Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 23, 2024 in जीवन प्रकाश

भावंडातील वैमनस्य

भावंडातील वैमनस्य

जॉन पायपर

स्टेफनीचा प्रश्न

पास्टर जॉन , माझा प्रश्न भावंडातील वैमनस्यासबंधी आहे. उत्पत्तीमध्ये दिसते की प्रत्येक कुटुंबावर  भावंडातील हेव्याचा परिणाम झाला. त्यापैकी काही – काईन आणि हाबेल, याकोब आणि एसाव, राहेल आणि लेआ, योसेफ आणि त्याचे भाऊ. बायबलमध्ये वारंवार घडणाऱ्या या कटाचा शुभवर्तमनावर काय परिणाम घडला? आणि असे दिसते की या भग्न नातेसंबंधाची कारणे म्हणजे पालकांचा पक्षपातीपणा किंवा निष्क्रियता. यामधून आजच्या आईवडिलांना काय धडा शिकता येईल?

उत्तर
खूपच छान प्रश्न. मला यावर खूपच विचार करावा लागला.

पहिली कुटुंबे

आरंभापासून सुरुवात करू या. देवाने मानवाला निर्माण केले. नर व नारी निर्माण करून त्यांनी विवाहामध्ये एकदेह व्हावी अशी रचना केली. त्यांना मुले होणार होती, ज्यांना बहीण भाऊ म्हटले जाणार होते. हे नाते विश्वमान्य आहे. सर्व जगभर प्रत्येकाला हे नाते काय आहे हे ठाऊक आहे.  प्रत्येक संस्कृतीला बहीण भाऊ म्हणजे काय हे माहीत आहे. बहीण भाऊ सामान्यपणे आईवडिलांच्या छत्राखाली  एकत्र वाढतात आणि कौटुंबिक रचनेत प्रौढ होतात.

आता जगात पाप आले आणि त्याचा विनाशकारी परिणाम ह्या विवाहित जोडप्यावर झाला. आदाम हवेला दोष देतो, हवा सापाला दोष देते. त्यांचा निरागसपणा संपलेला असतो. त्यांच्या नात्यात लज्जा आणि दोष आला आणि अनर्थ माजला. आणि आपण वाचतो की पापाने दूषित आणि नाश पावलेले पुढचे नाते काईनाने हबेलाचा वध करण्यात झाले.

यामुळे जी  मूळ कौटुंबिक रचना देवाने अस्तित्वात आणली तिच्यामध्ये  पाप शिरले – त्या नातेसंबंधाचा नाश करण्यासाठी. तरीही त्याच वेळेला देवाची कृपा जगात प्रवेश करते आणि त्याचे उद्धाराचे कार्य करण्यास सुरुवात करते. आणि आपण पाहतो की भावाभावांच्या आणि बहिणी बहिणींच्या ह्या पापाने भग्न केलेल्या नात्यामध्ये  देवाने उध्दाराचे, वाचवणारे काम केले आहे. इसहाक आणि इश्माएल यांच्याशी असणारे देवाच्या नात्यामध्ये आपण ते पाहतो. याकोब आणि एसव यांच्याशी असलेल्या त्याच्या नात्यात आपण पाहतो. मिसर देशामध्ये जेव्हा दोन इस्राएली लोकांना मोशेने विचारले, “तुम्ही का भांडत आहात? तुम्ही एकमेकांचे भाऊ नाहीत का?”  त्या संदर्भात भाऊ भावाविरुद्ध भांडत असताना देव त्याच्या लोकांना वाचवत होता.

राजाचे भाऊ

जेव्हा येशू जगात आला तेव्हा ज्या प्रकारे त्याच्या आणि त्याच्या अनुयायांचे नात्याची तो व्याख्या करतो  आणि अनुयायी एकमेकांशी असलेले नाते कसे समजून घेतात यामध्ये दोन गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे आपल्या अनुयायांना तो स्वत:चे भाऊ म्हणतो, मग त्यांचे त्याच्याशी शारीरिक नाते असो व नसो. उदाहरणार्थ मार्क ३:३२-३५ मध्ये आपण वाचतो:

“त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते; ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यांना उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, “पाहा, ही माझी आई व हे माझे भाऊ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई.”

तसेच शेवटच्या न्यायाच्या वेळी जेव्हा शिष्य राजाला विचारतील की आम्ही तुझी केव्हा सेवा केली तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे’” (मत्तय २५:४०). म्हणून येशूचे अनुयायी जे त्याच्यासारखी प्रीती करतात ते विश्वाच्या राजाचे भाऊ आहेत.

मंडळी हे  उद्धारलेले कुटुंब

आपले अनुयायी आपले भाऊ म्हणून ओळखणे याचा शिष्यांवर खूप मोठा प्रभाव पडला. यामुळे त्यांनी आपले नाते एकमेकांशी कसे समजून घेतले आणि नंतर  प्रेषितांनी  मंडळीच्या स्वरूपाबद्दल जे शिकवले यावरून ते आपल्याला समजते.

उदा. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात” (मत्तय २३:८). ते शारीरिक भाऊ नव्हते तर ते नव्या प्रकारचे बंधू होते. ते फक्त येशूचेच भाऊ नव्हते तर एकमेकांचे भाऊ होते.

आणि मग आपण प्रेषित पौलाकडे वळतो आणि त्याला विचारतो मंडळीतील विश्वासीयांचे नाते तो कसे समजतो? तेव्हा आपल्याला अद्भुत सत्य समजते. त्याला ख्रिस्ती लोकांना संत म्हणायला आवडते. तो ख्रिस्ती जनांना ४० वेळा संत म्हणतो. पण त्याला याहून काय आवडते? तो ख्रिस्ती लोकांना १३० वेळा बंधू / भाऊ म्हणतो.

येशू जसे शिष्यांना स्वत:चे आणि एकमेकांचे भाऊ म्हणतो तेच पौलसुद्धा म्हणतो.  रोम ८:२९ मध्ये तो म्हणतो,

कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा की, तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा.” याचा अर्थ देवाने आपण त्याच्या पुत्राचे बंधू व्हावे असे पूर्वीच नेमून ठेवले आणि त्यामध्ये ख्रिस्त हा प्रथमचा. तर देवाने ही साखळी घडवली. देवाचा पुत्र येशू हा अनेक भावांमधला प्रथमफळ – याचा अर्थ सर्व मंडळी ही येशूच्या उद्धाराच्या कार्याद्वारे  देवाची मुले, देवाच्या पवित्र कुटुंबाचा भाग आहेत. हे सत्य खोलवर जाणून घ्या.  
देवाने निर्मितीमध्ये पतीपत्नी आणि नंतर भावाभावात केलेली रचना ही आता ख्रिस्त आणि त्याची मंडळी यांच्यामध्ये दोन प्रकारे प्रबळ होते. तो मंडळीतील बहीण भावंडाचा वडीलबंधू आहे आणि तो त्याच्या मंडळीचा पती आहे. देवाची ही  मुलभूत रचना जगिक कुटुंबात पूर्ण होत नाही तर देवाच्या पवित्र कुटुंबात पूर्ण होते. ख्रिस्त हा त्यांचा वडील बंधू आणि मंडळी या वधूचा वर.

वैमनस्य कमी केले

आता स्टेफनी च्या प्रश्नाच्या दुसऱ्या  भागाचे काय? आईवडील या नात्याने आपल्या मुलांमध्ये वैमनस्य कमी करून त्यांच्याम्ध्ये शांती आणण्यासाठी आपण काय करू शकतो? येथे मी चार मुद्दे तुमच्यापुढे ठेवू इच्छितो.

१. देवाला मोलवान माना.

आदाम व हवेने केलेली चूक करू नका. सर्व सुज्ञ सर्व पुरवठा करणाऱ्या देवाला धिक्कारून त्यांनी त्याऐवजी स्वत:चे प्राधान्य स्वीकारले. आणि याचा परिणाम कुटुंबाचा नाश झाला. म्हणून ते बदला आणि तुमच्या जीवनात  देवाला ख्रिस्तामध्ये सर्वात अधिक किंमत द्या. त्याच्या वचनावर व त्याच्या काळजीवर पूर्ण भरवसा ठेवा . तुम्ही हे करताय हे मुलांना दिसू द्यात. “ आई बाबा देवावर भरवसा ठेवतात आणि त्याला सर्वाधिक किंमत देतात. आईबाबांना एक स्वर्गीय पिता आहे आणि त्याने त्यांची व आमची काळजी घ्यावी म्हणून ते त्याच्यावर भरवसा टाकतात.

२. अंतिम कुटुंबाकडे निर्देश करा.

मुलांना सांगा की सध्या ज्या नैसर्गिक कुटुंबाचा ते भाग आहेत ते अंतिम नाही. देवाच्या कुटुंबाचे असणे हे अंतिम आहे. मानवांना – मुले, मुली, किशोरवयीन- यांना काहीतरी महान गोष्टीसाठी जगण्याची गरज असते. ते ज्याचा भाग आहेत त्या  नैसर्गिक कुटुंबापेक्षा काहीतरी मोठे. जर ह्या कुटंबालाच तुम्ही सर्वस्व मानले तर ते मानवी जिवासाठी पुरेसे नाही. जर त्यांच्या कुटुंबापेक्षा काहीतरी गौरवी गोष्टीने त्यांचे मन काबीज केले – ते म्हणजे सर्व राष्ट्रांचे असलेले कुटुंब – तर त्यांना त्यांच्या कुटुंबावर अधिक प्रेम करायला साधने मिळतील .

३. खरी महानता शिकवा.

त्यांना शिकवा की मोठा कोण यासाठी भांडण करणे म्हणजे ज्यांना येशू समजला नाही त्यांच्या गटात जाणे. जेव्हा शिष्यांनी तसे केले तेव्हा येशू म्हणाला, “मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्‍यासारखा आहे” (लूक २२:२७) . दुसऱ्या शब्दांत जर तुम्ही येशूला अनुसरता तर दास असणे ही खरी महानता आहे. म्हणून जर तुम्हाला तुमच्या भावापेक्षा किंवा बहिणीपेक्षा मोठे व्हायचे असेल तर मोठा दास बना.

४. भिन्नतेला मान द्या.

जेव्हा तुमच्या मुलांच्या निरनिराळ्या देणग्यांचा तुम्ही विचार करता तेव्हा त्यातील कोणतीही देणगी कमी किंवा तुच्छ लेखू नका. पौलाने १ करिंथ १२:२४-२५ मध्ये शिकवलेली सूचना लक्षात घ्या. “आपल्या सुरूप अंगांना अशी गरज नाही. जे उणे आहे त्यांना विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे; अशासाठी की, शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी.”

तुमची मुले सर्वच बाबतीत समान आहेत असा देखावा करणे चुकीचे आहे. हे त्यांना ठाऊक आहे आणि तुम्हालाही. काही एका गोष्टीत सरस आहेत तर काही नाहीत. प्रत्येक जण जसे आहे तसे देवाच्या दृष्टीने मोलवान आणि उपयोगी आहे हे त्यांना पाहायला शिकवणे ही गुरुकिल्ली आहे. कोणी निरुपयोगी नाही. देव त्याची निर्मिती वाया घालवत नाही. कोणीच व्यर्थ नाही. प्रत्येकासाठी देवाच्या मनात काही योजना आहे आणि त्यांना काही महत्त्वाचे करण्यासाठी पाचारण केले आहे.

देवाने आपल्याला त्याची मुले होण्यात आनंद घेण्यास मदत करावी – ख्रिस्ताचे बहीण भाऊ. आणि देवाने आपल्याला आपल्या मुलांसाठी चांगले उदाहरण होण्यासाठी मदत करावी हीच प्रार्थना .