दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

रात्री उच्च स्वराने गा

स्कॉट हबर्ड


ख्रिस्ती लोक हे अशा प्रकारचे लोक असतात की ते मध्यरात्री गाणी गातात.

जेव्हा पौल व सीला यांना मारहाण करून, रक्तबंबाळ करून, बेड्या घालून तुरुंगात डांबले होते तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनी त्या कोठडीत त्यांना गाणी गाताना ऐकले (प्रेषित १६:२५). जेव्हा प्रभू येशू त्याचा विश्वासघात होण्याची वाट पाहत होता तेव्हा त्याने शिष्यांसमवेत गीत गायले (मत्तय २६:३०). आणि अर्थातच जेव्हा दावीद व इतर स्तोत्रकर्ते  देव शांत आहे की काय अशा आभासाच्या संधीप्रकाशात चालत होते तेव्हा त्या अंधारातून त्यांनी गाणी पाठवून दिली.

ख्रिस्ती लोक फक्त सूर्योदयाच्या वेळी जेव्हा क्षितिजावर मदत धाव घेऊन येत आहे असे दिसतानाच गात नाहीत, ते मध्यरात्रीही गातात जेव्हा अंधाराने सूर्याला ग्रासून टाकलेले असते.
आणि बहुतेक वेळा देव ही मध्यरात्रीची गीते आपल्याला सकाळपर्यंत टिकाव धरून ठेवण्यास वापरतो.

मध्यरात्रीची दु:खे

स्तोत्र ४२-४३ च्या १६ वचनांचे मिळून एक गीत आहे आणि ते स्तोत्रकर्त्याच्या गडद काळ्या रात्री त्याने लिहिले. हा स्तोत्रकर्ता इस्राएलच्या मंदिरातील गायक – मंदिरापासून दूर – मित्रांपासून दूर हद्दपार झालेला आहे व देवाच्या सान्निध्यापासूनही दूर आहे असे त्याला भासते.

देवाच्या भासणाऱ्या अनुपस्थितीचे हे भूत त्याच्या गाण्याच्या लयीतून चालताना दिसते. खास करून पुन्हा पुन्हा मिळालेल्या हेटाळणीत – “तुझा देव कोठे आहे” (स्तोत्र ४२:३, १०)? ११५व्या स्तोत्रकर्त्याने धीटपणे जसे उत्तर दिले की, “आमचा देव स्वर्गात आहे; त्याला योग्य दिसते ते सर्व तो करतो” (व. ३). असे उत्तर न देता तो पुन्हा पुन्हा विचारत राहतो “तू मला का विसरलास..  (४२:९, ४३:२)?

स्तोत्रकर्त्याची शंका त्याला दुभागते. त्याचा एक भाग विश्वास ठेवतो की देव त्याचा उद्धार करील (४२:५) आणि दुसऱ्या भागाला वाटते की देव त्याला विसरला आहे (४२:९). त्याचा एक भाग अजूनही आशेची भाषा आठवतो. “देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन” (४३:५). आणि एक भाग केवळ निराशेची भाषा बोलतो, “तू माझा का त्याग केलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे” (४३:२)? एक भाग उभा राहून देवाच्या अभिवचनांना घट्ट धरून राहतो; “परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील” (४२:८) आणि दुसरा भाग म्हणतो; “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस  (४२:११)?
आणि या सर्व दु:खाच्या मध्ये, त्याच्या शंकांच्या झंझावातात बसला असताना स्तोत्रकर्ता एक गोष्ट करतो जी आपल्यापैकी अगदी थोडे जण करण्याचा विचार करतील.
तो गातो.

मध्यरात्रीचे मधुर गायन

“मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन” (स्तोत्र ४२:८). येशू, पौल आणि सीलाप्रमाणेच हा स्तोत्रकर्ता रात्रीच्या शांततेचा भंग त्याच्या गीताने करतो. त्याच्या गाण्यामध्ये ४२ व ४३ या स्तोत्रांमध्ये दिलेल्या अनेक कल्पना असतील.
पण का? अंधाराने व शंकेने आतून बाहेरून व्याप्त असताना हा स्तोत्रकर्ता गात का होता? आणि त्याने का गावे? स्तोत्र ४२ व ४३ मध्ये याची निदान चार कारणे दिली आहेत.

१. गीत हे दु:खाचे रूपांतर प्रार्थनेत करते

आपल्या अंधाऱ्या रात्री या प्रार्थनेला एक परकी भाषा आहे असे भासवतात. आपण आपल्या बिछान्यापाशी तासभर गुडघे टेकून बसलो तरी एक शब्दही बोलू शकत नाही. आपण सुरुवात करतो, थांबतो, सुस्कारे सोडतो आणि मग सोडून देतो. किंवा आपण जरी प्रार्थना केली तरी आपले विचार एका बेबंद विचारातून दुसऱ्याकडे भरकटत राहतात. आपल्या विनंत्या वर जाण्यापूर्वीच मरून जातात.
त्याच्या या संकटात (स्तोत्र ४२:९,४३:१,३) हा स्तोत्रकर्ता त्याच्या प्रार्थनेला मधुर गीताचे पंख देतो.
स्तोत्रकर्ता इस्राएलच्या गाण्याच्या पुस्तकातील ठेका धरतो. त्याला माहीत आहे की त्याचे गीत त्याचे उसासे दूर करील आणि ते देवाकडे पाठवील. त्याला माहीत आहे की त्याचे गाणे त्याच्या आतील सर्व गोंधळ गोळा करील आणि त्याला एक समजण्याजोगा आवाज देईल. आणि म्हणून त्याने त्याचे दु:ख एका विलापाच्या गीतामध्ये गोवले.

जेव्हा तुम्ही इतके त्रासलेले असता की देवाशी तुम्ही बोलूच शकत नाही तरीसुधा तुम्ही गाऊ शकता. एखाद्या संताचे एखादे गीत तुम्ही घेऊ शकता – ते कदाचित प्रत्यक्ष स्तोत्र असेल किंवा उपासना संगीतातले गाणे असेल किंवा हल्लीचे नवे गीत असेल – ते तुमच्या दु:खाचे प्रार्थनेत रूपांतर करील.

२. गीत हे निराशेच्या युक्तिवादाशी सामना करते

मार्टीन लोईड जोन्स यांनी ४२व्या स्तोत्रावर उपदेश करताना म्हटले, “तुमच्या जीवनातील बहुतेक दु:ख हे तुम्ही स्वत:शी न बोलता स्वत:चे ऐकत राहता या सत्यामुळे आहे हे तुम्हाला समजते का?”

हा स्तोत्रकर्ता स्वत:चे केवळ  ऐकत नाही तर स्वत:साठी गातो आणि स्वत:ला म्हणतो, “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन” (४२:५). ते तो गुणगुणतो.  बुडालेल्या स्वत:कडे तो वळतो आणि खांदे धरून वर उचलतो आणि आशेचे गीत गातो.

बहुधा गायलेले शब्द आत भिडतात, बोललेले शब्द नाही. आपल्या शंकेच्या दरवाजाखालून गात असताना आत सरकते बोललेले शब्द दरवाजा ठोकतच राहतात. एकदा गायलेले शब्द बहुधा आपल्याजवळ राहतात. आपल्या ह्रदयाच्या व मनाच्या खोलीतून त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात. आपल्या लुळ्यापांगळ्या जीवाला आकार देतात, उदासीनतेला सौदर्य देतात आणि निराशेच्या युक्तिवादाला सत्यामध्ये आणतात.
देवाने आपल्याला गीतांचे पुस्तक काही हेतूने दिले आहे. आपल्याशी केवळ सत्य न बोलता आपण काहीतरी अधिक करण्याची गरज आहे. आपण गायला हवे.

३. गीते ही जो देव ऐकतो त्याचा गौरव करतात

जेव्हा मध्यरात्री आपण आपला स्वर उंचावतो तेव्हा स्तोत्रकर्त्यासमवेत आपण घोषणा करतो की; “तरी परमेश्वर दिवसा आपले वात्सल्य प्रकट करील; मी रात्री त्याचे गीत, माझ्या जीवनदात्या देवाची प्रार्थना गात राहीन. देव जो माझा खडक त्याला मी म्हणेन, “तू मला का विसरलास? वैर्‍याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे” (४२:८,९)?

जेव्हा आपण अंधारात गातो तेव्हा आपण कबूल करतो की, “देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन” (४२:५). “तू आपला प्रकाश व आपले सत्य प्रकट कर; ती मला मार्ग दाखवोत; तुझ्या पवित्र डोंगरावर, तुझ्या निवासस्थानी मला पोहचवोत; म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन” (४३:३,४).

जेव्हा आपण मध्यरात्री आपला गीत गातो तेव्हा आपल्या सर्व भावनांविरुद्ध आपण जाहीर करतो की देवाचे अंधारावर साम्राज्य आहे. देव अंधारात कार्यरत आहे आणि अंधारात सुद्धा देव भक्ती करण्यास पात्र आहे.

आणि जेव्हा आपण असे करतो तेव्हा जो देव ऐकतो त्याचा आपण गौरव करतो.

४. गीत आनंदासाठी वाट तयार करते

गीते ही काही जादूचा मंत्र नाहीत. आपण गात असताना आपले दु:ख नाहीसे करण्याचा ती उपाय नाहीत. पण गीते ही आनंद पुन्हा येण्यासाठी तयार करणारी वाट आहे. स्तोत्र ४२-४३ चा शेवट होताना स्तोत्रकर्ता अजूनही अंधारातच आहे. तिसऱ्यांदा तो खालील शब्दांनी स्वत:ला म्हणतो; “हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन” (४३:५).

पण आनंदाचा विलंब स्तोत्रकर्त्याचे तोंड बंद करू शकत नाही. तो त्याच्या खड्ड्याच्या तळाशी बसून राहतो त्याचे गुडघे त्याच्या खाली दुमडलेले आहेत, त्याची दृष्टी वर रिकाम्या वाटणाऱ्या आकाशाकडे लागलेली आहे आणि तो गात राहत आहे. तो गात गात देवाकडे याचना करत आहे आणि स्वत:ला उपदेश करत आहे. आणि त्याचा भरवसा आहे की हे करत असताना हळूहळू देव त्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढील आणि आनंद पुन्हा लोटेल. “मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन; आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन” (स्तोत्र ४३:४).

जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा देव उत्तर देईल. आपले गीत हे आपल्याला दरीतून वर काढणारा, टेकड्या सपाट करणारा आणि आनंद पुन्हा परतायला लावणारा एक मार्ग आहे.

Previous Article

आपल्या प्रार्थना देवदूत देवाकडे नेतात का?

Next Article

एक स्थिर अस्तित्व

You might be interested in …

बार्थालोम्यू झिगेन्बाल्ग

१६८३-१७१९ लेखांक ११                                                                                                      आपल्या कामाचा व्यवस्थित अहवाल झिगेनबाल्ग मायदेशी डेन्मार्कला पाठवत असे. ते तर मदत पाठवीतच. ते त्याच्या पत्राचे भाषांतर करून ती इंग्लंडला पाठवीत. त्यामुळे इंग्लंडकडूनही मिशनकार्याला चालना मिळू लागली. या कामाचे श्रेय डेन्मार्कचा राजा […]

क्षमा करणे हे आध्यात्मिक युद्ध आहे

मार्शल सीगल आपल्या जीवनात गोंधळ आणि दु:ख होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या जिवाच्या शत्रूची किंमत आपण कमी करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्यातील काहीजण सैतानाचा व त्याच्या हस्तकांचा विचारही करत नाही आणि केलाच तर त्यांचे […]