नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

लेखांक ३: कृपा आणि वैभव

ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव

स्टीव्ह फर्नांडिस

त्याने मानवी देह धारण केला. याचा अर्थ, आता ऐक्य आहे. म्हणजे एका व्यक्तीमध्ये दोन स्वभावांचे मीलन झाले आहे. यशया ७:१४ मध्ये म्हटले आहे ; ‘यास्तव प्रभू स्वत: तुम्हांस चिन्ह देत आहे: पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल.ती त्याचे नाव इम्मान्युएल ठेवील.’ कुमारीला पुत्ररत्न असलेले बालक होईल. तो इम्मानुएल म्हणजे ‘आम्हाबरोबर देव’ असा असेल. म्हणजे असे भविष्य केले होते की देव मानव होईल. बायबलमध्ये याविषयी कितीतरी भविष्ये  आहेत. आता येथे ऐक्य , मीलन झालेले दिसते. त्याने मानवी देह धारण केल्यामुळे त्याच्या मानवी स्वभावाचे व त्याच्या दैवी स्वभावाचे अशा या दोन स्वभावांचे मीलन झाले. ह्या दोन स्वभावांची सरमिसळ झाली नाही किंवा त्यांची परस्परांत गुंतवणूक झाली नाही . किंवा त्या दोघांमुळे एक नवीनच स्वभाव निर्माण झाला असेही घडले नाही आणि असे कधी ऐकलेही नाही. दोन्ही स्वभावांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचा संयोग झाला नाही. योहान ८:५८ मध्ये येशू स्वत:विषयी म्हणतो; ‘अब्राहाम झाला त्यापूर्वी मी आहे.’ तो खरे तर म्हणत आहे की –त्याचा जन्म ३० वर्षांपूर्वी झाल्याचे त्या लोकांना माहीत होते. त्यानुसार त्याला ३० वर्षांपूर्वी मानवी स्वभाव प्राप्त झाला , परंतु दुसरा स्वभाव त्याच्या ठायी अब्राहाम झाला त्यापूर्वीच होता. अब्राहाम झाला त्यापूर्वी मी आहे म्हणजे त्याच्या काळी २००० वर्षांपूर्वीही तो अस्तित्वात होता. तो एकच व्यक्ती आहे पण त्याच्या ठायी दोन स्वभावांचे ऐक्य, मीलन झाले आहे. तो दोन्ही स्वभावांमध्ये  राहून दोन्ही स्वभावांशी कृतिशील राहू शकतो, तरीही हे दोन स्वभाव कधीच परस्परांत गुंतून जात नाहीत. याचा अर्थ त्याला भूक लागते , तो खातो. आणि भूक लागली म्हणून जेवतो. तो तुमचे मन वाचू शकतो. तो थकून झोपतो. तो थकला होता म्हणूनच तारवात झोपला होता. तरीही तो उठतो आणि खवळलेल्या समुद्राला ‘उगा राहा आणि शांत हो’ म्हणताच समुद्रही अगदी निवांत होतो. येथे तो आपल्याला मानवी स्वभावाने तारवात झोपलेला आणि आजूबाजूला काय चालले आहे हे न समजल्याने कसलीही पर्वा न करणारा दिसतो. तो उठतो आणि भयग्रस्त कोळ्यांकडे पाहतो. त्या सरोवरावर या कोळ्यांनी आपले आयुष्य काढले होते. तो समुद्राला म्हणतो, ‘उगा राहा’ ; मग शिष्यांकडे वळून म्हणतो,  तुम्ही का भयभीत झालात? जणू तो म्हणतो, ‘तुम्हाला माहीत नाही का ,की मी झोपलेला असतो तरीही मी झोपलेला नसतो? मला झोप लागत नाही व मी डुलकीही घेत नाही?’ (स्तोत्र १२१). एका व्यक्तीने मला चिठ्ठी पाठवली की आज बिछान्यावर झोपण्यापूर्वी प्रार्थना कर कारण रात्रभर देवबाप जागा असणार आहे . ख्रिस्त त्याच्या दैवी स्वभावानुसार कधीच थकत नाही. आणि तुम्ही कोणत्या प्रसंगातून जात आहात याची त्याला पूर्ण कल्पना असते.

म्हणून खिस्ताच्या या दैवी व मानवी ऐक्यात हे दोन्ही स्वभाव भिन्न राखले आहेत. दैवी स्वभाव बदलू शकत नाही. तो निर्भय , निर्धास्त आहे. तो फिरून छायेत जात नाही. तो बदलत नाही. बायबल स्पष्ट करते की, दैवी स्वभाव म्हणजे देवाचा स्वभाव बदलत नाही. म्हणून ख्रिस्ताने देखील तो स्वभाव गमावलेला नाही. त्याच्या ठायी देवाचा स्वभाव असतोच. देवाचे सर्व गुणविशेष पूर्णत्वाने व परिपूर्णतेने त्याच्या ठायी आहेत.  त्याच्याच जोडीला तो मानवी स्वभावही बाळगतो.

कलसै. २:९ मध्ये पौल म्हणतो, ‘ख्रिस्ताच्या ठायी देवाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते.’ पौलाची भाषा काळजीपूर्वक लक्षात घ्या. ‘सर्व’ हा शब्द वापरण्याची त्याला आवश्यकता वाटली नाही. त्याच्या ठायी दैवत्वाची पूर्णता मूर्तिमान वसतेच . ‘पूर्णता’ म्हटले की तुम्हाला गरज वाटेल ते सर्व. तुम्हाला आणखी कशाची गरज नाही. ‘सर्व पूर्णता’ हे धार येण्यासाठी वापेलेले शब्द आहेत. ते ज्या गोष्टीवर भर देण्यासाठी वापरले आहेत , तो उद्देश आपल्याकडून निसटून जाऊ नये किंवा आपण तो चुकवू नये. जोर देऊन ठामपणे सांगण्याची ती एक पद्धत आहे. त्यानुसार तो म्हणतो की, दैवत्वाची सर्व पूर्णता म्हणजे दैवी स्वभाव त्याच्या ठायी त्याच्या ठायी म्हणजे त्या दैहिक स्वरूपाच्या शरीरात वसत होता. दैवी गुण पूर्णत्वाने त्याच्या ठायी त्या मानवी शरीरात वसत होता आणि सर्व गुणविशेष त्याच्या सेवेस हजर होते. ही किती नवलाईची बाब आहे ! म्हणूनच ख्रिस्ती व्यक्ती गीते गाते. कोणी म्हणतात, हे ख्रिस्ती लोक असे काय सतत गात असतात? आमच्या मंडळीविषयीही लोक असे म्हणतात. ते कसे बरे गायचे थांबतील? तुम्ही गाऊ लागेपर्यंत ते थांबणार नाहीत.चला वाजवा. हा महान अद्भुत तारणारा आला आहे. त्याने आम्हांला मुक्ती दिली आहे. त्याने आम्हांला सोडवले आहे. आम्हांला त्याच्याप्रीत्यर्थ गीते गायलाच हवीत! अशा प्रकारे आपण पाहतो की तो आपल्या एकाच व्यक्तिमत्वात हे दोन भिन्न स्वभाव जतन करतो. एकच व्यक्ती दोन्ही स्वभावांनिशी कार्यरत राहील. हे दोन स्वभाव विभक्त होऊ शकत नाहीत. ती पाण्याचा द्राक्षारस होण्यासारखी बाब नाही. मानवी स्वभाव भिन्न आहे आणि दैवी स्वभाव भिन्न आहे. तरी एकच व्यक्ती ते दोन्ही स्वभाव धारण करून कार्यरत ठेवते ही नवलाची बाब आहे! याचमुळे तो सर्वोच्च आणि स्तुतीस पात्र ठरतो. म्हणून पौल म्हणतो , ‘त्याला प्रथम स्थान आहे.’ यशया म्हणतो, ‘त्याला अद्भुत म्हणतील.’ आश्चर्ययुक्त-होय आश्चर्याने भरलेला! म्हणूनच त्याच्या एकमेव व्यक्तिमत्वाच्या रचनेमुळे तो असा गौरवी आहे.

त्याच्या अत्युच्च पदावरून त्याने केलेल्या मेहेरबानीमध्ये त्याचे गौरव. देव म्हटलेल्या परमोच्च पदावर असताना त्याने केलेल्या मेहेरबानीमुळे तो गौरवी ठरतो. फिलीपै २:५ मध्ये म्हटले आहे , ‘असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हांमध्ये ही असो. ह्या शास्त्रभागविषयी आपण लक्षात ठेवावे की आपण ख्रिस्ती या नात्याने स्वत:पेक्षा इतरांना श्रेष्ठ का मानावे व महत्त्व का द्यावे आणि स्वत:चेच हित पाहू नये, याविषयीचे स्पष्टीकरण ही वचने देतात (फिली.२:३,४ वाचा). वचन ५ व ६ मध्ये म्हटले आहे ‘असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हांमध्येही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानला नाही…’ स्वरूपाचा याचा अर्थ त्याच्या ठायी देवाचा पूर्ण स्वभाव वसत असून तो त्याच्या अंगी  होता. ही परिभाषा गौण व बाह्यात्कारी असलेल्या बाह्य स्वरूपापेक्षा अधिक संदर्भ देते. हे स्वरूप स्वाभाविक मूळ वास्तवता प्रतिबिंबित करते. या शब्दापासून रूपांतर  हा शब्द आपल्याला सापडतो. जसे  सुरवंटापासून फुलपाखरू तसे काहीतरी त्याच्या मूलभूत स्वभावात बदलल्या संदर्भात तो शब्द आहे . ख्रिस्त देवाच्या स्वरुपात होता . तो त्याचा मूळस्वभाव होता. हे वचन ६ व ७ मध्ये सिद्ध केले आहे. तेथे असे म्हटले आहे ‘देवासमान असणे हा लाभ असे त्याने मानले नाही तर त्याने स्वत:ला रिक्त केले.’ असा अनुग्रह करून उच्च पातळीवरून आपण खालच्या पातळीवर येत आहोत असे त्याने दाखवून दिले. त्यातून त्याची नम्रता प्रदर्शित होते. जरी तो खरोखर देव होता, अमर्याद वैभवी परमोच्च पदी होता , तरी आपण देवासमान आहोत हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वत:ला रिक्त केले. आणि मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले . देव असण्यापासून त्याने स्वत:ला रिक्त केले नाही . देव म्हणून त्याच्यामध्ये काहीही फेरफार होऊ न शकणारा व न बदलणारा असा तो आहे . देव असे स्वत:ला सादर करण्यापासून व देव म्हणून कसलीही भक्ती स्वीकारण्यापासून त्याने स्वत:ला रिक्त केले. थोडक्यात सांगायचे म्हणजे त्याने आपल्या गौरवावर आच्छादन घेतले.

आता  त्याच्या अनुग्रहामुळे  वरच्या पातळीवरून खालच्या पातळीवर आगमन करण्याच्या त्याच्या थोर कृतीमागे आपण त्याची प्रेरणा पाहतो. वचन ७ म्हणते की ‘त्याने स्वत:ला रिक्त केले’ त्यात त्याने स्वत: पुढाकार घेतला. त्याच्यावर कोणतीही गोष्ट बळजबरीने लादण्यात आली नाही . त्याने गरजेपोटी काही केले नाही. ते त्याच्या अंतर्यामातून स्फुरले. अत्यंत दीन, क्षुल्लक आणि अपात्र अशा मानव प्राण्यांसाठी त्याच्या प्रीतीने व दयेने गळ घालून सक्ती केली. ही त्याची प्रेरक शक्ती होती. कृपा बहाल करून उच्च स्थानावरून नीच स्थान धारण करण्यामधील त्याची तेजस्वी व उच्च गुणवत्ता लक्षात घ्या. तो देवाच्या स्वरुपात होता म्हणजे त्याच्या अस्तित्वाच्या संपूर्ण गाभ्यात पूर्णपणे त्याच्या ठायी देवाचा स्वभाव वसत होता आणि व्यक्त होत होता. आपले स्थान आणि त्याची परमोच्च अवस्था यामध्ये अमर्याद अंतर आहे. अमर्याद याचा अर्थ अतुलनीय किंवा प्रमाणाबाहेर . तुम्ही कशाशी तुलना करायची म्हटल्यास तुलना करण्याजोगे काहीतरी कायदेशीर अस्तित्वात असायला हवे ना ! तुम्ही थोर खेळाडूंमध्ये तुलना करू शकता. पण एका महान बास्केटबॉल खेळाडूची जो बॉल हाताळूही शकत नाही अशा व्यक्तिशी तुलना करू शकत नाही. किंवा एखाद्या फुटबॉल खेळाडूची जो पळूही शकत नाही अशा व्यक्तिशी तुलना करू शकत नाही. काही बाबतीत आपण तुलना करूच शकत नसतो. तो इतका अमर्याद वा आपल्यापेक्षा इतक्या मोठ्या उंचीवर आहे की बायबल सांगते की त्याची कशाशीच तुलना होऊ शकत नाही. आपली सर्व थोरवी त्याच्यासमोर काहीच नाही. यशया म्हणतो की राष्ट्रे त्याच्यासमोर बादलीतील बुडबुड्याप्रमाणे आहेत. ती त्याच्यापुढे किडे किंवा टोळांसमान आहेत. त्याच्या तुलनेसाठी प्रमाणच नाही. तो अमर्याद परमोच्च असा आहे.

तुम्ही पसिफिक समुद्रकिनाऱ्यावरील पर्वत रांगांची इतर डोंगरांबरोबर तुलना करू शकता . खरे तर त्यातील फारच थोड्या डोंगरांना खऱ्या अर्थी पर्वत म्हणता येते.  मध्य पश्चिमेचे लोक तिथे भेट देऊन आल्यावर म्हणतात, ‘वलेहो मधील डोंगर म्हणजे खरंच काही विशेषच आहेत.’ काही लोक असेही म्हणताना मी ऐकलंय की, ‘पर्वतराजीत वास्तव्य करण्यातील मजा काही औरच असते.’ कल्पना करा की वलेहो हे पर्वत राजीसाठी प्रसिद्ध आहे. मग मी त्यांना म्हणतो की ‘मी तुम्हाला सियेराला नेतो म्हणजे खरे डोंगर काय हे तुम्हाला समजून येईल.’ म्हणजे तुम्ही किनारपट्टीवरील डोंगरांची सिएराशी तुलना करू शकता. पण तुम्ही सिएराची हिमालयाशी तुलना करू शकत नाही. माउंट व्हिटनाची देखील हिमालयाशी तुलना होऊ शकणार नाही. पण मग तुम्ही अवकाश यानात बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घातली तर एकही डोंगर तुमच्या दृष्टोत्पत्तीस पडणार नाही. मग एकाची दुसऱ्याशी तुलना करताना फारसा लक्षात येणार नाही.  तेथून पृथ्वीचा गोल सपाट वाटतो.देव म्हणतो, ‘तुम्ही माझी कोणाशी तुलना कराल? सर्व राष्ट्रे तर बादलीतील बुडबुड्याप्रमाणे आहेत. काही प्रमाणच नाही. आणि बायबल सांगते की आपल्याकडे नजर टाकायला त्याला लवून वाकून झुकावे लागते.केवळ पृथ्वीवर येणे एवढेच त्यात अभिप्रेत नाही.तर आपली दखल घेणे  ही गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. ते ही कोण थोर व्यक्तीसाठी खाली झुकून वाकणे नव्हे तर आपल्या सारख्यांची दखल घेण्यासाठी खाली झुकून तो वाकतो ना? कोणा थोर व्यक्तीला आपण  आहोत याची कल्पनाही नसेल  किंवा ते आपली दखलही घेणार नाहीत. त्यांनी येथे आपल्याजवळ येणे तर दूरच राहिले. देव म्हणतो आपली दखल घेण्यासाठी तो खाली झुकून वाकला यासाठी की त्याने एकट्याने आपल्याबरोबर राहावे.

स्तोत्र ११३ : ५,६ मध्ये म्हटले आहे,’परमेश्वर आमचा देव याच्यासारखा कोण आहे? तो उच्च स्थानी सिहासनारूढ आहे.तो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लवतो. स्वर्ग पृथ्वीपेक्षा महान आहे . आणि तो म्हणतो की स्वर्गात काय चालले आहे याचे अवलोकन करण्यास तो नम्रपणे झुकून लवतो.आपण जे पतित पापी आणि बंडखोर अशा आपली तो किती दखल घेतो बरे! म्हणजे त्याचे हे आपल्यावर कृपा करून उच्च पातळीवरून नीच पातळीवर  येणे आणि झुकून लवणे किती थोर आहे ! हा वैभवी व्यक्तिमत्व असणारा आपली फक्त दखल घेतो असे नाही तर आपल्या बरोबर राहण्यासाठी येतो . आणि केवळ आपल्याबरोबर वसती करण्यासाठी येतो एवढेच नाही तर तो आपल्यापैकी एक बनतो असाच याचा नक्की अर्थ नाही का? किती अद्भुत गोष्ट आहे ही! मग आपले पाप व अपराध वाहून नेण्यासाठी त्याने वधस्तंभापर्यंत आज्ञापालन करून आपला प्राण दिला!

परमोच्च स्थानी असल्याने त्याच्या आपल्यामध्ये असणाऱ्या अमर्याद अंतरामुळे केवळ त्याच्या मेहरबानीने उच्चपदावरून नीच पदावर येण्यातील त्याची तेजस्वी गुणवत्ताच फक्त  दिसून येते असे नाही तर त्याच्या अमर्याद साठ्यामुळे आणि त्याच्या व्यक्तिमत्वातील अत्त्युमतेमुळे देखील ती दिसून येते. त्याला कशाचीच गरज पडत नाही. तो त्याच्या स्वभावविशेषांमध्ये आणि गुणवत्तेमध्ये परिपूर्ण आहे. तो कधीच दु:खी किंवा अतृप्त नसतो की ज्यामुळे त्याला कशाची तरी गरज पडावी. रोम ११: ३४-३५ मध्ये म्हटले आहे, ‘प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता? त्याला प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे?’ या वचनातील प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्याचा मंत्री कोण होता या शब्दप्रयोगाकडे लक्षपूर्वक पहा. देवाला कधीच पेच पडला नाही की त्याला सल्लामसलतीसाठी मंत्र्याची गरज भासावी. घडलेल्या घटनांमुळे तो कधीच गोंधळून गेला नाही व काय चुकले आहे असा प्रश्न त्याला पडला नाही.तो असे कधीच म्हटला नाही की ‘असे का घडले मला कळत नाही. त्याला कोणी सल्ला देण्याची गरज भासली नाही.त्याला अधिक माहिती समजण्याची निकड पडली नाही . त्याला काही शिकण्याची आवश्यकता वाटली नाही. कारण त्याला सर्व प्रकारचे पूर्ण ज्ञान आहे. त्याला अजिबात कशाचीच गरज भासत नाही.पुढे या वचनात म्हटले आहे , ‘प्रथम देऊन त्याची फेड मिळेल असा कोण आहे?’ दुसऱ्या शब्दात त्याला गरज वाटेल असे काही दुसऱ्या कोणाजवळ तरी आहे असे कधीच झाले नाही. त्याने अशी कोणतीही गोष्ट कोणाकडून प्राप्त करून घेतली नाही की ज्यासाठी तो त्या व्यक्तीचा ॠणी आहे. तो कुणाच्याही ॠणात नाही. त्याला कधी कशाची कमतरता भासली नाही किंवा तो कधी दु:खी झाला नाही अगर अतृप्त राहिला नाही की कोणाकडून काही प्राप्त करून घेण्याची त्याच्यावर वेळ आली नाही. उलट त्याला कशाचीच गरज पडत नाही. तो पूर्णपणे स्वसंतुष्ट , स्वयंपूर्ण असलेली व्यक्ती आहे आणि शिवाय आपल्याहून अमर्याद अशा परमोच्च उंचीच्या अंतरावर आहे.यामुळे ख्रिस्त थोर आणि गौरवी व्यक्ती ठरतो की नाही?

यामुळे आपण पुन: फिलीपै २ कडे वळू या. अनुग्रह करून परमोच्च पातळीवरून नीचावस्थेकडे येण्यास तो खाली आला, लवून नम्र झाला. ही वचने यामध्ये असणाऱ्या गौरवाविषयी बोलतात.

त्यामागे असलेल्या प्रेरक शक्तीने तो गौरवी ठरतो एवढेच  नाही तसेच त्याच्या तेजस्वीतेच्या पातळीने तो गौरवी ठरतो. एवढेच नाही तर त्याने आपल्या अस्तित्वाला जे वळण दिले त्यामुळे तो गौरवी ठरतो. फिलीपै२:६,व७ या वचनांमध्येपुढे म्हटले आहे , ‘त्याने स्वत:ला रिक्त केले म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले,’ एवढेच त्याला पुरेसे वाटले नाही म्हणून पुढे म्हटले आहे , ‘आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन म्हणजे प्रत्यक्षात मानव बनून पुढे त्याने स्वत:ला अधिक लीन व नम्र केले. ‘त्याने आज्ञापालन केले.’ आपल्या ऐवजी तो आज्ञाधारक बनला .आपल्या बंडखोरीच्या बदली तो आज्ञांकित झाला . ‘त्याने मरण आणि ते ही वधस्तंभावरचे मरण सोसले. एथपर्यंत त्याने आज्ञापालन केले.’

रोमी राजवटीत सर्वाना वधस्तंभाची कल्पना होती. ते अत्यंत अटल गुन्हेगार पुरुषाला वधस्तंभी देत. तो आकाश आणि भूमीच्या मध्ये अधांतरी टांगला जाई. अत्यंत अधम गुन्हेगार असल्याने देवाने त्याच्यावर प्रहार केला आहे असे समजले जाई. (यात अद्भुत , थोर व गौरवी सत्य आहे. ) हे गुन्हेगार इतके दुष्ट व अधम असत की  त्यांना नगरच्या बाहेर तटबंदीच्याबाहेर नेऊन ठार करण्यात येई. ख्रिस्ताला नगराबाहेर अत्यंत अधम गुन्हेगार लेखून ठार करण्यात आले.

आपण किती नम्र असायला हवे  ; किती सहनशील असायला हवे; किती दयाळू असायला हवे ; त्याच्यावर किती विश्वास ठेवणारे असायला हवे ,त्याचा किती आदर व सन्मान करण्याची इच्छा बाळगणारे असायला हवे . यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना या संपूर्ण प्रसंगी त्याने आपला दैवी स्वभाव जतन केला. त्याने जेव्हा स्वत:ला रिक्त केले  तेव्हा त्याने आपल्या देवत्वाचे सादरीकरण करण्यापासून , देवत्व दर्शविण्यापासून स्वत:ला रिक्त केले. योहानाच्या शुभवर्तमानातही गोष्ट प्रकर्षाने दिसून येते.उदाहरणार्थ यहूदी लोक जेव्हा येशूला दगडमार करायला निघाले तेव्हा त्याने त्यांना प्रश्न केला,’मी पित्याची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांस दाखवली आहेत त्यातल्या कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता? यहुद्यांनी उत्तर दिले, चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही तर दुर्भाषणासाठी कारण तू मानव असून स्वत:ला देव म्हणवतोस यासाठी’ (योहान १०: ३२,३३). तो देव असूनही त्याच्याकडे त्यांनी केवळ मानव म्हणून पाहिले. त्याच्या ठायी असलेले गौरव त्याने पाहिले नाही. त्यांना त्याच्यामध्ये काही गौरवी असे काहीच आढळले नाही.आजही हे सत्य आहे.ख्रिस्ती जनांना तो मोलवान वाटतो.पण इतर जे त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत, अशांसाठी तो अडखळण्याचा धोंडा आहे. ठेचाळण्याचा खडक आहे.त्याच्या ठायी त्यांना काहीच आढळत नाही.. फार तर त्यांच्या दृष्टीने तो दुसरा एक महंमदच आहे. पण ज्यांना पाहणारे नेत्र प्राप्त झाले आहेत , ज्यांना आकर्षून घेण्यात आले आहे आणि ज्यांची खात्री पटली आहे ; त्यांच्यासाठी मात्र तो गौरवी आहे.तो गौरवी असण्या पलीकडचा आहे. खरे तर ख्रिस्ती जीवनात या गौरवाची झलक रोज वाढत्या प्रमाणात दृष्टीस पडत राहते. म्हणूनच त्याच्या अस्तित्वाने घेतलेल्या वळणामध्ये त्याचे गौरव आहे. त्यामध्ये तो मानव झाला आणि गुन्हेगाराचे मरण त्याने स्वीकारले. ही त्याची स्वत:ला नम्र करण्याची कृती आहे. हे करीत असता त्याने आपले गौरव बाजूला ठेवले. मानवत्व धारण करण्याची ती कृती होती. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर तो स्वत: जे नाही ते तो झाला. पण हे करीत असता तो जे होता ते त्याने सोडले नाही अगर थांबवले नाही. हेच त्याच्या परमोच्च स्थानावरून लवून खालच्या पातळीवर येणारे गौरव आहे.

Previous Article

एका कडक थंडीच्या  तुरुंगातील नाताळ

Next Article

यावर विचार करा

You might be interested in …

एकटे असणे आपल्याला का कठीण जाते

ग्रेग मोर्स एकटे असण्याची थोडीशी गैरसोय आणि माझ्या मनात विचार येतो : मी इथं काय करत आहे? इतकी वर्षांची परिचयाची माझी खोली बेढब आकार घेऊ लागते. शांतता, स्तब्धता प्रत्येक वस्तूला अनैसर्गिक दर्जा देऊ लागते. काहीच […]

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

लेखांक ७                       आपण पाहिलं की पवित्र शास्त्र वाचणाऱ्याला चांगल्या कामाकरता तयार करण्याचं काम करतं. आता ते काम पवित्र शास्त्र कसं करतं ते पाहू. विश्वासी व्यक्तिमध्ये चांगलं काम कोणतं ते पाहू. मार्क ७:३७ मध्ये एका चिमुकल्या […]

ख्रिस्तजन्म आणि घरी असण्याची आपली ओढ

गेरीट डॉसन स्कॉटलंडचा एक तरुण किनाऱ्यावर असलेले आपले घर सोडून समुद्रावरच्या सफरीला गेला. कुटुंबातील लोकांना  काहीही न सागता तो अचानक निघाला. सफरीच्या  त्याच्या ओढीने आपल्या आईवडिलांना आपले अचानक जाणे कसे वाटेल याचा विचारही त्याच्या मनाला […]