दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक ११

भाकिते पूर्ण होण्याच्या काळाचा सारांशाने अभ्यास


इ.स. ७० मध्ये यरुशलेमाच्या विनाशाच्या सुमारास महासंकटाचा काळ व येशूच्या आगमनाची भाकिते पूर्ण झाली असा समज कोणी करून घेऊ नये. नव्या करारात ‘लवकर,’ ‘ही पिढी,’ ‘जवळ’ असे शब्द वाचण्यात येतात. उदा. प्रकटी १:१-३; २;१६; २२:१०,२०; याकोब ५:८; मत्तय २४,२५ मध्ये जेव्हा ते अडतात तेव्हा लोकांना असे वाटते. पण आपण आता नवीन पृथ्वी अगर नवीन स्वर्गात मुळीच नाही आहोत. कारण प्रकटीकरणाचे पुस्तक तर इ.स. सुमारे ९५ च्या दरम्यान लिहिले आहे. ही भाकिते पुढील भावी काळाविषयी सांगतात. येशूही भावी काळाविषयीच बोलत आहे. येशूच्या पहिल्या येण्याशी निगडित देखील हा काळ नाही. ज्या भावी काळाचे येशू वर्णन करीत आहे, त्या काळाच्या पिढीविषयी येशू बोलत आहे. मत्तय २४:३६ व प्रकटी १:७ मध्ये या घटना घडण्याचा निश्चित काळही येशू सांगत नाही. देवालाच तो काळ ठाऊक आहे. त्यामुळे ज्या शतकातल्या लोकांविषयी तो बोलत आहे, त्या लोकांनाच हे शब्दप्रयोग लागू आहेत. जैतून डोंगरावरील मत्तय २४ व २५ मधील भाकिते पहिल्या शतकात पूर्ण झाली नाहीत. कारण मत्तय २४:१४ नुसार संपूर्ण जगाला सुवार्ता पोहंचलेली नव्हती. अजूनही येशू मेघारूढ होऊन गौरवाने आलेला नाही. दाविदाच्या सिंहासनावर बसला नाही. मत्तय २४ मधील भूकंप, छळ, लढाया, खोटे संदेष्टे … इ. भाकिते इतिहासात घडत आली आहेत. पण त्यातील तीव्रतेचा काळ अजून आलेला नाही. त्यामुळे ती भाकिते अजून पूर्ण झालेली नाहीत. प्रकटी १:१९  मध्ये म्हटले आहे की ‘जे तू पाहिले, जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव.’ ४२ महिने, साडेतीन वर्षे, १२६० दिवस हे देखील भावी इतिहासातील ठराविक कालखंड आहेत. त्यात सर्व युगांतील विश्वासीयांना उद्देशून लिहिलेले नाही. त्या घटना अजून प्रत्यक्षात घडायच्या आहेत.

भाकितामधील नेमके काळ

महासंकटकाळ, ख्रिस्तविरोध्याचा उदय, इस्राएलांचे तारण, येशूचे द्वितीयागमन, या भूतलावरील येशूचे प्रत्यक्ष हजार वर्षांचे राज्य, आणि सार्वकालिक अवस्था या घटनांचा शेवटचा काळ या शीर्षकाखाली समावेश होतो. त्यात दानीएल ९:२४-२७; मत्तय अध्याय २४ व २५ व प्रकटीकरण अध्याय ६-२० मधील घटनांची भाकिते पूर्ण होणार आहेत. बायबलमधील सर्वच भाकिते भावी काळासंबंधी नाहीत. कारण पुष्कळ भाकिते पूर्ण झाली आहेत. ती जशी तंतोतंत पूर्ण झाली तशीच ही उरलेली भाकितेही पूर्ण होणार असे आपण विश्वासाने ठाम म्हणतो. कारण अजून आज्ञाभंजक आपल्या देवाच्या मंदिरात बसून स्वत:ला देव म्हणायची घटना व येशूचे द्वितीयागमन होऊन स्वर्गातून उतरून त्याचा नाश करणे,  २ थेस्सल. २:३-८ आणि २ पेत्र ३:१०,१२ नुसार पृथ्वीचा अग्निने नाश होणे या घटना अजून घडल्या नाहीत. दानीएल ९:२७ चा काळ अजून पुढे आहे. जशी येशूच्या पहिल्या आगमनाची पुष्कळ भाकिते पूर्ण झाली तशी द्वितीयागमनाचीही पुष्कळ भाकिते पूर्ण व्हायची आहेत. प्रे.कृ ३:१८-२१.

प्रकटीकरणातील घटना घडायला अचानक केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यासाठी विश्वासीयांनी आत्मिक दृष्टया कोणत्याही क्षणी सज्ज असायला हवे. जरी प्रकटीकरणातील घटना मूळ श्रोत्यांना लागू नव्हत्या तरी त्यातील इशारे व वर्णने सर्व पिढ्यांच्या लोकांना लागू आहेत. ७० सालच्या यरुशलेमाच्या विनाशानंतर ९५ साली प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले. म्हणजे महान संकटाचा काळ ७० साली इतिहासात घडून गेला नाही. तर त्याबाबतच्या घटना भावी काळी घडायच्या आहेत.      

हजार वर्षांचे राज्य

प्रकटी २०:१-७ मधील एक हजार वर्षांच्या राज्याविषयीच्या काळाचे हे शीर्षक आहे. हे येशूचे त्याच्या संतांबरोबर या पृथ्वीवर चालणारे राज्य असणार आहे. सैतान १००० वर्षे बंदिस्त असणार आहे,              (२०:१-३). आणि पुनरुत्थित संत येशूसोबत पृथ्वीवर १००० वर्षे राज्य करणार आहेत, प्रकटी २०:४. एक हजार वर्षे संपल्यावर सैतानाला मोकळे केले जाईल. आणि तो यरुशलेमाविरुद्ध बंड करील. पण येशू तत्काल त्याचा विध्वंस करील, प्रकटी २०:७-१०.

(१) येशूचे पहिले आगमन व दुसरे आगमन यांच्या मधला काळ हा तो हजार वर्षांचा काळ नाही हे लक्षात घ्या. येशू व त्याचे परिपूर्ण झालेले संत सध्या स्वर्गातून पृथ्वीवर राज्य चालवत नाहीयेत. मंडळीत जे त्याचे विश्वासीयांमध्ये आत्मिक राज्य चालू आहे त्याला हजार वर्षांचे राज्य म्हटलेले नाही. याचे कारण उत्पत्ती १:२६-२८ मध्ये आदामाला जो पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार दिला होता तो पतनामुळे त्याने गमावला. त्यामुळे दुसरा आदाम जो ख्रिस्त त्याचे यशस्वी राज्य पृथ्वीवर घडवून आणायची देवाची योजना आहे, यशया ११. म्हणून आत्मिक नव्हे तर येशूचे हे प्रत्यक्ष राज्य व्हायलाच पाहिजे. त्याच्या शत्रूंचा प्रत्यक्ष पराभव व्हायलाच पाहिजे. प्रकटी ५:१०; १९-२० ते २०:३. येशूचे राज्य गुप्त, अदृश्य, आत्मिक नसणार. ते कार्यशील, सर्वांना कळेल असे असणार व तेव्हा सर्व त्याचे अंकित असतील.

(२) वरील वचनांवरून स्पष्ट होते की, येशूच्या या राज्यासाठी होणार्‍या द्वितीयागमनसमयी श्वापद, खोटा संदेष्टा, पृथ्वीवरील राजे, ह्या सर्वांचा  आणि सैतानाचाही न्याय होणार आहे.

(३) या युगात सैतान व दुर्जन मंडळीला छळत आहेत. पण त्या काळात संतजन व रक्तसाक्षी येशूबरोबर राज्य करतील.

(४) कोणी असे समजू नये की एक हजार वर्षांचे राज्य प्रत्यक्ष हजार वर्षांचे नाही; तर आताचे युग हजार वर्षांच्या राज्यात रूपांतरित होत आहे. कारण येशूच्या द्वितीयागमनावेळी पूर्णावस्थेत आलेले जग येशूला सादर होणार नाही. आपण वचनात पहातो की त्याच्या आगमनमयी जगाची अवस्था अत्यंत खालावलेली व बिघडलेली असणार, २ तीम. ३:१,१२-१३. हे चित्र आणि प्रकटी. अध्याय ६-१८ मधील चित्र असून यात सैतानाकडून होणारा छळ व दैवी न्यायाचे स्पष्ट वर्णन दिसते. ‘मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल का?’ लूक १८:८. हे वर्णन करीत बायबल त्या काळच्या परिस्थितीचे पुरावे देते हे लक्षात घ्या. ख्रिस्ताचे राज्य आल्याशिवाय पृथ्वीचे रूपांतर होणार नाही. यशया ११; जखर्‍या १४; स्तोत्र ७२. गेली २००० वर्षे पाहता हा इतिहास पृथ्वी सुवर्णकाळाकडे रूपांतराची वाटचाल करीत असल्याचे दिसत नाही; ही सत्य परिस्थिति आहे. अधार्मिकता जोर धरत आहे.

(५) येशूचे पुनरागमन हजार वर्षांच्या राज्याच्या आधीच प्रत्यक्षात पृथ्वीवर होणार असा घटनाक्रम आपण प्रकटी १९:११ ते २०:७ मध्ये वाचतो.
(अ) महासंकटाचा काळ – मग येशूचे पुनरागमन – मग १००० वर्षांचे राज्य.
(ब) सैतान १००० वर्षांसाठी बंदिस्त केला जाईल. हाच क्रम. सध्या तो बंदिस्त नाहीये. सध्या अविश्वासीयांचे मन सुवार्तेसाठी अंध करण्याचे काम करण्यात तो व्यस्त आहे. गर्जना करत कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. पापाचे क्षेत्र त्याच्या अधीन आहे.
(क) तेव्हा पवित्र जन ख्रिस्ताबरोबर राज्य करतील. आता ते छळातून जात आहेत.
(ड) ते राज्य सुख, समाधान, शांतीचे असेल. यशया ६५:१७-२५.
(ई) येशूचे आगमन होईल तेव्हा त्याचे पाय जैतून डोंगराला लागतील. तो दुभंगल्याने यरूशलेमचे तीन भाग होतील. तेव्हा तो यरुशलेमेसाठी लढेल. मग तो पृथ्वीवर राज्य करील. सर्व राष्ट्रे यरुशलेमेकडे लोटतील, जखर्‍या १०:१-१९.
(फ) यशया २४:१-२० मध्ये पृथ्वीच्या न्यायाचे वर्णन आहे. तेव्हा देवाचे नियम मोडणे हा गुन्हा असेल. त्याच अध्यायात पुढे २१ -२३ वचनामध्ये त्याच्या शत्रूंचा न्याय दिला आहे.
(ग) शेवटचा आदाम येशू, पृथ्वीवर यशस्वीपणे राज्य करील; त्याची सांगता ते राज्य पित्याच्या हाती सोपवून देऊन तो करील, १ करिंथ १५:२४-२८ . यासाठी की तेथून पुढचे सदासर्वकाळचे राज्य त्याने नवे आकाश व नवीन पृथ्वीवर सुरू करावे.

                                                                प्रश्नावली                                                                                                  


प्रश्न १ ला – धड्यातील विवेचनाचा वापर करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                   

१- मत्तय २४ व २५ मधील भाकिते इ.स. ७० च्या सुमारास पूर्ण झाली नसल्याची कारणे सांगा.                        
२- वरील भाकिते कोणाला लागू आहेत?                                                                           
३- कोणत्या अध्यायांतील भाकिते पूर्ण व्हायची आहेत? यादी द्या.                                                       
४-अजून काही भाकिते पूर्ण व्हायची आहेत हे आपण कोणत्या मुद्यांवरून म्हणू शकतो?                 
५- १००० वर्षांच्या राज्यात सैतान कोठे असणार व देवाचे संत कोठे असणार?                                               
६- सैतानाला केव्हा सोडले जाईल? तेव्हा तो काय करील? मग काय होईल?                              
७- हजार वर्षांचे राज्य पृथ्वीवर घडवून आणायची योजना देवाने का आखली?                          
८- येशूचे राज्य गुप्त नसून कसे असणार?                                                                     
९- द्वितीयागमनसमयी कोणाकोणाचा न्याय होणार?                                                         
१०- या युगात सैतान व दुर्जन काय करत आहेत? पण काय होणार?                                           
११- येशूच्या द्वितीयागमनात त्याचे पाय कोठे टेकतील?                                   
१२- १००० वर्षांच्या राज्याची सांगता कशी होईल?                                       

प्रश्न २ रा- पुढील विधाने चूक की बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करा.                   

१- इ.स. ७० च्या सुमारास मत्तय अध्याय २४,२५ मधील भाकिते पूर्ण झाली. ——                                 
२- फक्त देवालाच भावी काळच्या घटनांचा निश्चित काळ ठाऊक आहे. ——                                           
३- येशूसमोरच सुवार्ता जगभर पोहोंचली होती.——                                                   
४- बायबलमधील काही भाकिते पूर्ण झाली आहेत, काही पूर्ण व्हायची आहेत. —-                                      
५- भाकितातील सर्व इशारे सर्व पिढ्यांच्या लोकांना लागू आहेत.—–                                 
६- महान संकटाचा काळ इ.स. ७० साली घडून गेला. ——                                                      
७- सध्या मंडळीच्या विश्वासीयांवर ख्रिस्ताचे जे राज्य चालू आहे, त्याला हजार वर्षांचे राज्य म्हणतात.—– 
८- १००० वर्षांचे राज्य आत्मिक नव्हे तर प्रत्यक्षातील असणार. ——-                                       
९- आताचे युग १००० वर्षांच्या काळात रूपांतरित होत आहे. —–                                 
१०- मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडणार नाही.——                                         
११- ख्रिस्ताचे राज्य आल्याशिवाय पृथ्वीचे रूपांतर होणार नाही.—–                                             
१२- पापाचे क्षेत्र सध्या सैतानाच्या अधीन आहे.—–                                                                      

प्रश्न ३रा:- पुढील संदर्भ खाली दिलेल्या योग्य वर्णनापुढे लिहा.
प्रकटी २०:१-७; २ पेत्र ३:१०,१२,  २ तीम. ३:१,१२,१३: २ थेस्स. २:३-८, दानीएल ९:२७                                              

१- अनीतिमान पुरुष (ख्रिस्ताविरोधी) प्रकट होणार. ———–                                                   
२- पृथ्वीचा अग्निने नाश होणार.—–                                                            
३- सात वर्षांच्या  महान संकटाचे भाकीत. ———                                                       
४- १००० वर्षांचे राज्य. ——–                                                                                
५- सैतानाकडून होणारा छळ व दैवी न्यायाचे चित्र. ——                                                 

प्रश्न ४ था – अ-प्रकटी १९:११ ते २०:७ वाचून घटनांना १ ते ९ क्रमांक द्या.
                             

क – रक्तसाक्षी जिवंत होऊन १००० वर्षांच्या राज्यात.—–                                                           
ख- श्वापद व खोटा संदेष्टा जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात.——-                                                                
ग- पृथ्वीवरील श्वापद व त्याचे सैन्य लढाईला एकत्र. —–                                                 
घ- साखळदंड व अथांगडोहाची किल्ली घेऊन देवदूत स्वर्गातून उतरतो. —-                                   
च- स्वर्गातून घोडेस्वार निघतो.—–                                                              
छ- श्वापद व खोटा संदेष्टा धरले जातात. ——-                                                        
ज- सैतानाला बांधले जाऊन तो अथांगडोहात बंदिस्त.—–                                                          
झ- देवदूत पाखरांना मानवांचे मांस खाण्यास एकत्र होण्याचे पाचारण करतो.——                            
ट- बाकीचे लोक तरवारीने ठार व पाखरे माणसाने तृप्त. —–                                           

Previous Article

देव आपले विचार वाचू शकतो का?

Next Article

फार जोराने धावण्यापासून सावध राहा

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर   अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण २२ एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे […]

जर सर्वात वाईट घडलं तर ?

वनीथा रिस्नर माझी भीती वाढत आहे असं मला जाणवलं. ती अगदी ह्रदयाची धडधड बंद करणारी, सर्वत्र व्यापून राहणारी भीती नव्हती पण  सतत कुरतडत राहणारी भीती- जेव्हा तुम्ही सध्याच्या निराशाजनक घटना पाहता आणि हे कधी बदलणार […]

ख्रिस्ताचं मन: फिलिपै २:५ (॥)

 ख्रिस्ताचं मन म्हणजे त्याचा कळवळा हे आपण पाहिलं व त्या मायेनं व सहानुभूतीनं त्यानं काय कृती केली तेही पाहिलं. आपण त्यातून हे शिकलो की, (१) आपल्याजवळ जे आहे ते आपल्यासाठीच ठेवण्याची वस्तू नव्हे.(२)  इतरांसाठी ती […]