संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक १३
भावी घटना : पुढे चालू
अजून पुष्कळ भाकिते भावी काळी पूर्ण व्हायची आहेत. त्यात लोकांतरण, ख्रिस्ताविरोध्याचे आगमन, महासंकटाचा काळ, प्रभूचा दिवस, ख्रिस्ताचे द्वितीयागमन, ख्रिस्ताचे या पृथ्वीवरील हजार वर्षांचे राज्य, सैतानाचे शेवटचे बंड. सार्वकालिक अवस्था या घटनांचा आपण अभ्यास करू.
लोकांतरण
भावी काळातील ही घटना मोठा चर्चेचा विषय असल्याचे आढळते. बायलमधून आपण या घटनेचा अभ्यास करू. लोकांतरण या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ आहे, ‘खेचून घेणे,’ ‘अचानक काढून घेणे,’ असा आहे. तो शब्द नव्या करारात जेथे जेथे वापरला आहे तेथे ‘घेऊन जाणे,’ ‘ओढून काढणे,’ ‘सोडवून आणणे,’ स्वर्गापर्यंत उचलून नेणे,’ ‘वर नेले जाणे’ असे अर्थ आहेत. १ थेस्स. ४:१३-१७ मध्ये अंतराळात घेतले जाण्यासाठी तोच शब्द वापरला आहे. या उतार्यात दानिएलाच्या भाकितातील कोणतीही घटना दिलेली नाही. १ करिंथ १५:५१-५२ मध्ये याच घटनेचे वर्णन आहे. येथेही दानिएलातील समयाविषयी काहीही नमूद केलेले नाही. विश्वासीयांच्या लोकांतरणाचे ते वर्णन आहे यात वाद नाही. त्यामुळे महासंकट काळाच्या दरम्यान ते केव्हा होईल याविषयी अनेक मते मांडली जातात.
(१) महान संकटाच्या संपूर्ण काळात देवाचा क्रोध ओतला जाणार असल्याने मंडळीचा बचाव करण्यासाठी, त्या संकटकाळापासून सोडवण्यासाठी येशू लोकांतरणाचे अभिवचन देतो असे मानले जाते व १ थेस्स. १:९-१० व प्रकटी ३:१० चा आधार घेतला जातो.
(२) काहींच्या मते महासंकटाची पहिली साडेतीन वर्षे संपताच लोकांतरणाची घटना घडेल. दुसर्या साडेतीन वर्षांच्या टप्प्यातील अत्यंत गंभीर न्याय पृथ्वीवर सुरू होण्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील न्यायाखालून तो मंडळीला जाऊ देईल. कारण पहिल्या टप्प्यात देवाचा नव्हे तर मानव व सैतानाचा न्याय ओतला जाणार आहे. असे त्यांचे मत आहे.
(३) काहींना वाटते की कर्णे व वाट्यांचा न्याय ओतून होताच लोकांतरण होईल.
(४) काहींना वाटते की येशूच्या द्वितीयागमनाच्या वेळी लोकांतरण होईल. संपूर्ण महांसंकटातून गेल्यावर प्रभूला भेटायला तेव्हा ती सामोरी जाईल व त्यांच्यासह प्रभू अंतराळातून खाली उतरेल.
महासंकटकाळापूर्वी लोकांतरण होण्याचे पुरावे
(१) प्रकटी ३:१०  मध्ये प्रभू धीराने वचन राखल्याबद्दल मंडळीला (१ थेस्स.१:१०; २ करिंथ १:१०) हे प्रतिफल देत आहे. तो म्हणतो, जगावर जो परीक्षा प्रसंग येणार आहे त्यापासून तो आपल्या लोकांना राखील. सध्या जी मंडळी पृथ्वीवर संकटे सहन करीत आहे, ती विश्वासी मंडळी जेव्हा पृथ्वीवरील लोकांचा परीक्षाकाळ चालू होईल तेव्हा देव त्यांना त्यात अडकण्यापासून पासून वाचवील व राखील. येथे असे सूचित होते की तो काळ चालू असताना नव्हे तर त्या काळापासून अलिप्त राखून देव त्यांना सोडवील.
(२) दुसरा पुरावा म्हणजे प्रकटी ६-१८ अध्यायात मंडळी कोठेच दिसत नाही. थेट २२व्या  काळात मंडळी आपली भूमिका मांडताना बजावते तोपर्यंत नाही.
(३) मंडळी जर महान संकटातून जाणार असेल तर लोकांतरणाला अर्थच राहाणार नाही. फक्त हर्मगिदोनची लढाई टाळायला हे लोकांतरण होणार असेल तर मिसरी पिडांपासून जसे इस्राएलांना राखले तसे देव मंडळीला राखील असे म्हणावे लागेल. आणि शेरडांपासून मेंढरे वेगळे करण्याच्या न्यायाला अर्थच उरणार नाही. मग १००० वर्षांचे राज्य कोणावर चालवायचे? कारण महासंकटाच्या काळानंतर अविश्वासीही पृथ्वीवरून काढले जातील. (मत्तय १३:४१-४२; २५:४१). सर्व विश्वासी लोक लोकांतरित झाले तर यशया ६५:२० व प्रकटी २०:७-१० नुसार बंडखोर प्रजा पृथ्वीवर जन्माला येणार नाही. लोकांतरणात विश्वासीयांना गौरवी शरीर मिळणार आहे. ऐतिहासिक कालक्रमानुसार विश्वासी जनांचा न्याय, कोकर्याचे लग्न या घटना समयानुसार घडण्यात अडचणी येतील. म्हणून महासंकट काळापूर्वीच लोकांतरण होणे अगत्याचे वाटते.
(४) नव्या करारात मंडळीला महान संकटकाळासाठी सज्ज राहाण्याविषयी, अथवा खोट्या संदेष्ट्याविषयी  कोठेही सूचना अगर इशारे दिलेले नाहीत. देवहीन वर्तनाविषयी इशारे दिले आहेत. प्रे.कृ २०:२९-३०; २ पेत्र २:१; इफिस ४:२५-५:७. सध्याच्या काळात संकटे, छळ, क्लेश सहन करण्याचा बोध केला आहे. १ थेस्स. ४:१३-१८ व २ थेस्स.१:४. पण प्रकटी ६-१८ मधील न्यायाविषयी काहीच सूचना दिलेल्या नाहीत. मात्र सध्याच्या काळात मंडळीस सध्याच्या तिच्या अवस्थेविषयी, उद्दिष्ट्ये व आचार विचारांविषयी नव्या करारात भरपूर शिक्षण दिले आहे.
(५) १ थेस्स. ४:१३-१८ वाचा. लक्षात घ्या की ही मंडळी आपले मृतजन प्रभुबरोबर असून महासंकटाची भयानकता त्यांना भोगावी लागणार नाही व आपल्यालाही भोगावी लागणार नाही म्हणून आनंद करताना दिसत नाही; की त्यांना लोकांतरणात वाटा नसणार म्हणून किवा आपल्याला महासंकट काळी क्लेश भोगावे लागणार म्हणून खेद करताना दिसत नाही. महासंकटकाळाविषयी त्यांना भयही नाही नाही आणि प्रश्नही नाहीत. कारण मंडळीला येणार्या महान संकटकाळाविषयी काहीही शिकवण दिलेली नाही.
(६) योहान १४::१-३ व १ थेस्स.४:१३-१८ वाचा. येथे स्पष्टपणे लोकांतरणाचे वर्णन दिसते.
अ- त्यात ख्रिस्ताने दिलेल्या हमीविषयी अभिवचने आहेत. ‘जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.’ ‘आपण सर्वदा प्रभुबरोवर राहू.’
ब- त्यात सांत्वनाचे शब्द आहेत. ‘तुमचे अंत:करण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये’ ‘यास्तव या वचनांनी एकमेकांचे समाधान करा.’ येशू त्याच्याबरोबर ते  स्वर्गात राहाणार याविषयी बोलत आहे. ही भाषा महासंकटकाळापूर्वी होणार्या लोकांतरणालाच लागू पडते. त्यात न्यायाचा उल्लेखही नाही. पवित्र जन स्वर्गात पित्याबरोबर रहातील.
(७) येशूचे भूतलावर उतरण्याचे द्वितीयागमनाचे वर्णन लोकांतरणाहून भिन्न आहे. या दोन आगमनात ८ भेद आढळतात.
१- लोकांतरणात ख्रिस्त अंतराळात येणार व पुन्हा स्वर्गात जाणार. तर द्वितीयागमनसमयी तो पृथ्वीवर उतरून राहणार आहे व राज्य करणार आहे.
२- लोकांतरणात येशू त्याचे लोक गोळा करणार आहे. १ थेस्स. ४:१६-१७. द्वितीयागमनसमयी दूत निवडलेल्यांना गोळा करतील.
३- लोकांतरणात ख्रिस्त प्रतिफळ देण्यासाठी येणार. द्वितीयागमनात ख्रिस्त न्याय करण्यासाठी येणार.
४- लोकांतरणात पुनरुत्थान झाल्याची घटना स्पष्ट दिसेल. १ थेस्स ४:१५-१६. पुनरागमनसमयी ख्रिस्त उतरत असताना पुनरुत्थानाची घटना घडण्याचा उल्लेख नाही.
५- लोकांतरणाचे वेळी पृथ्वीवर जिवंत असलेले विश्वासी भूमिपासून अंतराळात उचलले जाऊन अलग होताना स्पष्ट दिसतील. १ थेस्स. ४:१५-१६. द्वितीयागमनच्या वेळी अविश्वासी लोक पृथ्वीवरून काढून घेतले जातील. मत्तय २४:१७-३१.
६- लोकांतरणाचे वेळी अविश्वासी जन पृथ्वीवर राहतील. द्वितीयागमनाचे वेळी विश्वासी जन पृथ्वीवर रहातील.
७- लोकांतरणाच्या वचनांमध्ये ख्रिस्त भूतलावर राज्य करण्याचा  उल्लेख नाही. तर द्वितीयागमनसमयी ख्रिस्त पृथ्वीवर राज्य स्थापन करणार आहे असे आपण पाहातो. मत्तय २५:३१, ३४.  
८- लोकांतरणसमयी विश्वासीयांना गौरवी शरीरे मिळतील. १ करिंथ १५:५१-५७. द्वितीयागमनसमयी पृथ्वीवर जिवंत असलेल्या कोणालाच गौरवी शरीर मिळणार नाही.
मत्तय १३ मधील दाखले लोकांतरण व ख्रिस्ताचे द्वितीयागमन यामधील भेद स्पष्ट करतात. निदण म्हणजे अविश्वासी व गहू म्हणजे अविश्वासी. निदण गव्हापासून वेगळे केले जाईल म्हणजे लोकांतरणाने विश्वासी जन अविश्वासी जनांपासून वेगळे केले जातील. मत्तय १३:३०,४०. तसेच वाईट मासे म्हणजे अविश्वासी चांगल्या माशांपासून म्हणजे विश्वासीयांपासून वेगळे केले जातील. हा पुन्हा लोकांतरणाने अलग करण्याचा संकेत आहे. मत्तय १३: ४८-५०. मत्तय २४ व प्रकटी १९ मध्ये लोकांतरणाचा अजिबात उल्लेख नाही. यावरून लोकांतरणाची घटना स्पष्ट होते.
                                                         
                                                           प्रश्नावली
प्रश्न १ ला – विवेचनाच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.
१. भावी काळी घडायच्या मुख्य घटना कोणत्या? यादी द्या.
२. ‘लोकांतरण’ या शब्दाचे अनेक अर्थ सांगा.
३. लोकांतरणाचे वर्णन करणारे दोन शास्त्रभाग सांगा.
४. लोकांतरणाविषयीचे पुरावे काय सूचित करतात?
५. लोकांतरण व येशूचे द्वितीयागमन यातील ८ भेद सांगा.
६. लोकांतरणाविषयी ४ मते कोणती?
७. गहू, निदण, चांगले मासे, वाईट मासे या उपमा कोणाला दिल्या आहेत?
प्रश्न २रा- कंसात दिलेले संदर्भ वाचून वचने पूर्ण करा.
(मत्तय२५:३१-४६; योहान १४: १-४; १करिंथ १५:५०-५२; १थेस्स. ४: १४-१८)
१. ————- तेथे तुम्हीही असावे .
२. तुमचे अंत:करण ———— अगर ——— होऊ नये.
३. यास्तव या वचनांनी ———-
४. अहो शापग्रस्तहो, ———-
५. आपण सर्वच महानिद्रा —————– जाऊ.
६. अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो,—————
प्रश्न ३रा- कंसातील संदर्भ योग्य वर्णनापुढे लिहा.
( मत्तय १३:३६-४३; १ थेस्स.४:१३-१८ व १ करिंथ १५:५०-५२; योहान १४:१; मत्तय २४ व प्रकटी १९.)
१. सर्व विश्वासी जन बदलून जाणार——
२. चांगले, वाईट मासे——-
३. प्रभूच्या दिवसाचे वर्णन ——
४. निदणाचा दृष्टान्त——
५. लोकांतरणाची हमी—–
६. लोकांतरणाचे वर्णन —-




 
		 
		 
			 
			 
			 
			 
			
Social