जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

लेखक : जेराड मेलीन्जर

काही वर्षांपूर्वी माझे आजी व आजोबा अजूनही आमच्याबरोबर होते तेव्हा आम्ही एका पिकनिकला गेलो. आजी पहिल्यासारखी राहिली नव्हती. विस्मरण हळूहळू कायमचे झालेले होते. ते इतके वाढले की तिला माझे किंवा घरच्या इतरांचे नावही आठवेना. पण एक नाव ती विसरली नव्हती: तिच्या प्रभू येशूचे नाव. आणि जीवनभर त्याची जी गाणी ती गात होती तीही ती विसरली नव्हती.

पिकनिकमध्ये आजी आजोबांनी आमच्यासाठी काही गाणी गायली. एक गाणे होते “येशू काळजी घेतो का?” वृद्धापकाळाच्या अनेक आव्हानांमध्येही आजी गात होती. त्याचा भावार्थ असा: जेव्हा ह्रदयात वेदना असते, मला गीत गाता येत नाही, भक्ती करता येत नाही, ओझे भारी होते, चिंता त्रास देते, वाट लांब दिसते, थकून जाते तरी येशू काळजी घेतो का? आणि मग उत्तर होते: होय, नक्कीच मला ठाऊक आहे तो काळजी घेतो. माझ्या दु:खाने त्याचे ह्रदय द्रवते … माझा तारक काळजी घेतो.

देव त्याच्या वृध्द होणाऱ्या संतांची काळजी घेतो

आपली शरीरे व मने किती चांगल्या रीतीने वृद्ध होत जावी हे आपल्या हातात नाही व त्यावर आपले नियंत्रण नाही. पण आपला तारक आपली काळजी घेतो हे आपल्याला ठाऊक आहे. आणि तो दररोज आपल्याला कृपा पुरवणार आहे असा जर आपला विश्वास आहे तर ज्या हातांनी तो आपल्याला वृद्धपणी सावरतो त्यांच्यामध्ये आपण विसावा घेऊ. “तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन” (यशया ४६:४). देवाची कृपा आपल्याला सुंदरपणे वृध्द होण्यास मदत करते. देवाच्या न बदलणाऱ्या काळजीवर विश्वास ठेवण्यास सुवार्ता आपल्याला सामर्थ्य देते – फक्त आपल्या आत्म्याची काळजी नव्हे तर शरीराची सुद्धा.

बायबल आपल्या उतारवयाचे काव्यमय वर्णन करते (उपदेशक १२:१-७). आपले तारुण्याचे दिवस सरल्यानंतर काय होते? आपण वार्धक्याने वाकून जाऊ. शक्ती निघून जाईल, दात गमावले जातील, दृष्टी अंधुक होईल. आपण वृध्द होणार या जाणीवेच्या भीतीला स्तोत्र ७१ मध्ये स्तोत्रकर्ता आवाज देतो. तो प्रभूकडे आक्रोश करतो, “उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस” (७१:९). २ करिंथ ४:१६-१८ मध्ये पौलाला त्याचा बाह्यदेह क्षय पावत आहे असे जाणवताना तो म्हणतो,  “म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही; परंतु जरी आमचा बाह्यदेह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते; आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो; कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत.”

बऱ्याच लोकांना वृध्दपणाच्या अडचणी निराशा आणतात. दु:ख व काळजीने आपण व्यापून जातो. आपण विचलित होतो. पण जसा जीवनाचा अध्याय बंद होऊ लागतो तेव्हा ख्रिस्ताशी असलेले आपले ऐक्य, जे अस्सल आहे त्याकडे निर्देश करते. जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी वृद्ध होणे हे भीतीपेक्षा आशेचे, अवमान नाही तर सन्मान, क्षय नाही तर पवित्रता, हानी नाही तर लाभ असे आहे.उतारवयाची सत्यता आपल्याला ख्रिस्तामध्ये जे भविष्य आहे त्याकडे नजर लावायला मदत करून आपली आशा भक्कम करते.

पुनरुत्थान नीट करू शकणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही

काही ख्रिस्ती लोकांमध्ये अशी धारणा असते की ते शरीराला कमी महत्त्व देतात. शारीरिकतेची किंमत ते कमी करतात व आध्यात्मिकतेला उंचावतात. पण सुवार्ता अशी चांगली बातमी आणते की देव येशूमध्ये मानव झाला यासाठी त्याने आपल्या लोकांचे पूर्ण तारण सुरक्षित करावे. यामध्ये आपल्या शरीराचे पुनरुत्थान, रोगनिवारण व अनंत जीवन यांचा समावेश होतो. या जीवनात आपली शरीरे कमकुवत आहेत व कालमानानुसार आपल्या क्षमता कमी होत जातात. कदाचित सध्या तुमचे शरीर नीट काम करत नसेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की प्रकृती अजूनच बिघडत जाईल. सर्वात उत्तम गोष्ट आपण करू शकतो की वृद्धत्वाच्या पलीकडे – येशूच्या पुन्हा येण्याकडे व आपल्या शरीरांच्या भवितव्याकडे पाहा.

डी ए कार्सन यांनी म्हटले, “पुनरुत्थान नीट करू शकणार नाही अशा कोणत्याच व्याधीने मला ग्रासले नाही.”  ही आपल्यासाठी अत्यंत चांगली बातमी आहे. कल्पना करा असे शरीर की त्याला व्याधी नाही, रोग नाही, अशक्तपणा नाही, लंगडणे नाही, वेदना नाही, अलर्जी नाही, शारीरिक व मानसिक बिघाड नाही.

पौल म्हणतो, “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत; ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वत:च्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील (फिली.३:२०,२१). तो म्हणतो हे शरीराचे रूपांतर म्हणजे आपल्या शरीराची मुक्तता. हा महान विजय आहे (रोम ८:२३-२४). प्रत्येक दिवस सरताना आपली सुटका पूर्वीपेक्षा जवळ आली आहे हे समजून दिलासा घेत आपण वृध्द होत जातो.

आपण प्रभूबरोबर असणार

या सर्वामुळे वृध्द होणे सोपे होत नाही. माझ्या आजीच्या मरणापूर्वीच्या उन्हाळ्यात मी आजोळी गेलो होतो. आजोबा म्हणाले, “मी एवढे अश्रू गाळू शकतो याची मला कल्पना नव्हती. ते म्हणाले सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आजीच्या विस्मरणामुळे मी तिच्याशी बोलू शकत नाही. इतर वृध्द जोडपी खेळतात तशी कोडी, खेळ ते खेळू शकत नव्हते.

आम्ही ख्रिस्ताचे पुन्हा येणे व स्वर्गाचे वैभव याविषयी खूप बोललो. माझी आजी संपूर्ण दिवस खुर्चीवर बसून होती. तिला ना हालचाल करता येत होती ना बोलता येत होते. तरी ती कृपेने भरलेली होती. ख्रिस्ताच्या गौरवाचे सामर्थ्य तिच्यावर विसावले होते. शारीरिक शक्ती सोडून जात असताना आणि मानसिक आरोग्य कमी होत असतानाही उमेद म्हणजे काय तर हीच. आपण कोण आहोत आणि जीवन खरे काय आहे याचा गाभा वार्धक्य व त्यासोबत येणाऱ्या सर्व गोष्टी बदलू शकणार नाही. “तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे” (कलसै. ३:३). “मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे” (फिली १:२१).

त्या दिवशी आजी आजोबांच्या घरी मी एक खुर्ची ओढली व आजीच्या अगदी जवळ बसलो. प्रकटीकरणाचा २१ वा अध्याय मी अश्रू ढाळत तिला वाचून दाखवला. मी तो संपवू शकलो नाही. “आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्याच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हे नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या” (प्रकटी.२१:३-४).

हे आपले महान भविष्य आहे. ख्रिस्तामध्ये उतारवय हे वैभवाकडे जाण्याचा रस्ता आहे. जे अशक्तपणात पेरले जाते ते ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळी सामर्थ्याने उठवले जाईल. आपण सर्वकाल प्रभूबरोबर राहू. दरम्यान उतारवय हे देवाच्या विश्वासूपणाच्या गोष्टींचा वाढता साठा व देवाने आपल्या लोकांची प्रीतीने घेतलेली काळजी यांच्या गोष्टींचा साठा करीत जाणे होईल.

Previous Article

पुनरुत्थानदिन अजून येत आहे

Next Article

त्याच्या अभिवचनाखाली झोप

You might be interested in …

ख्रिस्तजयंती तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]

माझ्या पापाने त्याला तेथे धरून ठेवले लेखक : ग्रेग मोर्स

उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो. त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू येत होते. […]

येशूच्या १२ शिष्यांमधील थोमा

 प्रकरण २                                            सुवार्ता प्रसारासाठी मंडळी ज्यांना पाठवते, त्यांच्यासाठी मिशनरी हा शब्द सध्या प्रचलित आहे. प्रे.कृत्यांमधील पौलाच्या सुवार्ता फेऱ्यांनाही मिशनरी फेऱ्या म्हणूनच संबोधले जाते. इतर देशांच्या तुलनेत विविध संप्रदायांतून, धर्मपीठांतून व देशांतून भारतात मिशन कार्य झाले.  […]