Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 4, 2022 in जीवन प्रकाश

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत का?

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत का?

जॉन ब्लूम

तुम्हाला कृपादाने देण्यात आली आहेत. ती कोणती आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? ती किती अमोल आहेत ह्याची कल्पना तुम्हाला आहे का? त्याची योग्य गुंतवणूक करण्यासाठी देवाने ती तुम्हाला दिली आहेत. आणि त्यांचे कारभारीपण तुम्ही कसे केलेत ह्याविषयी एके दिवशी तो तुम्हाला जबाबदार धरेल.

हा विचार करण्याचा मुद्दा आहे – आणि तो असायलाच हवा. पण तरीही तो आपल्याला मुक्त करण्यासाठीही दिलेला आहे.
‘देणग्या’ येशूपासून येतात – (मराठीत देणग्या असा शब्द न वापरता रुपये हा शब्द वापरला आहे). येशूने हा रुपयांचा दाखला मत्तय २५:१४ -३० मध्ये दिला आहे. ह्या दाखल्यांमध्ये धनी त्याच्या प्रत्येक दासाला तो प्रवासाला जात असताना काही आकड्यांची रक्कम गुंतवण्यासाठी देतो. त्या काळी ज्यांच्याकडे एवढी रक्कम असे ते फार श्रीमंत गणले जात. पण हा दाखला त्या पैशाचे कारभारीपण करण्याविषयी नाही. हा दाखला देवाने जी आपल्याला दाने व कौशल्ये सोपवली आहेत त्यांविषयी आहे. जेव्हा आपण म्हणतो एखाद्याला दान आहे तेव्हा आपण तो श्रीमंत आहे असे म्हणत नाही तर त्याला कलाकौशल्ये आहेत अशा अर्थाने तो शब्द वापरतो.

दाने ही कृपादाने आहेत

ह्या दासांबद्दलची पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते म्हणजे त्यांना दाने देण्यात आली. “एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले” दासांना काही द्यावे हे धन्याला बंधनकारक नव्हते. प्रत्येक दासाला त्याचे दान धन्याच्या कृपेने मिळाले.

“कोणाला अधिक, कोणाला कमी दिले आहे पण सर्वांनाचा भरपूर दिले आहे”
याचा परिणाम स्पष्ट आहे: आपल्या कोणालाच आपल्या ‘दाना’बद्दल फुशारकी मारण्यासाठी काहीही आधार नाही. जे सुवार्तेबाबत खरे आहे तेच ‘दाना’बद्दलही खरे आहे. “जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?” (१ करिंथ ४:७).
पण येशूने मत्तय २५:१५ मध्ये एका महत्त्वाच्या विधानाची भर टाकली: “असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले.” योग्यता याचा मूळ ग्रीक अर्थ आहे कामाच्या पात्रतेनुसार सामर्थ्य.
येथे येशू सांगत आहे की देव त्याच्या सेवकांना त्याच्या कृपेद्वारे काही कौशल्ये आणि काही प्रकारचे सामर्थ्य काम करण्यासाठी पुरवतो. देव आपल्याला काही क्षमता आणि कौशल्ये देतो.

दाने ही अमोल आहेत

दुसरी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे देव आपल्याला पात्रता देतो. यासाठी दाने हे रूपक वापरून येशू स्पष्ट करत आहे की ज्या देणग्या देव आपल्याला देतो त्याला तो अतिशय मोठी किंमत देतो.
पहिल्या शतकातील पैशांची किंमत आधुनिक चलनामध्ये करणे जवळजवळ अशक्य आहे. पण त्याचा सध्याच्या बाजाराशी हिशोब लावण्यासाठी काही विद्वानांनी त्याची किंमत केली व तेव्हाचे १००० रुपये हे  सध्याचे ४० लाख रुपये होतात असा हिशोब लावला. येशूच्या दाखल्यातील एका दासाला  दोन कोटी (५००० रुपये) दुसऱ्याला ८० लाख (२००० रुपये) आणि तिसऱ्याला ४० लाख (१००० रुपये ) दिले गेले. ‘कमी देणगी मिळालेल्या दासाने’ जास्त देणगी मिळालेल्या दासाचा हेवा केल्याची शक्यता असू शकते.  पण वास्तवात कोणत्याच दासाला दिलेले कारभारीपण कमी महत्त्वाचे नव्हते. प्रत्येकाला मोठ्या किमतीची देणगी मिळाली होती.

याचा अर्थही स्पष्ट आहे: आपल्याला जे दिले आहे त्याची किंमत आपण कमी लेखू नये. कोणाला अधिक दिले गेले आहे कोणाला कमी दिले आहे. पण प्रत्येकाला भरपूर दिले आहे. आणि येशू आपल्याला म्हणतो, “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अधिक मागतील” ( लूक १२:४८).

ह्याच कारणामुळे ज्या दासाने दिलेल्या पैशांचे काहीच केले नाही त्यावर धनी फार रागावला (मत्तय २५:२४-२५). पण ह्या धुराळ्यामधून धन्याने त्या दासाकडे स्पष्ट पहिले आणि त्याला “दुष्ट व आळशी दास” (मत्तय २५:२६) असे म्हटले.
हे शब्द आपण आपल्या धन्याकडून कधीही ऐकता कामा नयेत. ह्या दाखल्याने आपल्यामध्ये देवाची योग्य भीती निर्माण करायला हवी आणि आपल्याला जी कृपादाने देवाने दिली आहे तिचे आपण काय करत आहोत असा प्रश्न विचारायला भाग पाडायला हवे.

तुम्हाला दिलेली कृपा

‘दिलेली कृपा’ हे विधान पौलाला आवडत असे व स्वत:संबंधी बोलताना तो हे वापरत असे:
•     “कारण मला प्राप्त  झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की…” (रोम
       १२:३). येथे प्रेषित म्हणून देवाने पौलाला सोपवलेला एकमेव अधिकार पौल ओळखून घेतो.

  • माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला” ( १ करिंथ ३:१०). देवाने त्याला सुवार्ता न पोचलेल्या लोकांमध्ये मंडळीरोपण करून  व ख्रिस्ती मंडळीसाठी  ईश्वरविज्ञानाचा पाया घालण्याची एकमेव पात्रता (दान) दिली होती.
  • “ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले” (१ करिंथ १५:१०). देवाने त्याला त्याच्या एकमेव अधिकाराचा वापर करून त्याची एकमेव पात्रता  वापरण्याचे कौशल्य दिले होते.
    हे विधान तो तुमच्या आमच्यासाठी सुध्दा वापरतो.
  •  “आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा” (रोम १२:६).
  • तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे (इफिस ४:७).

वरील वचनांतील “आपल्याला दिलेले कृपादान” हे विधान येशूने त्याच्या दाखल्यात दिलेल्या मुद्यावर जोर देते.
१) देव आपल्याला काही कृपादाने देतो.
२) त्यांची गुंतवणूक करायला देव आपल्याला काही प्रमाणात सामर्थ्य देतो. 
३) आणि जे देवाने आपल्यावर सोपवून दिले आहे त्याची गुंतवणूक करून, जे सामर्थ्य तो पुरवतो ते सर्व आपण वापरावे अशी देवाची आपल्याकडून अपेक्षा आहे.

विचार करायला लावणारे व मुक्त करणारे

म्हणून आपण प्रत्येकाने विचारायला हवे: देवाने मला जी कृपा पुरवली आहे तिच्याद्वारे –  मला दिलेल्या देणग्यांचे मी काय करत आहे? हा प्रश्न विचार करायला लावणारा व मुक्त करणारा आहे.

ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे कारण आपला स्वार्थीपणा आपल्याला ठाऊक आहे. आणि आपल्या पापी स्वभावाने ज्याने आपल्या कारभारीपणाकडे दुर्लक्ष केले त्या निरुपयोगी दासासारखे वागण्याचा आपला कल असू शकतो. पण असा सखोल विचार करणे ही कृपा आहे, कारण आपल्या स्वकेंद्रित मूर्खपणातून ते आपल्याला हालवून काढू शकते व अधिक परिश्रम करण्यास प्रेरणा देते.

पण हा प्रश्न दोन कारणांसाठी आपल्याला अद्भुत रीतीने मुक्त करणारा आहे.
१) देव स्वत:च आपल्याला ज्याची गरज आहे ते पुरवतो. दाने व ते वापरण्यासाठी सामर्थ्यही तोच पुरवतो.
२) हे लक्षात आल्यावर आपण स्वत:ची इतरांशी तुलना करण्यापासून मुक्त होतो. ज्या सेवकांना आपल्यापेक्षा अधिक दाने मिळाली आहेत किंवा ज्यांना अधिक पात्रता आहे त्यांचा हेवा करण्यापासून ते आपल्याला मुक्त करते. आणि ज्या सेवकांना आपल्यापेक्षा कमी दाने मिळाली आहेत किंवा आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे त्यांचा न्याय करण्यापासूनही मुक्त करते. देवच दान व सामर्थ्य देणारा आहे आणि त्याने आपल्याला “जी कृपा पुरवली आहे” तिच्यासाठी तो आपल्या प्रत्येकाला जबाबदार धरतो.

तुम्हाला दाने देण्यात आली आहेत. देव त्यांना फार मोठी किंमत देतो. तुम्ही त्यांचे काय करीत आहात?

 हा प्रश्न तुम्हाला विचार करायला लावू दे व मुक्त करू दे. कारण प्रत्येक जो दास त्याला सोपवलेल्या दानाबद्दल विश्वासू राहिला त्याला धनी म्हणेल;  “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (मत्तय २५:२३).
हे आपल्याला ऐकायला हवे आहे.
या आनंदासाठी तुमच्या दानांची योग्य गुंतवणूक करा.