जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुम्ही कोठेही असा ख्रिस्त तुमचा होऊ शकतो

स्कॉट हबर्ड

पापी लोकांना ख्रिस्ताकडे येण्यापासून काही लबाड्या त्यांना रोखून ठेवतात. कदाचित ते प्रथमच ख्रिस्ताकडे येत असतील किंवा एका मोठ्या पतनानंतर वळत असतील – ते म्हणतात : देवाची अभिवचने माझ्यासाठी नाहीत.

येशू पापी लोकांचा उद्धार करतो हे कदाचित तुम्हाला ठाऊक असेल आणि तुम्ही तसे कबूल केले असेलही. त्याने इतरांचे कसे तारण केले या त्याच्या विजयी कृपेच्या  शेकडो साक्षी तुम्ही ऐकल्या असतील. आपण त्याचे व्हावे अशी ज्वलंत इच्छा तुम्हाला वाटत असेल. तरी तुमच्या जिवाच्या सावलीत, अर्धवट जागतेपणी एक विचार तुम्हा कां कू करत अडखळवतो.  “मी येशूकडे आलो असतो पण…”

  • मी  इतका कमकुवत आहे की  त्याच्या आज्ञा शेवटपर्यंत पाळायला मला जमणार नाही.
  • मी खूपच लाजिरवाणी पापे केली आहेत.
  • किती वेळा मी त्याच्या कृपेला तुच्छ लेखले आहे.
  • माझं ह्रदय फारच कठीण आहे.
  • मी बराच काळ ख्रिस्ती असल्याचे ढोंग केले आहे
  • माझा विश्वास खूपच कमी आहे.

अशी कारणे लबाड आहेत. ती विषारी सुद्धा आहेत. “पण मी…” असे म्हणणाऱ्या असहाय पाप्याला सैतान कधीच गजाआड घालायला पाहत नाही. असे अपवाद सुचवण्यात तर तो कुशल आहे.


जो कोणी विश्वास ठेवतो

अशा सैतानी सूचनांविरूद्ध प्रभू येशू लढाई करतो.

“देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान ३:१६).

“जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” (योहान ५:२४).

“मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” (योहान ६:४७).

 “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल” (योहान ११:२५).

“जो कोणी” या फलकाखाली बसण्यास कोण लायक आहे? असे अभिवचन कुणाला मिळू शकते? तरुण पापी आणि वृद्ध पापी, लज्जित पापी आणि सभ्य पापी, गुप्त पापी आणि निर्लज्ज पापी, नव्याने परिवर्तन झालेले पापी आणि नीतिमान ठरलेले पण अद्याप गौरवीकरण न झालेले पापी – थोडक्यात, सर्व पापी. तुम्ही कोणीही असा. ख्रिस्त विश्वास ठेवण्यासाठी तुमचा आहे. याला कोणीही अपवाद नाही.

कदाचित हे सर्व तुम्ही पूर्वी ऐकलेले असेल. कदाचित अशी अभिवचने घट्ट धरून ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला असेल पण धडधडणारा विवेकभाव आणि अथक शत्रू तुमच्या हातातून ती खाली पाडत आहेत. कदाचित “जो कोणी” हे येशूचे शब्द तुम्ही डझनभर ऐकले असतील तरीही “पण मी…” असे पुटपुटत तेथून दूर जाता.

अपंग लोकांमध्ये

येशूने इतक्या लोकांना, इतक्या वेळा का बरे केले असा विचार तुम्ही कधी केलात? तो सुवार्ता सांगण्यास आला         (लूक ४:४३) आणि त्याने ती गाजवलीही. आजारी लोक, लुळे लोक, मरणारी मुले, रोगी, गर्दी यांच्यामध्ये त्याने इतका वेळ का घालवला? एक कारण म्हणजे बरे करणे हे त्याच्या उपदेशाचे उदाहरण होते. त्यामुळे त्याच्या अभिवचनावर आपण शंका न घेता विश्वास ठेवावा (मार्क २:९-११). लूकाच्या शुभवर्तमानातला एक ठराविक देखावा पहा: “मग सूर्यास्ताच्या वेळी, ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांना त्यांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांना बरे केले” (लूक ४:४०).

नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली सर्व माणसे आली आणि येशूने त्या प्रत्येकाला बरे केले. देवाच्या पुत्राच्या हातातून आजार पळून जातो. – मग तो कोणताही व्याधी असो, कोणीही व्यक्ती असो.

त्या गर्दीतील कोणी त्यांची पाळी येत असताना गुप्तपणे असा  विचार केला का की, “ हो मला येशूची दया व सामर्थ्य दिसतंय. पण त्याला माझा आजार बरा करता येईल का? मी तर किती दीर्घ काळ आजारी आहे. इथले दुसरे लोक तर माझ्या अर्ध्या आजाराइतके पण आजारी नाहीत. मी बरा न होण्यासारखा असावा.” जर असे असले तर येशूने हे सर्व प्रश्न लवकरच मिटवून टाकले. अंध पाहू लागले, बहिरे ऐकू लागले, पक्षघाती चालू लागले. भुताने पछाडलेले योग्य मन:स्थितीत आले. ते कोणीही असोत. असा दिवस कधी आला नाही किंवा येणार नाही की येशूला त्याच्याकडे आलेल्या व्यक्तीला कसे बरे करावे हे ठाऊक नाही.

तुम्हाला विसरून जा

जेव्हा आपण येशूला बरे करताना – सर्व रोग्यांना – बरे करताना पाहतो तेव्हा ‘जे कोणी’ हे शब्द जास्त स्पष्ट, जास्त खरे दिसू लागतात. तसेच विश्वास हा शब्द सुद्धा.

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” (योहान ६:४७).

विश्वास ठेवणे म्हणजे काय?

आपल्याला लगेचच दिसते की विश्वास ठेवणे याचा अर्थ असा नाही की : तुमच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वासासाठी शोधा की त्यामुळे येशूला तुमचा उद्धार करता येईल. ही जरी वेडेपणाची कल्पना असली तरी अनेक जण शोधणे, शोधणे आणि शोधण्याच्या जुन्या वाटांवरूनच चालत जातात. अखेरीस आपल्याकडून असे म्हटले जाते की “बरंय तर, कदाचित येशू मला वाचवू शकेल.”

जेव्हा जेव्हा आपण अशा शोधाचा प्रयत्न करतो तेव्हा आपण त्या कुष्ठरोग्यासारखे असतो. आपल्या कुजणाऱ्या त्वचेकडे आशेने पाहत की ख्रिस्त आपल्याला बरे करू शकेल. कुष्ठरोग्याची त्वचा अशी  काहीही आशा देऊ शकत नाही की ज्यामुळे ख्रिस्त ती बरी करू शकेल. अगदी काहीच नाही. त्याची एकमेव आशा एवढीच की स्वत:विषयी म्हणजे फोड, त्वचा सर्व विसरून जे हात त्याला बरे करू शकतात त्यांच्याकडे जायचे.

जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बाहेर न लावता स्वत:कडेच आत लावता –  ख्रिस्ताची कृपा व सामर्थ्य याकडे न लावता तुमची पापे व दुर्बलता याकडे पाहता तोपर्यंत तुम्हाला आपण एक अपवाद आहोत असे वाटण्याला कारणे मिळत राहतील. पण विश्वास शिकवतो की त्या कुष्ठरोग्याचे अनुकरण कर : स्वत: पासून फिर,  प्रत्येक सबबीसाठी तुझे कान बंद कर, विवेकाच्या त्या  वेड्यावाकड्या पंजामध्ये येशूची अभिवचने घट्ट पकड, येशूला ओरडून म्हण, “प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात” (लूक ५:१२).

केवळ ख्रिस्तापुढे कोणताही आतला कटाक्ष आपल्याला आशा देऊ शकत नाही. आणि जर अशा कटाक्षाने आशा दिली असेल तर तुम्ही स्वत:ला अगदी खोलवर पाहिलेच नाही. येशूशिवाय आपल्यातला प्रत्येक जण निराशेचा एक ढिगारा आहोत.

म्हणून जर तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल आणि ठेवत राहायचा  तर “केवळ मी” ह्या प्रत्येक सूचनेचा धिक्कार करून “ होय केवळ ख्रिस्त” ह्यालाच जोरदार प्रतिसाद द्यायला हवा.

  • “पण ख्रिस्ताच्या आज्ञा पाळण्यास मी फार दुर्बल आहे.” “ हो. पण ख्रिस्त शक्ती देतो.”
  • “पण मी ढोंगी जीवन जगलो.” “ हो. पण ख्रिस्त ढोंगी लोकांनाही क्षमा करतो.”
  • “पण माझे ह्रदय फार कठीण आहे.” “ हो. ख्रिस्त नवे ह्रदय देण्याचे अभिवचन देतो.
  • “पण माझा विश्वास खूपच कमी आहे.” हो. पण ख्रिस्त महान विश्वास असलेल्यांना आणि लहान विश्वास असलेल्यांनाही तारतो.”

हे समजून घ्या की विश्वास ठेवल्याने आपले एका विस्तृत जगात स्वागत केले जाते. त्या जगात आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे , देवाच्या वचनावर जगत राहणे, आपल्या मंडळीच्या लोकांची सेवा करणे, आपले पाप जिवे मारणे आणि जाणीवपूर्वक ख्रिस्ताच्या इतर आज्ञांचेही पालन करणे हे सर्व येते. पण त्या मार्गात चालण्यासाठी सामर्थ्य आणि प्रत्येक ठोकर खाल्ल्यावर क्षमा ही फक्त एकाच प्रवाहातून येते: विश्वास.

तर तुम्ही कोणीही असा. तुमच्यामधल्या कोणत्याच गोष्टीने तुम्हाला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यापासून अडथळा करू नये. कदाचित पहिल्यांदाच किंवा पुन्हा आरंभ करून तुमचे पाप कितीही हट्टी, काळेकुट्ट, निंदनीय, लाजिरवाणे, नाशकारी असले तरी येशूचे हे अभिवचन ऐका: “जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे” (योहान ६:४७) – त्यात तुम्हीही येता.

Previous Article

एकटे असणे आपल्याला का कठीण जाते

Next Article

जर आपण प्रीती केली नाही तर आपण टिकणार नाही

You might be interested in …

 तुमच्या आनंदाचा विध्वंस करणारा गर्व  जोनाथन वूडयार्ड

  मी एक गर्विष्ठ माणूस आहे. खरंच. या विभागातला मी एक प्रमुख तज्ज्ञ आहे. मी ढोंग करत नाहीये. मला प्रामाणिक आणि नितळ व्हायचे आहे. गर्वामुळे येणाऱ्या समस्या मी प्रत्यक्ष  अनुभवल्या आहेत. मी खूप वेळा गर्व […]

सात वचनांमध्ये विवाहाची कहाणी

डेविड मॅथीस नुकताच मी एका प्रगल्भ जोडीचा विवाह लावला. वधू आणि वर दोघांनीही तिशी ओलांडली होती. ते दोघेही विश्वासात आणि जीवनात स्थिर होते आणि आपण कशावर उभे आहोत ते त्यांना माहीत होते – देवाच्या वचनावर. […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १५ प्रभूचा दिवस देवाच्या भावी प्रकटीकरणाचे ज्ञान होण्यासाठी ‘प्रभूचा’ दिवस हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. जुन्या करारातील या शब्दाच्या वापराच्या आधारावरच नव्या करारात हा शब्द वापरला आहे. देवाच्या क्रोधात घडणार्‍या भावी […]