अप्रैल 5, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ईयोबाची पहिली कसोटी

सॅमी विल्यम्स

धडा ४ था  

ईयोब १:१३-२२                                                                      


आपण पाहिले की ईयोबाच्या तीन इच्छा, येशूचे मध्यस्थीचे कार्य, पापक्षमा व पुनरुत्थानाची भावी आशा यावर केंद्रित आहेत. दु:खसहनाचा आत्मिक हिरो म्हणून ईयोब ख्रिस्ताची प्रतिछाया असा आहे – जरी ईयोबाच्या हातून एक घोडचूक घडली. येशूशिवाय कोणीच भयानक दु:खसहन केलेले नाही, त्यामुळे वास्तविक पाहता येशूशी कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. आता आपण पहातो, स्वर्गात जे काही घडले, त्यामुळे पृथ्वीवर काहीतरी घडत आहे. तरी ईयोब ५:११ वाचा. आपण ईयोबाच्या सहनशीलतेवरून व प्रतिसादावरून बरेच काही शिकतो.

या शास्त्रभागाचे महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत.                                                  

अ- त्याच्या परीक्षा. वचने १३-१९     ब- त्याचा प्रतिसाद. वचने २०-२१.

एका दिवसात ईयोबाचे सारे जीवन धुवून जाते. आपण छोट्याशा संकटातच किती कुरकुर करायला सुरुवात करतो. सहानुभूतीसाठी तरसतो.     

अ – त्याच्या परीक्षा

वचन १३- कोणाच्या तरी वाढदिवशी भोजनासाठी एकत्र जमले असतील. ईयोब दाम्पत्य तेथे दिसत नाही.   नित्याची सकाळी यज्ञ व प्रार्थना झाल्यावर बापाने मुलांना मौज करायला सोडलेले दिसते. आता लाटेमागून एक लाट यावी आणि एकातून मरता मरता वाचावे तो दुसरी मोठी लाट यावी तसे हे चालले आहे.     

संकटाची १ ली लाट- वचन १४-१५.

ही लाट दक्षिणेकडून आली. शेतीचा व्यवसाय म्हणजे अन्नधान्य उत्पादन वहातुकीचा व सेवकांचा धुव्वा उडाला. उत्पत्ती १०:७ नुसार शबाई लोक कुशाचे पुत्र होते. त्या काळी संपन्न असलेल्या दक्षिण अरबस्तानच्या ज्या लोकांशी त्याचा व्यवसाय जडलेला होता, तेच त्याला विरोध करतात. त्या कुरणात त्या सेवकांना क्रूरपणे तरवारीने वधून त्यांचे रक्त सांडले. एकच सेवक ही बातमी देण्यासाठी वाचला. यावर काही प्रतिसाद व्यक्त करण्यापूर्वीच दुसरी लाट येते.                                  

संकटाची २ री लाट– वचन१६.

ईयोब आपली संकटे, दु:खे, ओझी यांची सावली आहे. ह्या संकटाची दिशा आकाशापासून आहे. मांसाहारी अन्न, लोकर, कापड, चर्म व्यवसाय यांचा नैसर्गिक आपत्तीने नाश झाला. दैवी अग्नी, हवामान यावर सैतान नियंत्रण करतो का? स्तोत्र १३५:६-७ वाचा. सैतान सर्वच गोष्टींवर नियंत्रण चालवणारा नाही. तो देवाशी बरोबरी कोठेही करू शकत नाही, देवाच्या परवानगीशिवाय तो काहीच करू शकत नाही. देव निसर्गाचा निर्माता आहे. सैतान त्यावर कसा अधिकार चालवू शकेल? आकाशातून म्हणजे देवापासून दैवी अग्नी आला. ईयोबाला हे ठाऊक आहे. म्हणून तो सैतानाला शिव्याशाप देत नाही, हे लक्षात घ्या. हा त्याच्या विश्वासाचा पुरावा आहे. त्याला श्वास घ्यायला, प्रतिसाद द्यायला फुरसतही नाही.                                               

संकटाची तिसरी लाट- वचन १७.

हे संकट उगवतीकडून, पूर्वेकडून आले. वाहतुकीचा सारा व्यवसाय बुडाला. गड्यांना तरवारीने मारून उंट घेऊन गेले. अब्राहामाचा हा मूळ देश. मत्सराने, कपटनीती आखून खास्द्यांनी हा हल्ला घडवून आणला. शंभर टक्के सारे गेले. सर्व साधनसंपत्ती गमावून एका दिवसात तो कंगाल होत आहे. आपण किती शिव्याशाप दिले असते. त्याला तर प्रतिसाद द्यायला, की काही प्रश्न करायला सवड देखील मिळाली नाही.

संकटाची चवथी लाट- वचने १८-१९.

त्याचे कुटुंबच गेले. कल्पनेपलीकडील सर्वात हृदयद्रावक संकट. बातमी आणणारा कसे सांगू या विचारात असेल आणि जीव एकवटून तो ऐकायला उत्सुक असेल. बोलण्यावरून  सांगणारा गहिवरून सांगत असेल असे वाटते. ही दैवी नैसर्गिक आपत्ती आहे. आधी कधी पाहिला नाही असा प्रचंड वारा, चक्रीवादळासारखा आला. पहिली आपत्ती एका दिशेने, दुसरी आपत्ती दुसऱ्या दिशेने, तिसरी आपत्ती तिसऱ्या दिशेने आणि चौथी आपत्ती चारही दिशांनी आली. चारही दिशांनी वारा येत नसतो. एकाच दिशेने येत असतो. हा वारा देवाकडून आला होता तो घराच्या चारही कोपऱ्यांवर आदळला. आणि त्या तरुण मुलांवर घर पडले. त्याखाली ती सारी मरून गेली. मुलांशिवाय कसे जगावे? त्यांचा शेवटचा निरोपही घेता आला नव्हता. कोविडच्या  काळात असेच होत होते ना? सैतान ईयोबाला नेस्तनाबूद करू इच्छित आहे. ईयोब मुलांची खूप काळजी घेणारा होता म्हणून सैतानाने हा हल्ला आणला.                                                                            

या वृत्तांतात तीन शब्दप्रयोगांची पुनरावृत्ती लक्षात घ्या.

१- ‘तो हे सांगत आहे इतक्यात.’ बुडवून टाकणारी संकटे. आणि विचार करायला की प्रतिसाद द्यायला फुरसतही नाही.

२- घाला घालून घेऊन गेले, भस्म केले, कोसळले, हे दैवी संकटे असल्याचा पुरावा देते.

३- ‘मी एकटाच रहिलो, वाचलो.’ परत मालमत्ता उभी करता येईल असे काहीच राहिले नाही. ईयोब दाम्पत्य का राहिले? देवाने सैतानाला मर्यादा घातली व परवानगी दिली नाही म्हणून राहिले. हा नाश फार भयानक होता. पण सैतान जिंकला का? नाही. ईयोबाने देवाविरुद्ध अवाक्षरही काढले नाही. सैतानाला वाटले होते ते घडलेच नाही. पतन पावण्याऐवजी ईयोब तर विश्वासाचा नाश न होता अढळ उभा राहिला. कारण विश्वास हे आपले नव्हे तर देवाचे काम आहे. आपण विश्वास ठेवतो पण त्याचे श्रेय घेऊ शकत नाही. हा दैवी विश्वास तोच आपल्याला देतो.     

ब- ईयोबाचा प्रतिसाद वचने २०-२१.

१- शोकाची सांस्कृतिक पद्धत- झगा फाडणे ही औपचारिक कृती होती. अनुवाद १४:१ वाचा.

२- डोके मुंडले – याद्वारे तो मृतांशी समरूप होतो. स्वत:ला प्रेतवत गणतो.     

३- ‘भूमीवर पालथा पडला’. शक्ती उरली नाही. जेव्हा आपण दुर्बल असतो तेव्हा ख्रिस्त सबळ असतो. संकटातून जाताना दिलेले हे विश्वासीयाचे प्रामाणिक प्रतिसाद आहेत. नम्रपणे भूमीवर पडून तो देवाची आराधना करतो. आत्म्याने व खरेपणाने आराधना करण्यास अशी खरी मनोवृत्ती हवी.

४- ईयोब कोणती सत्ये विदित करतो?

(|) ‘मी उघडा आलो, उघडा जाणार’ १तीम.६:७. सर्व पापी लोकांमध्ये मी मुख्य आहे असे म्हणणाऱ्या पौलाप्रमाणे ही मनोवृत्ती आहे १तीम.१:१५. ईयोबाचे हेच तत्त्व पौल मांडत आहे.     

(||) ‘यहोवाने दिले व यहोवाने नेले.’ देणे व काढून घेणे देवाच्या नियंत्रणात आहे. तो देव चूक करत नाही आणि वाईट चांगले दोन्ही त्याच्या नियंत्रणात आहे.

(|||) ‘धन्य त्याचे नाम’. हे क्रियापद मी एकदाच नव्हे तर सतत त्याचा धन्यवाद करीन असे दर्शवते. तो सतत स्तुती करण्यास पात्र आहे. त्याने देवाला दोष अगर शाप दिला नाही. आपण देवाला अधिक जाणून घेऊ व त्याची आराधना करू.

५- वचन २२- या सर्व प्रसंगात ईयोबाच्या हातून पाप झाले नाही. देवाला त्याने दोष दिला नाही. येथे सैतान पुरता हरला आहे. त्याचे आरोप खोटे ठरलेत.                                   

इफिस ३:८-१० वाचा. देव व विश्वासाचे दान याविषयी हा धडा आहे. देव आपल्याशी हा खेळ खेळतो का?

इफिस ६:१०-१२ वरून पौलाच्या जीवनाचा हेतू पहा.

१- देवाचे ज्ञान अंतरिक्षातील व पृथ्वीवरील अधिकाऱ्यांना म्हणजे सैतान व त्याच्या दूतांना दाखवून द्यायचे.

२- आपली वाटचाल केवळ जगापुरती मर्यादित नाही; आपले युद्ध त्याच्याशीच आहे. आणि संकटातही आपण देवासमागमे विश्वासाने देवाचे गौरव करीत चालायचे.

                                                         

Previous Article

जर देवाने मला मुलगी दिली तर

Next Article

आपल्याला  टाकून दिलंय असं तुम्हाला वाटतं का?

You might be interested in …

१०००० छोट्या परीक्षा लेखक : स्कॉट हबर्ड

जेव्हा मी कामावरून परतलो आणि किचनमध्ये गेलो तेव्हा मला जाणवले की मी एकटा नव्हतो. क्षणभर मी घुटमळलो, मग मला सावरून मी लाईट उघडले. आणि ते तिथे होते, सर्व दिशांनी माझ्याकडे पाहात. भांडी. सिंकमध्ये कप वाट […]

देवाची यशस्वी प्रीती लेखक : जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६)

देवाची प्रीती कधी चुकत नाही. याविषयी स्तोत्रांमध्ये भरपूर विधाने सापडतात. “परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती दयेचे वेष्टन असते” (स्तोत्र ३२:१०). जेवढ्या विपत्तीतून आपण जातो त्या सर्वांमध्ये देवाची न चुकणारी प्रीती असते. “पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु […]

अन्यायाचं धन  (॥)

लूक १६:९ आपण लूकाच्या शुभवर्तमानाची पार्श्वभूमी पाहिली. आता लूक १६:१-१३ वचनांचा अर्थ लावणे आपल्याला सोपे जाईल. ९:५१ पासून ख्रिस्ताची अखेरची वाटचाल सुरू झाली आहे. “त्यानं यरुशलेमकडे जाण्याच्या दृढनिश्चयानं तिकडं तोंड वळवलं आहे.” आता शिष्यांना यार्देन […]