नवम्बर 24, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाचे गौरव येशू जॉन मॅकआर्थर यांच्या एका संदेशाचा सारांश

“परमेश्वराचे गौरव प्रकट होईल” (यशया ४०:५), हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. येशूचा जन्म हा यशयाच्या अभिवचनानुसार देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण आहे. ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचा आशय देवाचे गौरव आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव हे गाणे देवदूतांनी गायले, प्रभूचे तेज मेंढपाळांभोवती प्रकाशले व ते भयभीत झाले. देवाच्या गौरवाचे वलय ह्या देखाव्याला व्यापून होते आणि हीच ख्रिस्तजन्माची कहाणी आहे.

आता यशयाच्या ४० व्या अध्यायात पाहण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी पाहू या. पहिले ३९ अध्याय हे देवाच्या लोकांवर व इतर राष्ट्रांवर काळाकुट्ट नाश, सूड, न्यायदंड व अमाप न्याय यासबंधी आहेत. पण देवाच्या दयेने हे इथेच संपत नाही. अध्याय ४०मध्ये देव त्याच्या लोकांना सांगत आहे की एक नवा दिवस येत आहे. त्यानंतरचा संदेश हा सांत्वन देणारा आहे की, तारण येत आहे, अधर्मांची क्षमा होईल, शिक्षा दूर  होईल. हा आशेचा संदेश आहे. नवा दिवस उगवेल. प्रभाततारा अंधारी रात्र दूर करील. तारण येत आहे.
हा विषय घेऊन यशया ह्या नव्या दिवसाच्या प्रभातेविषयी तिसऱ्या वचनापासून बोलत आहे, “अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा.” आणि जेव्हा तुम्ही नव्या करारात येता तेव्हा मत्तय ३:३ मध्ये आपल्याला दिसते की हे भविष्य बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पूर्ण केले आहे. तो चालण्याचा रस्ता तयार करत नव्हता तर मनुष्याच्या अंत:करणापर्यंत जाणारा, प्रवेश करणारा रस्ता तयार करत होता. मनुष्यांच्या जीवनात व अंत:करणात अयोग्य असलेल्या गोष्टी काढून तारणाऱ्यासाठी त्यांची अंत:करणे तयार करत होता. पश्चात्ताप व पापांची कबुली याद्वारे व शुध्द अंत:करण दाखवणारा बाप्तिस्मा देऊन तारणाऱ्याच्या आगमनाची घोषणा तो करत होता.

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे भविष्य केल्यावर यशया ४०:५ मध्ये तो असे सांगत आहे की, “देवाचे गौरव प्रकट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहील, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे.” देव जर बोलत आहे तर तो ते करणारच असे पुढचे वचन सांगते. तारणाचा दिवस येत आहे. बाप्तिस्मा करणारा योहान त्याची ओळख करून देईल. तो मानवांची अंत:करणे तयार करील आणि मग प्रभूचे गौरव प्रकट होईल आणि हे गौरव सर्व मानवजात पाहील.
गौरव प्रकट होईल याच अर्थ काय? गौरव ही देव या व्यक्तीची अभिव्यक्ती आहे. देवाच्या चारित्र्याचे सादरीकरण आहे. देवाच्या गुणांचे या जगात, विश्वात, जे काही प्रकटीकरण होते ते त्याचे गौरव आहे. दुसऱ्या शब्दांत देवाचे गौरव हे सूर्याला प्रकाश असणे, आगीला उष्णता असणे याप्रमाणे आहे. ते त्याचे तेज आहे, प्रकाश आहे. ते त्याच्या अस्तित्वाचे फळ आहे. ते खुद्द देवाचे प्रकटीकरण आहे.

आता आपल्याला ठाऊक आहे की विश्वामध्ये जे काही अस्तित्वात आहे ते देवाचे गौरव प्रकट करते कारण सर्व गोष्टी त्याने निर्माण केल्या. अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या स्वभावाचा परिणाम आहे आणि म्हणून ते त्याचे गौरव प्रदर्शित करते. आकाश, प्राणी, राने, वने, फुलपाखरे, झाडे , निर्मिलेली प्रत्येक वस्तुमात्र, त्याचा गौरव – त्याचे व्यक्तित्व दाखवते.
हे सर्व पाहून झाल्यावर सुद्धा मोशेला आणखी काही तरी हवे होते. निर्गम ३३ मध्ये तो देवाला म्हणतो “मला तुझे गौरव दाखव” देव त्याला म्हणाला “माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.” देवाने त्याला खडकाच्या भेगेत ठेवले व त्याचे काही तेज दाखवले. आणि अशा काही वेळा देवाने निर्मितीत दिसणारे जे सामान्य गौरव आहे त्या पलीकडचे त्याच्या गौरवाचे खास प्रकटीकरण काही जणांना दाखवले.

तो आदाम व हवेबरोबर चालत असे. लेवीय ९:६ मध्ये तो लोकांना दिसला. लेवीय १६ मध्ये मान्ना दिला त्यावेळी लोकांनी त्याचे गौरव पाहिले. रानात अनेक वेळा देवाचे गौरव मोशेने व लोकांनी पाहिले. कोरह, दाथान व अबीराम यांनी बंड केल्यावर देवाने त्यांचा नाश केला त्या वेळी लोकांनी देवाचे गौरव पाहिले. १ राजे ८:११ मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर देवाच्या गौरवाने ते भरून गेले.

तर देवाने फक्त निर्मितीद्वारेच आपले गौरव प्रकट केले नाही तर खास प्रकारे आपले शकायना गौरव प्रकट केले. आणि ज्या ज्या वेळी ते प्रकट झाले तेव्हा त्यामध्ये काहीतरी विस्मित करणारे गूढ होते. उदा. ढग, अग्निस्तंभ, तळपता प्रकाश. ते कसे असेल हे समजून घेणे आपल्याला फार कठीण आहे.
यावेळी यासंबधीचे वर्णन करणारा यहेज्केल अध्याय १ वाचकांनी कृपया वाचावा. हे वर्णन करताना जे अशक्य ते सांगण्याचा प्रयत्न तो करीत आहे. ते देवाच्या गौरवासारखे काही आहे पण ते गूढ आहे असे सांगण्याचा तो प्रयत्न करीत आहे. हेच त्याला ८,९,१० अध्यायातही दिसले व तरीही ते अगम्य गूढच राहिले.

परंतु हबक्कूक २:१४ मध्ये म्हणतो, “जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या गौरवाच्या ज्ञानाने भरेल.” पण तो दिवस येईपर्यंत आपण आपल्याला जे मर्यादित दिसत आहे तेच समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.  सुदैवाने यशया म्हणतो “प्रभूचे गौरव प्रकट होईल.” याहून मोठे गौरव प्रकट केले जाईल. आता नवा करार याच्या पूर्ततेविषयी काय सांगतो हे पाहू या. इब्री १ ही ख्रिस्तजन्माची खरी कहाणी आहे. वचन १ म्हणते, “देव प्राचीन काळी अंशाअंशांनी व प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला.”  देवाने स्वत:ला प्रकट केले. निरनिराळ्या वेळा, निरनिराळ्या प्रकारे, आपल्या पूर्वजांना, संदेष्ट्यांच्याद्वारे.
आतापर्यंत आपण जे शिकलो त्याचा अर्थ असा की देव गप्प बसलेला नव्हता. तो अदृश्य नव्हता. प्रथम त्याने आपल्या गौरवाचे तेज निर्मितीद्वारे प्रकट केले. आणि नंतर काही खास प्रकारे जुन्या करारातील काही लोकांच्या जीवनामध्ये शकायना गौरव प्रकट केले.

सर्वात अद्भुत, निश्चित प्रकारे व दयेने त्याने यापलीकडे देवाच्या वचनाद्वारे संदेष्ट्यांना सर्वात मोठे स्वत:चे प्रकटीकरण केले. आमोस ३:७ म्हणते प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.”
हे लक्षात घ्या की निर्मिती व शकायना ही मर्यादित आहेत. लिखित वचन हे निर्मितीचा व शकायनाचा मजकूर सांगते. इयोब २६:१४ (पं.र.भा) नुसार ही फक्त देवाची बारीकशी गुणगुण आपल्या कानी येते. पण आता इब्री १:१ म्हणते, देव बोलला. चाहूल किंवा गुणगुण नव्हे तर मोठ्याने बोलला.
जर तुमच्याकडे फक्त निर्मिती असती तर ती गुणगुण आहे. जर शकायना असती तर तीही गुणगुण आहे. जर जुना करार असता तर देवाचे बोलणे तुम्ही ऐकले असते. पण तरीही ते सुद्धा रहस्यच असले असते. म्हणून पेत्र पहिल्या पत्रात म्हणतो, “जुन्या कराराच्या संदेष्ट्यांनी त्यांनी जे लिहिले त्या व्यक्तीचा व काळाचा बारकाईने शोध केला पण ते त्यांना प्रकट केले गेले नाही तर आपल्याला प्रकट गेले.”

इब्री ११; ३९, ४० म्हणते, आपल्याशिवाय ते परिपूर्ण होऊ शकले नाहीत. अधिक चांगले (नवा करार) येईर्यंत पूर्णता आली नाही. निर्मिती, शकायना यांची मदत झाली. देवाच्या वचनाची मदत झाली पण ती अपूर्ण होती, जोपर्यंत इब्री १:२ नुसार देव या काळाच्या शेवटी पुन्हा बोलला. आणि या वेळी तो कसे बोलला? आपल्या पुत्राच्या द्वारे. हे देवाचे पुकारणे आहे. निर्मिती, शकायना ही गुणगुण आहे. आता तो पुकारून बोलत आहे. पुत्र हा देव आहे आणि देवाने स्वत:ला त्याच्यामधून प्रकट केले. त्याचा न्याय, त्याची प्रीती, त्याचे ज्ञान, सामर्थ्य, सर्वज्ञता, हे सर्व येशूमध्ये आहे . जसे आपण त्याला जगात चालताना पाहतो, त्याचे कार्य करताना बघतो, त्याचे जीवन जगताना न्याहाळतो तसे देवाची पूर्णता कधी नव्हे इतकी फक्त येशूतच पाहायला मिळते.
इब्री १:२ पहा. “शेवटच्या काळी” हा शेवटचा काळ कोणता? हा मशीहाचा काळ आहे. येशू आला तेव्हा तो सुरू झाला. हा मोठा काळ आहे जो २०००वर्षांपूर्वी सुरू झाला. हे प्रकटीकरण, शास्त्रलेख, करार यांचे शेवटचे दिवस होते. शास्त्रलेख येथेच पूर्ण झाला. देव शेवटी याच काळात बोलला आणि आता त्याच्या राज्यातच त्याचा आवाज पुन्हा ऐकू येईल. म्हणून देवाची बारीकशी गुणगुण व ऐकू येणाऱ्या आवाजानंतर त्याच्या पुत्राद्वारे त्याने मोठ्याने घोषणा केली, पुकारले. आणि नवा करार हे प्रकटीकरण आपल्याला देतो. खरे भाषांतर आहे त्याच्या पुत्रत्वाद्वारे तो बोलतो. तिसरे वचन म्हणते “तो त्याच्या गौरवाचे तेज असून” येशू कोण आहे? देवाच्या गौरवाचे तेज. म्हणूनच योहान १:१४ म्हणते, “शब्द देह झाला. त्याने आम्हांमध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे…होते. ख्रिस्तामध्ये देवाच्या वैभवी प्रकाशाचे तेज मानवांच्या ह्रदयाला स्पर्श करत होते. तो कोण आहे हे त्याला त्यांना दाखवायचे होते. ख्रिस्त हा देव आहे तरी तो देवाचे प्रकटीकरण आहे. तो देवाचे गौरव आहे जे देवाचे वास्तव मोठ्याने पुकारत आहे. मत्तय १७ मध्ये येशूचे रूपांतर झाले तेव्हा हे चित्र स्पष्ट दिसते. येशूचे रूप त्यांच्यादेखत पालटले. त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. आणि मेघातून वाणी झाली “हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याविषयी मी संतुष्ट आहे; याचे तुम्ही ऐका.” आणि तेथे मोशे आणि एलिया उभे होते. जेव्हा शिष्यांनी हे गौरव पाहिले, देवाची वाणी ऐकली आणि मोशे व एलिया तेथे पहिले तेव्हा त्यांच्या मनात संशय उरला नाही की येशू हा खुद्द देव आहे.

प्रत्येक वेळी येशूने चमत्कार केला, अपंगांना बरे केले, अंधळ्याला दृष्टी दिली, बहिऱ्याचे कान उघडले, मुक्याला वाचा दिली, ज्या प्रत्येक वेळी त्याने पापांची क्षमा केली तेव्हा देव स्वत:चे गौरव दाखवत होता. तो देवाची प्रतिमा आहे, देवाचा स्वभाव उलगडून दाखवत आहे. कलसै २:९ मध्ये पौल म्हणतो “ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची पूर्णता मूर्तिमान वसते.”

१ – याला पुष्टी देण्यासाठी इब्री १;२ म्हणते “त्याला त्याने सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आहे.” पुत्रत्वाला वतन मिळायलाच हवे. स्तोत्र २ म्हणते, “मी आपला राजा सियोनात अधिष्टीत केला आहे” प्रकटी. ५ मध्ये आपण पाहतो की गुंडाळी उघडायला तोच एक लायक आहे कारण तो यहूदाचा सिंह आहे, त्यालाच देव सर्व वतन देणार आहे.

२ – इब्री १:२ मध्ये त्याचा पुढाकार दिसतो. “त्याच्याकडून त्याने जगते निर्माण केली.” म्हणजे त्याने हे भौतिक जग, व विश्वात असणारे सर्व निर्माण केलेच पण या जगात अस्तित्वात असलेल्या संकल्पनासुद्धा निर्माण केल्या. त्याने काळ, अवकाश, शक्ती, उर्जा आणि पदार्थ निर्माण केले. भौतिक जगातील सर्व पदार्थ त्यानेच निर्माण केले.

३ – त्याचा प्रभाव वचन ३ मध्ये दिसतो. “तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधर आहे. हा त्याचा आधार सतत चालूच आहे. नाहीतर या विश्वाची शकले उडाली असती. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग बदलला तर ती गोठून जाईल किंवा जळून जाईल. सूर्याचे तापमान व अंतर बदलले तर आपण जळून जाऊ किवा गोठून जावू. अशा अनेक बाबी आहेत ज्या ह्या पृथ्वीला टिकवून धरत आहेत.
व.३ मध्ये त्याचा हस्तक्षेप दिसतो “स्वत:कडूनच पापाचे शुद्धीकरण केल्यावर” हे सामर्थ्य आहे – स्वत:कडून. हे निर्मितीहून महान कार्य आहे. त्याने शुद्धीकरण केले. आपल्या पापांची क्षमा केली.

४- त्याची स्थापना. व. ३ “परमउंच लोकात महामहिम्याच्या उजवीकडे बसला.” देवाच्या उजव्या हाताशी म्हणजे हे मानाचे, आशीर्वादाचे, सामर्थ्याचे स्थान आहे. तो का बसला? कारण त्याचे कार्य पूर्ण झाले.
मंडपात किवा मंदिरात आसन नव्हते कारण याजकांचे काम कधीच संपले नाही. येशूने एक अर्पण केले आणि जेव्हा ते पूर्ण झाले तेव्हा तो बसला. आता काहीही अधिक करण्याची गरज नाही.
हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. देव या जगात आला आहे. हा पुत्र देवाच्या प्रकाशाचे तेज आहे. देवाचा पुत्र सर्व गौरवासह या जगात आला. हे देवाने पुकारा करून सांगितले यासाठी की सर्व विश्वाने मोठ्याने पुकारून त्याची स्तुती गावी.
विश्वासी या नात्याने आपण त्याचे गौरव न्याहाळत आहोत व त्याच्या प्रतिमेमध्ये आपले रूपांतर होत आहे.

Previous Article

खिस्तजयंतीच्या वेळी तुम्हाला ख्रिस्ताचाच कंटाळा येत नाही ना? लेखक : स्टीफन विटमर

Next Article

काबीज केलेले, समर्पित, संसर्गजन्य लेखक : मार्शल सीगल

You might be interested in …

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर   प्रकरण १ले देवाच्या वचनाशी […]

नंदनवनात कुरकुर

असमाधानावर विजय कसा मिळवावा                                                                                                                                                                  लेखक : स्कॉट हबर्ड १४ जून २००० हा दिवस माझ्या स्मरणातून कधीही पुसणार नाही. कारण त्यापूर्वीची दोन वर्षे मी असमाधान, शंका आणि रोगट आत्मनिरीक्षण यांच्या आध्यात्मिक शुष्क भूमीत भरकटत होतो. […]