Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 26, 2019 in जीवन प्रकाश

देवाची यशस्वी प्रीती                                                   लेखक : जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६)

देवाची यशस्वी प्रीती लेखक : जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६)

देवाची प्रीती कधी चुकत नाही. याविषयी स्तोत्रांमध्ये भरपूर विधाने सापडतात. “परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्यांभोवती दयेचे वेष्टन असते” (स्तोत्र ३२:१०). जेवढ्या विपत्तीतून आपण जातो त्या सर्वांमध्ये देवाची न चुकणारी प्रीती असते. “पर्वत दृष्टीआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची प्रीती ढळणार नाही असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो” (यशया ५४:१०). त्याची प्रीती अढळ असल्याने आपल्या भलाईसाठी तो आपल्या जीवनात वेदना, मनोव्यथा येऊ देईल. तो आपल्या जीवनात दु:खे पाठवतो त्याबरोबर कळवळा, करुणाही पाठवतो. “तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो (विलापगीत ३:२२). तो खात्री देत आहे की, तो करुणा करतो. विपत्तीचा अग्नी देखील कळवळा घेऊन येतो. त्यातून अढळ प्रीती बाहेर पडते. आपल्या आपत्तींना देवाची करुणा व सांत्वन यांची जोड असते. पौलानेही आपल्या दु:खात देवाची करुणा अनुभवली. त्याच्या गर्वाला अटकाव करायला देवाने त्याच्या देहात एक काटा ठेवला होता. तो काटा नेमका काय होता ते कोणाला ठाऊक नाही. तो दूर करण्याची त्याने तीनदा विनंती केली होती. पण देवाने ते नाकारले. उलट तो म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे आहे” (२ करिंथ १२:९). पौलाच्या कल्याणासाठी देवाने त्याच्या जीवनात दु:ख ठेवले होते. पण त्यासोबत देवाने करुणाही दाखवली. दु:ख पेलण्यासाठी त्याने शक्ती व कृपा पुरवली. त्याला एकट्यालाच तो काटा सहन करायला लावला नाही. संकटाशी सामना करायला दैवी सामर्थ्य व कृपा पुरवली. अखेर पौल संकटातही आनंद करताना दिसतो कारण त्याने देवाचे विजयदायी प्रेम अनुभवले. गरजेच्या वेळी देवाची कृपा त्याला प्राप्त झाली. ज्या दिवशी आपण येशूवर विश्वास ठेवतो त्याच दिवशी आपल्याला गरज असलेल्या संपूर्ण बलाचा देव पुरवठा करत नाही. “देव त्याचे चांगुलपण त्याचे भय धरणाऱ्यांसाठी साठवून ठेवतो” (स्तोत्र ३१:१९). स्तोत्र ११९:११ नुसार आपण जसजसे देवाचे वचन आपल्या अंत:करणात साठवतो तसतसे विपत्कालासाठी व परीक्षेच्या काळासाठी देव आपले चांगुलपण साठवतो. आपल्या गरजेपूर्वी अगर उशीरा ते प्राप्त होत नसते. तर दररोज त्याची दया आपल्याला प्राप्त होते.

देवाचे सान्निध्य

देव  संकटात आपल्या सन्निध असतो. संकटांना मुलाबला करण्यासाठी तो फक्त कृपा पुरवतो एवढेच नव्हे तर तो स्वत: मदतीला धावून येतो. तो म्हणतो “भिऊ नको – मी तुझे सहाय्यही करतो” (यशया ४१:१४). तसेच यशया ४३:२ मध्ये तो म्हणतो, “तू जलांतून चालशील तेव्हा मी तुजबरोबर असेन, नद्यांतून चालशील तेव्हा त्या तुला बुडवावयाच्या नाहीत. ज्वाला तुला पोळावयाची नाही.” संकट व दु:खात आपल्याबरोबर राहण्याचे देव आश्वासन देतो. तो दु:खाचे जल व आपत्तीची ज्वाला यापासून आपल्याला दूर ठेवणार नाही. पण तो स्वत: आपल्याबरोबर त्या जलातून व अग्नीतून चालेल. जरी अग्नी व जल देवच आपल्यावर आणत असला  तरी तोच त्यातून जात असता आपल्यासोबत चालत असतो. आपल्याला सोबत देण्याचे वचन त्याने प्रथम यहूदी राष्ट्राला दिले.
जेव्हा त्यांची दोन शकले पडली तेव्हा सातत्याने येणाऱ्या न्यायाविषयी त्याने संदेष्ट्यांद्वारे इशारा दिला. त्या इशाऱ्यासोबतच त्यांच्या सन्निध राहण्याचे अभिवचन दिले. त्याने आपल्या लोकांचा न्याय केला पण त्या न्यायकाळातही तो त्यांच्यासोबत राहिला. त्यांना अंतर दिले नाही. यशया ६३:९ म्हणते, “त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला.” आलेल्या विपत्तीचे कारण देव पाहत नाही. मात्र विपत्तीतून जाताना तो आपल्याबरोबर राहतो. “मी तुझे सहाय्य करतो, मी धार्मिकतेच्या हाताने तुला सावरतो” असे तो म्हणतो (यशया ४१:१०). विपत्काल कळसाला गेला असताना आपण त्याचे सुखद प्रकटीकरण अनुभवतो. २ करिंथ १:५ म्हणते, “ख्रिस्ताची दु:खे जशी आम्हांस पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. “ख्रिस्त आपल्या दु:खाशी समरूप होतो. प्रभू शौलाला म्हणतो, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?” शौल म्हणतो, “प्रभू तू कोण आहेस?” वाणी म्हणते, “ज्या येशूचा तू छळ करतोस, तोच मी आहे” (प्रेषित. ९:४,५). येशूचे लोक येशूशी जडलेले असतात. त्या लोकांचा छळ म्हणजेच येशूचा छळ. आजही हेच सत्य आहे. शिष्यांप्रमाणेच तुम्ही ख्रिस्ताशी जडलेले आहात.  त्याला जडलेले आहात म्हणून तो तुमच्या विपत्तीमध्ये वाटेकरी होतो. कोणत्याही प्रकारची आपत्ती येवो त्याची कृपा आपल्याला पुरेशी आहे. रोम ८:३९ म्हणते, “आकाश, पाताळ किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू खिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावर प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करायला समर्थ होणार नाही.” वचनात वारंवार देवाच्या अढळ प्रीतीविषयी सांगितले आहे. आपण विश्वास ठेवा अगर ठेवू नका ते सत्य आहे. आपण शंका घेतल्या म्हणून देवाची प्रीती उद्ध्वस्त होऊ शकत नाही. ती प्रीती देवाच्या स्वभावातून सतत वाहत असते. आपल्याला देवाच्या वचनातून ती प्रीती जेवढ्या प्रमाणात प्रगट होईल त्या प्रमाणात आपल्याला त्याच्या प्रीतीचा व सांत्वनाचा अनुभव येतो. पण शंका घेतली तर आपण या अद्भुत अनुभवाला वंचित होतो. जर ख्रिस्ती व्यक्ती संकट दु:खात पतन पावली, अगर अविश्वासात बुडून गेली तर ती संकटे, दु:खे तिला अडखळण झाली असा अर्थ होईल. पित्याचे गौरव व ते यांच्यामध्ये येणारा हा काळा ढग होय. हा ढग संकट नव्हे तर पाप आहे. तेव्हा जर सांत्वनाची इच्छा निर्माण झाली तर माणसाला आपले काही चुकले आहे याची जाणीव होते. मग आज्ञापालनासाठी आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतो तसेच देवावर विश्वास ठेवायलाही आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतो. विश्वासाने आपण आज्ञापालन करतो. अवलंबून राहण्याच्या वृत्तीने विश्वास ठेवायला आपण मार्क ९:२४ प्रमाणे आरोळी करावी. “ हे प्रभो, मी विश्वास धरतो माझा अविश्वास काढून टाकायला मला मदत कर.” अशा रीतीने विपत्काली शंका काढून टाकायला आपण धडपड करायला हवी. ती धडपड केली नाही तर विश्वास वाढणार नाही. शंकेत आपण गुंतून पडलो तर शंकाच आपल्यावर मात करील. दावीद म्हणतो, “हे परमेश्वरा तू कोठवर विसरणार? सर्वकाळ काय? तू आपले मुख कोठवर लपवणार” (स्तोत्र १३:१)? दाविदाला शंका होत्या. त्याला त्याने कसा लढा दिला ते पहा. किती वेळ मी या विचारांशी मुकाबला करू? त्याला वाटले या कालावधीत देवाने आपल्याला सोडले म्हणून तो देवाच्या सान्निध्याची तहान दाखवून लढा देतो. आणि अखेर शंकेवर मात करून तो लढा जिंकतो. कोणाच्या सामर्थ्याने? देवाच्या सामर्थ्याने. स्तोत्र १३:५-६ मध्ये तो म्हणतो, “मी तर तुझ्या दयेवर भरवसा ठेवला आहे. माझे ह्रदय तू सिद्ध केलेल्या तारणाने उल्हासेल. परमेश्वराने मजवर बहुत उपकार केले आहेत म्हणून मी त्याजपुढे गायन करीन.” आपणही दाविदाप्रमाणे आपल्या विचारांशी लढा द्यायचा. देवाच्या सहाय्याने आपणही विजय पावू. आपणही म्हणू या, “मी तुझ्या अढळ प्रीतीवर विश्वास ठेवतो.

तुम्ही जे आहात त्याबद्दल देवावर भरवसा टाका

“तूच माझे अंतर्याम निर्माण केले. तूच माझ्या आईच्या उदरी माझी घटना केली. माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवण्यात आले आहेत” (स्तोत्र १३९:१३, १६). बेसबॉलच्या यशासाठी नेमबाजी फार महत्त्वाची असते. ते दुसऱ्यांना जमते पण मला जमत नाही म्हणून लाज वाटण्याचे कारण नाही. असे समजून वर्तन केले नाही तर मनाला वेदना होतात. आपल्याला काही पात्रता नाहीत म्हणून मन दुखावत गेले तर पुढे तुम्ही स्वत:ला आहे तसे स्वीकारू शकत नाहीत. आपल्या न्यूनता, मर्यादा, कमतरता यांकडे पाहून लढा द्यायचा नसतो. कोणी शारीरिक कमतरतांना लढा देत असतात. माझे कान फार मोठे आहेत, नाक फार लांब आहे, बांधा सुरेख नाही. एक ना दोन. मग तुम्ही नाराज होऊन खट्टू बनता. काही लोक आपल्या कुळाविषयी नाराज असतात. काही जण स्वत:ला आहोत तसे स्वीकारायला तयार नसतात. त्यांच्या जीवनात एकामागे एक आपत्ती येतच राहतात. या गोष्टी बाहेरून नव्हे तर ते जे काही आहेत त्यावरून येतच राहतात. आपण कोण आहोत हे समजून घेऊन मान्य करून त्यांनी देवावर विश्वास ठेवायचा असतो. ज्यांची ही गरज आहे त्यांनी  स्तोत्र १३९:१३ ते १६ ही वचने वाचावीत.