नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

त्याच्या अभिवचनाखाली झोप

स्कॉट हबर्ड

काही रात्री दिवे मालवले जातात, घर शांत होते, आपल्याभोवती सर्वांवर एक शांत विसावा उतरतो – पण आपल्याभोवती नाही.  अशा वेळी हजार विचार आपल्या मनातून जात असतात. न संपलेले काम, अनुत्तरित प्रश्न. कालच्या दिवसाचा पस्तावा आणि उद्याच्या गरजा.

झोपी जाणे साधी गोष्ट वाटते. नॅन्सी हॅमिल्टन ह्या झोपेवरच्या संशोधक लिहितात , “ त्यासाठी थकलेले शरीर आणि शांत मन एवढीच गरज असते.” पण या समीकरणाचा दुसरा भाग दुरापास्त होऊन बसतो.

शलमोन राजाने खात्री दिली आहे की, “तो आपल्या प्रियांस झोप देतो”  (स्तोत्र १२७:२ – पं. र. भा.). पण अशा रात्री आपण ही देणगी असहाय हातात धरून विचार करू लागतो की ही कशी उघडायची.

स्वस्थ आणि शांत मन

स्तोत्रकर्त्यांना ठाऊक होते की काळजी, दु:खे आणि अनाकलनीय गोष्टी आपल्या डोळ्यांवरची झोप घालवून देऊ शकतात. ते सुद्धा आपल्यासारखेच विचार करत कित्येक तास बिछान्यावर पडून होते ( स्तोत्र ७१:१-३). कित्येक चंद्र हळूहळू आकाशातून सरकताना त्यांनी पहिले होते (स्तोत्र २२:२). त्यांना माहीत होते की काही चांगल्या आणि दयावान कारणाने, जो देव त्याच्या प्रियांना झोप देतो तो त्यांच्या प्रियांची झोप काढूनही घेतो.

आणि तरीही शलमोन, दावीद आणि इतर स्तोत्रकर्ते यांना ठाऊक होते की अगदी अशक्य रात्री सुद्धा झोप शक्य झाली होती. रानात पाठलाग होत असताना (स्तोत्र ३:५), दु:खात बुडून गेले असताना ( स्तोत्र ४२:८) किंवा जीवनाच्या अर्ध्या उभारलेल्या घराचा  विचार करताना (स्तोत्र १२७ :१-२)  त्यांनी  आपल्या काळज्या देवासमोर ठेवून दिल्या होत्या आणि गाढ झोपी गेले होते. त्यांना ठाऊक होते जरी त्यांचे जीवन शांत नव्हते, तरी शांत मन त्यांचे होऊ शकत होते.

साध्या शहाणपणाने  मन शांत होऊ शकते यात शंका नाही. संध्याकाळी कॉफी घेतली किंवा फोन बघत झोपायचा प्रयत्न केला तर मध्यरात्रीपर्यंत तुम्ही जागे राहणार यात नवल कसले. पण अखेरीस स्तोत्र आपल्याला आठवण करून देते की, शांत मन हे झोप देणाऱ्या देवाच्या हातातून येते. जो रोज आपल्या बिछान्याकडे, आपला प्रभू – आपली ढाल, आपला मेंढपाळ, आपले समाधान, आपले जीवन असा येतो.

देव तुमची ढाल आहे

मी अंग टाकले व झोपी गेलो; मी जागा झालो, कारण मला परमेश्वराचा आधार आहे” ( स्तोत्र ३:५).
स्तोत्र ३ मधल्या दाविदाला चिंता  करायला, काळजीच्या बिछान्यावर पडायला प्रत्येक कारण होते. धोकेबाज मुलाने यरुशलेमातून पाठलाग केल्याने आता तो रानात शिकारीच्या सावजासारखा धावत होता (स्तोत्र ३:१-२).  अशा वेळी झोप अशक्य असणार. तरीही दावीद झोपला – कोणत्याही संकटाशिवाय. तो म्हणतो, “मी अंग टाकले व झोपी गेलो”  (स्तोत्र ३:५). पण कसे? ज्या विश्वासाने त्याला झोप दिली त्यावर तो प्रकाश टाकतो. 

“मी मोठ्याने परमेश्वराचा धावा करतो, आणि तो आपल्या पवित्र डोंगरावरून माझे ऐकतो” (स्तोत्र ३:४).

दाविद – इस्राएलचा राजा यरुशलेमाच्या पवित्र डोंगरावर राज्य करत होता. या डोंगरावर तो  राजकीय सामर्थ्याने महान अधिकाराने एके काळी उभा होता. तरीही त्याला माहीत आहे की त्याचे राजासन आता रिकामे आहे किंवा बंडखोर पुत्राने बळकावले आहे; तरीही देवाचे राजासन नेहमीच भरलेले आहे. झोपण्यासाठी दाविदाला त्याच्या राजासनावरून राज्य करायची गरज नव्हती. त्यासाठी देवाने फक्त त्याच्यावर राज्य करण्याची गरज होती. फक्त देव जर त्याच्या पवित्र डोंगरावर असेल तर दावीद रानातही झोपू शकत होता.

आज आपण कोणत्यातरी असहायतेच्या रानात पहुडतो, आपल्या ताब्यात नसलेल्या काळज्या आपल्या मागे लागलेल्या असतात. आपल्याला कोणत्यातरी येणाऱ्या  गडद अनिश्चित बाबीने असुरक्षित वाटत असते – वैद्यकीय निदान, कामाची अनिश्चिती, एक न मिटणारा कलह. पण तरीही आपला देव मुगुट आणि राजदंडासह त्याच्या पवित्र डोंगरावर आहे. “रात्री तू  माझ्याभोवती कवच आहेस; सकाळी तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस” (स्तोत्र ३:३). आपल्या काळज्या खूप आणि जवळ असतील; आपला देव अधिक समीप आणि समर्थ आहे.

प्रभू तुमचा मेंढपाळ आहे

“परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो..” (स्तोत्र २३:१,२).
मेंढ्या ह्या खाली पहुडतात ते केवळ विसावा घ्यायला किंवा झोपायला. आता ते स्तोत्र २३च्या कुरणाचे चित्र डोळ्यासमोर आणा. त्या मेंढपाळच्या काळजीखाली निवांत  झोप घेत असलेल्या मेंढ्या. तो त्यांना खात्री देतो की, “त्यांना काही उणे पडणार नाही” (स्तोत्र २३:१). आपल्या किती अशांत रात्री अशा भीतीमध्ये जातात की, आपल्याला उणे आहे. की नवी सकाळ नवी दया घेऊन येणार नाही, उद्याची भाकरी येईल का? कितीदा आपले एकांतातील विचार दाखवतात की प्रभू आपला मेंढपाळ नाही?

जर प्रभू आपला खरंच मेंढपाळ असेल तर आपल्या गरजांना काळजीयुक्त  आणि निद्राहीन ह्रदयाची जरूरी नाही. तो आपल्या झोपेत बरेच काही करू शकतो जे आपण जागे राहून करू शकणार नाही. आणि उद्याची जी काही गरज असेल त्याच प्रमाणात त्याचा पुरवठा असल्याचे दिसून येईल.

प्रभू तुमचे  समाधान आहे

तो तार्‍यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो” (स्तोत्र १४७:४)
आता स्तोत्रकर्ता दु:खाने येणाऱ्या अशांतीसंबंधी बोलतो. अनेक स्तोत्रांमधून आपण रात्री रडणाऱ्यासंबंधी वाचतो (स्तोत्र ३०:५). सांत्वन न होणारा जागा जीव  (स्तोत्र ७७:१-२), संतांचे अश्रूंनी भिजलेले अंथरूण ( स्तोत्र ६:६). दु:खामुळे ह्रदय जागे राहते.

अशा वेळी देवाचा निर्मितीमधला आवाज शास्त्रलेखातील आवाजाला मिळतो आणि आपल्या दु:खाशी सांत्वनाचे शब्द बोलतो. तर वळा आणि तुमच्या खिडकीबाहेर पहा. शेकडो चमकते तारे तुम्हाला दिसतात का? आणि त्यापलीकडचे कोट्यावधी? तुमचा देव त्या तार्‍यांची गणती करतो; तो त्या सर्वांना त्यांची-त्यांची नावे देतो  (स्तोत्र १४७:४). अशा विचाराने आपल्याला अगदी लहान वाटू लागते की आपले भग्न ह्रदय देव कसे पहू शकेल. पण स्तोत्रकर्ता याविरुध्द लागूकरण करतो. जर देव प्रत्येक ताऱ्याला नाव देतो तर आपल्या प्रियजनांचे दु:ख त्याच्या नजरेपुढे नक्कीच आहे (स्तोत्र १४७:३; यशया ४०: २६-२७).

तारांगणातील प्रत्येकाची जाणीव असलेला देव आपण क्षुल्लक आहोत अशी जाणीव करून देत नाही. तर त्याचे आपल्याकडे लक्ष आहे; विशेषत: आपल्या दु:खाकडे लक्ष आहे हे दाखवतो. “भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो” (स्तोत्र १४७:३). जर त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव नक्कीच ठाऊक आहे तर आपली दडलेली दु:खे व वेदना तो जाणतो. आणि त्याच्या सर्व लोकांकरता तो एक महान रोगहर्ता, जखम बांधणारा आहे.

चमकणाऱ्या तार्यांकडून मिळणारे हे अभिवचन आपल्याला झोप देणारे अंगाई गीत होऊ शकेल.

देव तुमचे जीवन आहे

“मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो. मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो” (स्तोत्र १७:१५).

जर येशू अजून पुन्हा आला नसेल तर एक दिवस आपण आपले डोळे अखेरसाठी बंद करू – या जगात पुन्हा न उठण्यासाठी. येथे स्तोत्रकर्त्याला ही अखेरची  झोप येत आहे अशी  तीव्रतेने जाणीव झाली.  दावीद उठल्यावर “तुझे मुख… तुझे दर्शन यासंबंधी गातो.  केवळ स्वर्गच जी प्रभात तयार करू शकेल अशा या जगापलीकडे उठण्यासबंधी तो  गातो (यशया २६:१९; दानीएल १२:२).

हा एक मोलवान दृष्टिक्षेप होता, पण केवळ दृष्टिक्षेपच होता. तुम्ही आणि मी याहून जास्त पाहू शकतो. कारण दाविदाचा पुत्र आला आहे. त्याने मरणाच्या रात्रीपलीकडची पहाट आणली आहे. दोन दिवस तो कबरीमध्ये होता आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला.

प्रेषित पौल येशूची आणि आपली महान आणि अखेरची  झोप यामध्ये एक रेषा आखतो.

“कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे” ( १ थेस्स. ५:९-१०).

आज रात्री आपण झोपी जात असताना आपल्या प्रभूचे हात आपल्याला सुरक्षितपणे धरण्यास तयार आहेत. आणि त्याच्या हाताच्या ओंजळीत जी शांतता आहे ती, आक्रोश  करणारे जागे किंवा झोपलेले मन शांत करू शकते. कारण ही जरी आपली अखेरची झोप असली तरी आपले डोळे पुन्हा एकदा उघडतील. आता ते आपल्या जोडीदार किंवा मुलांसाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी उघडतील – जो हजारो रात्री आपली ढाल, आपले समाधान झाला होता आणि आता आपले अनंतकालिक जीवन आहे.

Previous Article

त्याच्याबरोबर वृद्ध होताना भिऊ नका

Next Article

भावंडातील वैमनस्य

You might be interested in …

रोगी असणे निरोगी असण्यापेक्षा चांगले असू शकेल का?

वनिथा रिस्नर आजार आणि दु:खसहन निरोगी आणि समृद्ध असण्यापेक्षा चांगले असू शकेल का?  या जगात जेथे दु:ख टाळण्यासाठीच जीवन जगले जाते तेथे हा प्रश्न हास्यास्पद वाटू शकतो. केवळ विलासात राहणारे नव्हे तर धार्मिक लोक सुद्धा […]

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर  प्रकरण २१ अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे […]

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

  लेखांक ५                                                 ‘ सर्व पवित्र लिखाणात देवानं आपला प्राण फुंकला आहे’ (२ तीमथ्य ३:१६) तारणाचं मूळ केंद्रस्थान कुटुंब. कुटुंबाच्या तारणाचं साधन ‘कुटुंबातली उपासना.’ उपासनेचा प्राण म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्राचा प्राण पवित्र आत्मा. […]