जनवरी 29, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

अठरावे शतक : झिगेन्बाल्ग कालवश

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक  ३                            

आता झिगेनबाल्गने स्थानिक पाळक व शिक्षकांना प्रशिक्षण देणारी संस्था सुरू केली. त्यात आठ विद्यार्थी होते. त्याने डॅनिश वसाहतीत दोन ठाण्यांवर एकेक मिशनरी नेमला. गव्हर्नरच्या विनंतीवरून कडलूर व चेन्नईमध्ये अशा दोन शाळा काढल्या. ब्रिटिशांचे ख्रिस्ती शिक्षणातील हे पहिले पाऊल होते. शब्दकोष पूर्ण झाला. जुन्या कराराचे रूथपर्यंत

भाषांतर झाले. काम वाढले तसा विरोध वाढला. एक दिवस एस.पी.सी. के. च्या अध्यक्षाचे झिगेन्बाल्गला पत्र आले. त्यात मानमरातबाने आरामदायी सेवा न करता, ज्यांनी ख्रिस्ताचे नाव कधीच ऐकले नाही अशांसाठी अथक त्यागाने काम केल्याबद्दल, त्यासाठी संकटे व अपमान सहन केल्याबद्दल झिगेन्बाल्गची प्रशंसा करण्यात येऊन त्याला सदिच्छा देण्यात आल्या होत्या. हे पत्र वाचून त्याला व त्याच्या सहकार्यांना उत्तेजन व समाधान मिळणार होते. पण ते पत्र त्यांच्या हाती पडण्यापूर्वीच झिगेन्बाल्गची जीवनयात्रा संपली होती.

१७१८ च्या अखेरीस तो फार खंगत चालला होता. अथक परिश्रम हे एक कारण होतेच. पण दुसरे कारण म्हणजे स्वदेशीय अधिकारवर्गाशी निष्कारण होणारा संघर्ष. मिशन बोर्डचा अध्यक्ष बेन्डट धार्मिक पण संकुचित वृत्तीचा होता. त्याच्यावर बोव्हिंगचा प्रभाव पडला होता. त्याने केवळ साध्या पद्धतीने सुवार्ताप्रसार करण्याचे धोरण ठेऊन पुस्तके

लिहिणे, छपाई, मंदिर, प्रशिक्षणवर्ग, ज्ञानप्रसार ही झिगेन्बाल्गची कामे नापसंत ठरवली. झिगेन्बाल्ग व त्याच्या सहकार्यांनी दारिद्र्य पत्करून जोडीजोडीने बाहेर पडून सुवार्ताप्रसार करावा असे फर्मान त्याने काढले. ही मूर्ख आज्ञा ऐकून झिगेनबाल्गचे काळीजच फाटले. अर्थात पुढे बोर्डाला ही चूक कळून आली व त्यांनी ही आज्ञा मागे घेतली. पण तोवर झिगेन्बाल्ग व ग्रंडलरला मृत्युमुखी पडावे लागले.  नंतर त्यांच्याच पद्धतीने काम चालू राहिले. जरी हा कटू अनुभव आला नसता तरी झिगेन्बाल्ग वाचला नसता हे तितकेच खरे आहे. शक्तिबाहेर काम केल्याने दीर्घायुष्य लाभण्याची अपेक्षा करणे चूक ठरेल. देवाचे हे काम तातडीने करणे गरजेचे आहे. देवाला काळजी आहे या भावनेने त्यांनी काम केले होते.

१७१८ च्या नाताळ व नवीन वर्षाच्या उपासनेत झिगेन्बाल्गने उपदेश केला. पण झपाट्याने त्याची प्रकृती खालावत गेली. पौलाप्रमाणे प्रभूच्या सन्निध्यात जाण्याची उत्कंठा बाळगत २३ फेब्रुवारी १७१९ रोजी तो प्रभुघरी निघून गेला. अखेरीस तो म्हणाला, “मी दररोज तुझ्या हाती स्वत:ला सोपवत असतो. आता जेथे माझा बाप आहे, तेथे तुझा सेवक असावा अशी मी इच्छा करतो”… ‘मला तीव्र प्रकाश सहन होत नाही’… असे म्हणत असता त्याने आपला हात कपाळावर आडवा धरला व म्हणाला, “कडक ऊन पडल्यासारखा प्रकाश माझ्या डोळ्यांवर कुठून येत आहे?” तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर सौंदर्यपूर्ण शांती फुलत होती.

त्याच्या विनंतीवरून त्याच्या जवळच्या लोकांनी व्हॅायोलीन वाजवून त्याचे आवडते गीत गायला सुरुवात केली. ते ऐकत असता मूल आपल्या आईच्या मांडीवर झोपावे तसा तो प्रभूच्या बाहूत शांतपणे विसावला. त्याला महानिद्रा लागली. केवळ ३६ व्या वर्षी त्याचे मरण झाले. पण आपल्या अल्पायुषी पायाभूत कार्यातून त्याने भारताला महान देणगी दिली. त्याने सुरू केलेली कार्यपद्धत आजही चालू आहे. कालपरत्वे त्या कार्यात अनेक सुधारणा होत गेल्या. पण कामाची दिशा देण्याचे काम झिगेन्बाल्गनेच केले.

एकच गोष्ट तो हाताळू शकला नाही, ती म्हणजे जातीवाद. कॅथॅालिक मिशनरींनी जाती भेदाला भलतेच महत्त्व दिले होते, त्यामुळे तो टोकाला गेला होता. हे असेच असते असा स्थानिकांचा ग्रह झाला होता. पण पुढे प्रॅाटेस्टंट मिशनरींनी ख्रिस्ती मंडळीत जातिभेदाला मुळीच थारा दिला नाही. त्रिंकोबारच्या मंडळीत शुद्र व हरिजन वेगवेगळे बसत. हरिजनांच्या आधी सर्व शुद्र आधी भोजन वाढून घेत. पुढे हे सारे बंद झाले. पण झिगेन्बाल्गची इतर सर्व कामे पुढे चालू राहिली. विशेष म्हणजे मिशन कार्यपद्धती व त्याचा उद्देश त्याने भारतीयांना दाखवून दिला. यापूर्वीच्या ‘रोमन ब्राम्हण’ पद्धतीमुळे ख्रिस्ती मिशन कार्याविषयी ढोंगी व लबाड अशी जी प्रतिमा तयार झाली होती, ती दूर होऊन ख्रिस्ती कार्याविषयी आदरभाव निर्माण झाला. हे महत्त्व मिळवून देण्याचे कार्य झिगेन्बाल्गने केले. ख्रिस्तीतरांचाही तो आवडता होता. त्यांचे मन ख्रिस्ताकडे वळवून त्याच्या कळपात त्यांना आणण्याचे काम तो करत होता. गूढ विधींनी नव्हे तर खऱ्या सुवार्तेचा पूर्ण खुलासा करून तो त्यांना ख्रिस्ताकडे आकर्षित करायचा. बाप्तिस्म्यापूर्वी पूर्ण पवित्र शास्त्र देण्याचा त्याचा आग्रह असे.

धर्माविषयी त्याने राजरोस मुक्त चर्चा घडवून आणली. कसलीच गुप्तता ठेवली नव्हती. हा बदल झिगेन्बाल्गने लोकांच्या लक्षात आणून दिला. असा आदर्श ठेवणारा हा पहिला मिशनरी होता. सर्व प्रॅाटेस्टंट मिशनऱ्यांचा हा मुकुटमणी होय. सर्वच त्याची आदराने प्रशंसा करतात. त्याचा मिशनकार्यासाठी असलेला उत्साह, आवेश, देवावरील दृढ निष्ठा, धाडस, परिश्रम, कामसुपणा, नि:स्वार्थीपणा, तन मन धन ओतून त्यागाने काम करण्याचा सेवाभाव यामुळे तो मिशन क्षेत्रातला ‘प्रभाततारा’ असे संबोधण्यास पात्र ठरतो.

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ् ( १७२६-१७९७)

पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या हातात देऊन आपण हे बालक देवाला समर्पित करीत असल्याचे सांगितले. व त्यांच्याकडून वचन घेतले की जर त्याने पाळक होण्याची इच्छा दर्शवली तर ती पूर्ण करण्यास त्याला प्रोत्साहन देऊन त्याला

योग्य ती मदत करावी. हेच बाळ ७० वर्षांनी भारतातील तंजावरमध्ये मिशनरी म्हणून मरण पावले. ते बाळ म्हणजेच ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ होय. त्याच्या आईप्रमाणे वडीलही देवभीरू असल्याने तो लहानपणापासून गांभीर्याने वागला. पुढे हॅले विद्यापीठात पाळकीय शिक्षण घेतले. झिगेन्बाल्गनंतर भारतात २३ वर्षे सेवा करून मायदेशी परत गेलेला शुल्टझ हा मिशनरी त्याच्या संपर्कात आला. तेथे तो तामिळ भाषेतील नव्या कराराचे काम करायचा. त्या दोघांच्या आवडीनिवडी सारख्याच असल्याने त्यांची चांगलीच गट्टी जमली. श्वार्टझ् त्याला ग्रंथप्रकाशनात मदत करू लागला. त्यासाठी श्वार्टझ त्याच्याकडून तामिळ भाषा शिकू लागला. त्यामुळे त्याची भारताशी नाळ जुळली. भारतीयांविषयी त्याला भरपूर माहिती मिळाली व त्यांच्याविषयी कळकळ व आस्था निर्माण झाली. त्यामुळे मिशनसेवेत जाण्याविषयी त्याला विचारणा झाली तेव्हा वडिलांच्या परवानगीने तो डेन्मार्कच्या ठाण्यावर गेला. तेथे त्याने दीक्षा घेतली आणि झिगेन्बाल्गनंतर ३१ वर्षांनी २० जुलै १७५० रोजी तो भारतात त्रिंकोबारमध्ये दाखल झाला. त्याच्या वयाच्या २४ व्या वर्षापासून पुढे ४७ वर्षे तो मायदेशी एकदाही गेला नाही तर भारत आपलाच देश मानून येथेच राहून अथक सेवा

व कष्ट करीत येथेच देह ठेवला.

आतापर्यंत भारतात मिशन सेवा खूप वाढली होती. तोवर बरेच धार्मिक, एकनिष्ठ, विश्वासू मिशनरी येऊन गेले होते. झिगेन्बाल्गनंतर त्याचा सहकारी ग्रंडलर मृत्यू पावल्यावर शुल्टझ् , कोहलॅाफ व फेब्रिक्स् हे महत्त्वपूर्ण काम करणारे होते. शुल्टझ् नंतर १७४२ मध्ये मद्रासचे काम फॅब्रिक्सकडे होते. त्याने तामिळमध्ये बायबलचे भाषांतर पूर्ण करण्याची मोठी कामगिरी पार पाडली. भारतात एका वेळी चार ते आठ मिशनरी काम करायचे. ते खेडोपाडी पायी फिरून सुवार्ता सांगायचे, वाटेत भेटणाऱ्यांना धैर्याने सत्याची घोषणा करायचे व शाळा देखील सांभाळायचे. ते गरीब घरात वाढलेले असल्याने विलासी नसून साधेसुधे व निष्ठेने सेवा करणारे असायचे. त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे झिगेनबाल्गच्या वेळी ३५५ बाप्तिस्मा पावलेले ख्रिस्ती होते. ती संख्या आता ८००० वर गेली. श्वार्टझच्या सेवेनंतर मद्रासमध्ये ती संख्या ११००० वर गेली. दोन स्थानिक दीक्षित पाळकही होते. तर प्रश्नोत्तररूपाने शास्त्र शिकवणारे लोक सर्वत्र विखुरले होते. त्या प्रांताबाहेरही मिशनकार्याचे जाळे पसरले होते.

भारताच्या अग्नेयेसही मंडळी स्थापण्यासारखी परिस्थिती तयार झाली होती. झिगेन्बाल्गच्या पद्घतीनेच सेवेचा गाडा पुढे चालू ठेवण्याची परंपरा मिशनरींनी चालू ठेवून काम खूप वाढवले होते. आधीच तामिळ शिकून आल्याने श्वार्टझ् तर लगेच कामाला लागला. आरंभी तो संदेश वाचून दाखवत असे. पण भाषेवर रोज भरपूर मेहनत घेऊन चार

महिन्यात तो तामिळमध्ये उत्तम उपदेश करू लागला. नवीन वर्ष सुरू होताच फिरतीवर जाऊन शाळेतील मुलांना तामिळ भाषेत सुवार्ता सांगून शिक्षण देऊ शकला. लोकांच्या स्थानिक धर्माची त्याने माहिती करून घेतली. त्याचा सुवार्तेसाठी त्याला खूप उपयोग झाला. पुढे तो इंग्लिश, पोर्तुगीज व त्या काळातील भारतातील फारसी भाषाही शिकला. त्यामुळे त्याचे संपर्कक्षेत्र व्यापक बनले. बुद्धिमत्तेपेक्षाही त्याचे सद्गुण हे त्याच्या यशाचे गमक होते. तो विनयशील, शांतवृत्तीचा, काटकसरी, कनवाळू, समंजस, प्रसन्न, निरागस व आचरणात पारदर्शक होता. म्हणून लवकरच त्याने भारतीयांचे प्रेम व मर्जी संपादन केली. त्याने त्रिंकोबार, त्रिचन्नापल्ली व तंजावर अशा तीन ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये काम केले. त्रिंकोबारमध्ये मिशनरी म्हणून तर त्रिचन्नापल्लीत मिशनकार्याबरोबरच सैनिकांचा चॅप्लन

म्हणून आणि तंजावर येथे ही दोन्ही कामे करून सल्लामसलतीची कामेही केली. तिन्ही ठिकाणी हा ख्रिस्ताचा दूत म्हणून उठून दिसतो.


१ ला टप्पा- त्रिंकोबार ( १७५० ते १७६६). येथे त्याने १६ वर्षे काम केले. त्याची कर्तबगारी अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी दक्षिणेकडील सर्व कामांची सूत्रे त्याच्या हाती सोपवली. मिशनरी म्हणून त्याने सर्व कामे व्यवस्थित पार पाडली. त्याचा दिनक्रम असा होता: सकाळ ते दुपार शाळेची कामे व देखरेख करून प्रश्नोत्तर पद्धतीने लोकांना शास्त्र शिकवायचे. जवळच्या खेड्यातील लोक यावेळी त्याच्याकडे एकत्र जमून हे शिक्षण घेत. सहा आठवडे तो त्यांना हे शिक्षण देत असे. दुपारी व संध्याकाळी तो फिरतीवर सुवार्ताप्रसाराला जात असे. त्यावेळी तो ख्रिस्ती लोकांच्याही भेटी घेत असे. तसेच विधर्मी व कॅथॅालिकांशीही संपर्क साधून बी पेरण्याचे काम करीत असे. यासाठी नित्यनेमाने देवाशी निकटचा संपर्क साधून तो देवाकडून ज्ञान, सुज्ञता व सामर्थ्य प्राप्त करून घेत असे. त्यामुळे देवावर त्याची अढळ निष्ठा राहून त्याला आयुष्यभर त्याची शांती व मार्गदर्शन लाभले. तोही झिगेन्बाल्गप्रमाणे कामगारांसाठी सभा घेत असे, त्यामुळे मतभेद टाळून बंधुभाव रुजून काम सुरळीत चालले. त्या काळी लोक देवाचे ज्ञान व सुज्ञतेसाठी प्रार्थना करायचे. प्रत्येक जण समाजात, शाळेत, घरी, छापखान्यात, कामावर काय घडले, आपण काय केले, हे आपापल्या ठिकाणी जमून सांगत असे. त्यामुळे सामोपचाराने संस्थेतील सर्व गैरसमज दूर करून उपाययोजना व सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग ठरवला जात असे. लोक तेथे आपल्या कामाचा अहवालच देत असत. त्यामुळे कामातील उणीवा दूर केल्या जात असत. शंभर वर्षे ही पद्धत चालू होती. श्वार्ट्झला या गोष्टीचे महत्त्व पटले होते. ही पद्धत फारच उपयुक्त होती. आज या बाबतीत  अनेक संस्थांमधील कामगारांमध्ये उदासीनता दिसते ही खेदाची बाब आहे जेथे ही पद्धत चालू आहे, तेथे ही फलदायी ठरत आहे.

Previous Article

विस्कटलेल्या कुटुंबातील मुलांसाठी आशा

Next Article

ख्रिस्तासाठी थोडे दिवस कष्ट करताना

You might be interested in …

एलजीबीटी लेखक: डग्लस विल्सन

(एलजीबीटी हा शब्द आता खूपच प्रसिद्ध होत आहे. इंद्रधनुष्य  हे चिन्ह आता या लोकांचे प्रतिक बनले आहे. एलजीबीटीचा अर्थ काय? एल: लिस्बीयन – स्त्रियांचा समलिंगी संभोग. जी: गे- पुरुषांचा समलिंगी संभोग. बी: बायसेक्षुअल – नैसर्गिक […]