नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना नील अॅन्डरसन व हयात मूर

नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण ४                                      

‘बेटे’ : मूळारंभ / उगम

 

फोलोपा लोकांना भूमिपुत्र म्हटल्यास वावगे होणार नाही. ते सतत भूमिलगतच्या मातीच्या संपर्कात असतात. तेथील सरपटणारे जीव त्यांचे खाद्य असते. जंगलातून ते गोळा करायचे, आगीत टाकायचे की खायचे. मधली काही प्रक्रियाच नसते. भूमी त्यांचे अन्न पाठवते आणि त्यांचे पोट भरते. त्यांचे दुर्भिक्ष्य झाले की हे लोक पण रोडावतात.

दुसरी गोष्ट, फोलोपा लोक एखाद्या गोष्टीच्या मुळाशी शिरणार नाहीत असे होतच नाही. रोजच्या संभाषणातूनही अचानक मूलभूत गोष्टी बाहेर पडतात. कधी नामात, काळात किंवा क्रियापदात त्या दडलेल्या असतात. कधी एवढ्या ताकदीने त्या समोर येतात की दिवसभर तोच विषय संवादाला पुरेसा असतो. तर कधीकधी एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जायला संपूर्ण गावाला आपली ताकद व कल्पनाशक्ती पणाला लावावी लागते. आणि ते साध्य होईपर्यंत तोच त्यांच्या संवादाचा विषय असतो.

फोलोपा मध्ये यासाठी शब्द आहे ‘बेटे’

‘बेटे’ हा शब्द विविध संदर्भात त्यांच्या सतत वापरात असतो. त्याच्या भरपूर छटा, अर्थ व भाव आहेत. तो कधी संपत नाही. थकत नाही. जुना होत नाही. मूळ कल्पना, मूलभूत बाब, मुख्य आरंभ, खोल रहस्य, रचना, बांधणी, प्रथम कारण, प्राण, मर्म , मूळारंभ, सार, उगम ही अनेक रूपे ‘बेटे’ हा एकच शब्द व्यक्त करतो. तो ‘असणे’ हे प्राथमिक क्रियापद असून संपूर्ण भाषेतील मूलभूत रूपक आहे. जणू या शब्दाच्या तैनातीस एक मोठे सैन्यच आहे.

फोलोपांच्या प्रदेशात शेकडो, हजारो वृक्ष आहेत. तेथे वर्षांला ४०० इंच पाऊस पडतो.त्यामुळे ही झाडे प्रचंड वाढून घनदाट होतात. त्यांचा भाल्यांच्या टोकांसाठी, त्यांच्या सालींचा कपड्यांसाठी, खोडांचा वासे व खांबांसाठी, लाकडांचा सरपणासाठी वापर करतात. हे वृक्ष नको तेवढी सावली देतात. मोकळी जागा व सूर्यप्रकाश या फोलोपामधील दुर्मिळ गोष्टी आहेत. राहण्यासाठी व बागायतीसाठी त्यांना अजस्त्र अवजारे वापरून झाडतोड करून मोकळी जागा तयार करावी लागते. ती झाडे तोडली तरी त्यांची मुळे जिवंतच असल्याने ती फुटतच राहतात. त्यामुळे ती उपटणे, छाटणे या प्रक्रिया सतत चालू असतात. जमिनीखालची शक्ती त्यांना उर्जा देते. दृश्य झाड जमिनीच्या पृष्ठभागावर असते; ती त्या झाडाची ओळख असते. पण मूलभूत, अदृश्य जीवन जमिनीखाली असते हे सत्य फोलोपा जाणतात. मूळ हाताळल्याशिवाय समस्या सुटत नाही हे तत्त्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे अदृश्य गोष्टी लक्षात घेणे त्यांना सोपे जाते. त्यांना झाडाच्या बाह्यभागातून कमी प्रमाणात खाद्य मिळते. पण त्यांची प्रमुख चार खाद्ये तारो, रताळी, याम, साबुदाणा, अदृश्य भागातून मिळतात. साबुदाणा झाडाच्या खोडातील गाभ्यातून तर इतर तीन जमिनीखालून मुळांच्या स्वरूपात मिळतात.

फोलोपाचा भूप्रदेश खडकाळ, ओबडधोबड, डोंगराळ, गुहा, कडे – कपाऱ्यांचा आहे. नद्या-नाले भूभागावरून तर दिशा बदलून भूमिगत देखील वाहतात व पुन्हा कुठून तरी बाहेर पडून पुन्हा भूभागावरून वाहू लागतात. जेथे ते भूपृष्ठावर येतात त्याला ‘बेटे’ म्हणजे उगम म्हणतात.

समोरच्या दातांना ‘सरेके ‘ तर मागच्या तोंडात लपलेल्या चर्वण करणाऱ्या दातांना ‘बेटे सरेके’ म्हणतात. ‘ बेटे’ चा अर्थ मूळ काढून टाकणे पण होतो. आम्हाला एकदा लाल मोठ्या शेकडो गांघिलमाश्यांची समस्या उद्भवली. त्या झाडांच्या ढोलीत घरटी करतात. लहान मुलांना चेहऱ्याला ती चावली तर ओळखू येणार नाही असा मुलांचा चेहरा सुजतो. थोरामोठ्यांना चावल्यास त्यांना तीन आठवडे तीव्र वेदना असतात. कीटकनाशके वापरूनही त्या हटत नाहीत. त्यांचे वास्तव्य ढोलीपासून थेट मुळांपर्यंत असते. त्यांचा नायनाट करणे म्हणजे साऱ्या गावाने त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारण्यासारखे असते. मग काय, गावकऱ्यांनी मशाली, दिवट्या , पांघरुणे लेवून, घण हातोडे इ. हत्यारे घेऊन फांद्या छाटल्या, खोडाला फट पाडून मुळापर्यंतची घरटी नष्ट केली. पुन्हा त्या फटीत घरटी करू नयेत म्हणून मुळासकट झाड उपटून ते घरंगळत नेऊन खोल दरीत लोटून दिले. ‘बेटे’ म्हणजे मुळापर्यंत जाऊन समस्या सोडवली.

त्यांची न्यायदानाची पण खास पद्धत आहे. कोणी चूक केल्यास प्रत्येक गावातील एका प्रमुख प्रतिष्ठित व्यक्तींनी बनलेल्या समितीला त्यांचा निकाल लावायला बोलावतात. त्यातील प्रत्येक आरोपी व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेतात. त्या प्रत्येकाला आपला मूळ उद्देश स्पष्ट करायचा त्यांचा आग्रह असतो. कारण त्यांच्या कृतीचे मूळ कारण ‘बेटे’ त्यांना शोधायचे असते. अगदी अनौपचारिकरीत्या खटला चालतो. कटुता असेल तर सर्वांसमक्ष त्यांवर उहापोह होतो.

फोलोपा अत्यंत अस्थिर, चंचल असतात. क्षुल्लक कारणांमुळे भांडण लागते. तक्रार करणारा त्या व्यक्तीच्या घरासमोरील अंगणात जाऊन आरडाओरडा करून तणतण करू लागतो. त्याच्या आवाजाने गावकरी जमतात. मग ती व्यक्तीही घराबाहेर येऊन आवाज चढवून भांडू लागते. धमक्यांची देवाण घेवाण होते. काठ्या लाठ्या घेऊन सर्व आपापल्या जागा घेतात. प्रत्येकालाच आपापली भूमिका माहीत असते. ते आपापल्या माणसाला आवरतात. जरी त्यांच्यात मारामारी जुंपली तरी खुनापर्यंत मजल जात नाही. एखादा दात पडेल नाहीतर चावे घेतले जातील, इतकेच. पण प्रचंड गोंधळ असतो.

मी बाजूला उभा राहून पाहत असतो. मग कोणीतरी येऊन मला म्हणतो, “तुम्हाला माहीत आहे का काय झाले”? मी उशीरा आल्याने मला अंदाज करावा लागतो. मग मी म्हणतो, “कोपो म्हणत आहे की अपुसीच्या डुकराने त्याच्या बागेतील भाज्यांची नासाडी केली. तर अपुसी म्हणत आहे की तसे झाले नाही. कोपोने माझी केळीची झाडे तोडली. आता अपुसी धमकी देतो की तो कोपोची सारी बाग उखडणार. तर कोपो म्हणतो की मी अपुसीचे डुक्कर जिवंत ठेवणार नाही.” मग माझ्याशी बोलणारा म्हणतो,  “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे; पण मूळ कारण काय आहे माहीत आहे का?” आणि मग तो जे मूळ कारण सांगेल ते या सर्व घटनांशी अजिबात संबंध नसेल इतके विसंगत असेल.

गोष्टी एवढ्या थराला जाण्यापूर्वी बरेच काही घडून केलेले असते. या घटनेत कोपोची बहीण अपुसीला द्यायची ठरलेले असताना ऐनवेळी ती दुसऱ्या कोणाला तरी दिली हे भांडणाचे मूळ कारण होते. त्या कृतीने सर्व वातावरण बिघडले होते. हुंडा निश्चित न केल्याने आप्त दुखावले गेले होते. मोठा भाऊ या सर्व गोंधळाला जबाबदार होता. तेवढ्यात या डुकराने बागेत घुसून पिकाची नासाडी केली होती आणि भांडण सुरू झाले होते. मूळ कारण ‘बेटे’ दुसरेच होते.

फोलोपा मला भाषा शिकवत असतात. मूळ कारण समजले नाही तर निरर्थक शब्दफेक होते. ठराविक लोकांसाठी पण ‘बेटे’ शब्द वापरतात. उदा॰ एखाद्या व्यक्तीकडे भरपूर पैसे, शिंपले, खाद्यपदार्थ, डुकरे असली व मुळीच उणे पडू न देता तो मेजवानी देऊ शकत असेल तर त्याला ‘ बेटे’ म्हणतात. सुज्ञतेने वागण्यासंदर्भात पण ‘बेटे’ शब्द वापरतात. संशोधनासाठीही हा शब्द वापरतात. उदा॰ एखादी टिकाऊ गोष्ट कोणती? प्रसिद्ध किंवा कधीही न संपणारी अंतिम गोष्ट कोणती ? तिच्याशी आपण कसे जडले जाऊ शकतो?

फोलोपामध्ये खोट्या मूलभूत गोष्टींचाही पाठपुरावा केला जातो. यासाठी की त्यांच्यामधील प्रचलित असलेल्या दंतकथा ऐकून त्यात वास्तव नसलेले कोणी खरे मानू नये. कारण जर मुळातच सारे चुकीचे असेल तर त्यातून नीतिशिक्षण कसे मिळणार?

फोलापोच्या इतिहासात ‘बेटे’ म्हणजे मूलभूतची संकल्पना त्यांच्या आध्यात्मिकतेत व्यापक प्रमाणात शोषली गेली आहे. ते कायम समजत आले आहेत की दुसरे असे एक असे वास्तव किंवा सत्य आहे की जे दृश्य जगताच्या पलीकडेच आहे. त्यांच्या नैसर्गिक अवस्थेपलीकडच्या त्या वास्तवाचे सामर्थ्य अधिक व श्रेष्ठ आहे. त्या वास्तवाचे त्यांना भय वाटते. त्याचा ते आदर करतात व त्याविषयी त्यांना कुतुहल असते.

त्यांच्या या अदृश्य जगताविषयीच्या मानसिकतेवर लक्ष ठेऊन सुवार्तिक किरापारेकेने त्या नवीन सामर्थ्याची त्यांना ओळख करून दिली. जरी ते अदृश्य व कशाहीपेक्षा बलशाली असले तरी ते त्यांचे वाईट करून त्यांना इजा करण्यापेक्षा त्यांचे केवळ कल्याण करण्यातच रुची घेते हे त्यांना समजले आहे. जेवढे मूळारंभ त्यांनी आजवर कल्पिले होते त्या सर्वांपेक्षा हा मूळारंभ त्यांना अत्यंत उत्तम व सत्य असल्याचे समजले आहे. ज्यांनी त्यावर विश्वास ठेवला त्यांना अंतर्यामात त्याच्या खरेपणाचा अनुभव आला आहे.

आता आम्ही या मूळारंभाच्या प्रारंभाचा शोध घेण्याच्या संधीचा एकत्र बसून फायदा घेत होतो. त्यानंतर आमच्यापैकी कोणीच पूर्वीसारखे राहणार नव्हतो.

 

 

 

 

 

 

Previous Article

स्वत:वर भरवसा ठेवण्याचा मूर्खपणा जॉन ब्लूम

Next Article

गर्वाची सात मार्मिक लक्षणे फेबियन हार्फोर्ड

You might be interested in …

कृपा आणि वैभव: ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव –  लेखांक २

स्टीव्ह फर्नांडिस अ) त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव आपण आता ख्रिस्ताच्या देहधारित व्यक्तित्वामधील तिहेरी गौरव पाहणार आहोत. पहिले म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव . येशू त्याच्या देहधारणामुळे पूर्णपणे एकमेव अपवादात्मक व्यक्ती असा घडला गेला. याचा अर्थ […]

देवाच्या दीनांना दिलासा (III)

जुळं स्तोत्र ५३ अक्षरश: १४ व्या स्तोत्रासारखंच. दोनच गोष्टींमध्ये भिन्न आहे. (१) पाचवं वचन निराळं आहे. (२) देवाचं एलोहीम नाव यात आठ वेळा आलं आहे. १४ व्या स्तोत्रात ४ वेळा एलोहीम व ४ वेळा यहोवा […]

कुमारीपासूनच्या जन्माने झालेले येशूचे गौरव

लेखक: डेविड मॅथीस येशूचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. देव मानव असलेल्या येशूचा हा एकमेव गौरव आहे. संपूर्ण इतिहासात आतपर्यंत जन्मलेल्या अब्जावधी मानवांमध्ये एकाच व्यक्तीने जगामध्ये अशा रीतीने प्रवेश केला. देव आणि मनुष्य यांमध्ये एकच मध्यस्थ […]