वर्षातून तीन वेळा देवाने नेमून दिलेल्या सणांसाठी सीयोन डोंगरावरील यरुशलेमातील मंदिरात जाहीर उपासनेसाठी एकत्र जमून डोंगर चढून जाताना उपासक जी स्तोत्रं आळीपाळीनं म्हणत चढण चढत असत; त्या १२० ते १३३ या पंधरा आरोहण स्तोत्रांच्या विषयांची रूपरेषा आपण पाहू या.
स्तोत्र १२० : ज्या परक्या देशांमधून यरुशलेमास वर्षातून तीनदा मोठ्या सणासाठी यायचं होतं… तिथं असता, असलेली मन:स्थिती.
स्तोत्र १२१ : दुरून दिसत असलेला देवाचा डोंगर. जाहीर सामाजिक उपासनेचं स्थळ. तिकडं जाणं व येणं सुरक्षित.
स्तोत्र १२२ : एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देण्याचा विषय एकच. उपासनेचं स्थळ, यरुशलेम, सीयोन डोंगर.
स्तोत्र १२३ : ती उपासनेची जागा यरुशलेम … सीयोन… जगात असली तरी खरी जागा स्वर्गात असलेल्या देवाच्या पायाजवळ आहे.
स्तोत्र १२४ : अद्याप ते यरुशलेमात येऊन पोहंचले नाहीत. तरी तिकडे सुरक्षित येण्यास त्याचीच दया कारणीभूत आहे. त्याबद्दल त्याची स्तुती.
स्तोत्र १२५ : उपासकांचं भाग्य व दुष्टांचं प्रतिफळ.
स्तोत्र १२६ : पाडावपणातून परत आलेल्या लोकांची मन:स्थिती. उपासकांचं भाग्य. संसाराच्या गुलामगिरीतून देवाच्या उपासनेकरता सुटका.
स्तोत्र १२७ : उपासक कोण? कुटुंब; घराणं. देवाचं कुटुंब. त्याच्या घरची माणसं.
स्तोत्र १२८ : “पुढं चालू.” मग उपासना म्हणजे काय? तर.. सर्व घराला आशीर्वाद.
स्तोत्र १२९ ते १३२ : मंदिरात केलेल्या प्रार्थना.
स्तोत्र १३३ : उपासना – स्वरूप
स्तोत्र १३४ : उपासकांना शेवटचा आशीर्वाद.
आता संग्राहकांनी ज्या कल्पनेनं ही स्तोत्रं एकत्र गोवली ती कल्पना तरी कोणती? तिच्यात दोन कल्पना होत्या.
पहिली
उपासनेसाठी एकत्र होणाऱ्या यात्रेकरूंमध्ये असणारा बंधुभाव. पुढे ते सीयोनास पोहंचून उपासक बनतात… तिथला उपासकांमधला बंधुभाव. उपासक असो की यात्रेकरू असो. त्यांच्यामध्ये कोणताही उच्चनीच हा भेदभाव नाही. प्रीतीनं भरलेलं भाऊपणच आहे.
दुसरी
उपासनेमध्ये प्राप्त होणारं सार्वकालिक जीवन. यहूदी लोकांमध्ये मरणानंतर जीवन आहे. जीवन हे न खुंटणारं आहे, ही कल्पना त्यांना नव्हती. कारण जिण्याला खरंच पूर्णविराम होता ना! पण पुढं देवानं केलेल्या वाढत्या प्रगटीकरणानं त्यांना प्राप्त झालेली शाश्वत जीवनाची कल्पना एवढीच होती. देव एकच शाश्वत आहे, आणि त्याच्याबरोबर आपला संबंध आला तर आपणही त्याच्याबरोबर शाश्वत होऊ. नव्या करारात ख्रिस्तानं प्रगट केलेलं पूर्ण … स्पष्ट… प्रगटीकरण हे नव्हे. तरी यहुदीतर जगताला माहीत नसलेलं एक शाश्वत जिणं आपल्या शाश्वत देवामुळं आपल्याला प्राप्त होणार, ही ती कल्पना होती.
दाविदाची कल्पना वंशिक सातत्याची. म्हणजे देव माझी गादी कायम करणार. माझ्या सिंहासनावर बसणारा नाहीसा होणार नाही. तो सतत बसतच राहाणार. त्या दृष्टीनं माझा… दाविदाचा वंश कायम राहाणार. ते तसलं शाश्वत जिणं… वंशाचं सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त होणार.
स्तोत्र संग्राहकांची कल्पना त्याच्या पुढच्या पायरीवरची आहे. ते सार्वकालिक जीवन वंशाचं नव्हे. व्यक्तीचं होय. तरी पण ते स्वरूप खास स्पष्ट नव्हतं. शाश्वत जीवनामागं चाचपडत जाणारी, देवाच्या सनातनावर आधारलेली ती एक कल्पना, हुरहुर होती. देवानं, प्रगट केलेला खरा, पण शाश्वतासंबंधी मानवानं आपलासा केलेला तो एक विचार होता. तो अनुभव, खरी, सर्वांगिण खात्री नव्हती.
(३) पवित्र आत्म्याचा अर्थ
पवित्र शास्त्रात एक अभेद्य नियम आहे, जेव्हा देव एखादं सुंदर, सत्य, मंगल काम करतो, किंवा त्यासंदर्भात एखादं दृश्य दाखवतो, तेव्हा तो ते पाहण्याचं आमंत्रण देतो. पवित्र शास्त्राचा मूलभूत, मुख्य नि महत्त्वाचा विषय म्हणजे तारण अथवा सार्वकालिक जीवन. ते प्राप्त होण्याचं स्थळ म्हणजे उपासना मंदिर.
त्यातील मध्यवर्ती गोष्ट म्हणजे संतांची उपासना. ते रमणीय, उपकारक, जीवनदायी दृश्य दाखवीत असता पवित्र शास्त्राचा मूळ लेखक देव हर्षित होऊन म्हणतो, पहा तर खरं हे सुंदर, दैदीप्यमान, विलोभनीय दृश्य! संतांचा समुदाय, भक्तिभावानं भारलेल्या भक्तांचा हा मेळावा!!
बंधूंचं हे ऐक्य, उपासनेत तल्लीन झालेल्यांची संगत कशी मंगल, भली, चांगली आहे! ती मूर्त झालेली कुठं दिसत असेल, तर ती इथं… भक्तवृंदांच्या या भक्तीमध्ये. भावाभावांच हे एकत्र राहाणं, हा जाहीर मेळावा. डोळ्यांमध्ये भरणारी दिलजमाई, आतलं ऐक्य, आंतरिक भक्तिमग्नता, मनोमीलन, बाह्यत: दिसणारं हे भाऊपण, सणात गढून गेलेला समुदाय दिलखेचक आहे. इतकं मांगल्य याच पवित्र मेळ्यात, याच सणातल्या समुदायात का? हा संतांचा, उपासनेला आलेल्या, त्यात रंगून गेलेल्यांचा देवाघरचा गोतावळा आहे. हा खेळासाठी, करमणुकीसाठी, ऐहिक कामांसाठी एकत्र आलेला कोणताही मेळावा नसून ही देवाच्या कुटुंबातली सभासद, देवाघरची माणसं, शाश्वत भावंडं, जिव्हाळ्याचे आप्त, खरे जडलेले गणगोत, मंडळी आहेत. मनोरम, आशीर्वाददायी, सुखदायी आहेत. याचं कारण बुद्धीला पटवून सिद्ध करण्याचा प्रयत्न पुढे केलेला नाही. तर ऱ्हदयाची पक्कड घेईल असे हे चित्र रंगवलं आहे.
हे ऐक्य, हा सहवास, हे उपासनेतील खास सुगंधित तेल आहे. देवासाठी खास कुटून तयार केलेलं सुगंधी द्रव्य आहे
(निर्गम३०:२२-३३). देह, जीव व आत्म्याला सुखसंवेदनांमध्ये तरंगत ठेवणारं हे तेल. अभिषेकाचं हे तेल. मंदिरातील वस्तू न् वस्तू देवाकरता वेगळं करणारं पवित्र तेल. शोभा व सौंदर्यासाठी तलम सणाचे, सोन्याच्या जरतारांनी, हिरेमाणके व रत्नांनी खचलेले शोभिवंत कपडे त्या तेलानं सुगंधानं दळून टाकणारं शुद्ध सुगंधी तेल.
हे तेल म्हणजे यहोवाचा पवित्र आत्मा होय. प्रीतीचा वर्षाव करणारा, भावाभावांना जिव्हाळ्यानं जडवणारा…देवाच्या देहाची, मंडळीची रचना करणारा, पवित्र आत्मा. देवपणाचा अंश, उपासकांना बहाल करून देवस्वभावाचे वाटेकरी करणारा हा पवित्र आत्मा.
तेल असलेला हा पवित्र आत्मा उपासकांच्या समूहात काय काम करतो? अभिषेकाचं तेल करतं तेच काम, जीव- जिवाला, भक्त- भक्ताला, उपासक – उपासकाला जडवून एकजीव करण्याचं काम तो दोन प्रकारांनी करतो. आतला सांधा निखळणार नाही असा बसवणं आणि बाहेरचा दुवा न निसटेल असा सांधणं. ते कसं? ते अभिषेकाचं तेल डोक्यावरून उतरत, पसरत, दाढीवर येतं, तिला सुगंधमय करतं. माणसाचं सौंदर्य केसात असतं. डोक्याचे केस उच्च. दाढीचे केस सुंदरच, पण दुय्यम दर्जाचे. या उच्चनीच अंशांना एकाच सुगंधानं समसमान व्यापून हे देवाचं बहुमोल तेल त्यांना एकदिल करतं. केवळ आतला अंशच नव्हे तर बाह्य पेहराव, मंदिल, डोक्याची शोभा असलेला, त्यावरची सुवर्णमय पट्टी, त्यावरचा मुकुट, झग्याचा, खालच्या अंगरख्याचा गळा, गळ्याचा काठ, पोषाखाच्या बाह्यशोभेच्या अंशांना एकाच सुवासानं दरवळून सोडून समसमान करणारं हे तेल होय. भक्तिभावानं भरलेल्या मन:स्थितीत उपासनावृत्तीनं थरारलेल्या देवाच्या सहवासाच्या सौख्यानं गहिवरलेल्या ऱ्हदयात सहजसुलभतेनं हे सुगंधी तेल सर्व उच्चनीच भाव विसरायला भाग पाडतं. देव नि उपासकवृंद परस्परांशी आपापसात एकजीव होऊन उपासनेत जातात. ही झाली उपासनेतील वैयक्तिक बाजू.
आता तिचे परिणाम? देवातून निघून केवळ माणसात ते विराम पावत नाहीत. त्यांचा शेवट केवळ उपासकात नाहीसा होण्यात नाही. उपासनेत गहिवरून, आशीर्वादित झालेले उपासक स्वस्थ बसणं शक्य नाही. ते जगात उतरलेच पाहिजेत. दंवाप्रमाणं जगाला उपयोगी पडलेच पाहिजेत. हे जल धनधान्यानं दुनियेला सुबत्तेनं भरून टाकल्याशिवाय कदापि राहाणारच नाही. मेघधनुष्याच्या लाख रंगांनी हिरव्या सृष्टीला सौंदर्याचा साज घातल्याशिवाय कदापि राहाणार नाहीत. तिथंही तीच एक अभेद्य उपासनावृत्ती. उच्चनीच भेदांऐवजी एकतेचं, एकमनाचं भाऊपण.
नऊ हजार फूट उंचीचं सदैव हिमाच्छादित हर्मोनाचं शिखर कुठं तर अडीच हजार फूट उंचीचं सीयोनाचं बसकं शिखर कुठं. हिमनिधिनं भरलेला हर्मोन कोण? आणि प्रस्तर ऱ्हदयी सियोनाचा खडक कोण? वनश्रीच्या सौंदर्यानं नटलेली वनराजी एकीकडे, तर खडकाळीचा सियोन खडक दुसरीकडे. विरोधाची ही परिसीमा. पण या दोहोंनाही ऐक्यात गोवणारं हर्मोनाचं दंव. सीयोनावर उरणारं…छिद्रमय ज्वालामुखी खडकांची गव्हरं जीवनदायी जलांनी भरून टाकणारं … सीयोन खडकाला जीवन देणारं देवाचं दंव. हर्मोनातून सियोन पर्वतावर उतरणारं दंव. सुबत्ता. आशीर्वाद.
भक्ताभक्तांमधील भेदभाव मुळासकट नाहीसा करून टाकून त्यांच्यात उपासनेची एकच आर्द्रता निर्माण करणारी ही उपासनेची वृत्ती, हा भक्तिभाव हा केवळ जीवनासाठी अवलंबून राहणारा एक दुय्यम अर्थ झाला या स्तोत्ररत्नाचा. त्याचा आणखी एक अखेरचा खोल अर्थ पाहू. तो आपलासा करीत राहू.
बंधूंचं मिलन, अंतर्यामाची एकता व बाह्य सहवास, ही सणातली जाहीर उपासना. पवित्र करणाऱ्या देवाच्या सुगंधी बहुमोल तेलासारखी, एकाच भक्तिभावानं उपासकांना भारून टाकणारी आहे. वैयक्तिक जीवनात तिचे पूर्ण फायदे मिळत नाहीत. सामूहिक उपासनेतलं हे देवाचं जीवनदायी दंव दुनियेला सुंदर शोभा देत, आपलं आयुष्य सुबत्तेच्या शेतमळ्यांप्रमाणं भिजवत झुलवत कंठीत राहातं. म्हणून यरुशलेमात, सीयोनात, देवाच्या गावात, उपासना मंदिरात, जाहीर उपासनेत, आशीर्वाद देण्याचं यहोवा देवानं ठाम ठरवलं आहे. हा जाहिरनामा त्यानं आपल्या शाश्वत, जिवंत वचनात फडकवला आहे. त्यासाठी पातकी दुनियेतल्या पश्चातप्त उपासकांशी, तारलेल्या भक्तांशी दुनियेतल्या पातकी बोलीत बोलायचं आहे. म्हणून तिच्यातल्या पश्चातप्त, तारलेल्या भक्तांशी दुनियेतल्याच पातकी बोलीनं बोलायचं आहे, म्हणून तिच्यातलाच “आशीर्वाद” शब्द घेऊन तिच्यात आपला स्वर्गीय अर्थ देवानं ओतला आहे.
आजवर तो आशीर्वाद वाहात आहे, याचा ख्रिस्ती अर्थ सार्वकालिक जीवन असा आहे. ते उपासनेत देण्याचं देवानं मुक्रर केलं आहे. हा या स्तोत्राचा अखेरचा अर्थ. देवबाप, देवपुत्र देव पवित्र आत्मा…शास्त्राचा मूळ लेखक त्र्येक देव याचा हा अर्थ होय. देव जगतो, ते न संपणारं, अनादि अनंत, कधीही न खुंटणारं, सार्वकालिक जीवन, प्रीतीचं, पवित्र जीवन. देव म्हणजे नित्य जगणं. तारण. सार्वकालिक जीवन. हे आपलं तर जीवन नाही. मग आमचा या जीवनाशी काय संबंध? हेच रहस्य तर गोड गुपित; कुणालाही केव्हाही, कुठंही माहीत नसलेलं गौरवी गूज या स्तोत्ररत्नात प्रकट केलं आहे. कोणत्याही पश्चातप्त पातक्याला प्राप्त होण्यासाठी उघड करून दाखवलं आहे. हे सार्वकालिक जीवन तारलेल्या भक्ताला उपासनेत प्राप्त होतं. कसं? कारण देवानं ते मुक्रर केलं आहे. तो खुद्द ते उपासकाला बहाल करतो. भक्त व देव यांच्या भेटीलाच उपासना म्हणतात. ख्रिस्त उन्नत मस्तक. उपासक मंडळी त्याचा पवित्र देह आहे. त्यांच्या जीवनाचा मिलाफ देवाच्या सुगंधमय, बहुमोल अभिषेकाच्या खास तेलानंच, म्हणजे पवित्र आत्म्यानं होतो. डोक्यावरील श्रेष्ठ केसांपासून तो खालच्या दाढीच्या केसांपर्यंत. मंदिलाच्या श्रेष्ठ शिरोभूषणापासून तो खालच्या सणाच्या झग्याच्या गळ्यापर्यंत… अंगरख्याच्या काठापर्यंत उतरून दोहोंनाही आपल्या सुगंधानं दरवळून सोडणाऱ्या तेलानं हा आशीर्वाद प्राप्त होतो व हे मीलन अनुभवास येतं. आंतरिक वैयक्तिक एकांतात झालेला हा वैयक्तिक सोहळा उपासनेचा कळस नव्हे. बाहेरच्या जगात सामाजिक जिण्याच्या दुनियेतही हा आशीर्वाद खाली आला पाहिजे. देव हर्मोनाचं पवित्र, शुद्ध, पवित्र, शुभ्र शिखर असेल…परंतु त्याचं दंव … आशीर्वादाचे हे जलबिंदू शांत वर्षावानं सियोन खडकाच्या कभिन्न माथ्यावर उतरले पाहिजेत. त्याला जलपूर्ण, सुबत्तेनं, सौख्यानं, सौंदर्यानं भरून टाकलं पाहिजे.
म्हणूनच उपासनेचा खरा अर्थ हा – “ यहोवानं मुक्रर केलं आहे की, तिथं, यरुशलेमात, सियोनावर, भक्तिमंदिरात, आशीर्वाद .. म्हणजे सार्वकालिक जीवन … खुद्द देवाचं देवपण उपासकांना द्यायचं … त्याला आपल्या स्वभावाचं वाटेकरी करायचं .”
धन्य यहोवा! धन्य त्याचा तारलेला भक्त ! धन्य ती उपासना! धन्य ते स्तोत्ररत्न!
Social