Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अक्टूबर 10, 2023 in जीवन प्रकाश

तुमच्या मुलांशी खोलवरचा संपर्क

तुमच्या मुलांशी खोलवरचा संपर्क

स्टीफन व्हिटमर

काही वर्षांपूर्वी मी व माझ्या पत्नीने एका मित्राकडून पालकत्वाची एक संकल्पना घेऊन आमच्या कौटुंबिक जीवनात आपलीशी केली. तेव्हापासून तो आमच्या पालकत्वाचा महत्त्वाचा व आनंददायक भाग झाला आहे. त्यामुळे आम्हाला व आमच्या मुलांनाही फायदा झाला आहे. ही साधी, स्वस्त आणि परिणामकारक संकल्पना आहे. तिची तुमच्यासाठी शिफारस करण्यास आम्ही उत्सुक आहोत: आम्ही आमच्या मुलांना एक-एकटे बाहेर घेऊन जातो.
(याला इंग्रजीत डेट वर नेणे म्हणतात. सोयीसाठी हाच शब्द वापरू या.)

आमच्या कुटंबात डेट हा विशेष, आयोजित व आनंददायक वेळ असतो. हा आमच्या दोघांपैकी एक आणि मुलांपैकी एक यांच्यामध्ये घालवला जातो. एखाद्या सेवेमध्ये किंवा सुवार्तासेवेमध्ये मुलांना सहभागी करणे आम्हाला आवडते, पण ह्या गोष्टी डेट पेक्षा वेगळ्या आहेत. मी आणि एमा आमच्या मुलांसोबत इतरही सामान्य गोष्टी करतो. (उदा. धावणे, खेळणे, भाजी आणणे.) पण ह्या ही डेटस नाहीत. डेट ही विशेष असते. आमच्या डेट आखीव योजना नसतात तर त्या सहजस्फूर्त असतात. कारण उत्कंठा असण्यात आणि बेत आखण्यात खूप मजा येते आणि आपण एकमेकांशी बांधले जातो. कधीकधी मी किंवा एमा एकाच मुलाला बरोबर घेतो व त्याच्याशी गंभीरपणे बोलतो. पण हा पण डेटचा प्रकार नाही. डेट ही यासाठी असते की तो आनंद देणारी असावी. आणि जरी मी व एमा दोघे मिळून मुलांबरोबर बरीच धमाल करतो तरी त्या सुद्धा डेट्स नसतात. डेट म्हणजे आम्हा दोघातील एक आणि मुलातील एक, एकत्र वेळ घालवतात.

आम्ही मुलांशी डेट का करतो

बायबलनुसार पालक-मुलाचे नाते असे आहे की पालकाला आपल्या मुलाची नीट ओळख असते. आपल्या मुलांना कशाने चीड येईल याची जाणीव त्यांना असते व ती गोष्ट ते टाळतात (कलसै. ३:२१). त्याऐवजी ते सुज्ञ सूचना आणि प्रशिक्षण देतात ( नीति १:८-९; २२:६). तसेच ते सुधारणारी शिस्त लावतात (नीति. १३:२४;२९:१५). बायबल नुसार असलेल्या पालकत्वामध्ये पालक हे दयाळू (स्तोत्र १०३:१३) आणि मृदू (स्तोत्र १३१:२) असतात. ते आपल्या मुलांसाठी तरतूद करतात (२ करिंथ १२:१४). ते त्यांच्या मुलांच्या जीवनात खोलवर भाग घेतात. त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवतात (अनुवाद ६:६-७). देवाबद्दल ते त्यांच्याशी खूप बोलतात (स्तोत्र ७८:४) आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात (यहोशवा ४:२०-२४).

अशाच प्रकारचे नाते आमचे व आमच्या मुलांचे असावे अशी आमची इच्छा आहे. आणि तरीही हे सर्व करणे आणि ते टिकवून धरणे किती कठीण आहे याची जाणीव आम्हाला आहे. आम्हाला असे पालक माहीत आहेत आहेत की जे मुलांबरोबर फार कमी बोलतात आणि सहजतेने बोलू शकत नाहीत. एकमेकांशी काय बोलावे हे दोघांनाही कळत नाही. याउलट आम्हाला असेही पालक ठाऊक आहेत की ते अगदी सर्व विषयावर मुलांशी चर्चा करतात. त्यांची मुले त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला उत्सुक  असतात आणि त्यांचे ऐकण्यास तयार असतात. या प्रकारच्या गटात  असण्यासाठी काही किमयेची गरज नाही. पण आपल्या मुलांशी संपर्क साधण्यास, खोल संवाद करण्यास मार्ग खुला व्हावा म्हणून आपण काही गोष्टी करण्याची गरज आहे.त्यांच्याबरोबर  डेटवर जाणे हा त्यांच्यावर बळजबरी  न करता नेहमी सुलभ, खोलवर संवाद साधण्याचा एक उत्तम मार्ग आहे असे आम्हाला आढळले.

आम्ही मुलांशी डेट कशी करतो

सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे  ही डेट केव्हा होणार  हे नक्की करणे. जर असे वेळापत्रक आधीच केले नाही तर ते कधीच जमत नाही असे आमच्या लक्षात आले. ते किती वेळा करावे हे ठरवणेही महत्त्वाचे आहे. महिन्यातून एकदा करणे आम्हाला जमते. आम्हाला तीन मुले आहेत याचा अर्थ जर मी किंवा एमाने त्यातील एकाला सोबत नेले  (एका महिन्यात एमा दुसऱ्या महिन्यात मी) तर एका वर्षात आम्ही प्रत्येक मुलाशी दोन डेट्स करू शकू.

आमच्या किचनच्या कपाटाच्या आत याचे वेळापत्रक आम्ही अडकवून ठेवले आहे. याचा अर्थ प्रत्येक मुलाला आपला महिना कधी येत आहे याची पूर्ण जाणीव असते. त्याची ते उत्सुकतेने वाट पाहत असतात. मग आम्ही दोघे मिळून आपण काय करणार ते ठरवतो. आम्ही अशा गोष्टी निवडतो की त्यामुळे आमच्यातील संवादाला चालना मिळेल. – पुस्तकाच्या दुकानाला भेट, कॉफी शॉप, पोटरी क्लास , मिनी गोल्फ कोर्स, मुझियम, बोलिंग, किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाणे. यामध्ये उधळपट्टी केली जात नाही. खरंतर वेळ आणि किती पैसे खर्च करणार हे नक्की केल्याने मुलांना दाखवले जाते की आपण एकत्र असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांना समजते की आम्हाला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडते. आणि निरोगी संवादाचा हाच उत्तम संदर्भ आहे.

आता हे आम्ही आमच्या मुलांना सांगत नाही, पण या वेळात आम्ही चार विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करतो: मित्रमैत्रिणी, विश्वास, भीती आणि कुटुंब. अर्थातच आमचा संवाद भरकटत दुसरीकडेच जाऊ शकतो – हे ही छानच! पण ह्या चार महत्त्वाच्या विषयांना थोड्या प्रमाणात तरी स्पर्श करण्याचा आमचा रोख असतो. म्हणून आमचा संवाद सहजरित्या तेथे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ते चर्चमध्ये व शाळेत मित्रांशी  इतरांशी कसे वागतात. आम्ही आमच्या स्वत:च्या विश्वासाबद्दल बोलतो आणि ते देवाबरोबर कसे चालतात हे विचारतो. किंवा चर्चमध्ये आणि कौटुंबिक प्रार्थनेत ते काय शिकत आहेत  किंवा त्यांना देवाबद्दल काय प्रश्न आहेत का ते विचारतो. जर एखाद्या गोष्टीची त्यांना काळजी वाटत असेल, भीती वाटत असेल किंवा कशाशी ते झगडत असतील तर त्यांच्याबरोबर त्यासंबंधी बोलायला आम्हाला आवडते. तसेच कुटुंबाचा घटक म्हणून ते कसे वागतात हे आम्ही पाहतो यामुळे आमचे नातेसंबंध सुदृढ आहेत ही खात्री आम्ही करून घेतो.

याची गुरुकिल्ली अशी आहे: जर आम्ही आमच्या मुलांशी ते लहान असताना या गोष्टीसंबंधी आता बोलत नाही तर जेव्हा ते किशोरवयीन किंवा मोठे होतील तेव्हा  कसे बोलू शकू? आपण ज्या बाबीसंबधी कधीच बोललो नाही तर अचानक तसे बोलणे, विचित्र, अवघड, किंवा अशक्य सुद्धा वाटू लागेल. जेव्हा आम्ही आमच्या मुलांशी डेटमध्ये बोलू लागलो तेव्हा ती सर्व आठ वर्षांच्या आत होती . त्या वयात त्यांच्याशी खोलवर संवाद करणे शक्य नाही याची जाणीव आम्हाला होती. आमचे ध्येय साधे होते: भविष्यात फलदायी संवाद होण्याचा मार्ग तयार करणे. एक एकाबरोबर संवाद सुलभ करून तो आमच्या नातेसंबंधाचा मुख्य भाग बनवणे हे आमचे उद्दिष्ट होते. जसजशी वर्षे सरली तसे हे घडत आहे हे आम्ही पाहतो. ज्याची आम्हाला ओढ होती त्या प्रकारचा संवाद आम्ही हळूहळू साधत आहोत.

परिपूर्ण नाही

मी तातडीने हे लिहितो की आमचे एक सर्वसामान्य कुटुंब आहे. आणि हे काही आम्ही परिपूर्णपणे करत नाही. आम्ही सर्वच कामात व्यस्त असतो. अनेक कार्यक्रम असतात आणि कधीकधी आमच्या डेट्स दोन तीन महिने मागे पडतात. कधीकधी आमच्या डेट्स खूप रोमांचक होतात. सॅमुवेलसोबत काच फुंकताना झालेला समुवेलचा विजय, हेन्री बरोबर मिनी गोल्फ खेळणे, अॅनी बरोबर घोड्यावरची रपेट – आणि काही काही तर आम्ही विसरूनही गेलो.

प्रत्येक डेट यशस्वी व्हायलाच हवी असे नाही. त्याऐवजी तो एकमेकांबरोबरच वेळ आणि त्याचा एकत्रित परिणाम म्हणून पाहा. वर्षातून चार वेळा, वर्षामागून वर्षे आमच्या प्रत्येक मुलाला डॅडी आणि ममीबरोबर वेळ घालवता येतो.. आम्ही कोठे जाणार आणि काय करणार याची चर्चा ते करतात आणि मग आम्ही एकमेकांबरोबर आनंदाने वेळ घालवतो, फक्त आम्ही दोघेच. आमचा आनंद फक्त त्यांच्यावरच केंद्रित आहे आणि आम्ही फक्त त्यांनाच समर्पित आहोत याचा अनुभव ते घेतात.

जर तुम्ही मुले असलेले पालक आहात आणि तुमची मुले अजून तुमच्यासोबत असतील तर ही कल्पना तुम्ही आमच्याकडून घ्याल अशी आशा आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबाप्रमाणेच तुमच्याही कुटुंबात गोड फळे येतील अशी मी प्रार्थना करतो.