Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on सितम्बर 10, 2019 in जीवन प्रकाश

चांगले करताना थकू नका                                                        डेविड मॅथिस

चांगले करताना थकू नका डेविड मॅथिस

जे खरेपणाने चांगले करतात त्यांना आपण थकून जात आहोत असा लवकरच मोह येईल. इतरांसाठी जेव्हा तुम्ही – देवाच्या पाचारणानुसार, त्याच्या अटींवर – चांगले करण्यास वाहून घेता तेव्हा थोडक्याच अवधीत तुम्हाला थकण्याचा मोह होईल.

प्रेषित पौलाला तर त्याच्या पाचारणाची इतकी खात्री असतानाही तो म्हणतो “बाहेर भांडणतंटे, आत भीती” होती (२ करिंथ ७:५). आणि त्या काळात आध्यात्मिक व भावनिकरित्या रिकामे  होत असल्याचा विचार  इतका प्रबळ होता की आपल्या पत्रातून त्याने दोनदा लिहिले, “बरे करण्यात आपण थकू नये” “ तुम्ही तर बंधूंनो, बरे करताना खचू नका” (गलती ६:९, २ थेस्स. ३:१३).

थकणे हे संसर्गजन्य असू शकते (अनुवाद २०:८). पण जेव्हा आपण त्याला प्रतिकार करतो तेव्हा ते दुसऱ्या प्रकारेही काम करते: दुसऱ्यांना टिकून राहण्यास मदत करणे. आपण चांगले करताना फक्त टिकून राहण्याची देवाची इच्छा नाही तर त्यांनी थकू नये म्हणून मदत करावी अशीही देवाची इच्छा आहे (१ थेस्स ५:१४).

जेव्हा चांगले करणे कठीण होत जाते -आणि ते होणारच- तेव्हा पौल फक्त ‘थांबू नका’ असे म्हणत नाही तर ‘थकू नका’ असे म्हणतो.

कसे थकायचे नाही

देव आपल्याला पाप व मरण यातून सोडवून नंतर स्वस्थ बसत नाही. त्याच्या लोकांनी त्यांना जो मोलवान वेळ आहे त्यामध्ये स्वत:चे जीवन ओतून “चांगले करावे” अशी त्याची इच्छा आहे. “तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे” (गलती ६:१०). अशा प्रकारचे चांगले हे परिश्रमाशिवाय आपोआप घडत नाही. ते हेतुपूर्वक, योजना करून आणि सरावाने करावे लागते “आपल्या लोकांनी आपल्या अगत्याच्या गरजा पुरवल्या जाव्यात म्हणून चांगली कृत्येही करण्यास शिकावे, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत” (तीत ३:१४).

चांगले करणे हे फक्त आपल्या जीवनातील सोयीस्कर शांत वेळेत करायचे नाही तर संघर्ष व दु:खाच्या मोसमातही करायचे आहे.  “देवाच्या इच्छेप्रमाणे दु:ख भोगणार्‍यांनी सत्कृत्ये करत आपले जीव विश्वासू निर्माणकर्त्याला सोपवून द्यावेत” (१ पेत्र ४:१९). आपल्याशी कोणी वाईट वागले तर चांगले न करण्याची सबब आपण सांगू शकतो का? “कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करत राहा” (१ थेस्स. ५:१५). अंधाराविरुद्ध आपण कसा लढा द्यायचा? “वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक” (रोम १२:२१). खुद्द येशूने म्हटले, “परंतु तुम्हा ऐकणार्‍यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा” (लूक ६:२७).

बायबलमध्ये ही दृष्टी स्पष्ट दाखवली आहे. पण चांगले करताना, आपल्याला आतून व बाहेरून आव्हाने येत असताना कसे थकायचे नाही?

१. नम्रतेने तुमची चाचणी घ्या.

जेव्हा थकण्याचा मोह होतो तेव्हा प्रथम स्वत:ला विचारा, हे जे चांगले मी करत आहे ते देवाच्या अटींवर इतरांसाठी करत आहे की माझ्याच वतीने करत आहे? मी इतरांची सेवा करत आहे की माझी? जेव्हा आपल्याला प्रतिकार होतो- आतून किंवा बाहेरून- तेव्हा तो कसल्या प्रकारचा आहे ह्यासंबंधी पुढील प्रश्न आपण विचारायला हवेत.

  • हा विरोध हा देवाकडून आलेली देणगी आहे का?
  • जे हे लोक माझ्यावर प्रेम करतात असे दिसते ते मला मदत करण्यासाठी माझी दिशा बदलत आहेत का?
  • देवाच्या अटींनुसार चांगले काय हे न समजणारे लोक मला विरोध करत आहेत का?
  • हे चांगले करताना देवाऐवजी मी स्वत:चा गौरव शोधत आहे का?

विरोध हा आपल्या कामाचे नम्रपणाने परीक्षण करायला संधी देतो. थकण्याचा मोह आपल्या अंत:करणाचे परीक्षण करायला मोका देतो. आपण खरंच इतरांच्या गरजा भागवत आहोत की आपल्या स्वार्थी इच्छा पूर्ण करत आहोत?

२. आशेने देवाकडे वळा.

टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या बाहेरचा भक्कम पाया असण्याची गरज आहे. मग जेव्हा आपल्याला थकण्याचा मोह होतो तेव्हा आपल्याला कुठेतरी-कोणाकडे तरी दिशा मिळावी स्पष्ट समजावे म्हणून शक्ती मिळण्यासाठी वळता येते. तुला कळले नाही काय? “तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर, दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्नकर्ता, थकतभागत नाही; त्याची बुद्धी अगम्य आहे” (यशया ४०:२८)

आणि आपल्याला फक्त आपला स्वर्गीय बापच नाही तर त्याचा मानवी देहातला पुत्र आहे जो चांगले करत गेला (प्रेषित १०:३८). येशूला सतत विरोध होत गेला. थकवा म्हणजे काय हे त्याला माहीत होते (योहान ४:६). त्याला विरोधाला तोंड द्यावे लागले – गेथशेमेनेत येथे आंतरिक आणि गुलगुथा येथे बाहेरून. “तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला, त्याच्याविषयी विचार करा” (इब्री १२:३). त्याच्याकडे आपण पाहतो. फक्त सोडून द्यायचे नाही तर थकायचे पण नाही.

न थकण्याचा एक सामर्थ्यवान मार्ग म्हणजे ख्रिस्ताकडे आपली दृष्टी वळवणे आणि आपला देव जो कधी थकत नाही त्याच्यापासून शक्ती घेणे.

३. त्याच्या अभिवचनांवर खात्रीने विसंबून राहा.

देवाने आपल्याला त्याचे वचन अशासाठी दिले आहे की आपण खुद्द देवावर विसंबून रहायला शिकावे. फक्त त्याचे खरे विचार, संकल्पना, घोषवाक्ये यावरच नव्हे तर देवाचे प्रत्यक्ष शब्द.  जेव्हा प्रत्यक्ष देव आपल्याशी बोलतो तेव्हा आपण चांगले करण्यास सिध्द होतो.

पुनरुत्थित प्रभू त्याच्या नेमलेल्या प्रवक्त्याद्वारे काय बोलतो ते ऐका: “माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा” (१ करिंथ १५ :५८). किंवा येशूसोबत त्याची ही वचने म्हणा:  “परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते; पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे.” (मार्क ४:२६-२९).

आपण स्वत:ला नम्र करतो, देवाकडे वळतो, त्याचे वचन उघडतो आणि तो जे म्हणतो त्याच्यावर भरवसा ठेवतो- जे पाहतो त्यावर नाही. त्याच्या सत्याशी आपण आपली ह्रदये जुळवतो आणि जगाच्या दृष्टीनुसार  स्वत:ला चालू देत नाही. आपण आपल्याच बुद्धीवर नाही तर त्याच्या विशिष्ट वचनांवर व अभिवचनांवर अवलंबून राहतो.

४. त्याच्या वेळेची धीराने वाट पहा.

त्याच्या अभिवचनावर भरवसा ठेऊन वाट पाहण्याने आपण काही त्याचा हात आपल्या वेळेसाठी वाकवत नाही. याउलट त्यामुळे आपण त्याच्या वेळेसाठी स्वत:ला बदलतो. याच महान पायावर पौल आपल्याला आदेश देतो: “चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल” (गलती ६:९). किती वेळा आपण देवाच्या वेळेऐवजी आपल्या योग्य वेळेच्या जाणीवेने थकून जातो?

देवाचा वेळ निर्दोष आहे. आपण जर स्वत:ला त्याच्या पराक्रमी हाताखाली नम्र केले तर तो आपल्याला उंच करील हे वाक्य एका महान विधानासोबत येते: “योग्य वेळी” (१ पेत्र ५:६). जर तुम्ही देवाच्या अटींनुसार खरोखर चांगले करत असाल -आणि तुम्ही त्याच्या परिणामांमुळे किंवा विरोधामुळे निराश झाला असाल तर हे अभिवचन ह्रदयाशी कवटाळून ठेवा. विश्वासूपणे पेरणी करत राहा. देव पाहत आहे. ख्रिस्तामध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत.

जेथे चांगले करणे होत राहते

गलती ६:९; २ थेस्स ३:१३ चांगले करताना थकू नये हे दोन्ही आदेश नम्र आणि प्रसिद्धीच्या प्रकाशझोताच्या बाहेरचे आहेत. बहुतेक चांगले करणे हे प्रसिद्धीत आणि हजारो लोकांसमवेत साजरे केले जाते. पण देवाचे राज्य एकांतात, दुर्लक्षित असे पुढे जात राहते आणि अखेरीस ते जगाची उलथापालथ करते. चांगले करणे हे फटाकेबाजीसारखे अचानक चमकून जात नाही. तर ते संथ पिकाच्या वाढीसारखे असते. रिमोटसारखे आपल्याला ते नियंत्रणाची जाणीव देत नाही तर बीज पेरून, पाणी घालून देवाची वाट पाहायला भाग पाडते.

जेव्हा ख्रिस्त आपल्याला एक ठराविक काम पूर्ण करण्यासाठी बोलावतो तेव्हा ते सहजसाध्य होईल असे अभिवचन तो देत नाही. खरंतर त्याच्या उलटच घडत असते. आपल्याला मिळालेल्या पाचारणाचा सच्चेपणा सिद्ध होण्यासाठी कठीण अडथळे येतील. त्यातून मार्ग हा माघार घेऊन नव्हे तर देवाची अभिवचने व विश्वास यांद्वारे टिकून राहण्याने काढला जातो. कदाचित अडथळे वाढत जाताना आपली आशा अधिक भरारी मारेल आणि सांगेल की आपल्याला हवा असलेला मार्ग आता जवळ येत आहे.