संकलन – क्रॉसी उर्टेकर
लेखांक २
अठरावे शतक: बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग १६८३-१७१९ : पुढे चालू
आपल्या तनख्यातून होईल तितका खर्च करून, देवाच्या सहाय्याने, मित्रांच्या मदतीने, लाजेकाजे शत्रुंनीही केलेल्या मदतीने बांधलेल्या मंदिराचे १४ ॲागस्ट १७०७ रोजी समर्पण झाले. त्यावेळी खूप विधर्मी, हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती लोकही जमले होते. झिगेन्बाल्गने तामीळ व पोर्तुगीज भाषेत उपदेश केला. यानंतर बाप्तिस्मा घेणाऱ्यांची संख्या
हळूहळू वाढू लागली. काम वाढले तसा खर्चही वाढला. आपल्या गरजा कमालीच्या कमी करून ते खर्च भागवायचे. यशासोबत स्थानिक लोकांचा व युरोपियनांचा विरोधही वाढू लागला. गव्हर्नर तर उदासीनच होता. एकदा तर त्याने हद्दच केली. क्षुल्लक कारणावरून त्याने झिगेन्बाल्गला ४ महिने अटकेत ठेवले. त्याचे खूप हाल केले. शाई, दौत व कागदही तो त्याच्या हाती पडू देत नव्हता. त्यामुळे त्याचा वेळही जाता जात नव्हता आणि काही कामही होत नव्हते. कोणाशीही तो संपर्क देखील साधू शकत नव्हता. पण कुरकुर न करता निमूटपणे त्याने सर्वकाही सहन केले, आणि सुटका होताच जोरात काम सुरू केले. तेव्हा युरोपियन व स्थानिक लोकांनी त्याला खूप सहानुभूती दाखवली. मायदेशाहून सहाय्य येईपर्यंत आर्थिक मदत केली. १७०८ मध्ये बाप्तिस्मा पावलेल्यांची संख्या १०१ होती.
त्यात भर पडू लागल्याने तो फार खूश झाला. कन्नावादी नावाच्या एका प्रतिभावंत कवीने प्रभूचा स्वीकार केला. त्याच्या कलागुणांचा मंडळीच्या कार्यासाठी त्याने भरपूर उपयोग करून घेतला. त्याच्याकडून त्याने भरपूर भक्तिगीते लिहून घेतली. स्थानिक लोकांनी त्यांना चाली लावून वाद्यांची साथ दिली. मुलांची तर ही गीते तोंडपाठ असत. १७०९ मध्ये तर सेवक व पैसे या स्वरूपात मायदेशाहून मदत आली. त्यामुळे या मिशनरींच्या आनंदात भरच पडली. मिशनऱ्यांची संख्या वाढल्याने त्यांनी मोठे घर घेतले. त्यांच्या सोबतीने ऐक्याने काम केल्यास काम वाढणार होते. त्यांच्यातील ग्रंडलर हा झिगेन्बाल्गच्या पश्चात कामाचा मोठा आधार बनला. जॅार्डन दीक्षित नसूनही खूप उपयुक्त होता. पण बोव्हिंग संकुचित दृष्टीचा व हट्टी असल्याने कामाची हानी करणारा होता. त्याला गव्हर्नरची फूस होती. आरंभी झिगेन्बाल्गला याची कल्पना आली नव्हती.
त्रिंकोबारमधील कामाला बळकटी आणायला झिगेन्बाल्गला दोन वर्षांहून अधिक काळ लागला. पण त्रिंकोबार बाहेरील संपूर्ण भारत प्रभूसाठी जिंकायचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या कार्यपद्धतीवरून प्रॅाटेस्टंट मिशनचे वैशिष्ट्य व ध्येय स्पष्ट झाले. त्याची छाप पुढे येणाऱ्या मिशनऱ्यांवर पडली. मंडळीच्या जोपासनेला प्रॅाटेस्टंटांनी प्राधान्याने महत्त्व
दिले. भारतीय ख्रिस्ती जनांनी आपले ऱ्हदय, तन, मन,धन ख्रिस्ताला वाहावे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे बुद्धीला पटून त्यांनी विश्वास ठेवावा म्हणून प्रश्नोत्तररूपाने ख्रिस्ती शिक्षण देणे त्यांनी चालूच ठेवले. दौरे काढून झिगेन्बाल्ग ख्रिस्तीतरांना एकत्र आणून त्यांचे विचार समजून घेत असे. तंजावरच्या राजाखेरीज अनेक ठिकाणी त्याचे स्वागत झाले. त्याने आपल्या कार्यपद्धतीचे तीन प्रकार ठरवले होते. एक, धर्मविषयक सार्वजनिक चर्चेच्या सभा घेणे. दुसरे, ख्रिस्ती धर्मविश्वासाचे साहित्य, ग्रंथ लिहून त्यांचा प्रसार करणे. तिसरे, मायबोलीत बायबलचे भाषांतर करणे. यापैकी दुसऱ्या व तिसऱ्या पद्धतीने आजही काम चालू आहे. वादविवाद पद्धतीत आपण अजिंक्य राहूनही त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष स्वीकार करण्याबाबत कोणी धाडस करत नसल्याने ती पद्धत हळूहळू वेळखाऊ व अग्राह्य मानली गेली. पण या तिन्ही पद्धतीत झिगेन्बाल्ग भारतीय प्रॅाटेस्टंट मंडळीचा सरदार म्हणून शोभून दिसतो. वादविवाद व चर्चा उभयपक्षी फारच सौजन्याने होत असत. एकदा नागपट्टण येथे कोणत्याही ग्रंथाचा वापर न करता तर्कशुद्ध विचार मांडून पाच तास चर्चा झाली. मूर्तिपूजा व अनेकेश्वरवाद बुद्धीला पटण्याजोगे नसल्याचे सिद्ध करण्यात झिगेन्बाल्ग यशस्वी झाला.
प्रतिस्पर्धी तर मूकच झाले. पण श्रोत्यांच्या मनावर परिणाम होऊन कोणीही ख्रिस्ती झाले नाही. परिस्थिती मारून नेऊन त्यांच्या प्रतिनिधींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून त्यांच्या चलाखीचे झिगेन्बाल्गने कौतुकच केले. पण ही पद्धत त्याने निरुपयोगी ठरवली. मिशनरींचे म्हणणे श्रोत्यांना पटूनही समाजासमोर उघडपणे हा विश्वास स्वीकारण्यास
कोणी धजत नव्हते. दुसऱ्या दोन पद्धती मात्र उपयुक्तच असल्याचे सिद्ध झाले. बायबलवाचन व अभ्यास केल्याने लोकांचे अंत:करण बदलत होते. हे ओळखून त्याने शाळेची क्रमिक पुस्तके, धर्मविश्वासावरील प्रश्नावली, ख्रिस्ताचे जगातील जीवन तसेच मुस्लिम, मूर्तिपूजक, यहूदी व ख्रिस्ती धर्मविश्वास, भक्तिगीतसंग्रह, उपासनापद्धती अशी पुस्तके लिहिली. तामिळ भाषेत शब्दकोष लिहिला. त्याचा पुढे मिशनऱ्यांना खूप फायदा झाला. कारण त्यात रोमन उच्चार व जर्मन अर्थही दिला होता. मात्र ताडपत्रीवर लिहिलेला हा शब्दकोष १५० वर्षे तसाच पडून होता. १८६० मध्ये तो छापण्यात आला. हे काम करीत असता त्याने बायबल भाषांतराचे काम चालूच ठेवले होते. लोकांना मातृभाषेत बायबल वाचायला मिळावे हे त्याचे ओझे होते. भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण होण्याच्या आत मातृभाषेत लोकांच्या हाती नवा करार पडावा हा त्याचा उद्देश होता. १७०८ मध्ये नव्या कराराचे भाषांतर पूर्ण झाले. हजार वर्षे लोटूनही बायबल भाषांतराचा विचारही यापूर्वी कोणी केला नव्हता. बेईची या रोमन कॅथॅालिकाने तर या उपक्रमाचा उपहास केला. लोकांना तर नजरेसमोर वचन असल्याने ते वाचता येत होते व समजतही होते. ही फार महान गोष्ट घडली होती. कारण मंडळीची आध्यात्मिक वृद्धी करणे, सेवेविषयी त्यांना आस्था निर्माण करणे, त्याबाबत सहानुभूती व तळमळ वाटून त्यांचे सहाय्य मिळवणे हा मिशनरी कामाचा महत्त्वाचा भाग आहे. या कामी झिगेनबाल्ग अग्रगण्य दिसतो. त्या काळी या कामाची झिगेनबाल्गने मशाल पेटवून ती पेटती ठेवली. या कामी त्याला येथे कोणी आश्रयदाता नव्हता. आपल्याला पुष्कळशी अनुकूल परिस्थिती आहे. सध्याच्या मंडळीने आत्मे जिंकण्याच्या व मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीच्या कार्याबाबत आपण काय करायला हवे याविषयी आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा रे. म. बोहिम याच्या पत्नीला जाते. मिशनरींना अशा प्रकारे पाठिंबा मिळवून देण्याचे
कामही किती मोलवान आहे, हे आजच्या मंडळीने लक्षात घ्यावे. त्या पत्रामुळे युरोपीयन देशांना भारताची दैवते, तत्त्वज्ञान, भाषा, रीतीभाती, धर्मांतरातील अडचणी मिशनरींची कार्यपद्धती व देवाची या देशावरील कृपा याविषयी माहिती समजली. इंग्लंडमधील एस.पी.जी. संस्थेने भारतातील डॅनिश मिशनचे संवर्धन केले. त्यांनी झिगेन्बाल्गला
नौदलाच्या जहाजाने २५० नव्या कराराच्या प्रती, कागद, छापखाना व एक मुद्रकही पाठवला. पण वाटेत संकट आले. एका फ्रेंच लढाऊ जहाजाने या जहाजावर हल्ला केला. जहाज व माल जप्त केले गेले. फक्त कागद व छापखाना हाती आला. त्यांना खंडणी देऊन जहाज सोडवून घेतले. पुढचा प्रवास सुरू झाला. पण वाटेत तो मुद्रक मरण पावला. ॲागस्ट १७१२ मध्ये छापखाना व कागद त्रिंकोबारला पोहंचले. पण मुद्रकाचा प्रश्न उभा राहिला. देवाच्या कृपेने डॅनिश कंपनीत छपाईकाम शिकलेला एक शिपाई सापडला. वरिष्ठांच्या परवानगीने त्याला छापखान्याचे काम दिले व
एकदाचा छापखाना मार्गी लागला.
प्रियांनो, आज पुष्कळ मंडळ्यांना सध्याचे सुवार्ताकार्य, मिशनकार्य, त्यातील आव्हाने, मिशन क्षेत्रे याविषयी काहीही माहिती नाही. मिशनरी परिषदा भरवून मंडळ्यांनी याविषयी लोकजागृती करणे गरजेचे आहे. त्या राणीप्रमाणे एका व्यक्तीचे पत्र, लोकांसमोर आणल्याने केवढे काम झाले व मिशन कार्याला गती आल्याचा हा रोचक इतिहास आपण पाहिला. आज वैयक्तिक सुवार्ताप्रसारात पुष्कळ मंडळ्या उदासीन आहेत हे पाहून खेद वाटतो.
छापखाना सज्ज होताच प्रथम लहान मुलांचे पाठ्यपुस्तक व तारणाचा मार्ग ही पुस्तके छापली. पुढे १७१३ मध्ये झिगेन्बाल्गच्या जर्मन मित्रांनी दुसरा छापखाना देणगी म्हणून दिला. तर एका हुशार कारागिराने तामिळ लिपीचा खोल अभ्यास करून तामिळ अक्षरांच्या खिळ्यांचा संच बनवला. आणि आपल्या भावाला सोबत घेऊन या छापखान्यासह तो त्रिंकोबारला आला. तामिळ भाषेत नवा करार छापण्याचे काम सुरू झाले. १७१४ मध्ये चारही शुभवर्तमाने छापून झाली. ही तामिळ ख्रिस्ती जगतातील अविस्मरणीय गोष्ट होती. अविश्रांत सलग ८ वर्षे झिगेन्बाल्गच्या श्रमामुळे त्याला ताण आला होता. त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाला. याचमुळे त्याचा सोबती प्लुटशॅा यालाही युरोपात माघारे जावे लागले होते. तो भारतात परतणे शक्यच नव्हते. पण देवाने योग्य वेळीच त्याला युरोपात भारताच्या सेवेला उचलून धरण्यासाठी ठेवले असे प्रत्ययास येते. त्याच काळात सेवेस अडखळण ठरणारा बोहिंग डेन्मार्कला परतला होता. तो तेथे लोकांना दिशाभूल करणारी खोटी माहिती देत होता. तेव्हा लोकांच्या मनातील किल्मिश दूर करण्यासाठी पुराव्यांसह खरी माहिती देण्याचे मोलाचे काम प्लुटशॅाने केले.
यावरून धाडसाने सत्यासाठी एकट्याने लढा द्यायचा धडा आपण शिकतो. त्याने सोबत आपल्याबरोबर एका तामिळ तरुणालाही नेले होते. त्याला घेऊन त्याने इंग्लंड व जर्मनीत दौरे काढले. त्यामुळे भारतातील सेवेला अधिक साह्य मिळू लागले. त्यामुळे झिगेन्बाल्गला हुरूप आला. त्याने आपले मिशनक्षेत्र वाढवून श्रीलंकेपर्यंत नेण्याचे ध्येय आखले. पण त्याचा देह मन व आत्मा अथक परिश्रमामुळे शिणल्याने त्याला तरतरीसाठी विसाव्याची गरज भासू लागली. १७१४ मध्ये एका स्थानिक तामिळ तरुणाला घेऊन तो युरोपला निघाला. तो तरुण भारतातील सेवेचे दृश्य फळ असल्याचा पुरावाच होता. वाटेत त्या दीर्घ प्रवासात झिगेन्बाल्ग जुन्या कराराचे भाषांतर करण्याचे व शब्दकोषातील दोष दुरुस्त करण्याचे काम करत होता. या कामी त्या तरुणाने त्याला खूप मदत केली. पूर्वी भारतातील
रोमन कॅथोलिक ख्रिस्तीच प्रवासात दिसायचे. आता झिगेन्बाल्ग प्रॅाटेस्टंट मिशनच्या यशाचा अहवाल घेऊन निघाला होता. तेव्हा मंडळीत २२१ बाप्तिस्मा घेतलेले प्रॅाटेस्टंट ख्रिस्ती होते. तर २२ लोक बाप्तिस्मापूर्व शिक्षण घेत होते. दानावर पाच वसतीगृहे चालवली जात होती. त्यात ७८ मुले शिकत होती. एक मंदिर बांधले होते. एक मिशनगृह बांधले होते. स्थानिकांसाठी तामिळ भाषेत ३२ पुस्तके छापली होती. हा अहवाल घेऊन आठ महिन्यांच्या प्रवासानंतर १ जून १७७५ ला तो युरोपात पोहंचला.
आता डॅा. लुटकेन वारले होते. तो प्रथम डेन्मार्कच्या राजाच्या भेटीला गेला. तेव्हा डेन्मार्क व स्वीडनमध्ये युद्घ चालू होते. प्रशिया डेन्मार्कच्या मदतीला धावून आला होता. तर राजा स्ट्रॅालसंडला वेढा देऊन बसला होता. तेथे राजा व झिगेन्बाल्गची भेट झाली. रुबाबदार, भारदस्त, तेज:पुंज, निश्चयी, शांत वृत्तीचा, कुशाग्र बुद्धीचा, चमकदार डोळ्यांचा, पण प्रेमळ व सौजन्यता आणि मनमिळाऊपणाची पावलागणिक साक्ष पटवणारा हा कोणी राजाच्या मेहरबानीसाठी आलेली परकीय व्यक्ती नसून प्रसिद्ध मिशनरी झिगेन्बाल्ग असल्याचे सैनिकांच्या तोंडी पसरले. पाच तास त्यांची मुलाखत चालली होती. भारतात परतण्यापूर्वी कोपनहेगनला मिशनबोर्ड स्थापण्याचे काम राजाने त्याच्यावर सोपवले.
ते त्याने चोख बजावले. तेथून आता त्रिंकोबारची सूत्रे हलू लागली. राजाच्या हुकमाने अधिकारी वर्गाचा विरोध बंद झाला. गव्हर्नर हेल्युअसला बडतर्फ करून मायदेशी परत बोलवण्यात आले. तेथे असताना झिगेन्बाल्गने डेन्मार्क, जर्मनीचा दौरा काढून भारतातील मिशनकार्याची मंडळ्यांना माहिती दिली. लोकांना मिशनकार्याविषयी आस्था व प्रेम वाटू लागले. त्याचा श्रमपरिहारही झाला. याच सुमारास त्याचा विवाह डॅारथीया सॅाल्ट्झमनशी झाला. ही सुदृढ, सुसंस्कृत, धार्मिक स्त्री ८ वर्षांपूर्वी ज्या शाळेत होती, तेथे हा शिक्षक होता. विवाहानंतर दोघे इंग्लंडला आले. तेथे मिशनकार्याची कीर्ती चहुकडे पसरली होती. त्यांचे तेथे उत्तम स्वागत झाले. लोकांची कळकळ व सहानुभूती लाभली. एस.पी.सी.के. संस्थेने पैसे व मानपत्र देऊन त्याचा गौरव केला व नित्यनेमाने मदत करण्याची हमी दिली. ४ मार्च १७१६ला निघून १९ ॲागस्टला ते दोघे चेन्नईला पोहंचले. त्याचा रजाकाळ फार अल्प होता. तो उत्साही होता, त्या रजाकाळातही त्याने कामेच केली. त्याला पुरेशी विश्रांती मिळाली नाही. याचे परिणाम पुढे प्रत्ययास येतात.
झिगेनबाल्गच्या अनुपस्थितीत ग्रंडलरने सर्व कामे उत्तम प्रकारे केली व वाढवली. आता झिगेन्बाल्ग परतल्यावर ९ फेब्रुवारी १७१७ ला अधिक मोठ्या नवीन मंदिराची पायाभरणी झाली. ‘नवे यरुशलेम’ या नावाच्या या नवीन मंदिराचा उद्घाटन सोहळा ११ ॲाक्टोबरला संपन्न झाला. ते क्रुसाच्या आकाराचे असून मधल्या भागात व्यासपीठ आहे. वेदीच्या दोन अंगांना झिगेन्बाल्ग व ग्रंडलरच्या कबरी आहेत. आज प्रेक्षणीय स्थळ म्हणून लोक या
स्थळाला भेट देतात.
( पुढे चालू)
Social