सॅमी विल्यम्स
धडा ८ वा
ईयोब ५.
आता अलीफज त्याच्या मसलतीला सुरुवात करतो. आणि आपल्याला कळून येईल की मानवी ज्ञान कितीही शिगेला पोहंचलेले असले तरी ते किती कफल्लक, दरिद्री आहे. आपण अलीफजच्या चार चुका मागील अध्यायात पाहिल्या. १- ईयोबाला समजू घेण्यापूर्वीच त्याच्यावर दोषारोप करतो. २- पापाची संकटाशी सांगड घालतो ३- तो आपले तथाकथित अनुभव सांगतो जे वचनाशी विसंगत आहेत. ४- आणि देव न्याय करायलाच बसलेला आहे असे चित्र उभे करतो.
मग आपण चांगले समुपदेशक कसे होऊ शकतो? आधी त्यांचे संपूर्ण म्हणणे आरोप न करता प्रेमाने ऐकून घ्यायचे, आपले अनुभव न सांगता सुवार्ता सांगून देवाची प्रीती त्यांना सादर करायची.
अलीफज भरपूर ज्ञान व निरीक्षणे घेऊन येतो, पण देवाला वगळून असलेली सत्ये सादर करतो. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आजचे तत्त्ववेत्तेही कबूल करतात की कितीही तत्त्वज्ञान शिकूनही आपण कोणत्याच निष्कर्षाला येत नाही. तारण पावलेले तत्त्ववेत्ते म्हणतात की जगाचे सारे तत्त्वज्ञान शिकूनही आम्हाला काही सत्य माहीत नाही. ते केवळ मार्ग, सत्य व जीवन असलेल्या येशूमध्ये सापडते. सर्व जगाच्या तत्त्वज्ञानात जेवढे आहे त्यापेक्षाही अधिक या देवाच्या वचनात आहे. मानसशास्त्राचेही असेच आहे. त्यांचे उपचार लक्षणावर उपचार करतात पण मुळाशी जाऊ शकत नाहीत. फक्त बायबल व पवित्र आत्मा मुळाशी जाऊन समस्या हाताळतात. कारण आपण आत्मिक व्यक्ती आहोत, रासायनिक नव्हे. आपण बुद्धिमान, ज्ञानी असावे, पण आपले ज्ञान, बुद्धी, मेंदू ही देवाला समर्पित हवीत.
तीन क्षेत्रांमधील मानवी ज्ञानाचे दारिद्र्य
(|) आशेचा अभाव. वचने ईयोब ५:१-७ – तुमच्या ज्ञानात सुवार्ता, ख्रिस्त, नसेल तर तुमचे ज्ञानही उपद्रवी व यातनादायी ठरते. आपल्या संवादात देखील त्यांचा अभाव असला तर परिस्थिती अधिक बिकट बनू शकते. त्यामुळे कोणी देवापर्यंत पोहंचू शकत नाही.
वचन ५:१- अलीफज म्हणतो, तू धावा कर, कोणीच तुझे ऐकणार नाही. हे म्हणताना त्याचा रोख स्वर्गाकडे आहे. देव व देवदूत पण मदत करणार नाहीत. तुम्ही जर अत्यंत पापात असलेल्या व्यक्तीशी आशाहीन शब्दांनी बोलला तर तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे सुवार्तेची भाषा वापरणारे नाही. ईयोब तर भणंग पापी नाही. तो म्हणत आहे की देव असा आहे की त्याच्यापर्यंत तुम्ही पोहंचू शकत नाही. देव तर वधस्तंभावरील चोरालाही उपलब्ध होतो.
वचन ५:२- तो ईयोबला मदत न मिळण्याच्या आपल्या दाव्याचे कारण सांगतो. तो ईयोबला पापी असल्याचे कारण दाखवतो व पाप्याचे वर्णन तो पापी नाश पावणारे आहेत असे करतो, तसेच ते गर्विष्ठ, रागीट, मूर्ख, मत्सरी, घातकी असे करतो. (पंडिता रमाबाई भाषांतरात वाचा.) अशा इतरांचा घात करणाऱ्याला देव का मदत करील, काहीतरी चांगले करणाऱ्याला देव मदत करील असे त्याला म्हणायचे आहे. हे त्याचे बोलणे बरोबर आहे? येशूने तर वधस्तंभावर असताना, चोर व त्याचा छळ करणाऱ्यांसाठी क्षमेची प्रार्थना केली, रोमी शताधिपतीचे तारण केले. देव पाप्यांचा द्वेष करतो अशी शिकवण देणारी माणसे पाप्यांवर प्रीती करून सुवार्ता सांगण्याऐवजी त्यांचे द्वेष्टे बनतात.
वचने ५:३-५- अलीफज स्वत:ला वचन ३ मध्ये देवाचा शाप व त्याच्या न्यायाची अंमलबजावणी करणारा दलाल समजतो. तो म्हणतो दोन प्रकारे पापाचा न्याय होतो. ईयोबाबाबत घडलेल्या घटनांवरून तो हा मुद्दा मांडताना दिसतो. (१) वचन ५:४— ईयोबाच्या पापामुळे त्याची मुले मरण पावली. (२) वचन ५:५- त्याच्या पापामुळे त्याची संपत्ती व पीकपाणी नष्ट झाले. देव अशी पाप्यांना शिक्षा करतो का? उलट त्याची सर्वसामान्य कृपा सतत कार्यरत असते.
वचन ५:६-७ मध्ये तर तो सूचित करतो की पाप्याचा स्वभाव तसाच राहतो. हे खरे आहे का? देव व्यक्ती बदलतो. हा आपला अनुभव आहे. आपण स्वत:ला बदलू शकत नाही, म्हणून तर देवाने येशूला पाठवले. पुढे तो म्हणतो, आपल्या पापासाठी सभोवतालच्या जगाला आपण दोष देऊ नये, कारण पापाची उत्पत्ती मातीतून नाही. आपला पापी स्वभाव वर उडणाऱ्या ठिणग्यांसारखा आहे. म्हणून देव तुझी प्रार्थना ऐकणार नाही. हिब्रू भाषेत मनुष्याच्या स्वभावाला आदाम म्हटलेय तर मातीला आदामा म्हटले आहे. म्हणून तो येथे म्हणत आहे, आदाम स्वभावाला दोष दे, मातीला दोष देऊ नको. तो अर्धसत्ये बरीच मांडतो. पापात जन्म झाला म्हणून तुला पापक्षमा नाही असे त्याला म्हणायचेय.
अलीफजचे म्हणणे व सुवार्तेत कोणता फरक आहे?
१- ईयोबाला सुवार्तेनुसार आपल्या पापासाठी मध्यस्थी करणाऱ्या कैवाऱ्याची आशा होती. १६:१९ वाचा. अलीफज या आशेचा उल्लेखही करत नाही.
२- आपण आपल्या वाडवडिलांच्या नव्हे तर आपल्याच पापांनी शिक्षा भोगतो. निर्गम २०:५; अनुवाद २४:१६ या वचनाशी अलीफज विसंगत आहे. तो ईयोबामुळे त्याची मुले का मारील?
३- देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आपला स्वभाव बदलून देव आपल्याला पवित्र जन करतो. अलीफज म्हणतो तसा देव पाप्याचा त्याच्या पापात शेवट करत नाही. तीत ३:५.
(||) नम्रतेचा अभाव. वचने ५:८-१६- वचन ८ वाचा. आता अलीफज स्वत:च्याच बोलण्याशी विसंगत बोलतो. नुकतेच त्याने म्हटले, धावा केलास तरी देव तुझे ऐकणार नाही. आता म्हणतो, धावा कर म्हणजे तो ऐकेल. तो काय चुकीचे बोलतो? तेही तो स्वधार्मिकता दर्शवित गर्विष्ठपणे बोलत आहे. ईयोबाने प्रार्थना केली तो प्रार्थनाशील व्यक्ती आहे. त्याला उत्तरे मिळाली नाहीत हे खरे. पण त्याने प्रार्थना केली नाही असे गृहीत धरून अलीफज बोलत आहे.
वचने ५:९-१०मध्ये (अ) तो इयोबाला पश्चातप्त होऊन केलेल्या प्रार्थनेने अगणित चमत्कृती घडण्याची आमिषे व अभिवचने दाखवत बोलत आहे. प्रार्थना कर, देव अद्भुत कृत्ये करील.
वचन ५:११ मध्ये तो दृश्य आशीर्वादांविषयी बोलत आहे, (ब) सांगत आहे की प्रार्थना कर म्हणजे देव तुझी सर्व संकटे दूर करील. संकटामुळे नीचावस्थेस गेलेल्याला देव उंच करील. राखेने काळे झालेले असा शोकमग्न शब्दाचा हिब्रू भाषेत अर्थ आहे. त्यांना तो सुस्थळी नेईल असे तो म्हणतो. देव सर्व परिस्थितीला न्याय देतो.
वचन ५:१२ मध्ये तो ईयोबाला काय इशारा देतो? तो उत्पत्ती ३;१ मध्ये सैतानाला वापरलेला शब्द वापरतो व ईयोबाला धूर्त म्हणतो. तो इशारा करतो की प्रार्थना न करणारे सैतानासारखे धूर्त आहेत. त्यांच्या हातून योजनेनुसार फलदायी कृत्ये होत नाहीत. प्रार्थना केली तर चमत्कार. नाही केली की तू सैतानी असे म्हणून तो त्याला निराश करतो.
वचने ५:१३-१६ अधर्म करणाऱ्यांना ते पाप दोन प्रकारे पाश असे होईल असे होते. हे दर्शवताना तो दोन शब्दप्रयोग वापरतो. प्रार्थनहीन म्हणून तो ईयोबाला जगिक ज्ञानी लेखतो. खरे तर अलीफज स्वत:च जगिक ज्ञानी आहे. आपल्या डोळ्यातले मुसळ न पहाता तो ईयोबाचे कुसळ पहातोय.
अ- जगिक ज्ञान– पौल १करिंथ ३:१९ येथे या वचनाचा वापर करतो. का बरे? कारण पौल दाखवत आहे की जुन्या करारात स्वत:ला फार ज्ञानी समजणारा एक मनुष्य होता, पण तो अत्यंत मूर्ख होता. वचन १४ नुसार भर दिवसा ते अंधासारखे वावरत असतात. प्रार्थना न करणाऱ्याची अशी अवस्था होते असे तो सूचित करतोय.
वचने ५:१५-१६
ब- जगिक अन्याय– वचन १५- अलीफज म्हणतो की देव दारिद्र्यांचे संरक्षण करण्यासाठी अत्याचाऱ्यांचा नाश करतो.त्याला सूचित करायचे की ईयोब अत्याचारी आहे.
वचन १६- कंगालाला आशा प्राप्त होते व त्याच्यावरील अन्याय मिटतो. पण अधर्म आपले तोंड बंद करतो. तो ईयोबाला सूचित करत आहे की तू गरिबांवर अन्याय करत आहेस. या वचनाप्रमाणे तुझ्या प्रार्थनामय जीवनाअभावी अशा वागण्याने तू असा गरिबांवर अन्याय करत आहेस. अलीफजची ही सल्लामसलत कशी चुकीची वाटते?
अ- पश्चाताप हा जगिक आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी दिलेले अभिवचन नव्हे. पण तो स्वर्गीय देवाशी घनिष्ठ संबंध प्राप्त करण्यासाठी करायचा. मत्तय ४:१७.
ब- अलीफज गर्विष्ठ असून त्यालाच पश्चातापपूर्वक नम्र होण्याची गरज आहे.
(||| वचने ५:१७-२७ जगिक आशीर्वादांवर टाकलेला प्रकाशझोत
अ- वचन १७-१८- शासन किंवा शिक्षा झाल्यास त्याचा शेवट शारीरिक आरोग्य मिळाल्याने होतो. ईयोबाची त्वचा पाहून अलीफज हे बोलतो. त्याच्या बोलण्याचा इब्री १२:५-८ मध्ये योग्य वापर केलेला दिसतो. पण अलीफज एक सत्य घेतो आणि त्यात पाखंडाची सरमिसळ करून अयोग्य लागुकरण करतो. देव शिस्त लावायला शिक्षा करतो पण जगिक आशीर्वाद द्यायला नव्हे. तसेच जेव्हा देव शिक्षा करतो, तेव्हा तुमचे घाय बरे करायला पट्टी बांधतो व तुमची भग्नता बरी करतो. आपण पश्चात्ताप करायचा पण जगिक आशीर्वाद मिळावा म्हणून नव्हे.
वचन ५:१९- सहा काय सात संकटे ही म्हण पूर्णतेचे दर्शक आहे.
ब- वचने २०-२६– त्याला सांगायचे आहे की कठीण समयी देव संरक्षण करील व आशीर्वाद देईल. तो धन्यवादच सांगतो. तो दुष्काळ व युद्ध या दोन संकटातून आणि पुढील वचनात खोटे दोषारोप जिभेने होणारे प्रहार व विनाश यापासून देव तुझा बचाव करील असे अभिवचन देतो. ईयोबावर प्रत्यक्ष आलेल्या संकटांनी गमावलेल्या गोष्टी समोर ठेऊन तो हे आशीर्वाद देतो.
वचने २२-२६ मध्ये तो पश्चाताप केल्यामुळे मिळणाऱ्या जगिक आशीर्वादांची यादीच देतो. १- निसर्ग तुला उपद्रव करणार नाही. विनाश, दुष्काळ, पशू, इ. २- शेती, पिकपाणी, पशुपालन यात तू यशस्वी होशील. ३- डेरा/घर सुरक्षित असेल, चोरी होणार नाही. दारवानाची गरज नसेल, घराला शालोम, शांती असेल. ४- संतान, घरसंसार विपुल वाढेल. ५- तू पवित्र असलास म्हणजे पुऱ्या वयाचा झाल्यावर तुला मरण येईल. हे असे वचन सांगते का? सारेच प्राप्त होणार? याला अलीफजचा पुरावा काय? समजा अल्पवयीन कोणी निवर्तले तर तुम्ही काय म्हणाल? वचन काय दर्शवते? खूप काम अल्पवयात करून लवकर मरण पावलेले अनेक अविवाहित मिशनरी होऊन गेले. येशू अल्पवयात मरण पावला.
वचन २७ मध्ये अलीफजचा पुरावा एवढाच की त्याने शोध घेतला असता त्याला हा अनुभव आला. म्हणून ईयोबाने पश्चातप्त होऊन अलीफजच्या अधीन होऊन स्वत:ला त्याची मसलत लागू करावी असे त्याचे म्हणणे आहे. खरे तर या पुस्तकाच्या अखेरीस हेच घडते. पण अलीफज सांगतो त्या मसलतीमुळे नव्हे तर केवळ देवाच्या कृपेने घडते. अलीफज देवावर विश्वास ठेवतो, पण सुवार्तेवर नव्हे. त्याचे ज्ञान दरिद्री आहे. तो देवाकडे जाता येत नाही असे निराशेचे सल्ले देतो.
Social