Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 1, 2017 in जीवन प्रकाश

आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दहा आवश्यक धडे  

आपल्या मुलांना शिकवण्यासाठी दहा आवश्यक धडे  

 जॉन मकआर्थर

(जॉन मकआर्थर यांच्या “ब्रेव डॅड या पुस्तकातून हे दहा धडे घेतले आहेत. नीतीसूत्रे १-१० मधून घेतलेले हे धडे पालकांना आपल्या मुलामुलींना शिकवण्यास अत्यंत उपयुक्त ठरतील. जर आपण ते शिकवले नाहीत तर सैतानाला आपण कशी संधी देऊ शकतो याबद्दल धोक्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. ह्या लेखामध्ये या पुस्तकाचा गोषवारा थोडक्यात सादर केला आहे.)

  • तुमच्या मुलांना देवाची भीती बाळगण्यास शिकवा
    परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय (नीती १:७). यासाठी देवाचे गुण त्यांना शिकवणे आवश्यक आहे. हे जेव्हा आपण योग्य रीतीने शिकवू तेव्हा ते देवाचे भय बाळगू लागतील. देवाची आदरयुक्त भीतीच फक्त त्यांना वाटणार नाही पण त्याच्याविरुद्ध पाप करण्याची सुद्धा त्यांना भीती वाटेल. यामुळे देव हा सन्मान देण्यास योग्य आहे हे समजून त्याच्यासाठी नीतीचे जीवन जगण्याची इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण होईल. हे योग्य रीतीने शिकवण्यासाठी प्रथम पालकांनी देवाची भीती बाळगण्याची गरज आहे आणि कुटुंबामध्ये पापाचा तिटकारा दाखवायला हवा. जर आपण आपल्या मुलांना देवाची भीती बाळगायला शिकवले नाही तर सैतान त्यांच्यामध्ये देवाबद्दल द्वेष निर्माण करून त्याचा धिक्कार करायला शिकवेल.
  • तुमच्या मुलांना त्यांच्या मनाचे रक्षण करण्यास शिकवा
    नीती ३:३-४ म्हणते, “दया व सत्य यांनी तुला न सोडावे. त्यांना तू आपल्या गळ्यात बांध. त्यांना आपल्या ह्रदयाच्या पाटीवर लिही. म्हणजे तू देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती पावशील..” येथे ह्र्दय ह्या शब्दाचा मूळ इब्री भाषेत मन असा उल्लेख आहे. मन हे विचार , भावना, इच्छा यांचे उगमस्थान आहे. हा भाग पालकांनी आपल्या मुलांना मनाचे रक्षण करण्यास शिकवण्यास सांगत आहे. वडील या नात्याने आपल्या मुलाच्या मनाचे तुम्ही रक्षक आहात. जगापासून त्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. पण येथेच ते थांबत नाही. त्यानंतर आपण त्यांचे मन सत्याने , दयेने आणि अखेरीस देवाच्या वचनाने भरण्यास होईल तितके प्रयत्न केले पाहिजेत. आपण त्यांना सांगितले पाहिजे, “ आपल्या मनाचे रक्षण करा करा कारण त्यातूनच तुमचे आचरण बाहेर येते.” जर आपण आपल्या मुलांना त्यांच्या मनाचे रक्षण करण्यास शिकवले नाही तर सैतान त्यांना “खुले मन” ठेवण्यास आनंदाने शिकवील.
  • तुमच्या मुलांना आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळण्यास शिकवा

नीतीसूत्रे ही “माझ्या मुला आपल्या बापाचा बोध ऐक” यासारख्या विधानांनी भरलेली आहेत. याद्वारे नीतीसूत्रांचा लेखक “जी वचनयुक्त आज्ञा” म्हणजे आपल्या आईवडिलांची आज्ञा माना यावर भर देत आहे. जेव्हा तुमची मुले आज्ञा मानण्यास शिकतील तेव्हा ते सामाजिक अधिकाऱ्यांच्या आज्ञा पाळतील. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते देवाच्या आज्ञा पाळण्यास शिकतील. जी मुले आज्ञा पाळण्यास शिकतात ती आत्मसंयमन आणि खरे शहाणपण शिकतील. जर आपण आपल्या मुलांना आईवडिलांची आज्ञा पाळण्यास शिकवले नाही तर सैतान त्यांना बंड करण्यास शिकवील आणि त्यामुळे आपले ह्र्दय भग्न होईल.

  • तुमच्या मुलांना आपले मित्र काळजीपूर्वक निवडण्यास शिकवा

पालकांची ही जबाबदारी त्यांनी आक्रमक रीतीने हाताळायला हवी. आपण स्वस्थ बसून ते सहाजिक रीतीने कोणते मित्र निवडतात याची वाट पाहत बसू नये. त्यांनी त्यांचे मित्र कसे निवडावेत याबद्दल आपण त्यांना शिकवायला हवे. १ करिंथ १५:३३ मध्ये पौल म्हणतो “कुसंगतीने नीती बिघडते.” आपली मुले ज्या मित्रांबरोबर वेळ घालवतील त्याचा थेट परिणाम ते कसे बनतील यावर होईल आणि म्हणून त्यांनी योग्य मित्र निवडण्यास त्यांना आपण आक्रमक रीतीने मदत केली पाहिजे. नीती १:१० म्हणते “माझ्या मुला, जर पापी तुला भूलथाप देऊ लागले तर तर तू ऐकू नको.” या जगाचे लोक मजा , धाडस आणि फायदा उठवणे या गोष्टींनी आपल्या मुलामुलींना गळ घालतील. पण अशा मोहांना  प्रतिकार करण्याचे आपण त्यांना शिकवले पाहिजे. आपण आपल्या मुलांना सुज्ञपणा शिकवला पाहिजे म्हणजे त्यांना शहाणपणाने मित्र कसे निवडायचे याचे सामंजस्य प्राप्त होईल. आपल्या मुलांनी योग्य संगत कशी निवडावी हे जर आपण त्यांना शिकवले नाही तर सैतान आनंदाने त्यांचे मित्र त्यांना शोधून देईल.

तुमच्या मुलांना त्यांच्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकवा

नीतीसूत्रांच्या पहिल्या काही अध्यायांचा मुख्य विषय आहे इंद्रियदमन. नीती २:१६-१७ याबद्दल इशारा देते. शलमोन म्हणतो की “तुला परस्त्रीपासून, जी परकी स्त्री आपल्या वचनांनी आर्जव करते, जी तरुणपणाचा आपला संभाळणारा सोडते आणि आपल्या देवाच्या करार विसरते तिच्यापासून सोडवायला विवेक तुला सांभाळील.” जे व्यभिचार करायला पाहतात त्यांच्याविरुद्ध पालक धोक्याचा इशारा देतात कारण व्यभिचाराचे परिणाम हे मृत्यूपर्यंत उध्वस्त करणारे असतात. हे जरी अगदी टोकाचे वाटत असले तरी काही पुरुषांमध्ये वासना ही त्यांच्या जगण्याच्या इच्छेपेक्षा प्रभावी असते हे सत्य आहे. आपल्या मुलांना लैंगिक शुद्धता , मोहापासून दूर राहणे, आपल्या डोळ्यांचे रक्षण करणे हे शिकवायला हवे. जर आपण आपल्या मुलांना आपल्या शरीरावर ताबा ठेवण्यास शिकवले नाही तर सैतान त्यांना त्यांची शरीरे वासनेत झोकून द्यायला शिकवील.

६.तुमच्या मुलांना जोडीदारावर प्रेम करण्यास शिकवा
विवाहबाह्य सेक्स हे अर्थातच मना केलेले आहे पण विवाहमध्ये ते उंचावलेले आहे. नीती ५:१५-१९ वचने म्हणतात, “ तू आपल्याच कुपातून पाणी पी; आपल्याच आडातून वाहते पाणी पी. तुझे झरे बाहेर व तुझे जलाचे प्रवाह रस्त्यामध्ये वाहावेत काय? ते तुझेच मात्र असोत. तुझ्याबरोबर दुसर्यांचे असे नसोत. तुझा झरा आशीर्वादित असो, आणि तू आपल्या तरुणपणाच्या बायकोच्या ठायी हर्षित अस.”

दुसऱ्या शब्दांत जे स्त्री पुरुष अथवा स्त्रिया यांना लैंगिक ओढ आहे त्यांनी ती आपल्या जोडीदारामध्येच तृप्त करावी. ज्या रीतीने आपण आपल्या जोडीदाराला वागवतो त्यामधून आपण आपल्या मुलांना आपल्या जोडीदारामध्ये समाधानी कसे असावे हे शिकवू शकतो. जर देवाने दिलेल्या विवाहाच्या जोडीदारात आनंद घ्यायला जर आपण आपल्या मुलांना शिकवले नाही तर सैतान त्यांना शिकवेल की व्यभिचार करून विवाहाचा नाश कसा करावा.

७.तुमच्या मुलांना आपल्या बोलण्याकडे  लक्ष  देण्यास शिकवा
नीती ४:२४ म्हणते , कुटिल तोंड तू आपल्यापासून लांब टाक आणि वाकडे ओठ तू आपणापासून दूर कर.” आपल्या मुलांनी सत्य आणि सत्यच बोलावे असे आपण त्यांना शिकवायला हवे. बोलण्यापूर्वी मुलांनी  स्वत:ला विचारावे : मी जे बोलणार ते बोधपर आहे का? ते योग्य आहे का? ते दयाळू आहे का? ख्रिस्ती या नात्याने आपले बोलणे उत्तेजनदायी, उद्बोधक आणि मदतशील असावे. जर आपण आपल्या मुलांना आपल्या बोलण्याकडे लक्ष देण्यास शिकवले नाही तर सैतान त्यांची तोंडे चहाड्या, कंड्या, खोटेपणा आणि गालीच्छ शब्दांनी भरून टाकेल.

८.तुमच्या मुलांना परिश्रम करण्यास शिकवा

काम कसे करावे हे आपण आपल्या मुलांना शिकवायलाच हवे. हे शब्दांद्वारे व उदाहरणाद्वारे करायला हवे. नीती ६:६-८ वचनात पिता आपल्या मुलाला म्हणतो, “अरे आळशा त्या मुंगीकडे जा. तिचे मार्ग पाहून शहाणा हो. तिला कोणी नायक, मुकादम अथवा अधिकारी नसता ती उन्हाळ्यात आपली भाकर मिळवते आणि कापणीच्या वेळी आपले अन्न गोळा करून ठेवते.” कोणी देखरेख करीत नसले तरी त्यांनी कष्ट करावे असे आपण आपल्या मुलांना शिकवले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयं-प्रेरणा ही गुरुकिल्ली आहे आणि पूर्व योजना करणे हा त्याचा एक भाग आहे. नीतिसुत्रामधला पिता हा आळशीपणाविरुध्द , काम न करण्यासाठी सबबी सांगण्याविरुध्द आणि दिरंगाई करण्याबाबत धोका दाखवतो. आळशी असण्याचा परिणाम म्हणजे भुकेले राहणे, दारिद्र्य आणि अपयश  हे होय. आपल्या मुलांना काबाडकष्ट करण्यास व आळशीपणाचे परिणाम टाळण्यास आपण शिकवलेच पाहिजे. सैतान त्यांना आळशी कसे राहावे हे शिकवील व परिणामी ते दरिद्री होतील.

९.तुमच्या मुलांना योग्य रीतीने पैसे वापरण्यास शिकवा
पैशाची  जीवनात खूप मोठी भूमिका असते आणि यामुळेच नीतीसूत्रात अनेक वेळा तो कसा वापरावा हे सांगितले आहे. जर आपण आपल्या पैशांचा काळजीपूर्वक वापर केला तर ते आपल्याला उपयोगी ठरेल पण जर आपण त्याबाबत गाफील राहिलो तर ते आपल्या विवंचनेचे आणि मानसिक यातनांचे साधन ठरेल. यासंबंधी पहिली गोष्ट म्हणजे देवासंबंधी उदार असा. नीती ३;९-१० म्हणते “तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पनाच्या प्रथम फळाने यहोवाचा सन्मान कर. म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, आणि तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने  भरून वाहतील.” आपला पैसा हा आपल्या मालकीचा नाही. तो देवाचा आहे  नी हे आपण आपल्या मुलांना शिकवू शकतो. आपण आपल्या पैशासंबंधी उदार आहोत की नाही हे आपल्या मुलांना समजेल आणि ते आपला कित्ता गिरवतील.
दुसरी गोष्ट म्हणजे परक्यासोबत हातमिळवणी करू नये. इतरांच्या ज्या  कृतींवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही त्यासाठी आपण जबाबदार असू नये. यामध्ये तत्काळ श्रीमंत होण्याच्या योजना , आणि अविश्वासू लोकांसमवेत केलेला व्यवसाय यांचा समावेश होईल. जसे प्रभू पुढे नेईल तसे आपण पैसे योग्य रीतीने वापरावे हे आपण मुलांना शिकवले पाहिजे. जर पैसे योग्य रीतीने कसे वापरावेत हे जर आपण आपल्या मुलांना शिकवले नाही तर सैतान त्यांना ते निष्काळजीपणे कसे वापरावे हे शिकवील आणि ते कर्जबाजरी होतील.

१०.तुमच्या मुलांना शेजार्यावर प्रीती करण्यास शिकवा
जरी नीतिसुत्रामध्ये अविश्वासू लोकांशी भागीदारी न करण्यास सांगितले आहे तरी गरजू लोकांशी उदार होऊ नका असे सांगितले नाही. नीती ३:२७-२८ सांगते, “ज्यांचे हित करणे योग्य आहे त्यांचे ते करणे तुझ्या हाताच्या आटोक्यात असले तर ते त्यांच्यापासून आवरून धरू नको. तुझ्याजवळ द्रव्य असता, तू जा , मग परत ये म्हणजे उद्या मी देईन असे तू आपल्या शेजाऱ्याला म्हणू नको.” जर आपल्याकडे असेल तर ज्यांना गरज आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे. देवाला सन्मान देण्यासाठी आपण शेजाऱ्यांना त्यागपूर्वक प्रीती करण्याची गरज आहे. येशूने सर्वात मोठ्या दोन आज्ञांमध्ये शेजार्यांवर प्रेम करणे याचा समावेश केला आहे. म्हणून आपण आपल्या मुलांना फक्त देवावरच नव्हे तर शेजाऱ्यांवर ही प्रीती करायला शिकवायलाच हवे. जर आपण त्यांना शेजार्यांवर प्रीती करायला शिकवले नाही तर सैतान आनंदाने त्यांना स्वत:वरच प्रेम करायला शिकवील.

अखेरीस हे ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की शेवटी आपल्या मुलांचे देवच तारण करील . अगदी उत्तमात उत्तम पालकांनाही ह्र्दय यातनांतून जावे लागले आहे. दुसरी बाब म्हणजे आपली मुले आपण त्यांना शब्दाद्वारे जे शिकवतो त्यापेक्षा आपल्या उदाहरणाद्वारे अधिक शिकतात.

नीतीसुत्राद्वारे जे आपण शिकलो तसे जगण्याचा आपण कसून प्रयत्न करू या. त्यानुसार आपली जीवने जगून विश्वासूपणे आपल्या मुलांना शिकवू या. व देवाने त्याच्या गौरवासाठी त्याला फळ द्यावे अशी त्याच्याकडे प्रार्थना करू या.