सितम्बर 8, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

इ.स. ३०० ते इ. स. १५००

प्रकरण ५                               

आता पुन्हा कायमचाच पडदा वर जातो. येथवर केवळ आशियाच्या चर्चनेच आपले कर्तव्य बजावले होते. युरोपियन लोक या चर्चला फारसे महत्त्वही देत नव्हते. पण आता युरोपला आपल्या मिशनरी कर्तव्यांची जाणीव झाली असे दिसते. पण एवढा प्रदीर्घ काळ त्यांच्या सुस्तीचे एक कारण होते. सातव्या शतकापासून इजिप्त, इराण व सिरीयावर मुस्लिम ध्वज फडकत होता. त्यामुळे भारत व ख्रिस्ती युरोपच्या संपर्कात त्यांचा मोठा अडथळा होता. व्यापार उदीम जरी चोरूनमारून चालत असला तरी ख्रिस्ती विश्वासाबाबतची देवाणघेवाण नगण्य होती. युरोपियनांना या देशांच्या मार्गाने पूर्वेकडे येण्यास मज्जाव होता. मार्ग तर हा एकच होता. भारताचा माल युरोपियनांस या राष्ट्रांकडूनच घ्यावा लागे. ते स्वतः येथे येऊन व्यापार करू शकत नव्हते. १३व्या शतकापर्यंत असेच चालू होते. मार्कोपोलोचे प्रवास वर्णन वाचून त्यांचे भारताकडे लक्ष वेधले गेले. ते कायमचेच! त्या देशांना न जुमानता युरोपियनांनी भारतात प्रवेश केला. त्याचवेळी चीनमधील मोगलांनी इराणमधून मुस्लिमांचे उच्चाटन केले. त्यामुळे त्यांच्यासाठी भारतात येण्याचा मार्ग सुकर झाला. युरोपियनांस कळले की भारतात पश्चिम व दक्षिण किनाऱ्यावर ख्रिस्ती लोकांची वस्ती आहे. तेव्हा त्यांची अंतःकरणे विधार्मियांच्या तारणासाठी तळमळू लागली. येथील ख्रिस्ती लोकांच्या आचार विचारात सुधारणा करण्याच्या चिंतेतून येथे त्यांनी मिशनकार्य सुरू केले.

अनेक मिशनरी पूर्वेकडे येऊ लागले. त्यांच्यामध्ये जॉरडॅनस हा प्रसिध्द आहे. १३१९ मध्ये जॉरडॅनस ऑव्हिंगटनहून सोबत चौघांना घेऊन १३२१ मध्ये भारतात आला. त्याचा सर्व वृतांत त्याच्या ग्रंथात सापडतो. मैलापूर, कॅथे व भडोच येथे काम करण्याचा त्यांचा मानस होता. आता ज्या बेटावर मुंबई वसली आहे, त्या बेटावर आश्रय घेऊन त्याला आपल्या सोबत्यांना ठाण्यात ठेवून स्वतः प्रथम भडोचला जावे लागले. कारण समुद्रात फार मोठे वादळ आले. भडोच मार्गावर तो सुरतेपर्यंत येताच त्याला बातमी आली की, त्याच्या सोबत्यांना ठाण्यात कैद झाली आहे. त्यामुळे तो मागे परतला. तोवर त्याला समजले की, त्याच्या सहकाऱ्यांना देहांत शासन झाले आहे.

ती हकीगत अशी – तेव्हा ठाण्यात मुस्लिम राजवट होती. युसुफ नावाच्या आलेक्झांड्रियाच्या व्यक्तीला त्यांच्या खऱ्या कामाविषयी संशय आला. त्याने त्यांना चौकशीसाठी सुभेदारासमोर उभे केले. त्यांनी न डगमगता ख्रिस्तावरील आपला विश्वास जाहीर केला मग खुबीने त्याने विचारले, “पैगंबराविषयी तुम्हाला काय वाटते?” ते म्हणाले, “आम्ही फक्त ख्रिस्तावरील विश्वास सांगतो.” मग शब्दात पकडायला त्यांनी खोचक प्रश्न केला. तेव्हा त्यांना हवे ते उत्तर मिळून त्यांनी त्याचा विपरीत अर्थ लावला आणि पैगंबराची निंदा केल्याचा त्यांच्यावर आरोप लावला. पैगंबराचे चारित्र्य व भवितव्यावर सडेतोड विधाने केल्याने भर बाजारात त्यांची जाळून होळी करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. पण आपला विश्वास न डगमगता धैर्याने व परखडपणे सांगणाऱ्या वीरांना अपाय करण्याचे सामर्थ्य त्या अग्निज्वाळांमध्ये नव्हते. हे पाहून घाबरून सुभेदाराने त्यांना सोडून दिले व वाटेल तेथे जाण्याची त्यांना परवानगी दिली. काही ख्रिस्ती लोकांनी त्यांचा पाहुणचार केल्याचे काजी व युसुफला समजले. सुभेदाराकडे जाऊन त्यांना मरणदंड करण्यास त्यांनी त्याच्यावर दबाव आणला. पण सुभेदार म्हणाला, “त्यांना मरणदंड व्हावा असे त्यांनी काहीही केलेले नाही.” मग ते म्हणाले, “तुम्ही त्यांना असेच सोडून दिले तर सर्व लोक ख्रिस्ती होतील आणि मुस्लिम कायद्याच्या ठिकऱ्या उडतील.” सुभेदार म्हणाला, “मग मी काय करू?” ते म्हणाले, “त्यांच्या रक्ताचे खापर आम्ही आमच्या शिरावर घेतो. मक्केला जाता येत नसेल तर, त्याचे पुण्य लाभायला निदान ख्रिस्ती व्यक्तींना जिवे तरी मारा!” अखेर दुसऱ्या दिवशी त्याने माणसे पाठवून थॉमस, जेकब व देमेत्रिय या तिघांची हत्या केली. तेव्हा पीटर दुसऱ्या गावी होता. तेथून त्याला त्यांनी सुभेदारापुढे हजर केले. ख्रिस्तावरील त्याचा विश्वास एवढे सारे होऊनही अढळ असल्याचे पाहून दोन दिवस त्याचे हालहाल केले व अखेर तिसऱ्या दिवशी त्याचा शिरच्छेद केला आणि तोही रक्तसाक्षी झाला. झावळ्याच्या आठवड्याच्या पाच आठवडे आधी ही घटना घडली.

जॉरडॅनस गांगरला नाही. त्या सर्वांची त्याने चर्चमध्ये प्रेतक्रिया केली आणि ज्या कामासाठी तो आला होता, त्या कामास त्याने स्वतःला वाहून घेतले. मित्रांच्या मरणानंतर त्याला तेथे राहण्याची परवानगी मिळाली. अशी निष्ठावान वृत्ती आज मंडळीच्या लोकांमध्ये हवी आहे. आपल्याला धर्मस्वातंत्र्य असतानाच या वृत्तीने आपण वैयक्तिक सुवार्ताप्रसार करणे अत्यंत गरजेचे आहे.

जॉरडॅनसने त्या काळच्या पॅरट नावाच्या जिल्ह्यात दहा दिवसात ९० लोकांना ख्रिस्ती शिक्षण देऊन बाप्तिस्मा दिला. ठाण्यात वीस लोकांना तर सेफा येथे ३५ लोकांना बाप्तिस्मा दिला. ठाण्यात व परिसरात त्याने अडीच वर्षे सेवा केली. त्याला भरपूर हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. चाच्यांनी त्याला पकडले, सॅराकीन लोकांनी अटकेत ठेवले. निंदानालस्ती झाली. कुभांडे रचली गेली. निर्भत्सना झाली. पाळकाचे कपडे घालण्यास मज्जाव केला. केवळ एका सदऱ्यावर त्याची दूरवर धिंड काढली. भीक, तहान, ऊन, थंडी, वारा, आजार, दारिद्रय, छळ, खोट्या ख्रिस्ती लोकांनी निंदा, शिवीगाळी, यांचा त्याला भरपूर त्रास झाला. तरी तो ख्रिस्तासाठी प्राणार्पण करायला भीत नव्हता. त्याच्यामुळे लोकांमध्ये दोन गट तयार होत, याचे त्याला फार वाईट वाटे. तो म्हणतो, ‘येथे पवित्र जनांमध्ये भर पडावी, त्या फळाचे रक्षण व्हावे, योग्य वेळी देवाने भूस बाजूला करून धन्य कोठारात साठवावे, हीच माझी प्रार्थना आहे. पण यासाठी बंधुजनांमध्ये सहनशीलता व दमदारपणा पुरता बाणलेला हवा. पुढे तो युरोपला परत गेला. सोबत भारतातील वृतांत लिहून गेला. त्यामुळे तेथील वरिष्ठांचे पूर्वेकडील नवख्रिस्ती लोकांकडे लक्ष गेले व त्यांच्याविषयी त्यांना आस्था वाटू लागली. त्यांना चुकीच्या मार्गापासून परावृत्त करणे हेच त्यांचे मिशनकार्य ठरले.

मग इ.स.१३३० मध्ये कोलंबोचा बिशप म्हणून जॉरडॅनसला पुन्हा पूर्वेकडे पाठवले. पश्चिम भारतातील नेस्टोरियन पंथी ख्रिस्ती लोकांनी भक्तिपूर्वक ख्रिस्तासाठी परिश्रम केले. जॉरडॅनसच्या नोंदीनुसार तेव्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कराचीपासून उत्तर मलबारपर्यंत ख्रिस्ती म्हणवणारे लोक ठिकठिकाणी पांगले होते. जरी स्वतःला ते ख्रिस्ती म्हणवत असले तरी त्यांना ख्रिस्ताविषयी सखोल ज्ञान नव्हते. साधू थोमालाच ख्रिस्त मानणाऱ्या ३०० लोकांना जॉरडॅनसने विश्वासात आणले. त्याला आता कामात विरोध झाला नाही. योग्य पद्धतीने सेवाकार्य करणेही महत्त्वाचे असते. परधर्मियांच्या भावना दुखावल्या जातील अशी विधाने कदापि करू नयेत. त्याच्या नोंदीनुसार त्याच्या चर्चने पूर्वेकडे दोनशे ते तीनशे ज्वलंत मिशनरी पाठवले. तेव्हा दरवर्षी दहा हजार लोक तरी ख्रिस्ती होतील अशी त्याची खात्री होती. तेव्हा ख्रिस्ती लोकांची संख्या सुरवातीला दहा हजार होती. मिशनरी अल्प असल्याने लोकांची साधी भेटही घेता न आल्याने अनेक आत्मे अधोगतीला जात आहेत अशी तो खंत व्यक्त करतो. आणि नमूद करतो की, काम पुष्कळ आहे, पण कामकरी थोडे आहेत. जॉरडॅनस हा प्रेषितांप्रमाणे जातिवंत मिशनरी होता. जरी १४व्या १५व्या शतकात पुष्कळ मिशनरी येत राहिले तरी हा व त्याचे चार सहकारी यांच्याप्रमाणे हरवलेल्या आत्म्यांसाठी आक्रोश करीत सेवा करणारे मिशनरी फार थोडे होते. जॉरडॅनस नंतर त्याची जागा घेऊ शकणारा त्याच्या योग्यतेचा कोणी आढळला नाही.

१५वे शतक पूर्ण होण्याच्या २ वर्षे आधी २० मे १४४८ ला देवाने दुसरे प्रवेशद्वार मिशनरींसाठी उघडले. त्या दिवशी वास्को-द-गामाने कालिकत येथे जहाजाने भारतात प्रवेश केला. हा समुद्रमार्ग सापडल्याने पाश्चात्यांचा मुस्लिम राष्ट्रांच्या हद्दीतून येण्याचा अडथळा दूर झाला आणि देवाने या संधीने पाश्चात्यांसाठी भारतात सुवार्ता प्रसाराचा मार्ग सोपा केला. जरी १५०० वर्षात सातत्याने मिशनरी येत राहिल्याचे आपण पाहिले, तरी पदरात त्या मनाने फारसे फळ पडलेले दिसत नाही. हे सिरियन चर्च भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. त्यांचा सामाजिक दर्जाही उच्च आहे. तरी भारतात त्यांची छाप पडल्याचे दिसत नाही. याउलट युरोपात ख्रिस्ताच्या जन्मानंतर ५०० वर्षे लोटेपर्यंतच ख्रिस्ती धर्मविश्वासाचा संपूर्ण युरोपवर यशस्वीपणे प्रभाव पडला. त्या तुलनेत भारत पूर्ण अपयशी ठरला होता. युरोप व पौर्वात्य देश यांना अशी भिन्न फळे का आली ते थोडक्यात पाहू.

हे सिरियन चर्च पाश्चात्यांपासून फार दूर पडले. त्यात मुस्लिम देशाचे अडखळण होतेच. आरंभीच्या मूळ धर्मपीठाचा मलबारच्या चर्चशी संबंध तुटला होता. त्यांना आत्मिक उत्तेजन व चालना देणारे कोणी मिळालेच नाही. ते ख्रिस्ती सिद्धांतात अगदी पारंगतही नव्हते. तरीही ही मंडळी संपुष्टात आली नाही याचे नवल वाटते. पण या चर्चमध्ये चिकाटीचा, उभारीचा व स्वावलंबनाचा अभाव दिसतो. ते सतत पाश्चिमात्यांच्या मदतीचीच अपेक्षा करत राहिले. पाश्चात्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. हे उत्तमच झाले. युरोपात रोमचे साम्राज्य असल्याने एक भाषा सर्वत्र प्रचलित असल्याने ख्रिस्ती धर्माचा सुलभतेने प्रसार झाला. भारतात भाषा ही तर प्रमुख अडचण होती. तेव्हा भारत तितकासा प्रगतीपर  देश नसल्याने तेथे ख्रिस्ती धर्म पसरला नाही. खरे तर भारतातही सकस, जोमदार बीज पेरले गेले होते हे निर्विवाद आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की पेरणाऱ्यांनी निराळ्या पध्दतीने कार्य कारणे गरजेचे होते. म्हणजे याहून चांगले फळ आले असते. तरीही चोहीकडच्या अंधारात प्रकाशझोत टाकणाऱ्या या  आतापर्यंतच्या धर्मवीरांविषयी आदर व कृतज्ञता वाटते.

भारतात ख्रिस्तीधर्म विश्वासाची पिछेहाट होण्याची आणखी कारणे म्हणजे या १५ शतकांमध्ये कामाच्या प्रयत्नांत खंड पडत होते. सूत्रे हलविणारे एखादे कायमस्वरूपी ख्रिस्ती ठाणे नव्हते. एक कार्यकर्ता मरण पावला की कार्याला उतरती कळा लागत असे व ते काम संपुष्टात येत असे. कारण १५ शतके भारतात ख्रिस्ती धर्माला संस्थेचे स्वरूप नव्हते. एखाद्या देशातील बहुसंख्य लोक एकत्र आले तर त्यांचा प्रभाव पडून ते समर्थ बनतात. युरोपात तेच झाले. पण भारतात तसे झाले नाही. म्हणून मलबार सोडल्यास इतरत्र ख्रिस्ती धर्माची पाळेमुळे खोल रुजली नाहीत. सिरियन चर्चच्या भारतीय ख्रिस्ती जनांना मिशनकार्य करण्याची तळमळ व द्रष्टेदृष्टीही नसल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्म विश्वास आपल्या पुरताच ठेवला. त्यांना केवळ आध्यात्मिक जोम होता. म्हणून ते चर्च टिकून राहिले. पण हरवलेल्या आत्म्यांची त्यांना चिंता नव्हती. या चर्चमधून एकही वचनाचा शिक्षक अगर सुवार्तिक उदयास आला नाही. पाश्चात्य ख्रिस्ती मंडळीशी आपला संबंध टिकवायचा एवढेच त्यांचे धोरण होते. त्यांचा भारतात कधीही छळ झाला नाही. त्यांची खूप ऐहिक भरभराट झाली. पण हीच भरभराट त्यांच्या आत्मिक भरभराटीस घातक ठरली. छळ झाला असता तर मंडळीने उच्च स्तर गाठला असता. 

आता भारतात हिंदू धर्माचे सामर्थ्य प्रचंड आहे. याउलट युरोपात मूर्तिपूजेचा मुळीच जोम नव्हता. त्यामुळे त्यांच्या समाजात ख्रिस्ती धर्मविश्वासच खरा व जिवंत असल्याचा प्रचंड पगडा पडला व ख्रिस्ती विश्वासाची पाळेमुळे खोल रुजली गेली. असे काही भारतात आढळत नाही. त्या काळातील हिंदू धर्माचा थोडा परामर्श घेतल्यास आढळते की, सहाव्या शतकापर्यंत कृष्णाला लोक एक गुरू, आचार्य, वीर पुरुष मानत होते. त्याला देव मानण्याची प्रथा नव्हती. सहाव्या शतकात कृष्ण संप्रदायाने निराळे वळण घेतले व कृष्णाच्या अंगी ख्रिस्ताशी सदृश्य काही कथा आणि देवपणही चिकटवण्यात आले. ह्या कथा त्यापूर्वी अस्तित्वात नव्हत्या. ख्रिस्ती धर्माचा प्रभाव वाढत असल्याचे पाहून तो थोपविण्यासाठी त्यांनी हा बदल केल्याचा लेखी पुरावा नसला तरी प्रकर्षाने असे म्हणता येते.

त्यानंतर नवव्या शतकाच्या आरंभी शंकराचार्यांना धर्मगुरू व धर्म संस्थापक समजू लागले. त्यांनी संपूर्ण भारतातील हिंदूंना अद्वैतमार्गी बनवले. त्यात देवाच्या व मानवाच्या व्यक्तिमत्वाचा लोप पावलेला दिसतो. त्यांच्यामुळे मायावाद वाढीस लागला. ‘जग मिथ्या आहे. ब्रम्ह सत्य आहे. आपणच ब्रम्ह आहोत’ हा साक्षात्कार झाल्यास मोक्षप्राप्ती होते. मायाजालात न फसल्यास, त्याकडे अजिबात लक्ष न दिल्यास हा साक्षात्कार होईल, असे त्यांचे म्हणणे होते. याविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात बंड सुरू झाले. त्यावेळी दक्षिण भारतात आचार्यांची परंपरा सुरू झाली. त्यांनी शिकवले की, ‘जीव व शिव निराळे असून सगुण आहेत. त्यांना व्यक्तिमत्व आहे. निराळे अस्तित्व आहे. या सगुण देवाची भक्ती केल्यास मोक्ष मिळतो.’ तिरुवल्लूर, माणिक्य, सागर, रानुज, रामानंद, तुळसीदास यांनी ९व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत ग्रंथरचना करून भक्तिमार्ग शिकवून भक्तिरसाचे पाटच वाहविले. पुढे सतराव्या शतकात शैव पंथ सुरू झाला. सगुण परमेश्वरावर त्यांचा भाव होता. मूर्तिपूजा व जातिभेद ते त्याज्य मानीत. अशाप्रकारे धर्म सुधारणेची लाट दक्षिण भारतात सुरू झाली. येथेच ख्रिस्ती धर्म दृढमूल झाला होता. येथेच मिशनरींनी अविरत परिश्रम केले होते. तिरुवल्लूर, रामानुज हे दोघीही मैलापुरचे रहिवासी होते. ख्रिस्ती धर्माचे हिंदू धर्मापुढे येथे मोठे आव्हान होते. त्या प्रभावामुळेच हिंदू धर्मात एवढ्या उलाढाली धर्म सुधारणेच्या नावाखाली झाल्या व हिंदू धर्मात बदल होत गेले.

आपण एवढे म्हणू शकतो की, दक्षिण भारतात शेकडो वर्षे ख्रिस्ती धर्माचा प्रसार होत होता. त्यांच्या चांगल्या गोष्टी लोकांच्या कानी पडल्या होत्या. त्यांचे पडसाद या धर्मसुधारकांच्या शिक्षणात आढळतात. हिंदू धर्मावर ख्रिस्ती धर्माची छाप विशेषतः दक्षिण भारतातच पडलेली दिसते. देव सर्वांचा पिता आहे. सर्व मानव त्याची मुले आहेत. मानवाने त्याची भक्ती करावी, ही तत्त्वे हिंदू धर्माची होतीच. पण भक्तिमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या धर्म सुधारकांवर ख्रिस्ती विश्वासाच्या शिकवणीचा परिणाम झाला होता. म्हणूनच त्यांच्या चळवळीला जोराने चालना मिळाली. हिंदू धर्मरूपी पिठात ख्रिस्ती धर्म तत्त्वांचे खमीर पडले. ते पीठ फसफसून फुगू लागले आणि त्या धर्म सुधारकांची लाट भारतभर पसरली. त्या काळी भारतावर सतत परधर्मियांच्या स्वाऱ्या होत. त्यामुळे रंजीस आलेल्या लोकांचा त्यांच्या शिकवणीने परिहार झाला. हिंदू धर्म सुधारणेमुळे त्यांच्यात भाव, विश्वास, भक्ती, प्रेम ही आली. लोकांना भक्तिमार्गाचे वेड लागले. जरी हिंदी ख्रिस्ती मंडळीची फारशी प्रगती झाली नाही तरी चर्चरूपी खामिराचे काम सुरू झाले होते. देवाने आपले साक्षीदार येथे पाठवले होते. ईश्वरी आत्म्याच्या कार्याला खंड पडला नव्हता. आजही त्याचा आत्मा कार्यरत आहे. त्याच्या प्रवाहात आपण राहायला हवे आणि खऱ्या जिवंत देवाची जगाला ख्रिस्ताच्या तारणदायी सुवार्तेने ओळख करून देण्याचे कार्य पुढे चालू ठेवायला हवे.

Previous Article

 प्रेषितांची उमटलेली पावले

Next Article

फ्रान्सिस झेवियर

You might be interested in …

दररोजच्या निर्णयांमध्ये देव कसे चालवतो?

जॉन पायपर माझ्या दररोजच्या निर्णयांमध्ये देवाच्या मार्गदर्शनाला मी कसे अनुसरावे? तो माझा मेंढपाळ आहे हे मला ठाऊक आहे. तो मला चालवतो. पण मी त्याच्या मागेच जातोय हे मला कसे समजते? ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण […]

संपादकीय

मी सकाळी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की २०१६ सालचे  आठ महिने सरले असून आता आपल्याला ह्या वर्षाची अखेर गाठायला फक्त चार महिन्यांचा अवधी आहे. मला भीती वाटली कारण आता या जगाचा शेवट होण्याच्या […]

देव तुम्हाला क्षमता देईल जॉन ब्लूम

बायबलमध्ये देवाने समाधान, उत्तेजन, मार्गदर्शन आणि खात्री देणारे मोलवान खडे काही ठिकाणांमध्ये विखरले आहेत.  मला  अपेक्षा नसताना मी माझी वैयक्तिक भक्ती करत असताना अगदी किचकट अशा निर्गमच्या काही जागी मला ते दिसले. पूर्ण खुलासा: एकांतसमयी […]