नवम्बर 10, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

“देवाचे घर” पश्चाताप

(पूर्वार्ध)                      

“ परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो मनुष्यांस आज्ञा करतो” (प्रे. कृ. १७:३०).

प्रस्तावना: सेवेकऱ्यांची दोन चित्रे

अलीकडे चोहोकडे असे दिसते की, बहुतेक ख्रिस्ती लोक उदास आहेत. मरून गेलेले आहेत. त्याचे कारण सेवेकऱ्यांच्या सेवेचा अभाव. पवित्र शास्त्रात सेवेकऱ्यांची दोन चित्रे आहेत. ती आपण पाहू. म्हणजे वरील म्हणणे आपल्याला समजेल.

(अ) भयानक चित्र – यशया ५६:९-१२. तिथे सेवेकऱ्यांना जागल्ये असा शब्द आहे. जागल्ये हे गावकामगार असतात. त्यांचे काम रात्री जागे राहण्याचे असते. गस्त घालायची. धोका असलेला पाहायचा. आणि गावाला इशारा द्यायचा. इस्राएलच्या जागल्यांचे हे एक चित्र आहे. त्यासंबंधी येथे सात गोष्टी सांगितल्या आहेत.

(१) ते आंधळे आहेत (व. १०). त्यांचे काम गावाची राखण करण्याचे. त्यांची दृष्टीच जर गेली तर त्यांना आलेला धोका दिसणार तरी कसा? धोकाच जिथे दिसत नाही तिथे इशाऱ्याची हाळी देणार तरी कसे? लोकांना जाग येणार तरी कसा? शत्रू तर झोपेत येऊन नाश करत असतात.
(२) ते ज्ञानशून्य आहेत (व. १०). ज्ञान व्यवहाराचे नव्हे, तर शास्त्राचे ज्ञान नाही. असा येथे पवित्रशास्त्राचा अर्थ आहे. होशेय ४:६ पाहा: “ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. म्हणजे अर्थात मी तुला याजकाचे काम करू देणार नाही. तू आपल्या देवाचे धर्मशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांस विसरेन.”  डोळे शाबूत असून शास्त्राचं कार्यकारी ज्ञान नसेल तर त्यात धोका आहे. त्याच्यावर उपाय समजणारच नाही.
(३) ते मुके कुत्रे आहेत (व. १०). कुत्रेही जागल्येच आहेत. आपल्या जोरकस भुंकण्याने ते लोकांना जागे करतात. देवाच्या लोकांचे जागल्ये तसेच असतात. साऱ्या शास्त्राचं ज्ञान असलं पण बोलकं तोंडच नसलं तर ते ज्ञान निरुपयोगी आहे.
(४) त्यांना झोपेची आवड आहे (व. १०). आहेत सुदृढ, पण आळशी, कुचकामी.
(५) ते बरळणारे आहेत (व. १०). झोपाळू फार. मग निरर्थक, असंबद्ध, दुर्बल बडबडीला काय कमी? त्या दृष्टीनं त्यांचं काम परिणामहीन आहे.
(६) ते आधाशी कुत्रे आहेत (व. ११). तृप्ती कशी ती त्यांना ठाऊकच नाही. चोहोकडून फक्त स्वार्थ साधायचा. त्यासाठी आपला स्वत:चा मार्ग
शोधायचा.
(७) मद्याने मस्त (व. १२). विलासी, चैन, खाणे नि पिणे या सर्वांमुळे ते कुचकामी झाले आहेत. देवाच्या मंडळीचे मेंढपाळ . पण हे असे !

त्याचा परिणाम – नाश. यहोवाला आपल्या रानावनातील पशुंना बोलवावे लागते. त्यांना खाऊन टाकण्याची आज्ञा करावी लागते. नाशच नाश!

(ब) हे उत्तेजनात्मक असे दुसरे चित्र 
प्रे कृ ६:४ पाहा. “म्हणजे आम्ही प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”

पहिले भयानक चित्र आपण पाहिले. आता हे दुसरे चित्र किती आनंद व उत्तेजन देणारे आहे! पहिल्या चित्रात निरुपयोगी सेवेकऱ्यांसाठी यहोवाला सात गोष्टी सांगाव्या लागल्या. पण येथे किती खोल, दूरगामी, उपकारक मंडळीची संख्या वाढली आहे.

त्यांचं सर्व काही सामाईक होतं. तरी वाटणी होत होती. त्यात इब्री यहूदी व हेल्लेणी यहूदी असा पक्षपात होऊ लागला.  तेव्हा प्रेषित म्हणतात, की ते मंडळीचे महत्त्वाचे काम आहे, तरी पहिल्या प्रतीचे महत्त्वाचे काम नाही… त्या कामासाठी तुम्ही पवित्र आत्म्याने म्हणजे पवित्र शास्त्राच्या ज्ञानानं भरलेली अशी प्रतिष्ठित माणसं शोधून काढा. त्यांना त्या कामावर आम्ही नेमू. म्हणजे मग आम्ही पहिल्या प्रतीच्या कामासाठी मोकळे राहू. हे महत्त्वाचे. अगदी पहिले काम कोणते ? तर ‘वचनाची सेवा.’ मग आम्हाला ती तत्परतेनं, त्यातच गढून जाऊन करता येईल. त्या एकाच कामात आम्ही सर्व वेळ घालवू. पण त्यासाठी आमच्या सर्व वेळेचे दोन भाग करता येतील आम्हाला. ५० % वेळ आम्हाला प्रार्थनेत व उरलेला ५०% वेळ आम्हाला वचनाच्या सेवेत घालवता येईल. त्याचा परिणाम असा होईल की आम्ही आमच्या प्रेषितीय सेवेच्या कामात तत्पर राहू. त्यात रंगून जाऊ. आमच्याकडून ढिलाई, कुचराई होणार नाही.

(१) प्रार्थनेमध्ये – ही प्रेषितीय पार्थना आहे, खाजगी प्रार्थना, खाजगी जिण्याची प्रार्थना आहे. घरोघरी जाऊन मंडळीबरोबरचीही प्रार्थना आहे. तिच्या योगाने सर्व गरजा आम्हाला समजतील. त्याप्रमाणे वचनाची सेवा करता येईल. त्या प्रार्थनेनंतर मग स्वत:करता, उत्तेजनासाठी, प्रकाशासाठी, वाट दिसण्यासाठी, अखेर मन बदलणाऱ्या सामर्थ्यासाठी हे महत्त्वाचे आहे.

(२) वचनाची सेवा – सिद्धांत नव्हे. ते मानवी विचार असतात. ऐहिक ज्ञान, माहितीही नव्हे. ती दुर्बळ असते. मन पालटायचे सामर्थ्य तिच्यामध्ये नसते. तर “वचनाची सेवा” असते. देवाने केलेल्या वायद्याची, देवाच्या बोलीची, प्रकटीकरणाची, तारणाच्या जिव्हाळ्याच्या सत्याची सेवा. ती सत्ये स्पष्टपणे सांगणे. पालनाने जीवन तर आज्ञाभंगाने नाश. असे उत्तेजन देणे, इशारे देणे, हेच हल्ली होत नाही. म्हणूनच “ पश्चाताप” हे मूळ सत्य आपण आज घेतले. त्यासाठीच ही दोन चित्रे घेतली.

(३) तत्पर- अशी प्रार्थना केली, वचनाची सेवा केली, म्हणजे त्यात सेवेकरी रंगून जातो. कार्यक्षम होतो. नि त्याची सेवा, मन बदलण्याची सेवा, परिणामकारक होते.

१. पश्चात्तापाची व्याख्या

देवाचे राहाते घर – देवाची मंडळी शिथिल झाली आहे, मरून गेली आहे हे आपण पाहिले. ती परत जिवंत होण्याचा काही उपाय आहे काय ? तिला परत उत्तेजन येण्यास, म्हणजे धर्मसंजीवन होण्याचा काही मार्ग आहे का? आहे.

ख्रिस्ती धर्म हा देवकेंद्रित धर्म आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं आली आहेत त्यात. खुद्द देवच ते करू शकेल. तोच खुद्द आला पाहिजे. आमच्या मनात राहिला पाहिजे. त्याचा मार्ग आपल्याला कुठे, कसा सापडेल? शास्त्रात सापडेल. यशयाचा ५७ वा अध्याय नीट लक्षपूर्वक वाचा. त्याचा अभ्यास करा. तिथं तुम्हाला या आध्यात्मिक मरणावर उपाय सापडेल. तो उपाय म्हणजे पश्चात्ताप होय. तेथे पश्चात्तापाचे फारच रमणीय वर्णन तुम्हाला सापडेल. नम्र ऱ्हदयामध्ये मी राहतो. पश्चातापी ऱ्हदयात मी घर.. वस्ती करून राहतो, असं सुंदर वर्णन तिथं आहे. तिथं दिलेली पश्चात्तापाची व्याख्या किती दिलखेचक आहे पाहा. देवाचं घर. देवाचं राहातं घर. देवाची कायम वस्ती असलेलं घर… हेच पश्चात्तापी ऱ्हदय असतं. किती मनोहर आहे हे घर! नि अर्थानं किती खोल! पश्चात्ताप करतो आपण. पण किती वेळ? किती वेळ तो कायम राहातो? कधीतरी, कशाने तरी, कुणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या खास वेळी, आपण पश्चात्ताप करतो, हे खरं आहे. पण इथं या वचनातला अर्थ दिसतो की पश्चाताप एक खास ‘प्रासंगिक’ घडलेली गोष्ट नाही. ती एक कायमची मनोवृत्ती आहे. ती कोणती ?

ते वचनच पाहू या म्हणजे आपल्याला स्पष्ट समजेल. “जो उच्च (सर्वात उंच जागी) परमथोर ( सर्वात मोठा) आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो (शाश्वतकाळ हे ज्याचं सदैव राहाण्याचं घर आहे) ज्याचं नाव पवित्र प्रभू ( निर्मित वस्तूंहून भिन्न असलेला यहोवा हे ज्याचं नाव ) आहे, तो असं म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी वसतो. तसंच ज्याचं मन पश्चात्तापानं भरलेलं व नम्र आहे, त्याच्यामध्येही मी घर करून राहतो. मी आहे पवित्र. पण पातक्यांमध्ये वस्ती करतो. मी आहे उच्च. पण नीचांमध्ये राहतो. आपल्या नीचतेची जाणीव ज्याला आहे, त्यामुळे जो लीन आहे, त्याच्यामध्ये वस्ती करून राहतो. ख्रिस्ती देवाचे हे वैभव आहे. त्याचं यात सौंदर्य साठवलं आहे. त्याचं यातच सामर्थ्य आहे. अमानुष अशी कृत्यं करणं, त्याच्याहीपेक्षा खुद्द नीच, पातकी, तरी लीन पश्चात्तापाच्या मनामध्ये राहाणं- नव्हे, तिथं आपलं कायमचं घरंच करून राहणं. याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य जसं, जितकं दिसून येतं, तितकं दुसरीकडे कुठंही दिसून येत नाही. असा खुद्द यहोवाच आला, आमच्यात राहिला, तिथं कायमचं घरच केलं, की आमचा प्रश्न सुटला. आमच्या आध्यात्मिक दिवाळखोरीवर, मरणावर हाच एक उपाय होय.

( पुढे चालू)

Previous Article

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

Next Article

देवाचं घर: पश्चात्ताप

You might be interested in …

ख्रिस्तजन्म आणि घरी असण्याची आपली ओढ

गेरीट डॉसन स्कॉटलंडचा एक तरुण किनाऱ्यावर असलेले आपले घर सोडून समुद्रावरच्या सफरीला गेला. कुटुंबातील लोकांना  काहीही न सागता तो अचानक निघाला. सफरीच्या  त्याच्या ओढीने आपल्या आईवडिलांना आपले अचानक जाणे कसे वाटेल याचा विचारही त्याच्या मनाला […]