Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on नवम्बर 26, 2019 in जीवन प्रकाश

उगम शोधताना                                                लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण ५ – स्त्रिया : उत्पत्ती २

 

देवाने काही गोष्टी नसत्यातून – काहीही नसताना-  निर्माण केल्या; तर काही गोष्टी आधी निर्मिलेल्या मूलद्रव्यांपासून निर्माण केल्या. पशुपक्षी मातीने घडले. मानवालाही मातीपासून घडले. पण स्त्रीला पुरुषापासून निर्माण केले.

फोलोपा समाजाच्या बागेत स्त्रीला काही सोपे जीवन नाही. स्त्रियांना समाजातील बोजड ओझी वाहायची असतात आणि भरपूर ढोर मेहनत करायची असते. दिवसभर त्या आपल्या भूमीत राबत असतात. वाकून खोदकाम, लागवड, तण उपटणे अशी मेहनतीचे कामे करावी लागतात. दिवसभर मिळवलेले घेऊन धावत घर गाठावे लागते. पाठीवरील सुतळीच्या झोळ्यांचा बंद मस्तकावरून ओढलेला असतो; त्याने त्या वाकून गेलेल्या असतात. त्यांची वाटही चढणीची, उतरणीची, निसरडी असते. त्यात मान हलवणे मुष्कील असते. दुसऱ्या झोळीत काही वेळा एखादे बाळ असते आणि डोक्यावर सरपण. भुवया चढवून त्यांना डोळ्याची हलचाल करावी लागते. त्या डोंगराळ वाटेने एखादी कोवळी स्त्री १०० पौंडांचे तरी ओझे वाहात असते. तिला माहीत असते की आपण कणखर आहोत. हे सर्व अति असेलही; पण ह्यासाठीच आपला जन्म झाला आहे अशी तिची धारण असते. तिची एका शब्दाने काहीही तक्रार नसते; निदान मोठ्याने तरी!

संपूर्ण कुटुंबासाठी ती खाद्य बनवते. उपलब्ध असेल तर फोलोपा खूप खातात. स्त्रियांना फारसे नत्रयुक्त पदार्थ मिळत नाहीत. त्यांना फक्त उंदीर व कीटकांवर समाधान मानावे लागते. ख्रिस्ती विश्वासाची ओळख होईपर्यंत स्त्रियांनी मांसाहार घेणे निषिद्ध मानले जात होते. कष्टाची कामे करणाऱ्यांना हिरवा भाजीपाला व मांसाहार अत्यावश्यक असतो. अशा कुपोषणाने स्त्रियांच्या पोटाचा घेर मोठा दिसतो.

स्त्रियांनीच ओझी वाहायची आणि मुलेही सांभाळायची. तिला दिलेले शरीर तिच्या स्वत:साठीच केवळ नसून नवऱ्यासाठी व मुलांसाठीही असते. एक मूल छातीशी तर दुसरी मुले तिच्या घागऱ्याला पकडून.

स्त्रीची समाजातील भूमिका फारच मर्यादित असते आणि त्यांना सर्वांना याची पूर्ण कल्पना असते. त्या शरीराने कितीही कणखर असल्या तरी पुरुषांच्या तुलनेत सामाजिक दृष्ट्या बलहीन असतात. जर एखाद्या दांपत्याला मूल नसेल तर त्यासाठी सर्व दोष स्त्रीला दिला जातो.

स्त्री ही मानवी जातच आहे का ही शंका तर पूर्वापार चालत आली आहे. त्यांचा जन्म पुरुषांप्रमाणेच होतो, पण त्यांचा उगम कोठून आहे? त्या पुरुषांपेक्षा पुष्कळ बाबतीत इतक्या भिन्न कशा? हे त्यांचे प्रश्न आहेत.

आम्ही उत्पत्तीच्या पुस्तकाचे भाषांतर करत होतो; पण फोलोपांसाठी ते ‘प्रकटीकरण’ होते. आम्ही उत्पत्ती २ वर काम करत होतो. देव सर्व निर्माण करत होता आणि त्यांना कार्यरत करून त्यांना चाकोरी लावून देत होता. अखेरच्या टप्प्यात देवाने नद्या व वृक्षांनी डवरलेली बाग लावली. सर्व काही डोळ्यांसाठी रमणीय व पोटासाठी सर्वोत्तम गोष्टी त्यात होत्या. आपण बनवलेल्या मानवाला देवाने त्या बागेत काम करायला ठेवले. तरीही काहीतरी कमतरता असल्याचे त्याला जाणवले. मग देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन.”

लवकरच आम्हाला स्त्रीच्या मुळारंभाचा शोध लागणार होता. पहिल्या मानवाला देवाने गाढ निद्रा आणली. फोलोपांच्या मते अशा प्रकारची सुरुवात अगदी योग्य होती. त्यांच्या मते झोपेतही काही घटना घडत असतात. अर्थात उत्पत्ती २ मध्ये स्वप्नाविषयी काहीही उल्लेख नाही. पण आदाम झोपेतून जागा झाला तेव्हा बरेच काही बदललेले होते. तो इत:पर एकटा नव्हता तर ते आता दोघे होते. आम्ही भाषांतर केले: परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली. आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा मानव म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे. कारण ही नरापासून बनविली आहे” ( उत्पत्ती २:२२,२३).

आम्ही एकेक संकल्पना वाचून अर्थपूर्ण अनुवाद झाला आहे की नाही ते तपासले. कल्पनेपलीकडे ते अप्रतिम जमले होते. “अरे वा! स्त्री पुरुषापासून घडली आहे तर!” इसा म्हणाला. मी मानेने होकार दिला व म्हटले, “माझ्या हाडातले हाड, मांसातले मांस. ती पुरुषापासून आली. त्याच्या झोपेतून ती उठली. त्याच्या कुशीतून तिला बाहेर काढले. आणि तेव्हापासून ती त्याच्या कुशीशी आहे.” हेपल माझ्यापुढे ओणवून म्हणाला, “स्त्रीचा ‘बेटे’ पुरुष आहे तर!” मी मान डोलावली या प्रकटीकरणाचा फोलोपांवर किती खोल परिणाम होणार होता याची मला तेव्हा कल्पना आली नव्हती.

पण या विषयावर देवाचे वचन काय म्हणते याचे वर्णन गावभर वाऱ्यासारखे पसरले. फोलोपात नव्याच प्रारंभाने जागा घेतली. स्त्रियांच्या स्वत:बद्दलच्या समजाची पातळी उंचावली. नुकतेच आत्मसन्मानाचे बीज पेरले गेले.

जेव्हा यहूदी – ख्रिस्ती नीतिमूल्यांचे जगामध्ये खरोखर लागूकरण करण्यात आले तेव्हा अशीच स्त्रीची भूमिका, स्थान व अवस्था उंचावली गेली होती. तेच आता पुन्हा फोलोपा प्रदेशात घडत होते.

उत्पत्ती २ ने ते उकलून समोर आणले होते. स्त्री हा दुसरा वंश नाही. ती पुरुषापासून आहे. हाडामांसाची आहे. देवाने निर्माण केली आहे. त्याच्याशी सममूल्य आहे.

स्त्रीचा मूळारंभ ‘बेटे’ पुरूष आहे.

त्याच्याही आधी स्त्रीचा मूळारंभ ‘बेटे’ देव आहे.