संकलन – लीना विल्यम्स
प्रोटेस्टंट धर्मजागृती हे रोमन कॅथोलिक चर्चच्या संपूर्ण ताबा ठेवणाऱ्या एकाधिकारी व दुरुपयोगी राजकारभाराविरुध्द  युरोपमध्ये दूरवर (व्यापक) पसरलेल्या ईश्वर परिज्ञानाचे (तत्त्वाचे) बंड होय. जर्मनीमध्ये मार्टिन लूथर,  स्वित्झर्लंडमध्ये अलरीच झ्विन्गली आणि फ्रान्समध्ये जॉन कॅल्विन यांनी रोमन कॅथोलिक चर्चमधील बायबलला धरून नसलेल्या अनेक प्रथांना विरोध करून शुध्द बायबल तत्त्वांकडे परत फिरण्यास चालना दिली. प्रोटेस्टंट धर्मजागृतीला वेग येण्याची सुरुवात ३१ ऑक्टोबर१५१७ या दिवशी मार्टिन लूथरने व्हिटेनबर्ग येथील चर्चच्या दारावर ९५ पानांचा प्रबंध  ठोकला  तेव्हा झाली असे  मान्य करतात.
 प्रोटेस्टंट आणि धर्मजागृतीच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहताना कॅथोलिक चर्चचा प्रेषितीय परंपरेचा वारसाहक्क काय आहे  हे समजून घेणे आवश्यक आहे. त्यांचे तत्त्व असे म्हणते की रोमन कॅथोलिक पोपची वंशावळ ही शतकानुशतके मागे पाहत गेल्यास सध्याच्या पोपपासून ती थेट प्रेषित पेत्रापर्यंत पोचते. अधिकाराची ही अतूट साखळी रोमन कॅथोलिक चर्चला एकमेव चर्च बनवते आणि पोपला इतर सर्वत्र असलेल्या  सर्व मंडळ्यावर सर्वोच्च अधिकार देते.
प्रेषितीय अधिकाराच्या व पोप अचूक असल्याच्या या त्यांच्या विश्वासामुळे कॅथोलिक लोक चर्चचे शिक्षण परंपरा हे बायबलच्या पातळीला नेतात. रोमन कॅथोलिक व प्रोटेस्टंट यांच्यामधला हा प्रमुख भेद असून आणि प्रोटेस्टंट धर्मजागृती होण्यामागे तो एक मुलभूत मुद्दा होता.
प्रोटेस्टंट धर्मजागृती होण्यापूर्वी रोमन कॅथोलिक चर्चच्या बायबलला अनुसरून नसलेल्या काही  प्रथांच्या विरोधात  अनेक ठिकाणी निदर्शने झाली पण ती छोट्या प्रमाणात व तुरळक होती. लोलार्ड, वोल्डेशियन, पेट्रोब्रशियन हे सर्व कॅथोलिक तत्त्वांविरुद्ध उभे राहिले. लूथरने व्हिटेनबर्ग चॅपेलच्या दाराकडे हातोडी घेऊन जाण्यापूर्वी कित्येक पुरुष धर्मजागृतीसाठी ठाम उभे राहिले. जॉन  विल्कीफ हे त्यांच्यापैकी एक होते. ते इंग्रज असून ईश्वर विज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांना १४१५ मध्ये  पाखंडी म्हणून दोषी ठरवण्यात आले. जॉन हस बोहेमिया येथील एक प्रीस्ट यांना १४१५ मध्ये रोमच्या चर्चला विरोध केल्यामुळे खांबावर बांधून जाळण्यात आले. एक इटालियन महंत गिरोलामो सॅवोनरोला यांना १४९८ मध्ये फाशी देऊन जाळण्यात आले.
रोमन कॅथोलिक चर्चच्या खोट्या शिक्षणाला होणारा विरोध १६व्या शतकात कळसाला पोचला. यावेळी लूथर या कॅथोलिक मठवासी महंताने पोपच्या अधिकाराला आणि विशेषत:  पापविमोचनाचे पास विकण्यास आव्हान दिले. ह्या आवाजाला सुधारणा करून प्रतिसाद देण्याऐवजी रोमन कॅथोलिक चर्च त्याविरुद्ध ठाम उभी राहून धर्मसुधारकांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू लागली. अखेरीस धर्मजागृतीतून नव्या मंडळ्या उदयास आल्या. त्यांनी प्रोटेस्टंट पंथाचे चार प्रमुख भाग पडले. लूथरच्या अनुयायांनी लूथरन चर्च, कॅल्विनच्या अनुयांनी रीफॉर्म्ड चर्च, जॉन नॉक्सच्या अनुयायांनी प्रेसब्रिटेरियन चर्चची स्कॉटलंडमध्ये सुरवात केली  आणि नंतर इंग्लंडमधील धर्मसुधारकांनी अॅंग्लीकन चर्चची सुरवात केली.
प्रोटेस्टंट धर्मजागृतीच्या केंद्रस्थानी चार मुख्य प्रश्न आहेत : एखाद्या व्यक्तीचे तारण कसे होते? धार्मिक अधिकार कोठे आहे? मंडळी काय आहे? ख्रिस्ती जीवनाचा गाभा काय आहे? या प्रश्नांना उत्तर देताना प्रोटेस्टंट धर्मसुधारकांनी
5 solas – फक्त पाच  (लॅटिनमध्ये सोला म्हणजे फक्त) ह्याद्वारे हे स्पष्ट केले. पोप व  त्याच्या अनुयायांनी या शिक्षणाचा नकार करण्यास आदेश दिला. पण  या धर्मसुधारकांनी त्यांना विरोध केला इतका की काहींना त्यासाठी आपले प्राण द्यावे  लागले. प्रोटेस्टंट धर्मजागृतीची पाच आवश्यक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत.
१- “Sola Scriptura”   “फक्त शास्त्रलेखाद्वारे.” ख्रिस्ती मंडळीसाठी बायबल हाच  सर्व विश्वास व आचरण यासाठी एकमेव अधिकार आहे. मंडळीच्या सर्व शिक्षण व चालीरीतीचे मोजमाप करण्यासाठी बायबल आणि बायबल हेच एकमेव प्रमाण आहे. मार्टिन लूथरला हे शिक्षण नाकारण्यास आव्हान केले असता त्याने हे प्रभावीपणे व्यक्त केले. “माझी खात्री झाली आहे की पवित्र वचनाच्या साक्षीशिवाय व सकारण पुराव्यांशिवाय मी केवळ  पोप किंवा धर्मसभेवर विश्वास ठेऊ शकत नाही. कारण हे स्पष्ट आहे की त्यांनी वारंवार चुका केल्या आहेत,  आणि स्वत:स विरोधी शाबीत केले आहे. देवाचे जे पवित्र वचन माझा मूळ आधार आहे, त्याद्वारे माझी खात्री  झालीआहे की माझा विवेकभाव देवाच्या वचनाचा गुलाम झाला आहे. त्यामुळे मी पुन्हा पूर्वीप्रमाणे चालू  शकत नाही व चालू ठेवणार नाही. कारण एखाद्याने आपल्या विवेकभावाविरुद्ध वागणे सत्याचे व सुरक्षितपणाचेही होणार नाही. देवा, मला सहाय्य कर, आमेन.”
२. “Sola Gratia”  “तारण हे  फक्त कृपेद्वारे” आपण लायक नसताना देवाने आपल्यावर अनुग्रह / उपकार केल्याचा तारण हा पुरावा आहे. देवाच्या क्रोधापासून फक्त त्याच्या कृपेमुळेच आपण वाचवले गेलो आहोत. ख्रिस्तामध्ये दिलेले आशीर्वाद हे एकच तारणाचे योग्य कारण आहे . ही कृपा देवाच्या पवित्र आत्म्याचे अलौकिक कार्य असून तो आपल्याला पापाच्या बंधनातून सोडवून आणि आपल्याला आध्यात्मिक मरणातून उठवून आध्यात्मिक जीवनात आणतो.
३ ‘Sola Fide”  “तारण हे फक्त विश्वासाने” ख्रिस्तावरील विश्वासानेच फक्त आपण नीतिमान ठरवले जातो नियमांचे पालन करून नाही. ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानेच त्याची नितीमत्ता आपल्यावर चढवली जाते व ही फक्त एकच गोष्ट देवाचे परिपूर्ण प्रमाण पूर्ण करू शकते.
४. “Solus Christus” ‘फक्त ख्रिस्तामध्ये” तारण हे फक्त ख्रिस्तातच मिळते. दुसरे कोणीही किंवा काहीही आपल्याला मुक्ती देऊ शकत नाही. येशूचे आपल्याऐवजी  वधस्तंभावर झालेले मरण झालेले  हे देवपित्याशी आपला  समेट करण्यास आणि आपल्याला नीतिमान ठरवण्यास पुरेसे आहे. जर ख्रिस्त देत असलेली पापापासून सुटका घोषित केली नाही  आणि त्याच्या पुनरुत्थानावरचा विश्वास प्रकट केला नाही तर सुवार्ता सांगितली गेली नाही.
५. “Soli Deo Gloria’‘ देवाच्या गौरवासाठी.” तारण हे देवाचे आहे व ते देवाच्या गौरवासाठीच पूर्ण केले गेले आहे. ख्रिस्ती या नात्याने आपण त्याला नेहमी उंचावले पाहिजे, त्याची वाखाणणी करायला हवी आणि त्याच्या सान्निध्यामध्ये, त्याच्या अधिकाराखाली व त्याच्या गौरवासाठी आपली जीवने जगायला हवीत.
ही पाच महत्त्वाची तत्त्वे प्रोटेस्टंट धर्म जागृतीचे कारण आहेत. बायबलकडे परत फिरा. या  धर्मसुधारकांनी मंडळीला केलेल्या पाचारणचे हे  ह्रदय आहे. सोळाव्या शतकात हे “फक्त पाच” मंडळीचे मूल्यमापन करण्यासाठी जितके आवश्यक होते तितकेच आजही आवश्यक आहेत.
                                                              




 
	 
		 
		 
			 
			 
			 
			 
			
Social