लेखांक २
येशूच्या खुनाच्या काळ्या कटानं काळोखलेल्या त्या खुल्या बागेत … त्या काळरात्री त्याच्यासाठी अधिकच काळवंडत चाललेल्या दु:खरात्रीमध्ये आपल्या शिष्यांसहित त्यांच्या सहवासासाठी, सहानुभूतीसाठी आसुसलेला प्रभू चालला आहे. ‘बाहेर पडला.’ यरुशलेमच्या तटापासून त्या भयाण दरीच्या तळापर्यंत गेलेल्या उतरणीनं त्यांना घेऊन तो उतरला. बागेत प्रवेश करताच आठ जणांना तिथंच बसवलं. त्यांना सांगितलं, ‘बसून राहा इथंच!’ प्रियांनो, आपण आहोत का त्यांच्याबरोबर तरी? त्यांना तिथं बसेपर्यंतच्या जागी तरी आणलं. त्यांच्या संगतीसाठी तो अंशत: तरी त्यांच्याशी बोलला. पण आता? असं मागं सोडून येशू पुढे गेल्यावर? मग? “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा” (लूक २२:४०;मार्क १४:३२). त्यांना जागं राहाण्याची विनंती त्याने केली नाही. तो त्यांचा मगदूरच नाही. नाहीतर त्यांना त्यापेक्षा पुढं नेलं नसतं का? पण तो सारं काही जाणतो. त्यांनी तेथे बसणं एवढंच पुरेसं होतं.
त्यांची काळजी आहे प्रभूला. त्या रहस्यमय उपासनेसाठी तो पुढे चालला आहे. त्याची ममता तेवढ्यावरच संतुष्ट होत नाही. तो त्यांची काळजी घेण्यासाठीच म्हणतो, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून …” कसली परीक्षा? आपल्याला मागं ठेऊन सोडून दिलं. प्रार्थनेच्या संगतीतून वगळलं. त्यामुळं दु:ख नाही का वाटणार? याहून अवघड परीक्षा कोणती? त्यामुळं मंदावणं, शिथिल होणं, मनानं त्याची सोबत सोडणं सहाजिक नाही का? किती भयंकर परीक्षा बरं ही? यावर उपाय काय? देवाचा सहवास. त्याच्या सामर्थ्यासाठी सततचा सहवास, प्रार्थना. त्यांच्या स्वसामर्थ्यानं, मानवी शक्तीनं ते रेटणारच नाही.
प्रियांनो किती प्रेमळ, दूरदर्शी आहे बरं प्रभू! आपल्याच मगदुराच्या अभावी प्रभूच्या सहवासाला जेव्हा आपण किंचित काळ मुकतो. तेव्हा देहमन मंदावण्याचा धोका कितीतरी मोठा आहे. व्यक्तिश: दूर झाल्यामुळे मनानं दूर होण्याचा संभव कितीतरी आहे. तो आतला जिव्हाळा तुटू नये म्हणून उपाय काय? तर प्रार्थना करा!
तेवढीच परीक्षा का? अन त्या काळरात्री त्याला सोडून पळून जाण्याची, त्या तीन दिवसांच्या ताटातुटीची परीक्षाही होती ना? त्यानंतरही जन्मभर देहविरहित त्याचा सहवास … केवढी परीक्षा ही! त्या सर्वांसाठी प्रभू म्हणतो, ‘इथं बसून राहा.. व तुम्ही परीक्षत पडू नये म्हणून प्रार्थना करा.’ झालं. सोडलं प्रभूनं त्यांना. ती रहस्यपूर्ण उपासना त्याला अदृश्यपणे ओढून नेत होती. तो रहस्यपूर्ण अंधार त्याला बोलवत होता. तिकडं जाणं त्याला भागच होतं. आठ शिष्य मागेच राहिले. पहिला टप्पा संपला. दु:खसहनाच्या बागेतला. शिष्य मागे बसून राहिले. पण प्रार्थना करीत राहिले का? नाही….. मग? ‘त्यानं पेत्र, याकोब, योहानाला सोबत घेतलं.’ धन्य ते तिघं. येशूच्या पुढच्या दु:खसहनाचे वाटेकरी होण्याचा मान त्यांना मिळाला. आपण कुठं आहोत प्रियांनो?
त्यानं त्यांना बरोबर घेतलं. दोनच पावलं पुढं गेला. “तो खिन्न व अतिकष्टी होऊ लागला… फारच चकित व अस्वस्थ होऊ लागला” ( मार्क १४:३३; मत्तय २६:३७). त्या आठ जणांना सोडलं आणि त्याच्याभोवती उसळणारा रहस्यपूर्ण दु:खाचा दर्या त्याच्या रोखानं चाल करून येऊ लागला. त्याच्या कर्दनकाळाच्या लाटा त्याच्यावर येऊन आघात करू लागल्या. त्या आघातानं त्याचा जीव देहाबाहेर सांडतो की काय असं त्याला झालं. अदृश्य, रहस्यपूर्ण, भयानकता त्याला भासू लागली. दु:खाचं दडपण त्यावर पडलं. दु:खात तो भरडला जाऊ लागला. त्या धन्य तिघा शिष्यांच्या सहानुभूतीसाठी त्यानं धाव घेतली. आपल्या वेदनांच्या वेठांचं, कळवळायला लावणाऱ्या, चोहीकडून घेरणाऱ्या घोर, मरणासन्न, कोणीही वाटून घेऊ न शकणाऱ्या दु:खाचं वर्णन तो विव्हळ होऊन त्यांना सांगू लागला. कोणतं, कसलं हे दु:ख कुणाला ठाऊक?
आभाळ भरून आलं होतं, दरियाला टेकलं होतं. दोन्ही काळोखांची तिथं भेट झाली होती. तुफान कर्दनकाळ क्रूरतेची कमाल झाली होती. त्या भिरभिरत्या गिरगिरत्या भोवऱ्याच्या गर्तेच्या पिळोक्यात तो ओढला जात आहे. क्षणाक्षणाला दिसेनासा होत आहे. त्या उसळत्या खळखळाटात तो गडप होतो. कोण जाणार तिथं त्या सैतानी हैदोसात? तिथून वेदनांनी विव्हळ झालेले, शहारून सोडणारे त्याचे अस्पष्टसे शब्द आपल्या कानी येतात! मरणापर्यंत साऱ्या बाजूंनी घेरणारं हे दु:ख! बदलीच्या मरणाची ही पहिली सावली. देहजिवाच्या ताटातुटीचा हा पहिला स्पर्श.
देवपणाला देहाकरवी पिळणारा पातकाचा हा विखारी विळखा. कुणी करावं त्याचं वर्णन? आतमध्ये स्फटिकासारखं देवपण. मनुष्यासारख्या निखालस निष्पाप देहाची बदलीच्या या पातकानं घेतलेली ही घातक पक्कड होय. त्याच्या जातीला पातक ठाऊक नाही. पण पातक्यांच्या उद्धारार्थ बदलीच्या पातकाला, त्याच्या असंख्य परिणामांना, अपरंपार प्राणघातक आधिव्याधींना, त्या पवित्र देहात घालू दिलेला हा घातक धुडगूस होय. जिवाच्या जिव्हाळ्यातून अणुअणुंना सोडवणारं हे मरणाचं सामर्थ्य होय. सर्व बाजू्ंनी ‘मरणापर्यंत माझा जीव विव्हळ झाला आहे’ ( मत्तय २६:३८), असं तो म्हणतो. हा त्याचा शारीरिक जीव होय. मूलत: निष्पाप असल्यानं पातकाला अभेद्य आहे, पण विश्वाच्या उद्धाराकरता बदलीचं मरण मरण्यासाठी पातकाला त्याच्या संपूर्ण परिणामांसकट, आपल्या देहात वावरू दिल्यामुळं ही पातकाची पहिली घातक पक्कड होय.
मरणाची अनुभूती अमर देवाला कुठली? जगाच्या स्थापनेपूर्वी त्या बदलीच्या मरणाला त्यानं होकार दिला असेल ( इफिस १:४-७). आपण केलेल्या निवडीनं तिची परिपूर्ती होताना बदलीच्या मरणाला आपला देह सोपून दिल्याबरोबर पातकाचा पहिला फटकारा, मरणाचा पहिला मार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून देवानं कधीही न अनुभवलेलं मरणच होय. आता इथं आलेल्या त्याच अनुभवानं तो विव्हळतो. “ साऱ्या बाजूंनी मरणापर्यंत माझा जीव वेदना भोगीत आहे!”
किती साध्या सहजतेनं तो त्या तिघांकडं वळतो व त्यांना म्हणतो, “तुम्ही इथं राहा. माझ्याबरोबर सारखे जागत राहा.” तुम्ही इथं राहा. मला पुढं गेलंच पाहिजे. हे आतलं दु:ख मला अनावर झालं आहे. माझ्या एकट्यानं ते नाही सहन होत. माझ्या बापाला मला भेटलं पाहिजे. त्याला हे सांगून वाटून घेतलं पाहिजे. हे माझं एकट्याचं दु:ख आहे. मलाच ते सहन केलं पाहिजे. पण तुमची सोबत मला हवी आहे. माझ्याबरोबर जागं राहा. झोपू नका हं.” धन्य ते तिघं! त्यांची मुकी, अदृश्य संगत, सहानुभूती त्याला हवीय. किती मोकळ्या मनाचा! खुल्या दिलाचा! विशाल अंत:करणाचा आहे प्रभू! काही लपवाछपवी नाही. आपण देहधारी देव, ही पापी माणसं… यांच्या सहवासाची, आधाराची आपण कशी आशा धरावी? असं यत्किंचितही त्याला वाटत नाही. किती दिलखुलासपणे तो आपलं दु:ख त्यांच्या बरोबर वाटून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
पण त्यांना समजतंय तरी का ते? कसं समजणार ? आपल्या आवडत्या माणसाचं दु:ख पाहून कधी कधी माणसं बेशुद्ध पडतात. एवढा त्यांच्यावर त्या दु:खाचा परिणाम होतो. मग हा तर त्यांचा गुरू, मालक, मशीहा होता. पण त्यांच्या बुद्धीच्या आटोक्यात येईल इतकं ते सोपं नव्हतं. त्यांना दिसेल असं काही घडलं नव्हतं. म्हणूनच त्या आठांना काहीसं दूर ठेऊन ‘परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करायला सांगतो.’ तर या तिघांना निकट ठेवून त्यांना ‘माझ्याबरोबर जागत राहा’ सांगतो. त्यांच्याकडून जागरणाची, सोबतीच्या सहानुभूतीची अपेक्षा करतो.
मला जागावं लागणारंच.. मला झोप कुठली ? झोप घेतली तर तारणाच्या परिपूर्तीचं काय? आत तर शेवटंच आलाय. बदलीच्या मरणाची निवड केल्यानं का होईना, देह मरतच चाललाय. एकच अखेरचं पाऊल राहिलंय. की देहजिवाची ताटातूट! त्यासाठी मला काहीसं पुढं जाणं भाग आहे. मरण माझा प्राण अकाळी घेऊ पाहात आहे. माझ्या बापाच्या परवानगीशिवाय मी त्याला होकार कसा देणार? बापाशी मला बोललंच पाहिजे. उपासनेच्या गंभीर गाभाऱ्यात मला एकट्याला आत गेल्याशिवाय गत्यंतर नाही. त्या परम पवित्रस्थानात गेल्याशिवाय माझी ही रहस्यपूर्ण उपासना पुरी होणारच नाही. ‘तुम्ही राहा इथं अन् माझी सोबत करीत जागत राहा.’
झालं. गेथशेमानेचा दुसरा टप्पा संपला. शिष्यांनी येथवर काय केलं पाहू. त्यांनी एक शब्दही काढला नाही. हे प्रकरण नेमकं काय चाललंय, त्यांच्या ध्यानातही आलं नाही. प्रभूनं स्पष्ट सांगण्यात कसूर केली नव्हती, तर शिष्यांनीही त्याला अंतर देणार नाही अशी ग्वाही दिली होती (मार्क १४:३१). पण जेव्हा वेळ आली तेव्हा या मुलखावेगळ्या प्रार्थनेची, उपासनेची ही अजब तऱ्हा पाहून ते गोंधळून गेले होते. माणूस संकटात सोबतीची अपेक्षा करतो. हा तर सोबत सोडून हळूहळू गडद सावलीच्या आश्रयासाठी अधिक दाट अंधारात प्रवेश करीत आहे. त्यांच्या दृष्टीनं हे किती कमालीचं विलक्षण होतं ते पाहा. मग तुम्हाला त्यांचं हे करणं इतकं विलक्षण वाटणार नाही. त्यांना एकच करता आलं. त्यांना निष्क्रिय सोबत, शांत सहवास त्याला देता आला. तेवढं त्यांना सर्व विलक्षण वाटूनही त्यांनी केलं.. त्याला सोडलं नाही. नेमून दिलेल्या अंतरावर बसून राहिले. त्यांच्याविषयी लहानसाच पण अर्थपूर्ण निर्देश आला आहे, ‘ते त्याच्या मागं मागं गेले’ ( लूक २२:३९).
प्रियांनो एवढं जरी केलं तरी पुरे आहे. कितीदा तरी प्रभूच्या कितीतरी कृती आपल्याला विलक्षण वाटतात. समजता समजत नाहीत. पण शांत तर राहता येईल! निष्ठा अभेद्य, कायम ठेवता येईल! तो आहे ना बरोबर? नसेना का शरीरानं जवळ! यात ठिकाणी फारच फार जड जातं आपल्याला. त्याची शारीरिक समक्षता आपल्याला हवी असते. आपण माणसं आहोत. तो आता तर शरीरानं जवळ नसतोच नसतो. पण म्हणून हताश होऊ नका. तो फारसा दूर नाही. धोंड्याच्या टप्प्याइतकाच दूर आहे. त्यामुळं आमची गेथशेमाने बाग आम्हाला अधिक भेडसावणारी, दडपून टाकणारी, एकटं वाटायला लावणारी, त्यानं सोडून दिलंय असं वाटायला लावणारी असते. पण ‘भिऊ नका.’ निराश होऊ नका. तो हाकेच्या अंतरावर आहे. विशेष समाधानाची बाब म्हणजे आमची कायमची सुटका व्हावी म्हणून तो प्राणांतिक प्रार्थनेमध्ये, आमच्यासाठी रहस्यमय उपासनेमध्ये, याजकीय कामामध्ये गढलेला आहे. काळोखानं लपेटल्यानं तो आपल्या डोळ्यांना दिसत नाही. पण तो आहे ना तिथं…प्रत्येक एकेकासाठी परिणामकारक मध्यस्थीच्या प्रार्थनेत तो व्यस्त आहे.
आपल्याला एकटेच टाकले आहे असं समजणाऱ्या बंधो, वेदनेनं विव्हळणाऱ्या बहिणी, धीर नको सोडू. तो तुझ्या जवळच आहे, तुझ्यासाठी प्रार्थना करीत आहे. हताश होऊ नको. तो तिथं खास आहे. त्याच्याबरोबर राहा, त्याच्या मागून जा. तो नेईल तिथं पावलावर पाऊल टाकून जा. तो सांगेल तेथे बैस. प्रार्थना कर. जागत राहा. त्याच्या अदृश्य, अवघड पण समाधानपूर्ण संगतीत राहा.
( पुढे चालू)
Social