(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा )
(७) माझ्या दु:खांतून वाटचाल करताना माझा देवावर जो विश्वास आहे तो कितपत’खोल’आहे हेही मला कळून चुकले.मला हे उमजले नाही की माझ्यावर एवढा मोठा आघात का झाला. माझ्या मनांत अनेक प्रश्न होते परंतु जसजसे देव मला त्याच्या वचनांव्दारे हे दाखवू लागला की त्याला या बाबतची पूर्ण माहिती आहे की आम्ही कधी, कोठे व कसे या जगातून प्रस्थान करणार आहोत. आमचे या वर काहीही नियंत्रण नाही! आमचा समज असेल की आमच्याकडे अजून ‘पुष्कळ वेळ’ आहे, परंतु कदाचित आम्ही आमच्या जीवनाच्या अगदी ‘सीमारेषेच्या दोरीजवळ’ पोहोचलेले असू! वास्तविक पहाता तोच आम्हाला या जगात ‘घेऊन आला’ व तोच आम्हांला या जगातून ‘घेऊन जाणार’! आम्ही सर्व या जगांत ‘एकटे आलोत’ व या जगांतून ‘एकटेच परत जणार’! ही वस्तुस्थिती मला माझा प्रत्येक दिवस जणुकांही माझ्या जीवनाचा ‘शेवटचा दिवस’ आहे अशा विचाराने प्रतिदिन येशूसाठी जगण्यासाठी मला आव्हान करीत आहे तसेच प्रेरित करत आहे.
“मी गर्भात पिंडरूपाने असतांना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले; आणि माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी ते किती आहेत हे सर्व तुझ्या वहींत नमूद करून ठेवले होते ” (स्तोत्र १३९:१६ ).
(८) या अनुभवांव्दारे मी हेही शिकलो आहे की आमचे हे पृथ्वीवरील जीवन क्षणभंगूर आणि तात्पुरते असे आहे व फक्त देव आणि त्याची अभिवचने हीच सर्वकाळ ‘टिकून’ रहातील. दररोज जेव्हा आम्ही आमच्या अशक्तपणातून, असह्यतेतून, आजारपणामधून व जीवनाच्या ‘तोट्यातून’ जात असतो त्या वेळेस मृत्यूच्या सावल्या अधिकाधिक आमच्या जवळ येत असतात व या सर्वाचा शेवट आमच्या मृत्यूमध्ये होतो! परंतु जरी मी अशाप्रकारे या सर्व परिस्थितीतून जात असलो तरी माझ्या देवाने मला अभिवचन दिलेले आहे की तो नेहमी मजबरोबर राहील, आणि जरी ‘हे कसे’ हे मला नीट उलगडत नसले तरी हाच विचार मला एक फार मोठी ‘हमी’ देतो आणि माझ्या हृदयांत ‘शांतता’ प्रस्थापित करतो. मला हेही समजून येत आहे की आम्ही कधीही देवाला पूर्णपणे ‘समजू’ शकणार नाही कारण असा प्रयत्न करण्याऐवजी देवाची आमच्यासंबंधीची इच्छा आहे की आम्ही त्याच्यावर ‘पूर्ण विश्वास’ ठेवावा!
“मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्ठाला भिणार नाही, कारण तू मजबरोबर आहेस ” (स्तोत्र २३: ४ अ ).
(९) माझ्या परीक्षा आणि दु: खे मला आपल्या ‘स्वर्गीय पित्याला ‘ भेटण्यासंबंधी अधिकाधिक तयार करीत आहेत. मी ह्याही गोष्टीची अपेक्षा करत आहे की जसा आपल्या ‘स्वर्गीय पित्याला भेटण्याचा आनंद मी अनुभवेन तसेच मी माझ्या पत्नी रीटाला, माझ्या आई-वडीलांना, भावाला आणि इतर प्रियजनांना देखील भेटीन! आणि हे आश्वासन स्वत: प्रभू येशूने आम्हाला दिलेले आहे व त्यामुळे आम्ही, ज्या लोकांना अशी ‘आशा’ ( प्रभू येशू ख्रिस्तामध्धे ठाम खात्री) नाही, अशांसारखे शोक करीत नाही. आणि आम्ही ज्या आशेवर विश्रास ठेवतो ती आमची आशा प्रभू येशूच्या क्रूसखांबावरील मरण आणि प्रभू येशूचे पुनरुत्थान यावर आधारलेली आहे!
“ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे ह्या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे” (योहान ३:३३ ).
“……ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अश्या बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्र्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्याव्दारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील……. आणि जे ख्रिस्तात मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.”(१थेस्स. ४:१३ अ, १४, १६ ब आणि १६)
(१०) गत सर्व गोष्टींकडे सिंहावलोकन करत असता, देवाने मला दाखवून दिले आहे की:
(अ) आम्ही आमच्या वैवाहिक जीवनामध्ये : –
आदर (अवमान नाही), नम्रता (बंडखोरपणा नाही), सौम्यता ( निष्ठूरता नाही), संयम (चिडचिड नाही),
क्षमाशीलता (क्षमा न करणे नाही) या सर्वांची पेरणी केली पाहिजे !
“आमच्या जीवनात ज्या व्यक्ती आमच्यासाठी फार महत्वाच्या। मौल्यवान असतात त्या कदाचित ‘सर्वोत्तम‘ अथवा ‘सर्वात परिपूर्ण‘ म्हणून गणल्या जाणार नाहीत परंतु अशा व्यक्ती असतात ज्यांना आमची काळजी असते आणि काहींही झाले तरी, त्याआम्हांजवळच राहतात.”
(ब) आम्ही आमचा वेळ जास्तीतजास्त स्वतःच्या पत्नीबरोबर/ पतिबरोबर व तसेच दुसऱ्या प्रियजनांबरोबर व्यतीत करावा कारण आम्ही त्यांच्याबरोबर आणि ते आमच्याबरोबर कायमचे असणार नाहीत! आम्ही एकदुसऱ्याशी जास्त प्रेमाने संभाषण केले पाहिजे व शक्य असेल त्या त्या वेळेस त्यांना प्रेमाने आलिंगन दिले पाहिजे. कारण हेच ‘धन’ आम्ही त्यांना आमच्या पूर्ण अंत:करणाने देऊ शकतो आणि त्यासाठी आम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागत नाही!
“आम्हाला आमच्य़ा जीवनांतील ‘विशेष व्यक्ती‘ सापडण्यास एक मिनिट लागते, तिची प्रशंसा करण्यास एक तास लागतो, तिच्यावर प्रेम करण्यात एक दिवस लागतो परंतु नंतर तिला विसरण्यासाठी पूर्ण जीवन लागते!”
- आम्ही एकत्रपणे घालविलेला आमच्या चांगल्या वेळा आमच्यासाठी चांगल्या आठवणी होतात आणि आमच्या कठीण वेळा आमच्यासाठी ‘चांगले धडे’ होतात!
“My darling Rita, I wish we could spend all good times over again!”
(ड) आम्ही आमच्या एकमेकातील संबंधांची य़ोग्य ‘किंमत’ केली पाहिजे. दीर्घकालीन संबंध विशेषतः जर तो ‘एक देह’ संबंध असेल, तर अशा संबंधांना ‘समाप्तीस आणणे’ करणे फार कठीण आहे! आणि देवाच्या वचनांशिवाय असे करणे अशक्यप्राय आहे. आमचा देव स्वतःएक ‘संबंध ठेवणारा’ देव आहे आणि त्याने आम्हांलादेखील ‘संबंध’ ठेवण्यासाठी निर्माण केले आहे जेणेकरून आम्ही त्याला ‘जाणावे!’
“(आपल्या प्रिय व्यक्तीला) ‘पकडून ठेवण्यात”कमी शक्ती लागते परंतु ‘तिला जाऊ देण्यात‘ भयंकर!”
(११) आमचे पाळक ख्रिस विल्यमस यांनी माझे सांत्वन करीत व मला उत्तेजन देताना लिहिले की ‘मी माझ्या भावना व माझ्या हृदयातील व्यथा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ‘बंधनात’ आणाव्या व पवित्र शास्त्राच्या शिकवणीव्दारे माझ्या मनाचे सतत ‘नूतनीकरण’ करावे. कारण जसजसे आम्ही आमचे गमावणे, दु: ख व वियोग सहन करीत त्यातून वाटचाल करू लागू तसतसे फक्त पवित्र शास्त्रात दिलेले सिद्धांत आमच्या जीवनात ‘सार्वभौम प्रकारे राज्य ‘ करू लागतील. तसेच आम्ही देवाच्या वचनांबरोबर वाद घालू नये व उलट त्यावर संपूर्णपणे अवलंबून रहावे. इतरांनी देखील मला संभाषणाव्दारे व लिहिण्याव्दारे सांगितले की मृत्यू हा जीवनाचा एक भाग आहे, दु: ख हे आमच्या मानवी जीवनातील अनुभव आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तआमच्या प्रियजनांच्या वियोगात आमच्याबरोबर सहानुभूती दाखवितो व आमचे सांत्वन करतो.त्यांनी मला प्रोत्साहन देत सांगितले की ‘मी जे कांही काम देवाच्या द्राक्षमळ्यात आधी करत होतो ते काम मीचालू ठेवावे!’
“यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका परंतु त्या ऐवजी तुमच्या मनाच्या नवीकरणामुळे तुमच्यात बदल होऊ द्या.यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा ” (रोम१२:२).
(१२) (अ) आज आपण सर्व विश्वासणारे अशी आशा करितो की नजीकच्या काळांत प्रभू येशूचे आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आगमन होणार आहे आणि आम्ही अशी आशा व प्रार्थना करूया कीही गोष्ट खरोखर आमच्या जीवनकाळात घडेल! येशूच्या शिष्यांची देखील हीच अपेक्षा होती की प्रभू येशूचे त्यांना स्वर्गात घेऊन जाण्यासाठीचे आगमन त्यांच्या जीवनकाळात घडेल! पण अशा ह्या आमच्या अपेक्षेमागे खऱे ‘मूलभूत’ कारण हे आहे की कोणालाही खरोखर मृत्यूला तोंड देण्याची इच्छा नसते,तर न मरण पावताच ‘सरळ स्वर्गात’ जाण्याची इच्छा असते! माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या ‘देवाघरी’ गेल्यानंतर या विषयावर विचार करीत असताना माझ्या मनात ही गोष्ट प्रकर्षाने आली की, जर येशूने त्याचे आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येण्याचे आणखी काही काळ लांबविले तर आम्ही सर्वजण मृत्यूमुखी पडू आणि अशा परिस्थितीत आम्ही खरोखर मृत्यूला तोंड देण्यास तयार आहोत काय?!
“कारण पुढच्या क्षणी काय घडणार हे माणसाला कळत नाही…… त्याचप्रमाणे माणूसही अचानक घडण्याऱ्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतो “(उपदेशक ९: १२ ).
(ब) प्रत्येक दिवशी आम्ही युद्धाच्या बातम्या / अफवा आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रातील अनेक निष्पाप ख्रिस्ती लोकांच्या छळ, यातना आणि निर्घृण हत्येबद्दल ऐकतो ववाचतो. आणि ज्या वेळी आम्ही प्रभू येशू साठी उभे राहतो, तेव्हा आम्हालाही या जगामध्धे एका किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या छळाला/ त्रासाला तोंड द्यावे लागण्याची संभावना असते. प्रभू येशूने देखील आम्हाला त्याच्या शांततेबद्दल अभिवचन दिले आहे परंतु छळ/ त्रास ‘यांचा सामना न करावा लागण्याबद्दलचे’ नाही!
“माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा. मी जगावर मात केली आहे “(योहान १६: ३३ ).
खरं पहाता येशू ख्रिस्ताचा प्रत्येक शिष्य त्याच्यासाठी ‘हुतात्मा’ झाला! जरी प्रभू येशूला त्याच्या शक्तीमध्धे, त्याच्या शिष्यांना छळ, यातना आणि मृत्यू यांच्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपल्या पित्याकडे प्रार्थनेव्दारे मागणे सहज शक्य होते तरी येशूने तसे केले नाही. परंतु त्याऐवजी त्याने आपल्या पित्याकडे त्याच्या शिष्यांचे’दुष्टापासून संरक्षण’ करण्याबद्दलची प्रार्थना केली. याचे कारण हे की ‘जसे तो या जगाच नव्हता’ तसेच ‘त्याचे शिष्यही या जगाचे नव्हते’!
“मी त्यांना तुझे वचन दिले आहे. जगाने त्यांचा व्देष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत. तू त्यांना या जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करत नाही,तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो” (योहान १७: १४ व १५ ).
मी विचार करीत असतो की माझी प्रिय पत्नी रीटा ही खरोखर देवाची ‘अनुग्रहित’ व्यक्ती होती कारण देवाने तिला आम्हांवर/ या जगावर येण्याऱ्या ‘भयंकर संकटाच्या’ काळाआगोदरच ‘आपल्याघरी’ बोलाविले. आणि आता तिला या पृथ्वीवर तिने घालविलेल्या आयुष्याच्या बाबतीत जास्त आठवणारच नाही!
“त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसांची फारशी आठवण येणार नाही, कारण देव त्याला त्याच्या मनातील आनंदामध्ये गुंतवून ठेवील.” (उपदेशक ५: २०)
“मागल्यांचे स्मरण रहिले नाही ……” (उपदेशक १:११ अ).
क्रमशः
Social