नवम्बर 9, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

गेथशेमाने बाग

लेखांक ४                                         

(२) प्रार्थनेचा अर्थ
: उपासना.

उपासनेचा ख्रिस्ती अर्थ: देव मानवाची भेट. दोघांची देवाणघेवाण. त्यानं देवपण द्यायचं, मानवानं ते घ्यायचं. देवाची तारणाची योजना… तारण म्हणजेच देवपण. देवानं द्यायचं, मानवानं घ्यायचं. हा जिव्हाळा.. प्रीतीचा सहवास.. हा सोहळा म्हणजे उपासना. देवाचं देवपण घेऊन देवाच्या प्रतिमेचं होणं म्हणजेच उपासना होय. देवाचं देवपण स्वीकारण्यानं, देवाच्या या देणगीला होय म्हणण्यानं, स्वत:च्या निवडीनं त्याचा पत्कर करण्यानं ते प्राप्त होतं. मानवानं दिलेल्या वस्तू देवाला प्राप्त होणं ही उपासना नव्हे. ही तर अगदी कनिष्ठ उपासना होय. पण देवाच्या देवपणाची प्रतिमा स्वीकारणं …अंशत: देव होणं… ही उदात्त उपासना होय. आमचा स्वेच्छेनं झालेला परिपूर्ण असलेला प्रतिनिधी येशू, हा मानवजातीचा मान्यवर भाऊ, या दृष्टीनं मानवी देहासारख्या पातकाच्या देहानं देहधारी होऊन, आपल्याला अनंतकाळ त्याच्यासोबत राहता यावं म्हणून आला. त्यासाठी तो आम्हाला लायक करणारं त्याच्या देहाचं पूर्णपण या उपासनेत बहाल करतो. तिथं मानवी इच्छेच्या संमतीशिवाय देवमानवाची देवपणाच्या देवघेवीची ती यांत्रिक कृती नसते. त्यासाठी प्रभूला तीन वेळेस प्रार्थना का करावी लागली याचं रहस्य समजून घेऊ.

(३) प्रार्थनेच्या ३ पायऱ्या – त्या तीनही पायऱ्या चढत असता प्रभू मनुष्य या नात्यानं पूर्णपणे परीक्षेमध्ये पारखला जात आहे, हे ध्यानातून जाऊ देऊ नका. त्यानं मानवी देह धारण केला आहे. तो थेट पातकाच्या देहासारखा आहे. सैतानाचा आकस्मित हल्ला त्या देहावर झाला असता सैतानानं सुचवलेल्या त्या मरणातून, त्या प्याल्यापासून बापानं आपली सुटका करावी अशी त्याची मागणी आहे. सैतानाच्या घातकी हल्ल्यानं झालेली घालमेल त्याला शांत करायला हवी आहे. आपल्या इच्छेच्या निवडीनंच त्याला विजय प्राप्त करायचा आहे. तो कसा, केव्हा प्राप्त झाला, ते पाहू.

प्रार्थनेची पहिली पायरी – शिष्यांपासून धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर झाला आहे. गुडघे टेकले आहेत. आणि आपल्यावर अकस्मात आलेल्या मरणाविषयी तो आपल्या बापाशी बोलत आहे. मत्तयानं प्रार्थनेच्या तिन्ही पायऱ्या  दिल्या आहेत. पण मार्कानं अधिक निर्भिड, खुलासेवार अशी आम्हाला उपकारक माहिती दिली आहे. त्या रहस्यपूर्ण पायऱ्यांवर त्याच्या विनंतीत कसा फरक पडत गेला हे आपण लक्षपूर्वक पाहू. त्या वरवर इतक्या सारख्या दिसतात की अर्थाच्या दृष्टीनं त्यात होत गेलेला फरक व आध्यात्मिक मोल सहज लक्षात येत नाही. काय बरं तो म्हणत आहे?
“जर शक्य असेल तर माझ्यावरून ही घटका टळून जावो” (मार्क १४:३५).
किती सरळ, उघड, खरंखुरं, झालं तसं लिहिलंय हे! या साध्या दिसणाऱ्या विनंतीचा काय बरं अर्थ? संपूर्ण आयुष्यभर आपल्या बापाच्या इच्छेप्रमाणं वागणारा, त्याला संतोष देणारा देवाचा पुत्र एकदाच इथं बापाच्या इच्छेविरुद्धची इच्छा करतो आहे. काय आहे त्याच्या या स्पष्ट विनंतीचा अर्थ? ‘घटका’ व ‘प्याला’ हे समानार्थी शब्द नाहीत. ‘ घटका’ म्हणजे अकाली, सैतानाच्या फसव्या सूचनेप्रमाणं घडवून आणलेलं, मरणाच्या मालकाकडून आलेलं हे अयोग्य, अवकाळी मरण. ते टळून जावं म्हणून ही स्पष्ट विनंती आहे.

त्यातला दुसरा वाक्यांश पाहा: “ जर शक्य असेल तर” म्हणजे शक्य आहे की नाही हे प्रभूला माहीत नाही. त्याच्या देवपणाला धक्का लावणारी ही जर..तर ची भाषा स्पष्टच आहे. त्याला म्हणायचंय, मला शक्य अशक्य कळत नाही. पण तुला शक्य असेल तर, मला नाही. पण तुझा संकल्प यावेळी मला समजत नाही. तुला शक्य असेल तर ही घटका माझ्यापासून टळून जावो. म्हणजे मनुष्य या नात्यानं तो ही  परीक्षा देत आहे, हे प्रकाशाइतकं स्पष्ट दिसत आहे.

प्रियांनो! आपल्यासाठी किती उपकारक आहे बरं हे! “ तो सर्व प्रकारे आमच्यासारखा पारखला होता” ( इब्री ४:१५). “ज्याअर्थी त्यानं स्वत: परीक्षेचं दु:ख भोगलं त्याअर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे” (इब्री २:१८).

स्फटिकाप्रमाणं देवपणा व ढगाळलेली मानवता एकत्र कशी राहतात? हे एक रहस्यच आहे. म्हणजे ख्रिस्तचरित्रातच नव्हे तर संपूर्ण जिण्यामध्येच ते खरं आहे. आम्हाला ते रहस्य समजत नाही म्हणून ते अस्तित्वातच नाही का? आहे तर, त्याशिवाय जिणं हे जिणं होणारच नाही. मग ते आपल्याला निखालस न समजणारं, संपूर्ण अंधारच आहे का? नाही हो… जिण्याला पुढं जाण्यास उपयोगी पडेल एवढा अर्थप्रकाश तिथं आहेच आहे. जेव्हा एखादं उदाहरण सुटत नाही, पाठ काव्यातला एखादा शब्द आठवत नाही तेव्हा काय बरं होतं ? मानवी मनाचं अशक्तपण, दुर्बल देहातील विस्मरण, स्वच्छ स्मृती अल्पकाळ तरी विस्मृती नष्ट करते. प्रभूच्या स्फटिकासमान असलेल्या देवपणाला त्याच्या देहधारी मानवतेनं मुद्दामच वावर करू दिला नाही. आम्हा गरजवंत पातक्यांच्या संपूर्ण उद्धारासाठी देहधारी मानवतेनंच ही परीक्षा द्यायची असं प्रभूनं जाणून बुजून ठरवलं होतं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. ही परीक्षा त्याच्या देहधारी मानवतेची, अजाण अपूर्णतेचीच होती यात शंकाच नाही.

आता आपल्या बापाची इच्छा सर्वदाच पुरी करणाऱ्या पुत्रानं या एकाच वेळी आपल्या इच्छेप्रमाणं करण्याची इच्छा केली हे खरं आहे. तिथं आपल्याला त्याच्या मानवतेचं पूर्ण प्रकटीकरण झालेलं दिसतंच. पण त्याच्या सततच्या आज्ञापालनालाही खंड पडलेला नाही हे पण तितकंच स्पष्ट दिसतं. त्याच्या शरीर, मनात ते सर्रास सहजतेनं वस्ती करून आहे. ‘जर शक्य असेल तर…’ या वाक्यांशातून ते आढळून येतं.

पुढच्या विनवणीत तो म्हणतो, “अब्बा, बाप्पा.. माझ्या बाप्पा.. तुला सर्व गोष्टी शक्य आहेत.” हे स्पष्ट झाल्यावर त्याच्या विनंतीतील दु:ख तुमच्या लक्षात येईल. त्याचं स्फटिकाप्रमाणं असलेलं देवपण क्षणमात्र मानवतेनं लपेटलं आहे. देहावर सैतानी सामर्थ्याचे सर्व विनाशी पण सूक्ष्म आघात होत आहेत. बापाच्या उत्तरासाठी, अनुमतीसाठी, इच्छा प्रगट होण्यासाठी जीव मध्येच लटकला आहे. संमतीसाठी सूचना देणारं मरण समोर उभं राहिलं आहे… बापाचं उत्तर नाही. पाहिलात, त्याच्या देहमनावर पडलेला ताण? ही तगमग? आश्चर्याचे अव्याहत आघात? कासावीसतेचा कडेलोट? स्वर्ग निखालस शांत, नि:शब्द! बाप अजूनही अबोल! त्यासाठी तो पुन्हा अत्यंत आग्रहानं अरेमिक मायबोली भाषेत अधिक कळवळून जिव्हाळ्याची ‘अब्बा, बाप्पा’ हाक मारतो. म्हणतो, “तुला सारं शक्य आहे… मग ? हा प्याला, तुझ्या क्रोधाचा, बदलीच्या कमाल शिक्षेचा, हा प्याला दूर कर माझ्यापासून”… अद्याप उत्तर नाही बापापासून! तरी पाहिलंत त्याचं अभेद्य आज्ञापालन? “मी ज्याची इच्छा करतो, ते नको तर ज्याची इच्छा तू करतोस, ते होऊ दे.” अद्यापही स्वर्ग संपूर्णपणे शांत. आता त्याला अस्वस्थता असह्य होते. जीव टांगलेला असता तसाच उठतो. शिष्यांच्या सोबतीसाठी त्यांच्याकडं धाव घेतो.

पण तिथं काय? सारा अंधारच. ‘येऊन पाहातो, तो ते झोपी गेले आहेत.’ तळमळून तो पेत्राला हाक मारतो,  “शिमोना!” शिमोन या नावाचा अर्थ ऐकणारा. प्रभूनं केलेली विनंती त्यानं ऐकली मात्र… पण त्याप्रमाणं कृती केली नाही. अव्वाच्या सव्वा अघळपघळ आणभाक मात्र केली होती. “साऱ्यांनी सोडलं तरी मी तुला सोडणार नाही.. तुझ्यासाठी जीव देईन आपला”… अन् आता तर डाराडूर झोपलाय. “शिमोना, शिमोना, झोपी गेलास काय?” त्याची टांगल्या जिवाची तळमळ येथे परत दिसते आपल्याला! “एक घटका देखील जागण्याची शक्ती नाही का तुला”…(मार्क १४:३७)?

तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करणंही चालू द्या अन् जागणंही चालू द्या. त्याच्या दु:खाच्या कमालीतही त्याला त्यांचीच काळजी… आत्ताची, पुढची, साऱ्या आयुष्यभरची! ह्या तिघांपासून त्या आठांपेक्षा त्याची अधिक अपेक्षा होती. पण गळू लागले ते एकेक, एकेक…पण अद्याप नाही संपलेलं… अखेरीस तो एकटा, एकटाच.. न्यायनिष्ठुर कठोर बापाच्या समक्षतेत तो एकटाच राहणार आहे. त्याचा पुढचा स्पर्श किती सुंदर, अल्हादकारक आहे पाहा. झोपेमुळं ऐकण्यास ते जवळ जवळ असमर्थ आहेत.
तरी तो त्यांना म्हणतो, “आत्मा उत्सुक आहे.. पण .. देह अशक्त आहे” (मार्क १४:३८). त्याच्या भेदक दृष्टीला त्यांच्या देहाच्या दुर्बलतेतून त्यांचे उत्साहपूर्ण उत्सुक आत्मे दिसतात. त्याची सोबत करण्याचा त्यांचा आतला उत्साह त्याला दिसतो. तो ते मान्य करतो. त्यापुढं त्यांचं झोप घेणं तो मनावरच घेत नाही. त्यांच्या आणि आमच्या देहाची दुर्बलता त्याच्या शोधक, सर्वज्ञ देवदृष्टीला दिसते. तिथं ती रुजू होते. मात्र त्यांच्या ज्या सोबतीला त्याचा जीव आसुसलेला होता, ती त्याला नाहीच प्राप्त होत. त्याचा जीव तसाच टांगलेला राहातो. त्याचं दु:ख त्याला तसंच दडपून टाकतं. जड पावलांनी त्याच खिन्न मन:स्थितीत तो परत आपल्या प्रार्थनेच्या जागी येतो. ‘प्रार्थना करा’ म्हणून इतरांना बजावणारा स्वत: समाधानासाठी, सोडवणुकीसाठी, त्याच आपल्या प्रार्थनेच्या जागी येतो. तोच स्वर्गातून आलेला एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडतो. जिवात जीव येतो त्याच्या… आत… देहात…त्याला सामर्थ्य येतं. येथे थांबू या.

(पुढे चालू)

Previous Article

गेथशेमाने बाग

Next Article

गेथशेमाने बाग

You might be interested in …

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर   प्रकरण १ले देवाच्या वचनाशी […]

डॅा. ॲलेक्झांडर डफ

(१८०६ -१८७८) लेखांक १९ १८४३ च्या सुमारास स्कॅाटलंडच्या स्कॅाटिश मंडळीत एक शोचनीय घटना घडली. मिशनकार्याला सहकार्य करणारे धार्मिक वृत्तीचे अनेक पाळक, सुवार्तिक व थोर लोक आपली स्कॅाटिश मंडळी सोडून फ्री चर्चला जाऊन मिळाले. ही बातमी […]

माझा पुनर्जन्म नक्की झाला आहे का? विल्यम फार्ली

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जी व्यक्ती माझा पुनर्जन्म झाला आहे असा दावा करते ती ख्रिस्ताची खरीखुरी अनुयायी असते. लाईफ वे रिसर्च या संस्थेने २०१७ मध्ये एक सर्वेक्षण केले. त्यात त्यांना आढळले की अमेरिकेतील २४% […]