Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on दिसम्बर 28, 2021 in जीवन प्रकाश

ख्रिस्तजन्माच्या वेळचे शिष्य

ख्रिस्तजन्माच्या वेळचे शिष्य

डॉ. राल्फ विल्सन

देवाने ख्रिस्तजन्माच्या वेळी, तसेच त्या घटना घडण्याच्या सुमारास त्याचे शिष्य कसे तयार केले होते हे पाहून मी चकित होतो. उदा. त्याच्या जन्मापूर्वी जखऱ्या, अलीशिबा, मरिया योसेफ. इ. आता आपण त्याच्या जन्मानंतरच्या दोन शिष्यांबाबत पाहणार आहोत. शिमोन आणि हन्ना. देवाच्या या निवडलेल्या शिष्यांचे स्वभावगुण आपण पाहू या.

शिमोन – लूक २:२५-३५

“तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य यरुशलेमेत होता; तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता” (२:२५).

प्रथम शिमोनाशी आपली ओळख करून दिली जाते. त्याच्या नावाचा अर्थ आहे, “ऐकणे.” लक्षात घ्या की तो याजक किंवा संदेष्टा होता अशी त्याची ओळख करून दिली नाही. तो अदीक्षित व्यक्ती असून त्या शहरात राहत होता. त्याच्याबद्दल चार गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत.

१ नीतिमान – तो एक नेक, देवभिरू मनुष्य होता जो देवाला प्रामाणिकपणे अनुसरत होता.

२. भक्तिमान – देवाचा भययुक्त आदर बाळगण्याची शिमोनाची वृत्ती होती व त्याच विश्वासाने तो आचरण करत होता.

३. वाट पाहत होता – मशीहाच्या तारणाद्वारे इस्राएलाचे सांत्वन केव्हा होईल व त्यांची जुलूमापासून सुटका केव्हा
    होईल याची वाट तो पाहत होता.

४. आत्म्याने भरलेला – त्याच्यावर पवित्र आत्मा होता. जुन्या करारात हे क्वचितच दिसते. फक्त संदेष्टे, काही राजे आणि ज्यांचा विशेष उपयोग करून घेण्याची देवाची इच्छा असे त्यांच्यावर पवित्र आत्मा येत असे. आता आपल्या दिवसात आपण आशीर्वादित आहोत; आता प्रत्येक विश्वासी व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा राहतो (रोम ८:९).

हे ही स्पष्ट दिसते की शिमोन देवाशी बोलत असे व देव त्याच्याशी.

“प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही, असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते” (२:२६).

एक दिवस येणाऱ्या मशीहासबंधी शिमोन प्रार्थना करत असताना देवाने त्याला दाखवले की, “तू मरण्यापूर्वी मशीहाला पाहशील.” हे अभिवचन मिळाल्यानंतर शिमोन उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहत होता.
आता आपण वाचतो, “त्याला आत्म्याने मंदिरात आणले” (२:२७).

शिमोन पवित्र आत्म्याद्वारे चालत असल्याने तो ऐकत आहे आणि प्रतिसाद देत आहे. यामुळे जेव्हा पवित्र आत्म्याने त्याला प्रेरणा दिली किंवा मंदिरात जायला  मार्गदर्शन केले तेव्हा त्याने हयगय केली नाही. जसे तो आज्ञा पाळतो तसे तो देवाच्या विस्मयकारक दिग्दर्शनाचा भाग बनतो.

जेव्हा हा वृध्द अचानक दिसतो तेव्हा मरीया आणि योसेफ चकित होतात. ते त्याला आशीर्वाद देण्यासाठी बाळाला घेऊ देतात. देवाने त्याला मशीहा पाहू दिला म्हणून शिमोन स्वत:च्या  शब्दांनी देवाचा धन्यवाद करू लागतो. मग तो त्या बालकासंबंधी एक भविष्य सांगतो पण त्याचा इशारा खास करून मरीयेकडे असतो.

“शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, ‘पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे; ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)’” (२:३४-३५).

        ज्याद्वारे अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होणार होते त्यासाठी मुख्य व्यक्ती येशूच होती आणि असणार. ते त्याच्यावर विश्वास ठेवून उठले जातात. किंवा त्याचा धिक्क्कार करून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून पडले जातात.

“इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल” (यशया ८:१४).

        येशूची पूर्णपणे निंदा केली जाईल असे शिमोनाने भाकीत केले त्यामुळे टीका करणाऱ्यांचे विचार उघडकीस येतील. आणि जेव्हा तो वधस्तंभावर खिळला जाईल तेव्हा मरीयेच्या ह्रदयाला तो वेदना आणील.

       संदेष्ट्री हन्ना – लूक २:३६-३८

मरिया आणि योसेफ अवाक् झाले आहेत. पण देवाने अजून संपवले नाही. आता या महान दिग्दर्शनामध्ये रंगमंचावर हन्ना येते.

“हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवर्‍याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली” (लूक २:३६-३८).


आपल्याला तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत.

१. ती आशेराच्या वंशातली होती. जेव्हा इस्राएलच्या उत्तर राज्यातील १० वंश इ.स. पूर्वी ७२२ मध्ये अश्शूरच्या बंदिवासात गेले तेव्हा या विखरून गेलेल्या वंशामध्ये आशेर चा वंश होता. कदाचित हन्नाचे कुटुंब परागंदा झाले नसेल किंवा ते अश्शूरच्या बन्दिवासापूर्वी दक्षिण  राज्यात गेले असेल. आपल्याला याबद्दल माहीत नाही.


२. एक विधवा. ती वयाच्या २०/२१ वर्षांपासून विधवा होती. तिने पुनर्विवाह केला नाही. लूकाच्या शुभवर्तमानात हे वास्तव दाखवले आहे. याचा अर्थ ती मंदिरामध्ये एक मान्यवर व्यक्ती होती. अनेक कुटुंबाच्या पिढ्या तिला ओळखत होत्या, कारण दरवर्षी ते वल्हांडणासाठी मंदिरात येत असत.


३. वयोवृद्ध. तिचे वय८४ वर्षांचे होते.

४. एक संदेष्ट्री. जुन्या करारात ज्या थोड्या एक संदेष्ट्रींची नावे दिली आहेत त्यापैकी हन्ना एक आहे. कधीकधी आपल्याला वाटते की देवाच्या लोकांमध्ये महत्त्वाच्या गोष्टी फक्त पुरुषच करू शकतात. पण तसे नाही. पुरुष आणि स्त्रिया देवाने दिलेल्या कृपादानानुसार, पाचारणानुसार सेवा करू शकतात. मानवी नियमानुसार नाही.   ती एक संदेष्ट्री म्हणून ओळखली जात होती आणि ती मंदिरात असे. म्हणून मला वाटते की ती सार्वजनिकरित्या उपदेश करत नसावी परंतु दृष्टयाप्रमाणे देवाचे वचन मंदिरात आलेल्या लोकांना देत असे.

५. रात्रंदिवस देवाची सेवा करीत असे. लूक नमूद करतो की, “ती मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे.” आता ती मंदिराच्या अंगणात झोपत होती व स्वयंपाक करीत होती का हे मला ठाऊक नाही पण तिचा सर्व वेळ ती तेथे घालवत असे. कदाचित लोक तिला जेवण आणत असतील. आपल्याला ठाऊक नाही. कसेही असो, ती देवावर प्रीती करत होती. इतकी की नम्रतेने त्याच्यासमोर ती उपास व प्रार्थना करीत असे.

आता ही सर्वांना परिचित असलेली संत स्त्री या निवडलेल्या कुटुंबाजवळ येते.


“तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली” (२:३८).

हन्नाने देवाची स्तुती करण्यास सुरुवात केली आणि भोवतालच्या सर्व लोकांना हे बाळ कोण आहे आणि देवाच्या लोकांचे तारण करण्यासाठी तो जे करणार त्याचे महत्त्व ती सांगू लागली.

हे परिच्छेद देवाची त्याच्या शिष्यांबद्दलची (विशेषत: वृद्ध शिष्य) जी अपेक्षा आहे त्याबद्दल काय शिकवतात?

१.शिष्य देव जे सांगतो ते ऐकतात व त्याचे आज्ञापालन करतात. ते देवाशी बोलतात व देवाने त्यांच्याशी बोलावे  
    म्हणून त्याचे ऐकतात.

२. शिष्य हे नीतिमान, भक्तिमान लोक असतात व ते देवावर प्रीती करतात.

३. शिष्य बराच वेळ देवाची भक्ती, प्रार्थना करण्यात घालवतात. ते स्वत:ला देवासमोर नम्र करतात. हेच त्यांचे जीवन          
 असते.

४. देव ज्यांना त्यांच्याकडे पाठवतो त्यांना हे शिष्य उत्तेजन आणि जीवनाचे वचन देतात.

५. वृद्ध शिष्यांनी एकाकी, इतरांपासून दूर झालेले नसावे. जर ते देवाबरोबर चालत असतील तर सर्व मंडळीला देण्यासाठी त्यांच्याकडे बरेच काही असते.

६. वृद्ध शिष्यांनी तरुणांना प्रभूच्या मार्गात चालण्यासाठी उत्तेजन द्यायचेच आहे. आणि तरुण शिष्य त्यांचा देवाशी असलेला संबंध व अनुभव ऐकून स्वत:चा फायदा करून घेतात.


त्या खास दिवशी देवाने तरुण मरीया योसेफ आणि येशूला मंदिराकडे नेले. त्यांची या देवावर प्रेम करणाऱ्या दोन लोकांची भेट व्हावी व उत्तेजन मिळावे ही त्याची योजना होती.


“देवा, ज्या कोणाकडे तू आम्हाला पाठवशील त्यांच्यासाठी आम्हाला अशा प्रकारचे उत्तेजन देणारे शिष्य बनव!

येशूच्या नावाने आमेन.”

,