दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

लेखांक ७                      
 

आपण पाहिलं की पवित्र शास्त्र वाचणाऱ्याला चांगल्या कामाकरता तयार करण्याचं काम करतं. आता ते काम पवित्र शास्त्र कसं करतं ते पाहू. विश्वासी व्यक्तिमध्ये चांगलं काम कोणतं ते पाहू. मार्क ७:३७ मध्ये एका चिमुकल्या वाक्यात ख्रिस्तचरित्र गोवलं आहे. ‘त्यानं सर्व काही चांगलं केलं’ असं म्हटलं आहे.
चांगल्या कामाची ही ख्रिस्ती धर्मातील व्याख्या होय. प्रत्येक काम येशूनं चांगलं केलं. तसं करणं हेच चांगलं काम. शरीराला त्यानं रोगमुक्त केलं. आणि मनालाही त्यानं स्पर्श केला. तुझ्या विश्वासानं तुझं तारण केलं… देह रोगमुक्त केला… निरामय केला…आता शांतीमध्ये प्रवेश कर. ‘म्हणजे तुझ्या जिवाला विसावा मिळू दे.. तुझ्या आत्म्याला शांती प्राप्त होऊ दे’ असं तो म्हणाला. तेव्हा चुकलेल्या पातकी माणसाचं तारण करणं…सर्वांग परिपूर्ण तारण करणं ह्यालाच चांगलं काम असं ख्रिस्ती धर्मात म्हणतात.

त्यासाठीच ख्रिस्त जगात आला. ख्रिस्ताचं संपूर्ण चरित्र असल्याच ‘मंगल कृतींनी’…चांगल्या कामांनी भरलेलं आहे. ‘ तो (ख्रिस्त) बरं करीत फिरला.. मंगल करीत फिरला.’ असं दुसऱ्या एका त्याच्या चरित्र लेखकानं म्हटलं आहे. हे तारणाचं काम…इतरांच्या उद्धाराचं काम ह्यालाच ख्रिस्ती धर्मामध्ये ‘चांगलं काम’ असं म्हटलं आहे. ते एकाच प्रकाराचं नाही. निरनिराळ्या इसमांना निरनिराळी दानं असतात. त्या त्या प्रमाणानं त्यांची कामंही भिन्न असतात. त्या सर्वांचं उद्दिष्ट एकच. इतरांचं तारण. ह्याच कामाला देवाचं काम ‘चांगलं काम’ असं म्हटलं आहे. असलं चांगलं काम कोणाला करायचं असेल तर त्यात पवित्र शास्त्र आलंच पाहिजे. कारण असलं प्रत्येक चांगलं काम करण्यासाठी पवित्र शास्त्र वाचकाला तयार करतं. या अद्वितीय कामासाठी ते ‘उपयोगी’ आहे.

पवित्र शास्त्र हे काम कसं काय करतं? मागे आपण पाहिल्याप्रमाणं पहिली गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये आपल्या धर्मातील जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. धर्मसिद्धांत आहेत. त्या सिद्धांतांचं ज्ञान.. जिव्हाळ्याचं…आपुलकीनं भरलेलं ज्ञान करून देणं हे त्याचं पहिलं काम आहे. शास्त्राचं सामान्य ज्ञान फारच थोड्यांना असतं. घरातील उपासनेत शास्त्राचा उपयोग करीत असता आपल्या प्रेमळ धर्मातल्या जिव्हाळ्याच्या सिद्धांतांचं ज्ञान घरातल्या प्रत्येकाला व्हावं, याचीही खबरदारी प्रत्येक घरकऱ्याने घेतली पाहिजे. त्यानंतरचं दुसरं काम म्हणजे कसोटी, आणि कानउघाडणी होय.

सिद्धांतांमध्ये देवाची इयत्ता असते. त्या इयत्तेप्रमाणं वाचकांचं चरित्र आहे की काय याची कसोटीही ते पाहातं. आणि ते नसलं तर मग कानउघाडणी करतं. त्यावेळी त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. तुमच्या भल्याकरता तुमची विनवणी करणारा… तुमची मनधरणी करणारा तो देवाचा आत्मा आहे. तुमच्या आतल्या जिवाशी बोलणारी ती देवाची ‘शांत, मंजुळ’ वाणी आहे. त्या तुमचं मन वळवण्यासाठी झटणाऱ्या आत्म्याला कध्धीही दुखवू नका.

आता सिद्धांत शिकवला. इयत्ता पटवली. कसोटी पाहिली. नि उणं दिसल्यावर कानउघाडणी केली. पण एवढ्यानं संपलं काय? विघातक टीका केली पण विधायक शिकवण नाही दिली तर चुकलेल्या जिवाला त्याचा फायदा तो काय? त्यासाठी त्याच्या पुढचं काम फारच महत्त्वाचं आहे. त्यासाठी वापरलेला मूळ ग्रीक शब्द फारच सुंदर आहे. त्याचा अर्थ ‘उठवून बसवणं’ असा अर्थ आहे. चित्र किती गोड आहे पाहा. देवाच्या इयत्तेप्रमाणं चालणारा, तारलेला चुकून इयत्तेवरून घसरतो. खाली येतो. पडतो. पवित्र शास्त्र वाचलं तर तत्काळ त्या पडलेल्या जिवाकडं … भ्रष्ट आत्म्याकडं ते धाव घेतं. त्याला प्रीतीनं कवटाळतं. जपून उचलतं. देवाच्या इयत्तेवर परत नेऊन बसवतं.

प्रिय वाचका, शास्त्राच्या या कृतीचा अनुभव आला आहे का? आला असल्यास धन्य ! शास्त्रानं पातक्याला त्याचं पातक दाखवलं. त्याला उठवलं. परत त्याला उभं केलं. देवाच्या समोर उभं केलं. खराखुरा … पूर्ण… पश्चाताप त्याला झाला. त्यानंतरच शास्त्राचं काम म्हणजे असल्या पश्चातप्त पातक्याला नीतीचं बालशिक्षण देणं. जगात इथून तिथून सर्व पापी ! नीतिमान कोणी नाही… नाहीच…एक देखील नाही. याचकरता ख्रिस्तानं नियमशास्त्र विरहित नवीन नीतिमत्ता तयार केली. ती फक्त ख्रिस्तावरील विश्वासाच्या एका अटीवर..पत्करण्याच्या… कबूल करण्याच्या, घेण्याच्या, आपलेसे करण्याच्या एकाच सोप्या शर्तीवर ती नीतिमत्ता पवित्र शास्त्र पातक्याच्या पदरात टाकतं!

ही झाली सर्व सिद्धता. इतरांच्या तारणासाठी आता ‘देवाचा माणूस’ पूर्णपणानं सजला. तारणाची इच्छा करणाऱ्या पातक्याला काय काय हवं आहे ते त्याला आता अनुभवानं समजलेलं असतं. त्याला गती देऊन तारणाकरता… इतरांच्या उद्धाराकरता चुकलेल्या जिवाचं मंगल करण्याकरता ते वाचकाला ‘तयार करतं.’ गतिदायक प्रेरणेनं भारतं.
या सर्व गोष्टींसाठी पवित्र शास्त्र ‘कौटुंबिक उपासनेचा जीव’ आहे. त्याचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे.

Previous Article

पवित्र शास्त्राचं कार्य

Next Article

“देवाचे घर” पश्चाताप

You might be interested in …

माझ्या पापाचा अनंतकालिक पारितोषिकावर परिणाम होतो का?

जॉन पायपर ब्रॅंडनचा प्रश्न-  बायबलमध्ये स्वर्गात मुगुटांची पारितोषिके मिळतील असे लिहिले आहे. येणाऱ्या जीवनात मला  खूप आनंद हवा आहे. पण या जीवनात मला वाटते की मी सतत पाप करतो. आणि प्रत्येक वेळेला मी पाप केले […]

धडा १९.  १ योहान ३: १९-२० स्टीफन विल्यम्स

  देवासमोर खात्री तुमच्या जीवनात अशी कधी वेळ येते का की तुमच्या मनात देवाविषयी शंका येऊ लागते? त्या कोणत्या प्रकारच्या वेळा असतात? असे विचार तुमच्या मनात केव्हा येतात? तेव्हा कोणत्या प्रकारे काही मदत मिळते? चर्चा करा. […]