून जाई व तडे दिसू लागत. पौलाची प्रार्थना अशी होती की ते प्रामाणिक असावेत म्हणजे “सूर्याने परीक्षा केलेले” असावेत.

या समयाचे ताण आणि ताप तुला जाणवत असताना देवाच्या कृपेने तू मेणाविरहित आढळावीस अशी मी प्रार्थना करते.

ख्रिस्ती प्रीतीमध्ये

बेकी स्किनर

मला हे पत्र आवडते कारण ते व्यावहारिक आहे, बायबलनुसार आहे आणि त्याला उच्च दृष्टिकोन आहे. बेकीच्या शब्दांनी तुम्हाला उत्तेजन मिळेल अशी मी प्रार्थना करते. विशेषकरून ज्यांचे असे वैद्यकीयरित्या कठीण निदान झालेले आहे त्यांनी अशा समयामध्ये ताप आणि ताण यांना प्रामाणिकपणे व आशेने तोंड द्यावे. येशूला आपण केव्हातरी तोंडोतोंड पाहणार असलो तरी मी त्याला धन्यवाद देते की या जीवनाच्या अखेरपर्यंत तो आपल्याबरोबर आहे. आणि त्यानंतर तो आपल्याला आपल्या घरी नेईल आणि तिथे आपण कायम त्याच्याबरोबर आनंदात राहू.  

Previous Article

आत्म्याचे फळ -विश्वासूपणा

Next Article

तुम्हाला स्वर्गात का जायला हवंय

You might be interested in …

लक्ष विचलित झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल

जॉन ब्लूम येशूने शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सांगितलेले वाक्य असे आहे, “कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको” (मार्क ४:२३). जर आपण शहाणे असू तर येशू जे काही सांगतो ते आपण ऐकू, विशेष करून त्याने वारंवार […]

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल?

जॉन ब्लूम जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख […]

जेव्हा प्रीती हे युध्द असते लेखक : ग्रेग मोर्स

जीवनातील सर्वात जिवलग मित्र आता तुमच्यासमोर शत्रू म्हणून उभा आहे (असं तुम्हाला वाटतंय). शस्त्रं उगारलेली आहेत. तप्त शब्दांची फेकाफेक होते. युद्धाची सुरवात होते. तुम्ही ठोसा मारा किंवा झेला, तुम्हाला इजा होतेच. एका दुष्ट शब्दाची दुसऱ्याने […]