जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

डॅा. ॲलेक्झांडर डफ

(१८०६ -१८७८)

लेखांक १८

पार्श्वभूमी

भारतात आलेले ख्रिस्ती मिशनरी किती निरनिराळ्या राष्ट्रांतून, देशातून आले होते हे पाहून आश्चर्य वाटते. सिरीया, इजिप्त, इराण, इटली, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, इंग्लंड, डेन्मार्क या देशांनी आपापल्या परीने या कामी हातभार लावला. १९ व्या शतकाचा टप्पा उलटून जाईपर्यंत स्कॅाटलंडकडून हे काम झाले नव्हते. कारण मिशनकार्य हे आपले कर्तव्य असल्याची जाणीव इतर देशांच्या तुलनेने त्यांना उशीरा झाली. पण या सुमारास त्यांनी ज्याला पाठवले त्याची विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट प्रकारे छाप पडली. त्याच्या तोडीचा कोणी मिशनरी झाला नाही. स्कॅाटलंडची लोकसंख्या व आर्थिक स्थिती यांच्या तुलनेत त्यांनी जो खर्च केला, त्यामुळे प्रॅाटेस्टंट मिशनरींमध्ये त्याला मानाचे स्थान प्राप्त होते.

१७९६ मध्ये स्कॅाटलंड चर्चच्या जनरल असेंब्लीत मिशन कार्याच्या मुद्द्यावर बरीच चर्चा झाली. त्यातील भाषणे व चर्चा फार गाजली. त्यात जॅार्ज हॅमिल्टन पाळकाने म्हटले, “मूर्तिपूजक व रानटी लोकांत शुभवर्तमानाची कल्पना मला विपरीत वाटते. लोकांना धर्मविषयक तत्त्वांचे ज्ञान करून द्यायला त्यांच्या अंगी प्रौढत्व व सुसंस्कृतपणा शिकवायला काहीतरी केले पाहिजे.” मिशनकार्यासाठी वर्गणी देण्याची योजनाही त्याने फेटाळली. निदान याबाबत प्रार्थनेत तरी राहावे; अनुकूल परिस्थिती आल्यावर चर्च आर्थिक सहाय्य करील असे ठरले. पण त्यांची अनुकूल परिस्थिती यायलाही पुढे तीस वर्षे लोटली. पण या काळात १७९२ मध्ये स्थापन झालेली बॅप्टिस्ट मिशनरी सोसायटी, १७९५ मध्ये स्थापन झालेली लंडन मिशनरी सोसायटी, १७९९ मध्ये स्थापन झालेली चर्च मिशनरी सोसायटी यांच्या मिशन कार्याचे अद्भुत अहवाल या लोकांच्या कानी आले. १७९६ मध्ये स्कॅाटिश मिशनरी सोसायटी व ग्लास्गो मिशनरी सोसायटी स्थापन झाल्या होत्या. तरी १८२४ मध्ये म्हणजे २८ वर्षांनी त्यांच्या खुळ्या कल्पनांचा बोऱ्या वाजला. त्या वर्षी पुन्हा भरलेल्या परिषदेत दोन मतांचे लोक होते. एक मॅाडरेट, तर दुसरे सुवार्तावादी ( इव्हॅन्जेलिकल).

पण मिशन कर्तव्यांबाबत सर्वांचे एकमत होते. मॅाडरेट पक्षाचा डॅा. इंग्लिश हा मिशनकार्याचा पुरस्कर्ता होता. त्याच्या सूचनेनुसार मिशनकार्याची योजना आखण्यास एक समिती नेमण्यात आली. पुढची पाच वर्षे तयारीत, वर्गणी जमवण्यात, योजना सुधारण्यात गेली. त्यात ७००० पौंड वर्गणी जमली. कलकत्यातच चर्च ॲाफ स्कॅाटलंडचा डॅा. ब्राइस नावाचा वरिष्ठ चॅप्लेन होता. त्याच्या विनंतीवरून मिशनकार्याचे क्षेत्र निवडण्यात आले. पहिला लाभ बंगालला मिळाला. पूर्वापार चालत आलेले मिशनचे धोरण अनुसरून शैक्षणिक कार्य करावे असे ठरले. एक मध्यवर्ती पाठशाळा काढून आसपासच्या प्रदेशात तिच्या शाखा काढण्याचे ठरले. १८२८मध्ये सर्व सिद्धता झाली, आणि ॲलेक्झांडर डफ हा मिशनरी मिळाला. तेव्हा तो २२ वर्षांचा असून ईश्वरविज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण करीत होता.

डफ हा स्कॅाटलंडमधील हायलंडरच्या डोंगराळ भागाच्या पर्थशायर येथील एका शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याच्या वडिलांनी त्याला फार आस्थेने ख्रिस्ती धर्मशिक्षण दिले होते. बापाच्या तळमळीचा त्याला खूप फायदा झाल्याचे पुढे तो सतत कृतज्ञतेने सांगत असे. शाळेत व विश्वविद्यालयात त्याचा नेहमी पहिला क्रमांक असे. पुढारपणासाठी लोकांचा त्याच्यावर डोळा असून त्याच्याकडून खूप अपेक्षाही होत्या. त्याची कुशाग्र बुद्धिमत्ता, मनाचा सुसंस्कृतपणा, झटून काम करण्याची वृत्ती व शक्ती, प्रभावी वक्तृत्व, छाप पाडणारे व्यक्तिमत्व, सुभक्तीचे जीवन, प्रभावी धर्मविश्वास यांची त्याला देवाकडून देणगीच लाभली होती. सेंट ॲन्ड्र्यूज कॅालेजमध्ये डॅा. चार्मसची त्याच्यावर छाप पडली होती. त्यांचा तो जणु मानसपुत्रच झाला. तो त्यांना आपला गुरू, आदर्श, कित्ता, मार्गदर्शक मानत असे. स्कॅाटिश चर्चचा पहिला मिशनरी म्हणून ह्या चर्चकडून त्याला पाचारण करण्यात आले. आपण या कामास पात्र आहोत की नाही याविषयी डॅा. चार्मसकडून पडताळा घेतल्यावरच त्याने या कामास होकार दिला.

त्यांच्या शुभेच्छा घेऊन १९ सप्टेंबर १८२९ रोजी आपल्या पत्नीसह तो भारताला निघाला. मायदेशाहून निघण्यापूर्वी ॲलेक्झांडर हेंडरसनच्या चर्चमध्ये उपदेश करताना त्याची मिशनरी मनोवृत्ती व विचारसरणीवर प्रकाश पडतो. आपण का मिशनरी झालो हे सांगताना तो म्हणतो,  “एकेकाळी मला मूर्तिपूजकांविषयी काडीइतकी चिंता वाटत नसे. त्यांच्या आत्म्यांविषयी मी बेफिकीर होतो. देवकृपेने मला त्यांची चिंता वाहण्याची बुद्धी होऊ लागली व परदेशातल्या मूर्तिपूजकांची काळजी वाटू लागली. तेव्हा मी गुडघे टेकून देवाला म्हटले, “हे प्रभो, या कार्याला सोनेरुपे देण्याइतकी माझी ऐपत नाही हे तू जाणतोस. जे आहे ते, म्हणजे मी स्वत:लाच तुला वाहून घेतो. माझ्या अर्पणाचा स्वीकार करशील का?” मग त्याने आपल्या बापाला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, “माझ्या अंतर्यामात सर्व आध्यात्मिक सामर्थ्याने खंबीरपणा यावा, मला सामर्थ्य, दिव्यज्ञान व ईश्वरकृपेचा लाभ व्हावा, मी वधस्तंभाचा साधासुधा नव्हे तर खराखुरा कैवारी व एक सच्चा पराक्रमी शिपाई होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून तुम्ही माझ्यासाठी दुप्पट कळकळीने व तळमळीने प्रार्थना करा.” देवाने ही प्रार्थना ऐकून उत्तर दिले व त्याला भरपूर सामर्थ्य प्राप्त झाल्याचे आढळते.

भारत प्रवासात त्याला कल्पनेपलीकडे विघ्ने आली. कलकत्याला पोहंचण्यापूर्वी दोनदा त्याचे जहाज फुटले. एके वेळी तर पार चुराडा झाला. त्याचे सारे सामान समुद्राच्या तळाशी गेले. फक्त जाड कागदात गुंडाळलेले त्याला भेट मिळालेले बायबल त्याच्या हाती लागले. त्याची ८०० पुस्तके, बहुमोल हस्तलिखिते नष्ट झाली. देवाचे वचन मात्र राहिले. हाच आयुष्याचा आधारस्तंभ मानून त्यावरच सदेशांचा भर असावा हेच देव आपल्याला सुचवीत असल्याचे त्याने जाणले. काही दिवस त्यांना अडकून पडावे लागले. दुसऱ्या जहाजाने ते पुढे निघाले. हुगळी नदीत शिरताच तेही जहाज फुटले. मे महिन्याचे ते अखेरचे दिवस होते. वादळ व मुसळधार पावसाने सर्व प्रवासी भिजले होते. कप्तानाने लागलीच किनाऱ्यावरील एका देवळाचा निवारा हेरून त्यांना तेथे सोडले. एवढ्या संकटातून हे लोक वाचल्याचे पाहून मंदिराच्या लोकांना अचंबा वाटला व ते म्हणाले की ह्या माणसावर नक्कीच देवाची कृपा आहे. हा देवाचा लाडका दिसतो. भारतात चांगले चिरस्मरणीय काम करण्याचा ह्याचा संकल्प असला पाहिजे. म्हणून त्यांनी त्याला सहानुभूतीने मदत केली.

डफने कलकत्यापासून दूर व शैक्षणिक गोष्टींना प्राधान्य देणारे काम करावे हे दोन निर्बंध पाळण्याची त्याला सक्ती होती. बाकी योग्य ते काहीही करण्याची त्याला मुभा होती. चर्चचा त्याच्यावर पूर्ण भरवसा होता. पहिला दीड महिना कलकत्याच्या आसपासच्या प्रत्येक मिशन ठाण्याला भेट देऊन त्याने मिशनऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. इंग्लिश बोलणाऱ्या ख्रिस्तीतर व्यक्तिंशी परिचय करून घेतला. भारतीय चालीरीतींची माहिती करून घेतली. कोणत्या बाबतीत फलप्राप्ती झाली, कोणत्या नाही ते हेरून ठेवले व मग कामाची योजना आखली.

मग न कचरता कलकत्यातच काम करण्याचा त्याने निर्णय घेतला. बुद्धिजीवी उच्च वर्णीयांप्रत पोहोचण्याचे त्याने आपले उद्दिष्ट ठरवले. बंगाली, संस्कृत, इंग्लिश पैकी कोणती भाषा शिक्षणाचे माध्यम ठरवावी हा त्याला प्रश्न पडला. बंगालीत केरींनी पुष्कळ काम केले होते. पण उच्च साहित्याची त्यात उणीव होती. आता संस्कृत व इंग्लिशमधून कोणती भाषा माध्यम म्हणून ठरवावी हा प्रश्न उरला. इंग्लिश भाषा माध्यम ठरवल्यास पाश्चात्य ज्ञान भांडार खुले होईल असा विचार करून त्याने इंग्लिश हे सोयीचे माध्यम निवडले. डॅा. केरींनाही त्याचा विचार पटला. मग या २४ वर्षांच्या मिशनरीने जाहीर केले की, “मी उच्च शिक्षण देण्यासाठी एक इंग्लिश माध्यमाची पाठशाळा काढत आहे. जोडीला ख्रिस्ती धर्माचे शिक्षणही देण्यात येईल.” जुन्या सर्व मिशनपद्धतींची प्रशंसा करून त्या अत्यावश्यक असल्याने पुढे तशाच चालू राहतील हे त्याने स्पष्ट केले. पण त्याच्या धोरणात ख्रिस्ती कार्याला स्थान नसल्याचा आक्षेप घेऊन मिशनरींनी त्याला फारसे साह्य केले नाही. डफच्या क्रांतीकारक उपक्रमाला मिशनरींनी नव्हे तर सुप्रसिद्ध राजाराममोहन रॅायचे साह्य लाभले. त्याने निरनिराळ्या धर्मांतील निवडक तत्त्वे घेऊन नवा ग्रंथ काढला होता. त्याला आपल्या वडिलोपार्जित धर्माची रूढ तत्त्वे त्याज्य वाटू लागली होती. नैतिकदृष्ट्या तर तो ख्रिस्तीच होता. आध्यात्मिकदृष्ट्या त्याला ख्रिस्ती लोक जास्त जवळचे वाटत असत. कलकत्याच्या सेंट ॲन्ड्र्यूज चर्चमध्ये अनेकदा तो उपासनेला जात असे. डफवर त्याचा लोभ जडला व सुरुवातीला त्याचे डफला मोठे साह्य लाभले.

त्यानेच उद्युक्त केलेल्या पाच विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने १२ जुलै १८३० रोजी भाड्याने घेतलेल्या दिवाणखान्यात डफची शाळा सुरू झाली. पहिल्याच धर्मशिक्षणाच्या तासाला त्यांच्या हातात प्रथमच नव्या कराराची प्रत पडताच ख्रिस्ती शास्त्र वाचण्यास त्यांनी कुरकुर सुरू केली. हे वाचून ख्रिस्ती झाल्याने आम्ही धर्मबहिष्कृत होऊ ही भीती त्यांनी व्यक्त केली. तेव्हा राजाराममोहन रॅाय यांनी हे वादळ शांत करीत म्हटले, “डॅा. विल्सन यांनी हिंदू शास्त्राचा अभ्यास केला, पण ते हिंदू झाले नाहीत. मी स्वत: ख्रिस्ती शास्त्र व कुराणही वाचले पण मी ख्रिस्तीही झालो नाही अन् मुस्लीमही झालो नाही. वाचून खरे खोटेपणा तुम्हीच ठरवा.” हे ऐकताच वादळ शमले. वर्ग सुरू झाले. एका आठवड्यात ३०० विद्यार्थी प्रवेशासाठी आले. पण २५० विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे शक्य होते. या शिक्षण संस्थेचे नाव होते, “जनरल असेंब्लिज् इन्स्टिट्युशन.” रोज आरंभी एक तास पवित्र शास्त्र शिकवले जाई. पुष्कळदा राजाराममोहन रॅाय या वर्गाला हजर असत. त्यांना त्या शिक्षणाचा लाभ होत असे. रोज ६ तास शाळा भरत असे. इतर तासही परिश्रमपूर्वक शिकवले जात असत. एका ॲंग्लो इंडियन तरुणाने या कामी डफला मदत केली. मिशनरी खूप शंकाकुशंका काढत. पण डफने चिकाटीच धरली व एका वर्षात पहिला विजय मिळवला. कलकत्यातील एका प्रशस्त दिवाणखान्यात वजनदार हिंदू व युरोपियन व्यक्ती व डॅा. केरींच्या अध्यक्षतेखाली डफने मुलांची सर्व विषयांची परीक्षा घेतली. मुलांची तयारी व परीक्षेचा निकाल पाहून उपस्थितांनी तोंडात बोटे घातली. ख्रिस्ती धर्मतत्त्वे अधिक पसंत पडण्यासारखी असल्याचे मुलांनी उद्गार काढले. मुलांच्या ख्रिस्ती धर्माच्या ज्ञानाचा विषय तर सर्वांच्या तोंडी सुरू झाला. प्रवेश दुपटीने होण्याची चिन्हे दिसू लागली. त्यात भर पडली ती डफने त्यांच्या घरी आयोजित केलेल्या “सृष्टीजन्य ईश्वरज्ञान व ईश्वरप्रणीत धर्म” या व्याख्यानमालेने. दुसऱ्या दिवशी डफविरुद्ध पुराणमतवाद्यांनी वादळ उठवले. मग या विद्यार्थ्यांनीच उघडपणे त्यांच्याविरुद्ध टीकेची झोड उठवली. आणि जी गोष्ट हे विद्यार्थी क:पदार्थ समजत होते, तिचा आपण त्याग करत असल्याची कृती त्यांनी केली. मोहन बॅनर्जी नावाच्या कुलीन, उदारमतवादी वर्तमानपत्र संपादकाच्या घरी त्यांनी गोमांस शिजवून खाल्ले व उरलेले उच्चभ्रू व्यक्तिच्या अंगणात टाकले. काहींच्या मते त्यांचे हे कृत्य प्रायश्चित्त होऊ न शकणारे महापाप होते. बॅनर्जी मताने हिंदू नव्हता, नास्तिकही नव्हता. तरी त्याला त्याच्या घरातून, बायकामुले, मित्रपरिवारापासून हाकलून देण्यात आले. कोणी त्याला आसरा द्यायला तयार नव्हते. तेव्हा डफने आपल्या घरात त्याला आसरा दिला आणि त्यांचा परिचय वाढला. अखेर त्याने ख्रिस्ती धर्मविश्वास स्वीकारला. तो मंडळीचे भूषणच ठरला. डफच्या प्रयत्नाने ख्रिस्ती झालेला हा पहिलीच व्यक्ती नव्हता. त्यापूर्वी महेशचंद्र घोष हा विद्यार्थी प्रथम ख्रिस्ती झाला होता. त्याने अनेकांना ख्रिस्तशिष्य होण्याचा मार्ग मोकळा केला. एकामागून एक अनेक उच्चवर्णीयही ख्रिस्ती होऊ लागले. त्यांचा एक गटच बनला. त्यांच्यापैकी एक सोडल्यास बाकी सर्व अखेरपर्यंत ख्रिस्ताला धरून राहिले. “१८३३ मधील या पहिल्या स्कॅाटिश मिशनरीला प्रथमच प्रेषित योहानानंतर विश्वासात क्रांती घडवण्याचे यश पहिल्या तीन वर्षांत लाभले.” असे डॅा. जॅार्ज स्मिथ म्हणतात.

डफच्या कार्याचे दुसरे महत्त्व म्हणजे इंग्लिश माध्यमातून पाश्चात्य विद्या पौर्वात्य भागात उपलब्ध करून देण्याच्या कार्यास अग्रस्थान देणे. त्यात डफचे यश पाहून तर ब्रिटिश वर्गाने अचंबाच केला. लोकांना सुसंस्कृत बनवण्याच्या कामी संस्कृतपेक्षा इंग्लिश भाषा अधिक प्रभावी व श्रेष्ठ ठरली. जे सरकारी अधिकारी इंग्लिश भाषेचे पुरस्कर्ते होते, त्यांना या कार्याने पुष्टीच मिळाली. गव्हर्नर मेकॅलोचा ठराव जाहीर करून लॅार्ड बेंटिंगने इंग्लिश माध्यमातून इंग्लिश साहित्य व विज्ञानासाठी निधी संमत केला. ही गोष्ट भारताच्या प्रगतीसाठी अत्यंत मोलाची ठरली. या ठरावावर बराच उहापोह करून तो संमत झाला होता, एवढा सरकारने त्याला अग्रक्रम दिला होता. यामुळे मोठी वैचारिक क्रांती होईल असे डफने भाकित केले होते.

या ठरावामुळे भारतात नवीनच क्षेत्र उपलब्ध झाले. त्यामुळे पाश्चात्य कल्पना, विचार, संस्था व आशाआकांक्षांचे ज्ञानरूपी वारे जोरात वाहू लागले. त्या ज्ञानाने भारतात मोठी स्थित्यंतरे घडली. पण सतत चार वर्षे युगप्रवर्तक डॅा. डफ हे कार्य करीत राहिल्याने त्यांच्या प्रकृतीवर व शक्तिवर ताण पडला व १८३४ मध्ये अमांशाचा विकार होऊन तो निपचित पडला. त्याचा जीव वाचवण्याचा एकच मार्ग उरला तो म्हणजे विसाव्याला मायदेशी जाणे. आपल्या कामाची सूत्रे त्याने आपले निष्ठावंत सहकारी मि. डब्ल्यू. व मि. मॅके यांच्या हाती दिली.

डॅा. डफचा स्कॅाटलंडमधील १ ला कालखंड

डफच्या आयुष्यात भारतातील काम व स्कॅाटलंडमधील काम असे छोटे छोटे कालखंड आढळतात. त्यातील हा पहिल्या चार वर्षांचा कालखंड विशेष उठून दिसतो. तरी त्याचा प्रत्येक कालखंड महत्त्वाचा आहे. भारतात असताना तो मिशनरी प्रेषित असायचा तर स्कॅाटलंडमध्ये असताना तो मिशनांचा प्रेषित असायचा. खरे तर भारतातून मायदेशी गेलेल्या मिशनरींना तेथे आपले खूप रोचक अनुभव सांगायचे असत. पण तेथील लोकांना त्यात अजिबात रुची नसून आपल्या क्षुल्लक कामांना महत्त्व देण्यात ते गर्क असत. तेव्हा या मिशनऱ्यांचा उत्साह मावळून जात असे. पाच महिन्यांचा प्रवास करून डफ नाताळच्या दिवशी स्कॅाटलंडला पोहंचला. प्रवासात आराम मिळून त्याची प्रकृती सुधारली होती.

तेव्हा स्कॅाटलंडमध्ये निवडणुकीचा माहोल होता. त्यावेळी डफकडून काही ऐकायला त्यांना मुळीच वेळ नव्हता. बोटावर मोजण्याइतक्या लोकांनी वेळ काढून रुची दाखवली होती. पण एकंदरीत लोकांमध्ये बेफिकिरीच दिसून आली. पण हळहळण्यात वेळ न दवडता स्कॅाटिश मंडळीच्या डोळ्यावरची झापड काढणेच आपले काम असल्याचे डफने हेरले.

१८३५ च्या जनरल असेंब्लित यासाठी उत्तम संधी त्याने साधली. त्यावेळी अत्यंत प्रभावी भाषण केले. त्यात भारताची परिस्थिती, गरजा, आपण केलेले काम, त्याचे फळ, त्याचे परिणाम, भावी काळचा विकास, या मुद्यांवर भावपूर्ण विचार मांडले. या कामी मंडळीने पराकाष्ठेने काम करून त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी आव्हान केले. तरी टीकाकारांनी हे काम धर्महीन लेखले. तेव्हा “आपण भारतीयांना सामान्य व उपयुक्त शिक्षण दिले तरच त्यांना पवित्र वाटणाऱ्या चुकीच्या कल्पना नष्ट होतील व उपयुक्त ज्ञान दिल्याने दिव्य ईश्वरज्ञानाचा मार्ग मोकळा होईल.” असे मत डफने मांडले. एवढेच नव्हे तर ख्रिस्ती कार्याशी याचा संबंध नसल्याचे वाटणाऱ्यांना आपले मत मांडण्यास आव्हान केले. तेव्हा जमलेले पाळक, सुवार्तिक, पुढारी व वडील लोक एकेक उठून त्याच्या भाषणाचे आपल्या मनावर झालेले परिणाम सांगू लागले. यानंतर मंडळीतील लोकांमध्ये जागृती करण्यासाठी डफने स्कॅाटलंडमध्ये दौरे सुरू केले. त्यावेळी तरुणांना सामान्य शिक्षण दिल्यावर जेव्हा आपण ख्रिस्त सादर करतो तेव्हा तो त्यांना उत्तम रीतीने कसा समजतो याचे त्याने अनुभव सांगितले. १८३८ च्या सुमारास स्कॉटिश चर्च मिशनरी कार्य करणारी मंडळी बनले. १२०० पौंडऐवजी ७००० पौंड वर्गणी मिशनकार्यासाठी जमा होऊ लागली. कलकत्याचे मॅकडॅानल्ड व स्मिथ, मद्रासचे ॲंडर्सन जॅान्स्टन व ब्रेडवुड, मुंबईचे मरे मिचल हे सुप्रसिद्ध मिशनरी डफने स्कॅाटलंडमध्ये केलेल्या कार्याची फळे होत.

१८४० पासून डफचा भारतातला दुसरा कालखंड

१८४० मध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सुएझ कालव्याच्या मार्गाने डफ भारतात परतला. वाटेत इजिप्त व सीनायला भेट दिली. फेब्रुवारीत मुंबईत उतरला. मग मद्रासला पाच दिवस मुक्काम केला व मार्च महिन्यात कलकत्यास पोहंचला. आपल्या सहकाऱ्यांनी आपल्या पश्चात केलेले काम पाहून त्याला संतोष झाला व त्यांनी त्यांची प्रशंसा केली. पाश्चात्य विचारसरणीचा तीन चार वर्षांत कलकत्यावर प्रचंड परिणाम झाल्याचे त्याला आढळले. ब्रिटिश धर्तीवर संस्था काढणे सुरू झाल्याचे आढळून आले. जनरल असेंब्लिने काढलेल्या इन्स्टिट्यूशनमध्ये ७०० विद्यार्थी शिकत होते. युरोपियन शिक्षक संस्था चालवत होते. त्यासाठी त्याने देवाचे आभार मानले. कामगारवर्गात पाच मिशनरी असल्याने बऱ्याच सुधारणा घडवून आणणे त्याला शक्य झाले. मिशनरींनाही इतर विषय शिकवायला दिले होते, कारण त्यांना त्यांचे प्रशिक्षण दिल्याने त्यात त्यांनी प्राविण्य संपादन केले होते.

भौतिकशास्त्र, विज्ञान, सृष्टिज्ञान, वाड्.मय, गणित, तत्त्वज्ञान या विषयांचा त्यांचा दर्जा तर स्कॅाटिश कॅालेजपेक्षा उच्च होता. डफने शिक्षक होण्यासाठी ट्रेनिंग कॅालेजही सुरू केले. त्यामुळे नवीन शाळांसाठी यातूनच त्याला शिक्षकवर्गही मिळू लागला. कारकुनांसाठी रविवारी पवित्र शास्त्रवर्गही सुरू झाला. शिवाय डफ स्वत: आठवड्यातून एकदा ख्रिस्तीतर प्रौढ लोकांना व्याख्यानमालेतून इंग्लिश वाड्.मयाची माहिती देऊ लागला. मुलींकरता त्याने शाळा काढली. झनाना शाळा व स्त्रीशिक्षणाची बीजे डफनेच रोवली. या ज्ञानाद्वारे त्यांना ख्रिस्ताच्या भजनी लावणे हाच त्याचा उद्देश होता. काही काळ लोक ख्रिस्ती झाले नाहीत. पण त्याची मार्गप्रतीक्षा करीत ते काम करीतच राहिले. एक जण ख्रिस्ताकडे आला, मग काही जण आले. पुढे लवकरच एका उच्चवर्णीयाच्या परिवर्तनाने ख्रिस्तीतर समाजाला धडकीच भरली, तर कार्यकर्त्यांना उत्तेजन मिळाले. डॅा. स्मिथ म्हणतात, “नकळत जीवनाची अंगोपांगे जखडून टाकणारा सामर्थ्यशाली धर्म सोडून मोठ्या प्रमाणात थोर लोक ख्रिस्ती झाल्याचे प्रमाण या काळात सर्वाधिक दिसते.”

Previous Article

हेन्री मार्टिन

Next Article

डॅा. ॲलेक्झांडर डफ

You might be interested in …

तुमच्या मुलांना देवावर प्रेम करणे सोपे करा

लेखक: रे ओर्टलंड पालकांसाठी सर्वात अधिक वापरले जात असलेले नीतिसूत्रामधले वचन म्हणजे “मुलाने ज्या मार्गात चालावे त्यात त्याला लाव  म्हणजे तो वृद्ध झाल्यावरही त्यापासून वळून जाणार नाही” (नीति. २२:६). हे महान सत्य आहे. पण नीतिसूत्रांचे […]

पक्षांपासून सावध राहा

ग्रेग मोर्स दर रविवारी सकाळी ते आमच्यामध्ये येतात. काळजीपूर्वक ऐकले तर त्यांचे पंख फडफडणे तुम्हाला ऐकू येईल. गाण्याचा आवाज बंद होतो , पाळक पुलपिटवर येतात. पुस्तक उघडले जाते. या मानवाद्वारे देव आज आपल्याशी काय बोलणार […]