प्रकरण ४
काळ इ.स.३०० ते १५००
या सुमारे १००० वर्षांच्या कालखंडातील ख्रिस्ती मंडळीच्या उत्कर्षाची माहिती फारच तुटपुंजी असल्याने आपण ती एकदमच सलग पहाणार आहोत. पंतैनस अलेक्झान्द्रियास परतल्यानंतर भारतावर पुन्हा पडदा पडला. नंतरच्या शतकात तो पुन्हा वर गेला. प्रकाशाच्या कवडशात अंधारातला दुसरा भाग अधूनमधून दिसला. ते पुरते लक्षात यायला अवधीही पुरत नाही. केवळ ख्रिस्ती विश्वास जीवन धरून असल्याचे समजते. म्हणून या काळातील तुरळक दृश्यांना “प्रेषितांची उमटलेली पावले” असे समजले जाते. प्रेषित दृष्टीस पडत नाहीत. पण या मार्गाने ख्रिस्ताचे जासूद गेले एवढेच कळते.
इ.स. ३२५ मध्ये नायसिया येथे एक ऐतिहासिक प्रसिध्द परिषद भरली होती. त्यात नायसिन धर्मसिद्धांत तयार करण्यात आले. त्या परिषदेस ३१८ बिशप हजर होते. त्यातील आज्ञापत्रावर सही करणाऱ्यांमध्ये ‘योहान्ना हे इराण व बृहद भारताचे बिशप’ होते, एवढीच माहिती मिळते. पण त्यावरून इराणमध्ये त्यांचे ठाणे असून भारताच्या विस्तृत भागाची व्यवस्था त्यांच्याकडे होती असे दिसते. यापेक्षा तपशीलवार माहिती उपलब्ध नाही.
पुन्हा इ.स.३५४ मध्ये पडदा वर जातो. भारतीय ख्रिस्ती समाजाला तेव्हा हिंदी थिओफिलिसने भेट दिल्याचे आढळते. कॉन्सटॅन्टीनसने एरियन मिशन सुरू केले होते. त्या पंथाच्या प्रसारासाठी त्याने थिओफिलसला अरबस्तानातील सेबियन किंवा होमेरिटो लोकांमध्ये पाठवले होते. शबाच्या राजे लोकांशी सलोखा करून त्या भागातील रोमी लोकांसाठी मंदिरे बांधण्याची परवानगी मिळावी व ख्रिस्ती लोकांना असे हक्क मिळवून द्यावेत हा त्यांचा मानस होता. या मंडळाचे पुढारपण हिंदी बिशप थिओफिलसकडे दिले होते. त्याच्या लहानपणीच मालदीव बेटातील लोकांनी कॉनस्टॅन्टीनसच्या कारकिर्दीत त्याच्याकडे थिओफिलसला ओलीस ठेवले होते असे म्हणतात. होमेरिटो लोकांकडची कामगिरी यशस्वीपणे पार पडल्यावर थिओफिलस मातृभूमीकडे आपल्या बेटात परतला. तेथून तो भारताच्या काही भागात फिरला. तेथील काही चुकीच्या पध्दती त्याने सुधारल्या व ख्रिस्ती लोकांच्या मूळ धर्म विश्वासाला बळकटी आणली. त्या काळात भारतात ख्रिस्ती लोक होते, त्यांची मंदिरे होती याला पुष्टी मिळते.
चौथ्या शतकात लोकांना ख्रिस्ताची फारशी माहिती नसलेले ख्रिस्ती लोक राहत होते अशी आख्यायिका आहे. थोमाच्या आगमनानंतर २९३ वर्षांनी या लोकांची अधोगती होऊ लागली. याविषयी सिरियातील एडेसाच्या बिशपला देवाचा साक्षात्कार झाला की, ‘मलबारच्या ज्या ख्रिस्ती लोकांच्या तारणासाठी मी प्राण अर्पिला, ते अधोगतीस जाऊन नाश पावत आहेत, याचे तुला काहीच वाटत नाही का?’ तेव्हा यरुशलेमास जाऊन त्याने हा सारा प्रकार त्यांना कथन केला. ज्ञानवृध्द व वयोवृध्द लोकांनी विचारविनिमय करून थोमा नावाच्या यरुशलेमेच्या एका व्यापाऱ्याला मलबारात पाठवले. त्याने सर्व माहिती गोळा केली. प्रेषित थोमामुळे हे लोक ख्रिस्ती झाले होते. पण पाळक नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. तेथे मुक्काम न करता तो परत यरुशलेमास गेला आणि सर्व परिस्थिती निवेदन केली. तेव्हा त्यांनी योहान नावाच्या बिशपास बोलावून बरेच पाळक, डिकन्स, अनेक स्त्रिया, पुरुष व मुले अशा सर्वांना त्या व्यापाऱ्यासोबत भारतात पाठवले. ते सर्व म्हणजे सुमारे ४०० लोक भारतात सेवा करण्यास त्या व्यापाऱ्याबरोबर इ.स.३४५ मध्ये मलबार किनाऱ्यावर पोचले. शिवाय या काळात इराणमध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ सुरू झाला होता. तो बराच काळ चालू राहिला. त्यांच्यावर छळाची आपत्ती ओढवली होती तर मलबारात ख्रिस्ती लोकांना त्यांच्या मदतीची आवश्यकता होती. म्हणूनच त्या लोकांनी भारतात स्थलांतर केले. एवढ्या मोठ्या वजनदार धर्मबांधवांच्या आगमनाचा मलबारच्या ख्रिस्ती लोकांवर लक्षणीय परिणाम झाला. त्यांचे आदराने स्वागत झाले. त्या प्रांताच्या राजाने त्यांना सन्मानाने वागवले. त्यांना सामाजिक दर्जा देण्यात आला. एडेसाचे सिरीयन चर्च आणि भारतीय ख्रिस्ती जगताचा धर्म संस्कारासंदर्भात दृढ संबंध जडला. हे त्या ४०० लोकांच्या स्थलांतरामुळेच शक्य झाले.
सहाव्या शतकापर्यंत हे संबध टिकून राहिले असे दिसून येते. पुन्हा पडदा वर गेला आणि हिंदी प्रवासी कॉसमोस ही असामान्य व्यक्ती दिसू लागते. त्याचे ऋण मोठे आहे. सर्व चढ उतारात देव भारतीय ख्रिस्ती मंडळीसाठी कार्यरत होता म्हणून त्याला शतशः धन्यवाद!!
कॉसमोस हा अलेक्झांद्रियाचा धनाढ्य व्यापारी होता. हिंदी महासागराच्या परिसरात त्याचा व्यापार चाले. त्यात त्याची खूप भरभराट झाली. पण तो केवळ पैसे कमवण्यात व्यस्त नसे तर त्यासोबत त्याचा अभ्यासही चालू असे. तो जाई तेथे आढळणाऱ्या निरनिराळ्या वंशाच्या लोकांच्या चालीरीती, रूढी, जीवनक्रम याविषयी बारकाईने चौकशी करत असे. भूगोल व प्राणिशास्त्राचा तो अभ्यासक व संशोधकही होता. पुढे त्याला या दगदगीच्या, भ्रमंतीच्या जीवनाचा कंटाळा आला म्हणून त्याने व्यापारातून अंग काढून घेतले आणि मठात प्रवेश घेतला. तेथे आपण पाहिलेल्या अनेक देशांविषयी, लोकांविषयी माहिती लिहिण्यात त्याने वेळ घालवला. त्याच्या “ख्रिस्ती स्थलवर्णने” या ग्रंथातून भारतातील ख्रिस्ती जगताची आपल्याला माहिती मिळते.
“मंडळीची शकले उडलेली दिसली नाहीत. तर तिचा बऱ्याच ठिकाणी प्रसार झालेला आढळला. ख्रिस्ती धर्मसिद्धांत जगभर पसरलेले दिसले. शुभवर्तमानाची घोषणा होत असलेले मी माझ्या प्रत्यक्ष नेत्रांनी पाहिले व लोकांनीही मला सांगितले. सिलोन मध्येही ख्रिस्ती लोकांची मंडळी आहे. त्या मंडळीत मला पाळक व भाविक लोक आढळले. मलबारातही मला तेच आढळले. कल्याण येथे व सोकोन्ना बेटातही इराणमध्ये दीक्षा झालेले बिशप, पाळक आणि ख्रिस्ती लोक मला आढळले.” म्हणजे सहाव्या शतकापुर्वीच भारतात ख्रिस्ती लोक होते असे आपण पाहतो. कॉस्मोसने सहाव्या शतकाच्या मध्यास ग्रंथ लिहिला, त्यावेळी ख्रिस्ती लोकांनी मंडळी स्थापलेली होती. तेथे दीक्षित पाळक होते. चर्चसाठी आवश्यक साधन सामुग्रीही त्यांच्याकडे होती, हे त्यातून स्पष्ट होते. त्याच्या ग्रंथावरून हे देखील समजते की हिंदी ख्रिस्ती लोक इराणच्या चर्चला आपले मूळ धर्मपीठ मनात होते. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा करत होते. त्यांची अधिकार सूत्रेही इराणी चर्चकडेच होती. थोमा कॅनानस ४०० लोकांना घेऊन भारतात आल्यामुळेच इराणशी असलेल्या हिंदी ख्रिस्ती चर्चच्या संबंधाना पुष्टी मिळते. ज्या शतकांचा इतिहास अज्ञात आहे, त्याच काळात भारतातील ख्रिस्ती लोकांचे मूळ धर्मपिठाशी जडले. म्हणजे पंतैनसच्या मूळ अलेक्झांद्रियाच्या मंडळीने भारतातील काम त्याच्यानंतर पुढे चालू ठेवल्याचे दिसत नाही. त्यांनी सोडून दिलेली अधिकारसूत्रे इराणकडे गेली होती. त्यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या अनेक अनामिक प्रेषितांद्वारे मलबारमधील अंधुक ज्योत टिकवून ठेवण्याचे काम झाले. पुराणमतवादी पाश्चात्य मंडळी इराणच्या मंडळीला पाखंडी समजत होती. सातव्या शतकात इस्लामचा उदय झाला. तरीही इराणच्या नेस्टोरियन चर्चच्या अधिकाराखाली हिंदी ख्रिस्ती मंडळीतील कार्य अखंड अव्याहतपणे चालूच राहिल्याचे इतिहास सांगतो.
सध्या नेस्टोरियन लोक कमजोर झाले असून इराणच्या पश्चिम भागातील परिसरात राहतात. त्यांच्यामध्ये पाश्चात्यांची प्रेस्बिटेरियन व अँग्लीकन चर्चची मिशन्स सेवा करत आहेत. पण जेव्हा नेस्टोरियनांच्या हाती पूर्वी सत्ता होती तेव्हा त्यांनी हिंदुस्थानात सेवा केल्याचे आपण विसरू शकत नाही. चौथ्या शतकात जेव्हा कुमारी मरीयेला देवमाता संबोधण्याचा प्रघात सुरू झाला तेव्हा नेस्टोरियनांनी या खोट्या सिद्धांताला हरकत घेतली होती. ‘ती आपल्या प्रभूच्या मानवी प्रकृतीची माता होती. दैवी प्रकृतीची माता नव्हती. म्हणून तिला ख्रिस्तमाता म्हणा पण देवमाता म्हणू नका.’ ही शिकवण त्यांनी प्रकर्षाने मंडळी.
मात्र त्यांच्या एका पाखंडी मताने इ.स.४९८ मध्ये आरंभीच्या ख्रिस्ती जगतात गोंधळ माजवला होता. ते मत असे होते की, ‘प्रभूतील दैवी व मानवी द्रव्ये इतकी भिन्न होती की, त्यामुळे नुसत्या दोन भिन्न प्रकृती उत्पन्न झाल्या एवढेच नव्हे तर दोन व्यक्ती निर्माण झाल्या व दैवी शब्द मानवी येशूत वास्तव्य करू लागला. हे मत पाखंड असल्याचे कारण येशूसाठी इब्री. १०:५ नुसार नसत्यातून असते करणाऱ्या देवाने ख्रिस्तासाठी मरीयेच्या उदरात शरीर निर्माण केले होते व ख्रिस्ताने पवित्र आत्म्याद्वारे त्या शरीरात प्रवेश केला. म्हणजे देवत्वावर ख्रिस्ताने मानवत्व पांघरल्यामुळे तो पूर्ण देव व पूर्ण मानव असा देहधारी म्हणजे देवमानव होता. असा तो एकच व्यक्ती जन्मला आल्याने त्याच्या ठायी पाप नव्हते. यावरून त्यांचे पाखंड मत कसे चुकीचे होते हे तुमच्या लक्षात आले असेल. त्यांच्या या पाखंडी मतामुळे फुटून निघालेल्या लोकांनी एक नवीन संघटना बनवली. पण या मंडळीकडेच सर्व अधिकारसूत्रे आली. ती बाबेलच्या पेट्रीयार्ककडे राहिली. पण या मंडळीचे हे एक पाखंडी मत असूनही ती झपाट्याने वाढली. आशियाचे प्रमुख चर्च हा मानही त्या मंडळीला मिळाला. ते पद १००० वर्षे त्यांनी भूषवले.
नेस्टोरियनांचे ते एक पाखंडी मत वगळता त्यांची ख्रिस्ताच्या कार्यावरील निष्ठा फारच प्रशंसनीय होती. त्या चर्चने ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या महाआज्ञेचे पालन अत्यंत इमानेइतबारे इतर कोणत्याही मंडळीच्या तुलनेत अधिक जोमाने केले. पाश्चात्य लोक मांडल्या संसारातून निवृत्त होऊन मठात, एकांतवासात, वाळवंटात जीवन कंठण्याचा मार्ग स्वीकारीत असत. नेस्टोरियन मिशनरी मात्र ख्रिस्ताच्या शिकवणीचा आशय शिकवून एकनिष्ठेने सेवा करीत असत. आशियातील दूर दूरच्या प्रांतात जाऊन त्यांनी हालअपेष्ठा, संकटे भोगून प्राणांची आहुतीही दिली. अशी एक नोंद आहे की, ‘भटक्या तार्तर लोकांच्या मुक्कामी त्यांनी तंबू ठोकले होते. त्यांचे शब्द ऐकून तिबेटच्या लामांचाही थरकाप होत असे. पंजाबातील भाताच्या शेतात उभे राहून ते सुवार्ता सांगत. मच्छीमारी करणाऱ्या कोळ्यांना वचनाचे शिक्षण देत. मंगोलियाच्या अफाट वाळवंटातून तर ते खरडत पुढे गेले होते. भारतात झामुरीन देखील त्यांच्या धर्माधिकाऱ्यापुढे आदराने मान तुकवायचा.’ असा होता हा नेस्टोरीयन समाज! लोक त्यांच्याकडे पाहून प्रसन्न असत. त्यांच्या अनुयायांनी चाचपडणाऱ्या, धडपडणाऱ्या हिंदी ख्रिस्ती लोकांना मार्ग दाखवून दृढ राखण्याचे काम अनेक पिढ्यांपर्यंत केले व हिंदी चर्चची भक्कम पायावर उभारणी केली. आज हे चर्च क्षुल्लक असले तरी टिकाव धरून आहे.
भारतात नक्की कोठपर्यंत नेस्टोरियन लोक पोहचले होते ही माहिती उपलब्ध नसली तरी पडदा पुन्हा एकदा वर जातो तो ७ व्या व ८व्या शतकाच्या सुमारास ते मैलापूरपर्यंत गेलेले आढळतात. १५४७ च्या सुमारास भारताच्या काही भागात पोर्तुगीजांचे राज्य सुरू झाले. तेव्हा त्यांचे बरेच लोक चेन्नईच्या परिसरात गेले. काही युरोपियन प्रवाशांकडून त्यांना समजले की काही शतकांपूर्वीच तेथे ख्रिस्ती धर्म स्थापला गेला आहे. मात्र आता त्या भागातील लोक मूर्तिपूजा करू लागले होते. म्हणून तेथे तेव्हा कोणतीही ख्रिस्ती संस्था अस्तित्वात नव्हती. मग त्यांनी तेथे सुवार्ताप्रसार करण्याचे काम हाती घेण्याचे ठरवले. याच उद्देशाने चेन्नई जवळील डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम त्यांनी हाती घेतले. तेव्हा उत्खननात त्यांना एक क्रॉस व कबुतराचे चिन्ह असलेला एक शिलालेख ही सापडली. एका ब्राम्हणाने तो लेख वाचून त्याचा अर्थ सांगितला. त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रेषित थोमा तेथे आल्याचा व तेथे त्याला मरण आल्याचा वृतांत त्यावर होता. म्हणून १८ डिसेंबर हा दिवस तेथे दरवर्षी उत्सव पाळण्यासाठी त्यांनी जाहीर केला. हा अवशेष फार मोलाचा समजला जातो. हा शिलालेख त्यांनी तेथे बांधलेल्या मंदिराच्या मागील भिंतीत बसवला आहे.
पण पुढे त्या ब्राम्हणाने वाचून दाखवलेला त्या शीलालेखावरील वृतांत सत्य नसल्याचे त्यांना भाष्य तज्ञाकडून आढळले. त्यावर असे लिहिले आहे की, “मशीहाने ज्याला क्षमा केली आहे व नवजीवन देऊन तारले आहे असा कोण एक क्रूसावरच्या यातनांची लोकांना आठवण करून देत आहे.” असेच शब्द लिहिलेले दोन शिलालेख त्रावणकोर मधील कोट्टायम गावीही जतन केलेले आहेत. या तीनही शिलालेखावरील लिखाण स्पष्ट आहे. ते सातव्या आठव्या शतकातील असून इराणी चर्चच्या अनुयायांनी लिहिल्याचे सिद्ध होते. म्हणजे त्यांच्या आधी आलेल्या नेस्टोरीयन पंथांच्या मिशनरींच्याही आधी आलेल्या मिशनरींनी मलबार किनाऱ्यावर सुवार्ता सांगितल्याचे पुरावे हे शिलालेख देतात.
या पौर्वात्य मिशनरींच्या स्वतःच्या चर्चपासून मैलापूर फार दूर होते. शिवाय मैलापूरच्या राज्यकर्त्यांनी दाखवली तितकी मलबारच्या राज्यकर्त्यांनी तेथील ख्रिस्ती लोकांना आपुलकी दाखवली नाही. म्हणून पाश्चात्य मिशनरीइतके हे पौर्वात्य मिशनरी यशस्वी होऊ शकले नाहीत. हे शिलालेख सापडल्यावर नेस्टोरियन पंथाचे मिशन कार्य रेंगाळलेले दिसते. जेव्हा मार्कोपोलो १२२८ आला होता तेव्हा मैलापूरला ख्रिस्ती लोकांची बरीच वस्ती दिसते. पण १६व्या शतकानंतर नेस्टोरियन मिशन संपुष्टात आले. पश्चिम भारतात नेस्टोरियन मिशनचा व्यापार करण्याच्या धाडसामुळे इराणशी त्यांचा सतत संपर्क राहिला. येथील ख्रिस्ती लोकांवर त्यांची मेहेरनजर होती. त्यांना मिळालेल्या राजकीय पत प्रतिष्ठेमुळे चर्चचा दर्जा वाढला होता. शिवाय ८व्या व ९व्या शतकात पुष्कळ लोक इराणहून देशांतर करून आले होते. त्यामुळे चर्चची खूप प्रगती झाली. ‘मलबारचे सिरियन चर्च’ असे त्यांचे नामकरण झाले होते. हे चर्च खऱ्या अर्थाने भारतीय होते व अजूनही आहे. काळ लोटत असता त्यांची संख्याही वाढतच राहिली. १९११ साली ७,२८,००० सिरियन ख्रिस्ती होते. आता २०,००,००० पेक्षाही अधिक सिरियन ख्रिस्ती तेथे आहेत. विशेष म्हणजे आशिया मायनरमध्ये ख्रिस्ती लोकांचा दुसऱ्या तिसऱ्या शतकापासून छळ चालू असून त्यांनी केलेल्या कामाचे आपण हे फळ पाहतो हे विशेष! आपण तर किती आत्मे जिंकायला हवेत बरे!
Social