Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 6, 2024 in जीवन प्रकाश

देवाला अंधाराची भीती नाही

देवाला अंधाराची भीती नाही

मार्शल सीगल

“कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास” (१ योहान ५:४).

या जगात इतका भरपूर अंधार आहे की तो आपल्या कोणाचाही थरकाप करू शकतो.

आपल्यापैकी अनेक कुटुंबांना कॅन्सर इतका ग्रासून टाकतो की दरवर्षी लाखो लोकांना तो मारून टाकतो. घटस्फोट अनेक कुटुंबाना एकमेकांपासून दूर सारतो आणि लहान मुलांना दु;खाने अश्रू ढाळायला लावतो. युद्ध, लढाया चालूच आहेत;  लक्षावधी लोकांना निर्वासित, बेघर करून, त्यांच्या मुखातला घास दूर करून. जात, वंश यांच्यातले भेदाभेद देशादेशांतून वाढतच आहेत. दर वर्षी या समस्या अधिकाधिक वाढतच आहेत.

या सर्व दिसणाऱ्या अंधाराखाली एक अधिक काळे सत्य, दहशत घालणारा अंधार आहे. प्रेषित पौलाने म्हटले, “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस ६:१२). आध्यात्मिक अंधाराची एक संपूर्ण प्रणाली- जिचे नेतृत्व खुद्द सैतान करत असून, ती त्याच्या कोट्यावधी भुतांद्वारे अंमलात आणली जाते. आणि ती जगातल्या कानाकोपऱ्यात प्रभाव पडत आहे – आपल्या दररोजच्या जीवनाच्या पृष्ठभागाखाली ती फैलावत आहे.

ह्या अंधारात बुडून जात असताना आपण काही  आशा धरत कसे जगावे ?

अंधार हा अत्यंत गडद आहे

जर आपल्याला येशू मिळाला आहे तर आता ह्या अंधारापासून लपण्याची गरज नाही – मग आपले दिवस कितीही गडद झाले तरी. देवाने त्याचा पुत्र येशू पाठवला  ह्यासाठी की, त्याने अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना प्रकाश द्यावा, आणि आमचे पाय शांतीच्या मार्गी लावावेत” (लूक १:७९). त्याच्या प्रकाशाने हा अंधार काही कमी गडद होत नाही. तर हा प्रकाश प्रत्येक सावली एका प्रभावाने जिंकत राहतो.

याचा अर्थ आपल्याला अंधार आता गडद नाही असे ढोंग करण्याची गरज नाही. तो कॅन्सर खरं तर त्या कुटुंबाला नाशकारी नाही. त्या घटस्फोटाने त्यातल्या कुटुंबाला उद्ध्वस्त केले जाणार नाही. त्या निर्वासित बालकांना चांगले भविष्य मिळेल. ज्या काही अंधाराला तुम्ही तोंड देत आहात तो काही इतका कठीण वा दु:खकारक नाही किंवा भीतीदायक नाही असा देखावा करण्याची गरज नाही. पण त्याचवेळी ह्या अंधाराला आपण एकट्याने तोंड देण्याची गरज नाही.

“देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही” (१ योहान १:५). आणि ख्रिस्तामध्ये, त्याने त्याचा प्रकाश आपल्या अंधाराच्या प्रत्येक लपलेल्या कानाकोपऱ्यात फैलावला आहे. त्याला अंधाराची भीती नव्हती तर तो आपल्या अंधारात आला. स्वर्गाची सुरक्षितता सोडून आपल्या बरोबर सावल्यांमध्ये चालायला तो आला. – या सावल्यांमध्ये  मरण्यासाठी, की आपण त्या मागे टाकू शकू.

आणि मग तो त्या अंधारातून पुन्हा उठला हे सिध्द करण्यासाठी की – येशूच्या नावामध्ये – अंधाराचे सामर्थ्य काढून घेतले आहे.

देव अंधारावर विजय मिळवतो

आणि या येशूने – तुमच्या येशूने अंधारावर विजय मिळवला आहे म्हणून तुम्हीही या जगातील अंधारावर विजय मिळवू शकता. प्रेषित योहानाने लिहिले आहे “मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे; कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे” ( १ योहान ४:४).

येशूने म्हटले, “माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे” (योहान १६:३३). तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का? जरी आपल्या देशात व सर्व जगभर निराशाजनक बातम्या तुम्ही दररोज पाहत असला तरी? तुम्ही तुमच्या परीक्षा आणि दु:खे याकडे पाहत असला तरी? तुमच्या देवाने या जगावर विजय मिळवला आहे. आणि त्याच्या नावामध्ये तुम्ही या जगावर विजय मिळवला आहे. “कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास” ( १ योहान ५:४).

तुमच्यामधला अंधार

देव या जगातील अंधाराला भीत नाही  आणि तो तुमच्यामधील अंधाराला पण भीत नाही. जेव्हा त्याने आपल्याला शोधले तेव्हा आपण फक्त अंधारात गुरफटलेच गेलो नव्हतो तर  आपण “प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण आपली कृत्ये दुष्ट होती” (योहान ३:१९). आपल्या सभोवतालचा अंधार इतका भयावह वाटतो याचे एक कारण आपण आपल्याला त्याच्यामध्ये खूपच पाहतो – आपला कमकुवतपणा, आपली भीती, आपली भग्नता, आपले पाप. आपल्यातील कित्येकांना आपला स्वत:चाच अंधार जास्त धमकावतो.

पण आपण येशूवर आपला विश्वास ठेवला आहे. “ ‘अंधारातून उजेड प्रकाशित होईल’ असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे”
(२ करिंथ ४:६).  फक्त जगात नाही तर आपल्या अंत:करणात.

ज्या प्रकारे त्याने अंधाराच्या आकाशगंगेत दिपवून टाकणारा सूर्य निर्माण केला तसेच त्याने आपल्या अंत:करणाचे डोळे उघडून त्याच्या पुत्राचे गौरव आपल्याला दिसू दिले. त्याने तुमचा अंधार नष्ट केला आणि तुम्ही प्रकाशावर प्रीती करणारे झाला.

तुमच्यातला उरलेला अंधार त्याच्या नावाच्या आवाजाने थरथर कापू लागतो. तुमची सर्व भीती आणि असुरक्षितता, तुमचा दोष आणि लज्जा यामध्ये येशूचे गीत गा. त्याच्या विजयामध्ये चालताना त्याने दिलेले स्वातंत्र्य आणि क्षमा यांचा आनंद घ्या. आणि मग त्या अंधारात जा इतरांना या प्रकाशात बोलावण्यासाठी.