जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवावर विश्वास लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

विश्वसनीय देव

देव हा विश्वसनीय आहे या सत्यावर देवावर विश्वास ठेवण्याचा विचार आधारलेला आहे. आतापर्यंत जी सत्ये आपण शिकलो त्यामध्ये आपण दृढ व्हायला हवे. आपली तो सातत्याने काळजी घेतो. याविषयीच्या अभिवचनांचा आपण आधार घ्यायला हवा. इब्री १३:५ “मी तुला सोडणार नाहीच; तुला टाकणार नाहीच.” हे अभिवचन आपण धरून ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत ते घट्ट  ठरून ठेवा, ग्रहण करा. आणि देवाने त्या परिस्थितीत आपल्याला सोडले नाही ही त्याची दया पाहून आनंद करावा. देवाच्या सान्निध्याची आणि मदतीची संवेदना आपण काही वेळा गमावतो तरी ती कायमची गमावत नाही. दु:खातच ईयोबाला देव सापडतो. तो म्हणतो, “पहा, मी पुढे गेलो तर तो मला सापडला नाही. मागे गेलो तरी तेथे दिसत नाही. डाव्या बाजूला  जेथे  तो आपली कृती करतो तेथे मी पाहतो, तरी तो मला दिसत नाही. परंतु माझा मार्ग त्याला कळणार आहे. त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन” (ईयोब २३:८-१०). विश्वास व शंका यांच्या लढ्यात ईयोब डळमळला हे आपण पहिले. तेथे विश्वासाची खात्री दिसते. देवाने त्याचे सांत्वनपर सान्निध्य पूर्णपणे काढून घेतले होते. जरी तो दिसला नाही तरी ईयोबाने त्याच्यावर विश्वास ठेवला. देव त्याच्यावर नजर ठेवून होता. आणि त्या संकटातून शुद्ध सोन्याप्रमाणे तो त्याला बाहेर काढत होता. आपल्याला कदाचित ईयोबासारखे अनुभव येतील. संकटे तशीच नसतील. पण देव कोठेच दिसणार नाही. यशया ४५:५ म्हणते, “हे इस्राएलाच्या देवा, तारका, तू खचित गूढ देव आहेस.” यशया, ईयोब यांच्याकडून हे आपण शिकू या. म्हणजे दु:ख आल्यावर आपण एकदम चकित होणार नाही. देव दिसत नाही म्हणून हताश होणार नाही. अशावेळी त्याच्या अढळ वचनांना बिलगून राहायचे. तो म्हणतो, “मी तुला सोडणार नाहीच व टाकणार नाहीच.” पौल म्हणतो, “देव कधी लबाडी करत नाही.” आपल्याला वाटेल की त्याने आपले अस्तित्व लपवले आहे. पण आपल्या आपत्तीपुढून तो लपत नाही. तो आपल्याला जलांतून, अग्नीतून घेऊन जाईल. पण तेव्हा तो आपल्यासोबतच असणार (यशया ४३:२). कारण तो आपल्याला सोडत नाही, टाकत नाही. म्हणून वचन सांगते, “त्यावर आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो” (१ पेत्र ५:७). ह्या वारंवार ऐकिवात असणाऱ्या वचनांकडे आपण दुर्लक्ष करतो,  पण आपली काळजी घेणे व स्वत: आपल्यासमोर हजर असणे हे तो सातत्याने करतो. प्रसंगारूप नव्हे तर पूर्णत्वाने काळजी घेतो. इतकी की आपले केस देखील त्याने मोजले आहेत. त्याच्या परवानगीशिवाय आपल्याला कशाचाही, कोणाचाही स्पर्श होणार नाही. त्याची काळजी घेणे अगाध व सुज्ञतेचे आहे. त्याची ती करणी आपण बिघडवून टाकू शकत नाही अगर ढवळाढवळ करू शकत नाही. आपली चिंता त्याच्यावर ‘ठेवा’ नव्हे तर ‘टाका.’ टाकण्याची क्रिया सोपी नाही. म्हणजे येथे पुन्हा निवड आली. त्याला म्हणा, “मी ही चिंता तुझ्यावर टाकू इच्छितो पण माझ्या कुवतीने मी हे करू शकत नाही. मी तुझ्यावर भरवसा ठेवतो. तुझ्या आत्म्याने हे शक्य कर. मला ही चिंता सोबत घेऊन तुझ्यासमोरून जायला नकोय.” विश्वास ठेवणे ही मनाची निष्क्रिय अवस्था आहे. तर देवाच्या वचनाची पकड घेण्याची ती वेगाची कृती आहे. आपत्ती डोक्यावरून चालली असताना आपण वचनाला घट्ट धरून राहायचे. स्तोत्र ५०:१५ म्हणते, “तू मला संकटात हाक मार म्हणजे मी तुला मुक्त करीन आणि तू माझे गौरव करशील.” या वचनानुसार धावा करत असताना संकटे अधिकच तीव्र होत असल्याचा मला अनुभव आला. मग या वचनाचा अर्थ वेगळा आहे याची जाणीव मला झाली. मग मी प्रभूला म्हटले, “हेच वचन मी आपलेसे करतो. तुझ्या वेळी, तुझ्या पद्धतीने, तुला हवे तसे मला तू सोडव.” ही प्रार्थना करताच अडचणी थांबल्या नाहीत. पण देवाची शांती माझ्या मनात आली. चिंता, भीती, निवांत झाली. मग देवाने त्याच्या योग्य वेळी मला सोडवले. आणि कसे सोडवले ते मला कळलेच नाही. देवाचे वचन सत्य आहे आणि ते अपयशी होत नाही. ते लबाड नाही. आपण विश्वास ठेवणे निवडायचे आणि त्याच्यावर आपली चिंता टाकायची.

विश्वासातील अडथळे

विपत्तीत देवावर भरवसा ठेवणे जेवढे अवघड जाते त्यापेक्षा यथास्थित असताना अडचणीचे वाटते. “मजसाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे” (स्तोत्र १६:६). आशीर्वादाच्या, भरभराटीच्या वेळी आपण या अभिवचनावर विश्वास ठेवतो. आणि त्याहून वाईट म्हणजे त्या भरभराटीचे श्रेय स्वत:लाच देतो. अनुकूल व भरभराटीच्या काळात देवच त्यांचा जनक आहे हे आपण मान्य करावे आणि त्याच्यावर भरवसा टाकावा. “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल” (अनुवाद ८:३). हा धडा इस्राएल लोकांनी शिकावा म्हणून देवाने त्यांना रानात भुकेले ठेवले व मान्ना पुरवला. ज्या देवाने त्यांना रानात मान्ना पुरवला तोच देव आपलेही घर खाद्यपदार्थांनी भरलेले ठेवतो. सर्व उपलब्ध करून देतो. त्यांना देवाने चमत्कार करून अन्न पुरवले. आपल्यालाही अनेक घटनांची मालिका घडवून तो अन्न पुरवतो. विश्वासी नेत्रांनाच त्याचा कार्यकारी हात दिसतो. हा पुरवठाही मान्ना पुरवण्याइतकाच अद्भुत आहे. किती यांत्रिक पद्धतीने आपण जेवणाबद्दल आभार मानतो? आपली कपाटे रिकामी असताना जितकी तातडीने, कळकळीने , वारंवार आपण आपली विनंती प्रभूला सादर करतो तितक्याच तीव्रतेने आपण आपली कपाटे भरलेली असताना आभारप्रदर्शन करायला हवे. अशा प्रकारे संपन्नतेच्या व भरभराटीच्या काळात आपण आपला देवावरचा विश्वास प्रकट करू शकतो. उपदेशक ७:१४ म्हणते, “संपत्काली आनंद कर, विपत्काली विवेकाने वाग. देवाने सुखदु:खे शेजारीशेजारी ठेवली आहेत.” देव बरे वाईट दिवस घडू देतो. विपत्तीत आपण देवाच्या पितृप्रेमावर शंका घेतो. आणि भरभराटीच्या काळात त्याला विसरतो. बऱ्यावाईट दोन्ही प्रकारच्या दिवसात देवावरचा भरवसा व्यक्त करायला हवा. दुसरी एक चूक आपण करतो. देवाऐवजी आपल्या पुरवठ्याच्या साधनांवर आपण भरवसा ठेवतो. मानवी साधनांद्वारे देव प्रत्यक्षात आपल्या गरजा पुरवतो. तो थेट गरजा पुरवत नाही. पण ही मानवी साधने देवाच्या नियंत्रणाखाली असतात. देव करू देईल तेवढीच भरभराट ही साधने करतात. या साधनांऐवजी जो देव त्या साधनांचा वापर करतो, त्या देवाकडे आपण पाहावे. नीती १८:१०-११ मध्ये धार्मिक व धनवान यांच्यामधील फरक सांगितला आहे. “परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे. धार्मिक त्यात धावत जाऊन निर्भय राहतो. धनवानाचे धन त्याचे बळकट नगर आहे.” त्याच्या  मते ते उंच तटासारखे आहे. ही तुलना धार्मिक धनवान यांच्यातील नाही. कारण पुष्कळ धार्मिक लोक श्रीमंत देखील असतात. ही तुलना देव व पैसा यांच्यातील आहे. जे प्रभूवर भरवसा ठेवतात ते सुरक्षित असतात. जे आपल्या धनावर भरवसा ठेवतात त्यांची आपण सुरक्षित आहोत अशी कल्पना असते. आपल्यासाठी येथे एक तत्त्व  सांगितले आहे. आपण सर्व एक तटबंदी उभारतो. कॉलेजच्या पदवीमुळे मोठा हुद्दा मिळेल ही एक तटबंदी, सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी साठवलेली बचत ही एक तटबंदी. देवाशिवाय आपण ज्या ज्या गोष्टींवर भरवसा ठेवतो या सर्व गोष्टींनी आपण एक तटबंदीचे नगर तयार करतो. याचा अर्थ देव पुरवत असलेली साधने आपण तुच्छ लेखायची असे नाही. मात्र आपण त्यांच्यावर भरवसा ठेवायचा नाही (स्तोत्र ४४:६). म्हणजे योग्य पद्धतीने साध्यासुध्या साधनांचा वापर करणे व त्याने पुरवलेली साधने वापरण्यासाठी त्याच्यावर विश्वास टाकणे. एखाद्या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी आपल्या चाचण्या चालू असताना आपण डॉक्टरवर भरवसा टाकतो. पण त्यासाठी देवाने योग्य सुज्ञता पुरवावी म्हणून जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण देवावर भरवसा टाकत असतो.

आपण देवाची जागा घेतो, त्याचा आदर करण्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाने आपली भरभराट करावी अशी अपेक्षा करतो हे चूक आहे. मानवी मदत कितीही हाताशी असली तरी देवावर भरवसा टाकण्याची कृती आपण केलीच पाहिजे. आपण हे लक्षात ठेवावे की मानवी साधने असोत वा नसोत देव त्याचे काम करू शकतो. देव अनेकदा ही साधने जरी वापरत असला तरी तो त्यांच्यावर अवलंबून नसतो. कधीकधी आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळेच साधन तो वापरतो. आपल्या प्रार्थनेला विश्वासाची जोड हवी असते. देव आपल्या भावी काळावरही अवलंबून नसतो. तो आपल्याला आश्चर्याचे धक्के देऊन आपली सुटका करतो. आपला विश्वास केवळ देवावरच हवा.

दुसरी एक चूक आपण करतो. ती म्हणजे मोठी आपत्ती आली तरच आपण देवाकडे धाव घेतो. आणि छोट्या समस्या आपणच हाताळायचा प्रयत्न करतो. स्वत:वर अवलंबून राहणे हा पापी स्वभावाचा एक पैलू आहे. आपण देवाकडे वळावे म्हणूनच आपल्यावर मोठ्या आपत्ती येतात. क्षणोक्षणी रोजच्या व्यवहारात देवावर भरवसा ठेवणे हेच प्रौढतेचे लक्षण होय. जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण देवावर भरवसा टाकायला लागू तेव्हाच मोठ्यामोठ्या समस्यांसाठी आपण देवावर भरवसा ठेवायला शिकू. रोज अशा कितीतरी संधी आपल्याला उपलब्ध होतात की छोट्या छोट्या बाबतीत आपण देवाचे गौरव करू. अगदी असामान्य घटना घडेपर्यंत विश्वास ठेवायची वाट पाहण्याची गरज नाही. कारण असामान्य घटना फार थोड्या घडतात. तोवर बरेचसे जीवन जगून संपलेले असते. म्हणून छोट्या बाबतीत देवावर भरवसा ठेवायला आपण शिकले नसू तर मोठ्या प्रसंगातही आपण देवावर भरवसा टाकणार नाही. रोजच्या व्यवहारात नम्रपणे देवावर भरवसा ठेवायला आपण शिकू या. मग मोठया समस्यांच्या गरजेचे वेळी आपण त्याच्यावर भरवसा टाकू. खूप प्रतिकूल परिस्थिती अनुभवलेली एक व्यक्ती म्हणते, “छोट्या अडचणींच्या वेळी देवावर भरवसा ठेवणे अवघड जाते. मोठ्या आपत्तीत लगबगीने आपण देवाकडे वळतो.” अडचण लहान असो व मोठी, आपण देवावर भरवसा ठेवायला हवा. आणि म्हणावे, “मी भयभीत झालो असता तुझ्यावर भरवसा ठेवीन.”

समाप्त

Previous Article

तुझा हात तोडून टाकून दे लेखक : जॉन ब्लूम

Next Article

जे वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी पाच प्रार्थना लेखक : स्कॉट हबर्ड

You might be interested in …

आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दहा आवश्यक धडे  

 जॉन मकआर्थर (जॉन मकआर्थर यांच्या “ब्रेव डॅड या पुस्तकातून हे दहा धडे घेतले आहेत. नीतीसूत्रे १-१० मधून घेतलेले हे धडे पालकांना आपल्या मुलामुलींना शिकवण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील. जर आपण ते शिकवले नाहीत तर सैतानाला आपण […]

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

लेखांक २ “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्यांविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या […]

हेन्री मार्टिन

  (१७८१-१८१२) लेखांक १६                                                                                                 हेन्रीने विविध प्रकारची सेवा केली. ही भूमिका साकारण्याचे काम त्याच्याखेरीज कोणालाच जमले नसते. तुम्ही त्याला कदाचित मिशनरी संबोधणार नाही, कारण तो आपल्या देशबांधवांचा चॅप्लेन म्हणून आला होता. पण त्याला […]