सितम्बर 19, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाचं घर: पश्चात्ताप

उत्तरार्ध                                             

२. पश्चात्तापाची गरज

आपण यशयाचा ५७ वा अध्याय वाचला आहे असे आम्ही धरून चालतो. त्यातील १ते ६ व ११ ते १४ वचने परत एकदा वाचा. वास्तविक ७ ते १० वचनांवर देवाच्या लोकांवर तोच दोषारोप आहे. नि त्याची भाषा वितळत्या शिशाप्रमाणं कानातून मनात भाजत, जाळीतच जाते.

अ- माणसाला पश्चात्तापाची गरज पडते, ती मूर्तिपूजेमुळे होय. मूर्तिपूजेचा मुख्य अर्थ व्यभिचार होय. आपल्या मालकाचा मनाने धिक्कार. देवाची आपल्या जिण्यातून हकालपट्टी. त्याच्याऐवजी दुसऱ्याची स्थापना, नि त्याची मनापासून केलेली पूजा, असा आहे. पैसा, ऐहिकता, कीर्ती, मान, विलास, ही सर्व मूर्तिपूजाच होय. ती इतकी प्रभावी असते, तिची पकड इतकी जबरदस्त असते की आपल्या पोटच्या गोळ्याचा यज्ञ करणेही माणसाला काहीच वाटत नाही. मोठेपण, प्रतिष्ठा, याच गोष्टी घ्या. पैसा घ्या. या गोष्टींमध्ये माणसे इतकी गढून गेलेली असतात की त्यांच्या योगे आपली पोटची मुले नरकामध्ये गेली आहेत, याचे त्यांना भानच नसते. अधिक पैसे, मानप्रतिष्ठा, मिळवण्यामध्ये आध्यात्मिक शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलाबाळांची आपण आबाळ केली आहे, त्याच्या योगे आपल्या कुटुंबाचा विसकटा झाला, मुले आध्यात्मिक दृष्टीने धुळीला मिळाली याची त्यांना पर्वाच नसते असे दिसते. मूर्तिपूजेसारखे पातकच नाही. आपला दैनंदिन संसार देखील सूक्ष्म पण सामर्थ्यपूर्ण मूर्तिपूजाच होऊ शकतो. खरं ना?

ब. ऐहिकता: यशया ५७ मध्ये त्याचे राष्ट्रीय स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. आसपासच्या राष्ट्रांशी दोस्ती, तर त्यासाठी जासूद, वकील, मध्यस्थ पाठवण्याची गडबड ही देखील दिवाळखोरीच आहे. वर वर्णिलेली मूर्तिपूजा ही आध्यात्मिक दिवाळखोरी, तर ही वैयक्तिक ऐहिक दिवाळखोरी. दोन्ही क्षेत्रांमधून देवाची हकालपट्टी. तारण, उपासना, शास्त्रवाचन, प्रार्थना, यांचा स्पर्श एकदा झालेला आहे. पण त्याची पुरी पक्कड नाही बसलेली. याने असे केले, त्याने असे केले, अशी सबब मात्र. आध्यात्मिक जिणे ही आपली खासगी गोष्ट आहे, याचा पत्ताच नाही! जणू दुसऱ्यांसाठीच हे आपले जिणं जगतात. संतांच्या सहवासाचाही कंटाळा. किंवा दुसरेच पापी आहेत अशी मनोवृत्ती.

क- यहोवा या जिण्याचे दोन परिणाम सांगतो.(अ) तुझी आत्मनीतिमत्ता मी चव्हाट्यावर मांडीन. (ब) त्याच्यापासून तुला काहीएक लाभ होणार नाही. किती निरुपयोगी दिसते..प्रियांनो …पण .. किती भयंकर!

३. पश्चात्तापाची व्याप्ती

सर्वांनी सर्वत्र वर सांगितलेली गोष्ट नीट लक्षात घेतली, तर आपणाला प्रे कृ १७:३० मध्ये देवाने केलेली पश्चातापाची आज्ञा समजून येईल. ते वचन असं, “अज्ञानाच्या काळाची देवानं उपेक्षा केली.” देवानं त्या काळाकडं कानाडोळा केला. कारण तो काळ अज्ञानाचा होता. त्यामध्ये देवाच्या पुत्राचं प्रकटीकरण झालेलं नव्हतं. आणि त्याचा प्रकट झालेला धर्म त्याच्या प्रेषित राष्ट्राने जगाला सांगितला नव्हता. “पण आता” देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याचे प्रकटीकरण झाल्यामुळं, ते जगजाहीर झाल्यामुळं, “सर्वांनी… सर्वत्र …पश्चात्ताप करावा अशी आज्ञा तो मनुष्यांस करतो.” पश्चात्तापाची व्याप्ती किती आहे, ते पाहिलं का? सर्वांनी… एकही अपवाद नाही त्यामध्ये. म्हणजे देवाच्या दृष्टीने प्रत्येक पश्चात्ताप करणं योग्य आहे. शिवाय सर्वत्र त्याचं क्षेत्र सार्वत्रिक आहे. भौगोलिक दृष्ट्या त्याला कोणताही अपवाद नाही. ‘आम्हाला पश्चातापाची गरज नाही’ असं कोणत्याही व्यक्तीला, मग ती कोणत्याही आध्यात्मिक पातळीवर असो, नि कुठल्याही लोकांना आम्ही फार आध्यात्मिक असल्यामुळे आम्हाला पश्चातापाची गरज नाही असं म्हणता येत नाही. “अशी तो आज्ञा करतो.”  विनवणी नव्हे. सूचनाही नव्हेच नव्हे. तो दैवी असंदिग्ध हुकूम आहे. पाहिलीत त्याची जरब नि व्याप्ती?

‘आज्ञा मनुष्यांस करतो.’ या लहानशा तुकड्यामध्ये एक सूक्ष्म पण बोचक खोच तर नसेल ना? आहे, असं खास वाटतं. कारण पशुपक्षांना ही आज्ञा नाही. त्यांना ती देणं शक्यही नाही. ती केवळ माणसाला आहे. त्यालाच मात्र ज्ञान आहे. एवढेच नाही तर स्वातंत्र्य त्याला एकट्यालाच आहे, असं त्यातून ध्वनित होतं.

‘सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो आज्ञा करतो’ या प्रतिकावर, विषयावर इतक्या आग्रहानं किती उपदेश होतात? संजीवनाच्या खास सभा सोडल्या तर जवळ जवळ नाहीच म्हटले असता वावगे होणार नाही. ख्रिस्ती मंडळी अशी उदास, आध्यात्मिकदृष्ट्या अशी मेलेली का आहे याचं एक कारण काय आहे, हे लक्षात आलं का? नि धर्मसंजीवनाच्या सभा घेतल्या तरी देखील काही अपवाद सोडून बहुतेक सर्व ठराविक ठश्याच्याच असतात, की नाही? देवाचा हा कठोर आग्रह त्यांच्यामध्ये असतो काय? नाहीच, असे म्हणावे लागते.
‘सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा’ ही आज्ञा का? याचे कारण पाहू.

४. पश्चात्तापाचे स्वरूप

. पातक केल्यास पश्चात्ताप 
शास्त्रातली दोन सुप्रसिद्ध वचने घेऊ; व पश्चात्तापाचं स्वरूप काय आहे ते पाहू. योएल २:१२ व २ इतिहास ७:१४

१- आता तरी यहोवाचं वचन ऐका. पातकाची जाणीव. देवाचं वचन कानानं ऐकायचं, मनानंही ऐकायचं म्हणजे त्याप्रमाणं आज्ञापालन करायचं. हे बुद्धीचं काम.
२- उपोषण, शोक, आक्रंदन, बुद्धीला समजून उपयोग नाही. भावनाही खळाळली पाहिजे. आक्रंदन, शोक, आक्रंदन असा परिणाम झाला पाहिजे.
३- बुद्धीला समजलं, भावना उफाळून आली, तरी देखील फायदा नाही. जोपर्यंत इच्छेला गती मिळत नाही आणि मनुष्य वळत नाही, देवाकडे वळत नाही, पूर्णपणानं देवाकडं फिरत नाही तोपर्यंत काही फायदा नाही.
४- त्याचा परिणाम यहोवा “आशीर्वाद ठेऊन जाईल.”  पश्चात्तापाच्या सामर्थ्यानं मनुष्य देवाला त्याच्या सिंहासनावरून ओढून आणतो. मानवी पश्चात्तापाच्या ठिकाणी देव खुद्द येतो. पश्चात्ताप पाहतो, आशीर्वाद ठेवतो नि जातो.
(२ इतिहास ७:१४ “आपल्या दुष्ट मार्गापासून” वळा नि मी “ विनंती ऐकेन” “ क्षमा करीन” हे त्यात राहिलेलं आहे.)

ब. पातक न केल्यास पश्चात्ताप
ईयोब ४२:६ हे फार महत्त्वाचं आहे. ख्रिस्ती धर्मात पातक जरी केलं नाही तरी पश्चात्ताप करावा लागतो. “आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहात आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चात्ताप करीत आहे” (४२:५). मी कर्णोपकर्णी म्हणजे सांगीवांगीनं ऐकलं होतं. आता तर मी प्रत्यक्ष डोळ्यांनी तुला पाहात आहे. नि त्याचा परिणाम ? मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे (४२:६). मी माघार घेतो. (खरं तर नीतिमान कोणी नाही.)
४२ अध्यायापर्यंत माझी नीतिमत्ता अभंग आहे असे म्हणून ( स्वधार्मिकतेचं स्वत्व : २:३; २:९; २७:५; ३२:१-३) मी माझ्या मित्रांशी नव्हे, हे यहोवा, तुझ्याशी भांडलो. (हीच ईयोबाची चूक.)

तू माझ्याविषयी तशी साक्ष दिली होतीस (१:९ व ४२:७) तेथून मी माघार घेतो. एवढंच नाही, धूळ राखेत बसून कमालीच्या दु:खप्रदर्शनाने मी आता पश्चात्ताप करीत आहे. पश्चात्तापाचा हा ख्रिस्ती धर्मातील अर्थ निखालस नवीन, अजोड असा आहे. त्याचं कारण देवाचं प्रत्यक्ष दर्शन. मनुष्याच्या हातच्या कृतीचं, मूर्तीचं दर्शन नव्हे, तर देवपणाच्या अस्सल पावित्र्याचा अलग, मोहक, भयंकर आघात जेव्हा निर्मित वस्तू अशा मनुष्याच्या मनावर होतो, तेव्हाच त्याच्यामध्ये पश्चात्ताप , खरा पश्चात्ताप निर्माण होतो. तो सदैवच देवाच्या प्रतिमेचं होईपर्यंत झाला पाहिजे. आपण अनुवंशिक दृष्टीनं पापी, आहोत. निर्मित वस्तू आहोत. देवासारखी पूर्णता प्राप्त होईपर्यंत तो पश्चात्ताप सदैव आपली कृती असली पाहिजे.

५. पश्चात्तापाचा परिणाम ( यशया ५७:१५)

अशा पश्चात्तापाचा परिणाम आपण पाहिला आहे. यहोवा स्वत: येतो नि नम्र व पश्चात्तापी मनात आपले कायमचे घर करून राहतो. कशासाठी? याला सततचे जीवन प्राप्त व्हावे यासाठी. योएल २: १४ मध्ये ते स्पष्ट आहे, “तो आशीर्वाद देईल.” पण तो तिथं आपल्या कामासाठी परत जातो. इथे तो कायमचा घर करून राहतो. कारण आशीर्वाद याचा अर्थ सार्वकालिक जीवन असा आहे ( स्तोत्र १३३:३). त्याची दोन अंगे इथे सांगितली आहेत. जो नम्र आहे त्याला तो संजीवित करतो. जीवन देत राहतो. धर्मसंजीवन ही एकदाच झालेली कृती नव्हे. ती जीवनाची कायमची वृती आहे. नम्राला संजीवन नि पश्चात्ताप्याला उत्तेजित करीत राहतो. जिणे नेहमी चढउताराचे असतेच. त्याला उत्तेजनाची फार गरज आहे. ते उत्तेजन देखिल यहोवा त्याच्यामध्ये भरत राहतो.

तो सर्वच उतारा वाचा. ( यशया ५७:१५-१९). तिथे किती अभिवचने दिली आहेत पाहा: मी त्याला सुधारीन. (मुळात आरोग्य देईन.) पातकाच्या व शरीराच्या रोगट अवस्थेतून त्याला सोडवीन. तो चुकणारच. परत परत. पण मी त्याच्यामध्ये घर करून असल्यामुळे त्याला वाट दाखवीन. तो दु:खी होईल तेव्हा मी त्याचे समाधान करीन. त्याला आभार मानायला लावीन. त्याला देहमनाचे आरोग्य देऊन शांती, विपुल शांती देईन, असं यहोवा म्हणतो. म्हणजे…

१ – जीवन देईन. २ – उत्तेजित करीन. ३- आरोग्य देईन. ४- वाट दाखवीन. ५- समाधान करीन. ६- आभार मानावयास लावीन. नि अखेर ७- भरगच्च शांती देईन. अशा रीतीने समृद्ध सार्वकालिक जीवन त्याला बहाल करीन.

६. समारोप

त्यासाठी आपण काय करू या बरे? पहिल्याने त्याची आज्ञा पाळू या. आपण सssssर्वजण, सर्वत्र खरा मनापासूनच पश्चात्ताप करू या. योएल २: १२-१७ वाचा.२:१२ मध्ये यहोवा म्हणतो, “माझ्याकडे मन:पूर्वक वळा. आपली बाहेर दिसणारी वस्त्रे नव्हे तर आत, माणसाला न दिसणारी, तर देवाला दिसणारी, ऱ्हदये फाडा. पवित्र मेळावा भरवा.
सामुदायिक रीतीने एकत्र या. तान्ही बाळे सुद्धा येवोत. त्यांना काही समजत नाही असे म्हणू नका. त्यांच्याही बालमनावर या मेळ्याचा परिणाम होतो. इतकंच नाही. पश्चात्तापयुक्ततेचे दूध प्याल्याने स्तनपान करणाऱ्या अर्भकांवरही परिणाम होतो ( योएल २:१६.) नव्हे, नूतन विवाहित जोडपी सुद्घा यामध्ये भाग घेवोत असे यहोवा म्हणतो.

७. अखेर
पश्चाताप आपल्या कर्माने मिळत नसतो. ती देवाची देणगी आहे ( प्रे कृ ११:१८). हे पूर्ण लक्षात घेऊ. मिळेपर्यंत मागत राहू. पश्चात्तापाची उपासना यशस्वी करू.

Previous Article

“देवाचे घर” पश्चाताप

Next Article

विश्वासाची संधी फक्त इथेच

You might be interested in …

आपला मृत्यू पुढे ठेपला असता कसे जगावे

वनिथा रिस्नर आपण लवकरच मरणार आहोत हे ठाऊक असताना आपण कसे जगावे? अर्थातच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की एक दिवस आपण मरणार आहोत. पण आपल्याला लवकरच मरण येणार आहे – आपल्याला जर काही आठवडे, महिने […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ९ मिसरातील भयानक तडाखे […]