जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

दिवसातले व्यत्यय काबीज करा

स्कॉट हबर्ड

“जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर” हे कोणाही ख्रिस्ती व्यक्तीला एक महान आणि सन्मान्य पाचारण वाटते. येशूचे हे शब्द आपल्या त्याग करण्याच्या ध्येयाला, चांगली कृत्ये करण्याच्या धाडसाला  प्रेरणा देतात. आपण प्रीती करण्याच्या भावी विचारात स्वत:ला विसरून जाऊ शकतो.

तथापि जेव्हा तुमचा शेजारी आज तुमच्या मदतीची मागणी करतो तेव्हा मात्र अशी दिवास्वप्ने मोठ्या वेगाने गायब होऊ शकतात. आपल्या दिवसाच्या व्यस्ततेमध्ये एखादा  मित्र गरजेने विचारतो “तुला बोलायला वेळ आहे का?” एखादा चर्चचा सभासद विचारतो, “घरातले कपाट हलवायला मदत करशील का?” कामामध्ये सहकारी विचारतो, “या प्रकल्पावर तुझे मत देशील का?” काम उरकण्याची आपली घाई आपल्याला सांगते की अशी प्रीती आपल्या वेळापत्रकात व्यत्यय आणते, त्यामुळे आपल्याला जे करायचे ती यादी अर्धवट राहते. “शेजाऱ्यावर प्रीती कर” ही आज्ञा  आता निराशाजनक रीतीने गैरसोयीची वाटू लागते.

मग आपल्या सबबी वाढू लागतात. “मी खूपच बिझी आहे” “गेल्या वेळी मी मदत केली होती” “माझ्यावर कामाचा खूप तणाव आहे” “त्याला सारखीच मदत हवी असते.” ही समर्थने खात्रीदायी, दिसायला वाजवी, आणि काही वेळा कायदेशीर असतात. तरी ती दाखवून देतात की आपण आपले स्वत:चे काम – ते कितीही महत्त्वाचे असले तरी- फारच गंभीरपणे घेत आहोत.

पापमय गंभीरपणा

जर तुम्हाला धाडस होत असेल तर क्षणभर  तुमचा आत्मा डीयेत्रिच बॉनहॉपर यांच्या विच्छेदन करणाऱ्या चाकुखाली आणा. त्यांनी म्हटले,

“ हलक्या सेवेसाठी कोणीच चांगले नसते. मदत करण्याच्या बाहेरच्या कृतीमुळे व्यत्यय येऊन जे लोक वेळ वाया जातो म्हणून काळजी करतात ते बहुधा त्यांचे स्वत:चे काम फारच गंभीरपणाने घेतात. देवाने आपल्यामध्ये हस्तक्षेप करावा म्हणून आपण नेहमी तयार असावे. मग तो आपल्या वाटेवर लोकांना पाठवून त्यांच्या मागण्या आणि आर्जवांनी आपल्या योजना विफल करील आणि आपले मार्ग  पुन्हा पुन्हा कदाचित रोजन् रोज निराशामय करील.”

हे शब्द – विशेष करून माझ्यासारखे जे लोकांपेक्षा कामाला अधिक महत्त्व देतात त्यांना खुपतात. कारण त्यांना “खरे काम” म्हणजे ते संपले की यादीत संपल्याची खूण करणे असेच वाटते.

बाहेरच्या क्षुल्लक कामासाठी साधी मदत करायला आपल्याला वेळ नाही असा विचार आपण वारंवार करतो का? की आपण नाखुशीने मदत करायला तयार होतो आणि मग ते काम अशा झपाट्याने संपवून टाकायचा प्रयत्न करतो आणि तरीही हा सर्ववेळ आपले लक्ष आपण मागे टाकलेल्या कामाकडेच असते? असे असेल तर आपण आपले स्वत:चे काम फारच गंभीरपणाने घेत आहोत.

बॉनहॉपर यांच्या निरीक्षणानुसार ख्रिस्ती लोक हे अशा प्रकारच्या पापमय गंभीरपणाला खास करून उद्युक्त होतात. आपले काम इतके महत्त्वाचे आणि तातडीचे आहे असे त्यांना वाटते की त्यामध्ये कोणी व्यत्यय आणलेला त्यांना चालत नाही. हळूहळू “देवाचे काम” आपल्याला देवाची आज्ञा पाळण्यासाठी दुर्लक्ष करण्यासारखे वाटू लागते. दुसऱ्यांच्या छोट्या आणि तातडीच्या गरजांसाठी आपण फारच व्यस्त असतो (फिली २:३-४). अचानक तासभर कुणाची तरी दु:खे ऐकायला आपल्याला मुळीच वेळ देता येणे शक्य नाही असे आपल्याला वाटते (याकोब १:१९). उच्च आणि पवित्र कामामध्ये आपण इतके गर्क असतो की जे दीन आहेत त्यांच्या गरजांकडे लक्ष पुरवायला आपल्याला वेळ नसतो.

दुसऱ्या शब्दात येशूसारखे व्हायला आपल्याला वेळ नाही.

व्यत्ययांचा प्रभू

इतर कोणाचेच काम येशू ख्रिस्ताच्या कामापेक्षा महत्त्वाचे नाही हे आपण निर्विवाद म्हणू शकतो. आपले काम कितीही महत्त्वाचे असले तरी “जगाचे तारण” हे काम त्या सर्वांपेक्षा महत्त्वाचे आहे. त्याला जे कार्य देण्यात आले होते त्याला पूर्णपणे वाहून घेणारा येशूसारखा दुसरा कोणी नव्हता (योहान ४:३४). तरीही जेव्हा आपल्या मागण्या आणि विनंत्या यांसह लोकसमुदाय त्याच्याकडे येत तेव्हा त्याच्यासारखा कृपाळू व सहनशील कोणीही नव्हता.

वाटेवर ओरडणाऱ्या त्या अंधाला आपण कसा प्रतिसाद दिला असता याची तुम्ही कल्पना करू शकता का (मार्क १० :४६-४८)? किंवा रक्तस्त्रावी स्त्रीला (मार्क १०:४६-४८)? किंवा आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद द्यावा म्हणून घेऊन येणाऱ्या लोकांना (मार्क १०:१३-१६)?

त्याच्याजवळ आलेल्या एकालाही येशू “आता नाही” असे म्हणत ओलांडून गेला नाही. आपल्याला असे कुठेच दिसत नाही की त्याच्यासमोर असलेल्या व्यक्तीसमोर त्याला लक्ष केंद्रित करणे कठीण गेले – त्याच्या समोर इतर अनेक जण त्याचे लक्ष वेधून घेत असतानाही.

सेवेच्या ह्या किरकोळ गोष्टी त्याला त्याच्या पाचारणात व्यत्यय आणत आहेत असे त्याला कधीच वाटले नाही तर हा त्याच्या पाचारणाचा भाग होता. मनुष्याचा पुत्र … सेवा करण्यास आला आहे (मार्क १०:४५). आणि त्याने किती सेवा केली! अर्थातच आपण येशू नाहीत. पण आपण त्याच्या प्रतिमेमध्ये निर्माण केले जात आहोत. आणि त्या महान दासाचे सेवक म्हणून त्याच्यामागे येण्यास तो आपल्याला पाचारण करतो (मार्क १०:४३-४४).

केंद्रित प्रीती

अर्थातच जा आणि विहिरीत उडी टाक असला काही सल्ला येशू कधीच देणार नाही. काही जणांची वेळापत्रके इतकी शिक्कामोर्तब केलेली असतात की ती उघडून आत जाणे अशक्य असते – आणि अशा लोकांना उद्देशून बॉनहॉपर यांनी सल्ला वरील दिला आहे.

समोर व्यत्यय आलेला असताना, एवढा धीर असतानाही एखादी विनंती कशी नाकारावी हे येशूला ठाऊक होते (लूक ४:४२-४३). काहींना हे ठाऊक असायला हवे की सेवक असणे याचा अर्थ ‘नाही’ हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकायचा असे नाही. हल्लीच्या युगातही आपण दिवसाचा काही काळ स्मार्ट फोन बंद करून अधिक महत्त्वाच्या कामावर अथवा नात्यावर लक्ष केंद्रित करू शकतो.

याशिवाय दररोजच्या छोट्या गरजा यामध्ये आणि आपला खूप वेळ खाणाऱ्या मागण्या यात फरक आहे. जर आपण आपल्यासाठी सामान्य नियम केला की छोटे व्यत्यय आणि छोट्या गरजा आपण हाताळू शकू तर मोठ्या व दीर्घ कालच्या इतरांच्या जबाबदार्‍यांपासून आपण स्वत:ला दूर ठेवू शकतो.

तरीसुद्धा येशू आपल्याला कठीण समतोल साधायला लावतो: तुमच्या दररोजच्या योजनावर एकदम घट्ट पकड असू देवू नका किंवा कोणासाठीही त्या अगदी सहज सोडूही देऊ नका. अशा प्रकारचा समतोल फायदा – तोट्याच्या यादीतून किंवा सफलतेच्या साधनांतून मिळणार नाही तर स्वर्गाच्या प्राधान्याशी एकसूर असलेल्या ह्रदयातूनच मिळेल.

स्वर्गाशी एकसूर असलेली ह्रदये

पुन्हा एकदा येशू हाच आपला आदर्श आहे. इतक्या मागण्या आणि विनंत्या पुढे असताना आणि इतके महत्त्वाचे काम करायचे असताना अनपेक्षित गोष्टी केव्हा कवटाळायच्या आणि केव्हा लक्ष केंद्रितच ठेवायचे हे त्याला कसे समजले?

त्याच्या सेवेच्या सुरवातीस कफर्णहूम येथे रात्रभर रोग्यांना बरे करून भुते काढल्यावर “ दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आले, आणि आपल्यापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते (लूक ४:४२). ह्या वेळी मात्र येशू नाही म्हणाला “परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावांनाही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठवले आहे” ( लूक ४:४३).

अशा प्रकारचे आध्यात्मिक सामंजस्य कोठून आले? लूक आपल्याला सांगतो, जेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ आला तेव्हा तो रानात होता (लूक४:४२) आणि अशा एकांताच्या जागा प्रार्थनेसाठी येशूच्या आवडत्या होत्या (लूक ५:१६). दुसऱ्या शब्दांत तो त्याच्या पित्याशी संभाषण करत असताना त्याच्याकडे गर्दी लोटली. आणि आध्यात्मिक सामर्थ्याच्या त्या स्थळातून त्याला स्पष्ट दिसत होते की आता त्याने पुढे जाण्याची गरज आहे. ज्यांची ह्रदये स्वर्गामध्ये रोवलेली आहेत – केवळ एकदाच नाही तर -रोज आणि रोज- ते हळूहळू अशाच प्रकारच्या सुज्ञतेत वाढत जातात. काही गरजा दिवसाच्या कामात मदत न करता अडथळा आणणाऱ्या आहेत आणि इतर पवित्र अडथळे आहेत  हे त्यांना समजते. आणि मदत करतानाही आपला स्वार्थीपणा आपल्याला मागे ओढतोय हे त्यांना जाणवते. पण देवाच्या कृपेद्वारे त्यांच्या क्षणिक निराशेला  ते हसतील, आपल्या क्षमतेच विचार  बाजूला ठेवतील आणि दिवसातील व्यत्यय प्रीतीसाठी स्वीकारतील.

Previous Article

देव तुम्हाला एकेक दिवस राखतो

Next Article

उगम शोधताना

You might be interested in …

मी कोमट आहे का?

जॉन पायपर कोमटपणा म्हणजे काय? कोमटपणाचे सार म्हणजे असे म्हणणे, “ मला कशाची गरज नाही, मला काहीच नको. मला येशू मिळाला ते पुरे आहे. एक दिवस मी त्याला माझ्या ह्रदयात यायला आमंत्रण दिले होते आणि […]

तुमच्यासाठी येशू कोण आहे वनिथा रिस्नर

शुभवर्तमान ही चांगली बातमी आहे हे मला ठाऊक आहे पण मी हे सहज विसरते की ही आश्चर्यकारक रीतीने चांगली बातमी आहे. माझ्या ह्रदयाने याचे पुनरावलोकन करावे म्हणून मी देवाला विचारत होते की मला माझे पाप […]