जनवरी 5, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कोणत्याही हाताने मेंढरांना चारा

ग्रेग मोर्स

माझ्याद्वारे देवाची सेवा होते, यामध्ये माझा भर देवावर की माझ्यावर आहे हे मी नेहमी पडताळून घ्यायला हवे.

यामधील तण हे हळूहळू वाढत जाते. माझे लेख कसे काम करतात? माझा अभ्यास गट कसा वाढत आहे? माझ्या पुस्तकाचा खप कसा होतोय? माझ्या रविवारच्या प्रार्थना कशा उत्तेजन देतात? माझे उपदेश, मार्गदर्शन, सुवार्तेचे प्रयत्न यशस्वी होत आहेत का? (या सर्व प्रश्नांचा रोख माझ्याकडे असतो)

येथे मी आत्म्यावर प्रीती करणाऱ्या व देवाचेच गौरव करू पाहणाऱ्या देवाच्या सेवकासारखे बोलत नसतो (रोम १५:२०).

स्वत:चेच अभिनंदन करणाऱ्या, स्वत:च्या पाठीवर कौतुकाची थाप मारणाऱ्या आणि काम चांगले आहे कारण मी ते करतोय अशा वृत्तीबद्दल मी बोलत आहे. गोंधळलेल्या प्रेरणांबद्दल मी बोलत आहे. शांत स्मितहास्य किंवा आरामशीर बैठक आणि आपल्या खिशात हळूच  गौरव ढकलणे. हा मोह जॉन बन्यन यांनी दिलेल्या प्रतिसादात छान पकडला गेला आहे. कोणीतरी त्यांना म्हटले की आताच केलेला तुमचा संदेश खूपच छान होता. त्यांचे उत्तर; “तुम्ही हे सांगण्यात खूपच उशीर केला; मी पुलपिट सोडण्यापूर्वीच सैतानाने मला हे सांगितले.”

इतरांचे यश, अगदी जवळच्या मित्रांचेही यश असे वहावत जाणे प्रकट करते. जेव्हा तुमच्याच क्षेत्रात ते वरचढ होतात तेव्हा तुमची कानशिले गरम होतात. कुरतडणारी शंका, दहशतीची एक भावना, हेवा, कटूपणा, ओशाळवाणेपणा, स्वत:ची कींव. देवाने आपले नाव पुढे केले आहे आणि आत्म्यांना फायदा झाला आहे यात आनंद करण्यापेक्षा सगळे बिनसले आहे कारण अनंतकालिक देवाने माझ्याऐवजी त्यांना निवडण्याचे ठरवले.

जेव्हा तुम्ही अपयशी झालेल्या क्षेत्रातच इतर जण यशस्वी होतात तेव्हा हा मोह पराकोटीला पोचतो. आपण चढू शकलो नाही त्या उंचीवर कोणीतरी लोकांना नेते, आपण चालू शकलो नाही त्याहून दूर त्यांना मार्गदर्शन करते. आपण, शौलाप्रमाणे आपले हजारो जण जिंकले आहेत, तरीही लोक दुसर्‍याचे गुण गात आहेत ज्याने दहा हजार जिंकले आहेत. आपण अंधुक प्रकाश आहोत. ह्या तुलनेने शौल वेडापिसा झाला. त्याने दाविदाला मारून टाकायला त्याच्यावर भाला फेकला (१ शमुवेल १८:१०-११).  आपला काय प्रतिसाद असतो?

कितीतरी  सेवा आपल्यापुढे आहे. आपण प्रार्थना करायला हवी की मोशेच्या अखेरच्या काळात जसे त्याला मेंढपाळाचे अंत:करण होते तसे आपल्यालाही असावे.

अभिवचनाकडे पाहणे

सेवेच्या अखेरच्या काळात मोशेला तोंड द्यावे लागणाऱ्या अडचणींचा विचार करू या. “ फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारल्यावर, पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतल्यानंतर (इब्री ११:२४-२५), मिसराला आपल्या गुडघ्यावर येण्यास भाग पाडल्यानंतर , इस्राएल लोकांना तांबड्या समुद्रातून पार नेल्यानंतर , सीनाय डोंगरावर चढून गेल्यानंतर, कित्येक दशके रानात भटकल्यानंतर त्याचा प्रवास वचनदत्त देशाची सीमा केवळ वरून पाहण्यामध्ये संपला. पण त्यात त्याला पाउल टाकता आले नाही.

तुम्हाला आठवत असेल की वृद्धपणा या संदेष्ट्याला दूध-मधाच्या  देशात जाण्यापासून रोखू शकत नव्हता. “मोशे मृत्युसमयी एकशे वीस वर्षांचा होता, तरी त्याची दृष्टी मंद झाली नव्हती व त्याची प्रकृतीही क्षीण झाली नव्हती. (अनुवाद ३४:७). तर देवानेच त्याला तेथे जाण्यापासून  रोखले.

देवाने मोशेला वचनदत्त देशात जाऊ दिले नाही याचे कारण त्याचे पाप. पुन्हा पुन्हा तक्रार आणि कुरकुर करणाऱ्या लोकांमुळे निराश होऊन मोशेने आपल्या काठीने पाणी देणाऱ्या खडकावर प्रहार केला, जो ख्रिस्ताचे प्रतिक होता (१ करिंथ १०:४; निर्गम २०:११). खडकाशी बोल असे देवाने त्याला सांगितले होते पण मोशेने अधिक आक्रमक पवित्रा घेतला (गणना २०:८). नंतर देव म्हणाला,  “तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, इस्राएल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रकट केले नाही, म्हणून ह्या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशात ह्यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही.” (गणना २०:१२). आणि मोशेने त्यांना तेथे नेले नाही.

अखेरच्या दिवसांमध्ये देवाने मोशेला पर्वतावर नेले आणि वचनदत्त देशाची संपूर्ण लांबी रुंदी दाखवली (अनुवाद ३४:१-४). ज्याने कित्येक दशके लोकांना चालवले होते तो मोशे त्या देशाकडे पाहत असताना मरण पावला. लोकांना यार्देनेपलीकडे जाण्याची संधी  त्याचा मदतनीस यहोशवा याला मिळाली. देवाने स्वत: आपल्या सेवकाला यार्देनच्या अलीकडच्या बाजूला पुरले (अनुवाद ३४:५-६). त्याने मोशेला लोकांना मिसर देशातून बाहेर काढण्यास मुभा दिली पण वचनाच्या देशात नेण्यात  नाही.

मेंढपाळाचे ह्रदय

निराश आणि शिक्षेमध्ये असलेल्या मोशेने कसा प्रतिसाद दिला?

देवाने त्याला पर्वतावर जाण्यास बोलावले व तो का जाऊ शकत नाही याची आठवण दिल्यावर (गणना २७:१२-१४) भूतलावरील सर्वात नम्र मोशे (गणना १२:३) उत्तर देतो. मोशे परमेश्वराला म्हणाला,“सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी; तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल; तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणील. असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडा-मेंढरांप्रमाणे होणार नाही.”(गणना २७:१५-१७).

येथे विश्वासू मेंढपाळचे ह्रदय दिसते. पाळक आणि नेत्यांनी अनुसरावे असे हे उदाहरण आहे. मोशे कुरकुर करत नाही. तो देवाने अन्याय केला असा दोष देत नाही. वचनाच्या देशात प्रवेश करू दे अशी आपली विनवणी (अनुवाद ३:२५-२६) देवाने ऐकली नाही म्हणून तो निराश होत नाही. तो यहोशवाचा घातपात करत नाही व त्याच्या वर भाला फेकत नाही. ज्या देवासाठी  तो सेवा करत होता आणि ज्या लोकांची तो सेवा करत होता त्यांच्या वरती तो आपली सेवा किंवा प्रतिष्ठा ठेवत नाही. तो संपूर्ण अधीनतेने त्याच्या देवाला विनंती करतो की या लोकांना मेंढपाळाशिवाय राहू देऊ नको.

तर माझ्या मेंढरांना चार

शास्त्रलेखांमध्ये आपण मोशेला पाहण्याची ही शेवटची वेळ नाही. तुम्हाला आठवते का तो पुन्हा केव्हा दिसला?

कित्येक शतकानंतर जो देवाच्या लोकांचा महान मेंढपाळ त्याला मोशे समोरासमोर भेटणार होता. एका दुसऱ्या पर्वतावर, रूपांतराच्या डोंगरावर मोशे येशूबरोबर बोलणार होता. त्यांनी कशावर चर्चा केली? येशूचे “निर्गमन” (लूक ९:३१). जो उत्तम मेंढपाळ येशू याच्याशी तो एलियाबरोबर बोलत होता. येशू आपली मेंढरे भाडोत्री मजूर असलेल्या लांडग्यांकडे न देता त्यांच्यासाठी तो स्वत:चा प्राण कसा देणार यावर ते संभाषण करत होते. आणि तो त्यांना मेंढपाळविरहित न ठेवता पुन्हा कसा उठणार हे ते बोलत होते.

हीच प्रीती आहे जी आपली सेवा व मीपणाची जाणीव यांच्यामधला गोंधळ सोडवते.

पौलाप्रमाणे आपण येशूच्या प्रीतीसह मंडळीसाठी तळमळ बाळगू लागतो (फिली. १:८) तेव्हा आपल्या श्रमामध्ये आपली दिशा गवसतो. तेव्हा  ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत  आपण प्रसुतीवेदना सहन करू लागतो  (गलती ४:१९), तिच्यासाठी अगदी थोड्या प्रमाणात तिची सेवा करताना,  श्रम करत असताना आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तेच आपली आशा, आपला आनंद व आपल्या अभिमानाचा मुकुट आहेत असे आपण पाहू शकतो (१ थेस्स. २:१९).

हीच प्रीती आपला प्रभाव कायम राहावा अशा महत्त्वाकांक्षेपासून आपल्याला शुद्ध करते. जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला अधिक यश मिळते तेव्हा नम्रतेने आनंद करण्यासाठी आपल्याला मदत करते. आपल्यापेक्षा इतरांनी मंडळीचे अधिक भले करावे अशी आशा आपण करू लागतो. जेथे आपल्याला अपयश आले होते तेथे इतरांना यश मिळावे अशी इच्छा आपण जेव्हा बाळगतो तेव्हा धोके हे आपले बंधू होतात. जेव्हा आपण लोकांना यार्देनेपलीकडे नेऊ शकत नाही तेव्हा देवाच्या इतर लोकांनी ते करावे अशी आशा आपण बाळगतो. तेव्हा आपण प्रार्थना करू लागतो, “कोणत्याही हाताने मेंढरांना चार.”

ख्रिस्ताच्या वधूबद्दलची प्रीती तिने आपल्याकडे लक्ष द्यावे आणि आपले कौतुक करावे या अपेक्षेपासून आपल्याला मुक्त करते. तिच्यावर प्रेम करणे म्हणजे ख्रिस्तावर प्रीती करणे हे समजून घेऊन आपण आपला भाग पूर्ण करतो. खुद्द येशूनेच तशी आठवण आपल्याला दिली आहे. पाळका, नेत्या, सेवका, “माझ्यावर प्रेम करतोस काय?” तर  “माझी मेंढरे चार” (योहान २१:१५-१७).

Previous Article

मुलांच्या जीवनात संपूर्ण बायबल कसे आणावे? 

Next Article

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल?

You might be interested in …

तुमच्या कुटुंबाला पैशापेक्षा अधिक गरज आहे

जे हॉफेलर जेव्हा माझ्या डॉक्टरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि स्पष्ट केले की मला कॅन्सर झाला आहे तेव्हा प्रामाणिकपणे माझी पहिली प्रतिक्रिया होती; “ठीक आहे.” जरी हे मी मोठ्याने म्हटले नाही तरी मला अचानक स्वस्थ […]

कुमारीपासूनच्या जन्माने झालेले येशूचे गौरव

लेखक: डेविड मॅथीस येशूचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. देव मानव असलेल्या येशूचा हा एकमेव गौरव आहे. संपूर्ण इतिहासात आतपर्यंत जन्मलेल्या अब्जावधी मानवांमध्ये एकाच व्यक्तीने जगामध्ये अशा रीतीने प्रवेश केला. देव आणि मनुष्य यांमध्ये एकच मध्यस्थ […]

गेथशेमाने बाग

लेखांक ३                                     ब –  प्रार्थना अगदी पहिली गोष्ट लक्षात येते ती प्रार्थनेच्या स्थळाबद्दल. प्रत्यक्ष अंतर आणि आध्यात्मिक मन:स्थितीचं अंतर अशी दोन अंतरं आपण पाहिली. त्याचे १२० शिष्य होते. पण चारही शुभवर्तमानं लक्षपूर्वक चाळून पाहा […]