नवम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमचे दु:ख व्यर्थ आहे असे तुम्हाला वाटते का?

                                                                                                                                                         लेखक : रॅन्डी अॅलकॉर्न

मी नऊ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. समजा माझ्या पुस्तकातील पात्रांची  तुम्ही मुलाखत घेतली. त्यांना विचारले, “तुम्हाला कमी दु:ख सहन करायला आवडेल का?” ते नक्कीच म्हणतील “हो”.

माझ्या पात्रांची मला सहानुभूती वाटते. पण लेखक या दृष्टीने मला ठाऊक असते की शेवटी त्यांचे हे सर्व सहन करणे त्यांच्या फायद्याचे आहे. कारण ते त्यांच्या वृद्धीसाठी व त्यांचा सुटकेच्या कथेसाठी फार महत्त्वाचे आहे.

देवाने आपल्या प्रत्येकाला त्याच्या गोष्टीत लिहिलेले आहे. आपण आपल्यापेक्षा कोणत्यातरी अतिशय मोठ्या गोष्टीचा भाग आहोत. देव आपल्याला सांगत आहे की ही गोष्ट एकत्र गुंफण्यासाठी आपण त्याच्यावर विश्वास टाकावा, म्हणजे जो न संपणारा शेवट त्यामध्ये आपण त्याची भक्ती करू आणि त्याने गुंफलेल्या या गोष्टीच्या निव्वळ बुद्धीचे तोंड आ वासून आश्चर्य करत राहू.

व्यर्थ वेदना?

माझ्या काल्पनिक कथेतील पात्रांना जशी माझ्या योजनांची काहीच कल्पना नसते तसेच देवाच्या सर्वव्यापी योजनेत आपली जीवने कोठे बसतात याच्या दृष्टिकोनाचा आपल्याला अभाव असतो. कॅन्सर, अपंगत्व, अपघात, आणि इतर हानी आणि दु:खे उध्वस्त करणारी व व्यर्थ वाटतात. पण दु:खात आपल्याला काही अर्थ दिसत नाही यामुळे त्याला काही अर्थ नाही हे सिध्द होत नाही.
जॉनी एरिक्सन टाडा हिने नुकताच व्हीलचेअरचा ५०वा वाढदिवस साजरा केला. साजरा हा शब्द चुकीचा वाटतो का? जेव्हा ती १७ वर्षांची होती व जीवनाचा अंत करावा असे विचार मनात येत असताना तिला हा शब्द तेव्हा नक्कीच चुकीचा वाटला असता. आता मागे वळून पाहताना आपण तिच्या चारित्र्याची अमर्याद वृद्धी पाहतो आणि अगणित जीवनांना – माझ्या कुटुंबाच्याही – जॉनीद्वारे देवाने स्पर्श केलेला पाहतो. शास्त्रलेख आपल्याला शिकवतात की आपल्या सावर्भौम देवाच्या प्रेमळ हातातून आपण सहन करीत असलेले आपले कोणतेही दु:ख हे कधीही हेतूविरहीत नसते. या क्षणाला ते कसेही दिसत असले तरी.
काही घटना घडताना आपल्याला निरर्थक वाटल्या तरी देवाचा त्यातला हेतू आपल्याला नंतर दिसला ना?

सर्व गोष्टी आपल्या अनंतकालिक कल्याणासाठी

बायबलमधले रोम ८:२८ मधील विधान हे मती कुंठीत करणारे आहे. “परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” याचा संदर्भ दाखवतो की या कण्हणाऱ्या, उत्थापन होणाऱ्या जगात देवाची कळकळ हीच आहे की त्याच्या मुलांना ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखे बनवणे. आणि आव्हानात्मक परिस्थितीमध्ये तो आपल्या जीवनात कार्य करून आपल्यामध्ये ख्रिस्तसादृश्यता वाढवतो. जुन्या करारातील रोम ८:२८ मध्ये योसेफ आपल्या भावांना (ज्यांनी त्याला गुलाम म्हणून विकले होते) म्हणाला, “तुम्ही माझे वाईट योजले. पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते” (उत्पत्ती ५०:२०). “देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते” सूचित करते की देवाने वाईट परिस्थितीचे चांगले केले नाही. योसेफाचे भाऊ काय करणार हे त्याला ठाऊक होते आणि त्याने त्यांना पाप करू दिले. देवाची इच्छा होती की ह्या वाईट परिस्थितीचा उपयोग चांगल्यासाठी करावा. त्याच्या अनंतकालिक भूतकाळात त्याने योजना केल्यानुसार हे केले. देवाची मुले “जो त्याच्या मनाच्या संकल्पाप्रमाणे अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे पूर्वी नेमलेली आहेत” (इफिस १:११).

योसेफाच्या जीवनात जे घडले ते हेच दाखवते की देव त्याच्या इतर मुलांमध्येही याच प्रकारे कार्य करतो. खरे तर रोम ८:२८ व इफिस १:११ ही वचने देव अशाच प्रकारे आपल्यामध्ये कार्य करतो यावर भर देतात.

तुम्ही रोम ८:२८ च्या अभिवचनावर विश्वास ठेवता काय? तुमच्या जीवनात ज्या अत्यंत वाईट गोष्टी घडल्या त्यांची आठवण करा आणि मग स्वत:ला विचारा या गोष्टी तुमच्या भल्यासाठी देव वापर करील असा तुमचा त्याच्यावर विश्वास आहे का? बायबल खात्री देते की तो करीलच.

आपल्या विश्वासाची देणगी

आपण मूर्खपणाने विचार केला की, जर आपला स्वर्गीय पिता त्याची अमर्याद सुज्ञता आपल्याला पूर्णपणे समजावून देईल तरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो… तर असा विचार एक अशक्य परिस्थिती निर्माण करतो – त्याच्या मर्यादेमुळे नव्हे तर आपल्या मर्यादेमुळे (यशया ५५:८-९). कधीकधी योसेफाला अखेरीस अनुभव आला त्याप्रमाणे देव त्याच्या तर्काचे ओझरते दर्शन आपल्याला देतो. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचा गंभीर अपघात झाला व त्याला  पूर्ववत  होईपर्यंत फार वेदनांतून जावे लागले पण त्याचा जीव बचावला. वैद्यकीय चाचणीत दिसून आले की त्याच्या शरीरात अपघाताशी संबंध नसलेली काही गंभीर समस्या होती व त्यासाठी ताबडतोब उपचाराची गरज होती. यावेळी त्याच्या अपघाताचे कारण स्पष्ट झाले.
इतर वेळा आपल्याला असे कारण समजत नाही. पण जे काही आपल्याला माहीत आहे त्यावरून आपले अज्ञान म्हणजे काहीच कारण नाही असे आपण का समजतो? फक्त देवच अशा ठिकाणी आहे की काय निरर्थक आहे आणि काय नाही हे तोच ठरवू शकतो. (येशूचे यातनामय मरण त्यावेळी हेतूशून्य आणि निरर्थक नाही का भासले?)

अनंतकालिक आनंदाचा आरंभ

योसेफाची परीक्षा होत असताना त्याला जर पर्याय दिला असता तर देवाच्या कथेच्या मंचावरून तो खाली उतरून गेला असता असे मला वाटते. इयोबाच्या कथेच्या मध्यभागी — १० मुलांचे मरण, त्याच्या शरीरावर आलेले फोड, देवाने सोडून दिले आहे असे भासणे — तुम्ही त्याला विचारा, तुला यातून बाहेर पडायचे आहे का? मला त्याचे उत्तर ठाऊक आहे  कारण इयोब ३:११ मध्ये तो म्हणतो, “मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला?” पण आता ते सर्व संपले आहे. नवी पृथ्वी जेव्हा अवतरेल तेव्हा त्या भव्य मेजवानीच्या वेळी तुम्ही इयोब, योसेफ यांच्या शेजारी  बसा आणि त्यांना विचारा, “हे खरंच उचित होते का?” “नक्कीच” इयोब म्हणेल. योसेफ मानेनेच होकार देईल.

एक दिवस आपण पण या महान अनंतकालिक दृष्टिकोनातून पाहू. आपल्याला कधीही न समजलेली देवाची प्रभावी दया — तिच्यापैकी काही आपल्याला समजलीच नव्हती आणि इतर काही वेळा आपल्याला ती नकोशी वाटली. आपण विचार करू की आम्हाला ख्रिस्तासारखे अधिक बनव अशी प्रार्थना करूनही त्याने त्यासाठी पाठवलेल्या उत्तराला आमच्यातून काढून टाक अशी आम्ही त्याला काकळूत केली होती.

“म्हणून  आम्ही धैर्य सोडत नाही…कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत” (२ करिंथ ४:१६-१८).

विश्वास म्हणजे आज अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे की पुढे गतावलोकन करताना आपल्याला समजेल की ते खरे होते. आपण मेल्यावर पाच मिनिटांनी समजेल की देवावर विश्वास ठेवणे हेच योग्य होते असे समजण्यासाठी वाट पाहू नका. ते आता येथे करण्यासाठी शिकू या. आपली दृष्टी आपला कृपावान, सार्वभौम आणि सदा हेतुपूर्ण असणारा तारणारा याच्यावर स्थिर करू या.

Previous Article

पवित्र स्थानातील पडदा

Next Article

नंदनवनात कुरकुर

You might be interested in …

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल? जॉन ब्लूम

जे दु:खात असतात ते दु:खद गोष्टी बोलत असतात. भारी दु:ख – मग ते मानसिक असो व शारीरिक, तो कधीच समतोल साधू शकणारा अनुभव नसतो. तो सर्व जीवनावर वर्चस्व करणारा अनुभव असतो. असे दु:ख आपल्याला प्रमुख […]

धडा २७. १ योहान ५: ६- ९ स्टीफन विल्यम्स

पुत्रासाठी देवाची तिहेरी साक्ष “इंटरनेटवरील विधानांच्या अचूकतेवर तुम्ही अवलंबून राहू शकत नाही – अब्राहाम लिंकन, १८६४.”  हे विधान तुम्ही इंटरनेटवर पाहिले का?  या हास्यास्पद विधानातून एक नक्की केले आहे की आपण राहत असलेल्या युगात कोणी […]

 कुटुंबात ख्रिस्त

 लेखांक १ “तो घरात आहे असं ऐकण्यात आलं” (मार्क २:१) ख्रिस्ती घर! ख्रिस्ती कुटुंब! कुठल्याही घरासंबंधी किती किती गोष्टी ऐकण्यात येतात, बऱ्या अन् बुऱ्याही! बऱ्यांपैकी सर्वात चांगली गोष्ट कोणती? ‘ख्रिस्त या घरात, कुटुंबात आहे.’ हीच […]