अबिगेल डॉड्स
“शौलाची कन्या मीखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही” (२ शमुवेल ६:२३). दाविद राजाची पत्नी मीखल हिच्या हकीगतीतला हा गंभीर निर्णय शेवटचा शब्द बोलतो.
प्रेमकथेने झालेली सुरुवात दुःखद घटनेत कशी झाली? एकेकाळी आपल्या पतीसाठी जीव आणि शरीर धोक्यात घालणारी शौलाची मुलगी अशा प्रकारे कशी संपली? देवाने आपल्या फायद्यासाठी शास्त्रात हे स्पष्ट उदाहरण समाविष्ट केले आहे, जे आपल्याला एका विश्वासू पत्नीपासून खाली घसरणाऱ्या स्त्रीकडे दाखवते. जी तिच्या पतीमध्ये फक्त सर्वात वाईट पाहते, परिस्थितीचे चुकीचे मूल्यमापन करते आणि स्वतःच्या ओटीत पडलेल्याचा दुष्ट न्याय करते. मीखलची कहाणी आपल्याला शिकवते; विशेषतः कठीण किंवा अपेक्षेपेक्षा वेगळी परिस्थिती असल्यामुळे ज्यांना टीका करण्याकडे प्रवृत्त केले जाते अशा ख्रिस्ती पत्नींना.
मीखल दाविदावर प्रेम करत असे
मीखलबद्दल आपल्याला कळणारी पहिली गोष्ट म्हणजे, ती शौल राजाची दुसरी मुलगी होतीच, पण ती दाविदावर प्रेम करत असे. तिच्या वडिलांनी वधूची किंमत म्हणून मागितलेल्या शंभरपेक्षा जास्त म्हणजे दोनशे पलिष्टी लोकांच्या अग्रत्वचा दाविदाने देण्याआधीसुद्धा ती त्याच्यावर प्रेम करत होती. आणि हे प्रेम काही कावा नव्हता – ते एक खरे प्रेम होते. जीवन-मरणाच्या परिस्थितीत परीक्षा झालेले एक निष्ठावंत प्रेम होते.
शौलाने दाविदाच्या घरी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जासूद पाठवले, आणि तो सकाळी त्याला मारणार होता. “पण मीखलने त्याला म्हटले, “आज रात्री आपण आपल्या जिवाचा बचाव करणार नाही तर उद्या ठार व्हाल.” मग मीखलने खिडकीतून दाविदाला उतरवले, व तो पळून जाऊन निभावला” (१ शमुवेल १९:११-१२).
बहुतेक नवीन विवाहितांना कधीही अशा परीक्षेचा सामना करावा लागत नाही:जर तुम्हाला तुमच्या वडिलांची म्हणजे राजाची किंवा तुमच्या नवीन पतीची बाजू घेण्यास भाग पाडले गेले तर, तुम्ही कोणाची निवड करणार? मीखलसाठी उत्तर स्पष्ट होते. ती तिच्या पतीला पळून जाण्याचा सल्ला देते आणि नंतर ती दाविदाचे रक्षण करण्यासाठी तिच्या वडिलांच्या नोकरांना फसवते. शास्त्रवचनांमध्ये दाविदाने तिच्या सूचनांचे पालन करण्यास कोणताही संकोच बाळगला नाही असे लिहिले आहे. उलट तो तिचे ऐकतो, तिच्यावर विश्वास ठेवतो आणि ती जे काही सांगते ते करतो आणि परिणामी त्याचे जीवन वाचते. तिच्या सूचना खरोखरच त्याच्या भल्यासाठी होत्या. ती त्याच्या संघामध्ये होती, कितीही किंमत मोजावी लागली तरी.
मीखलने दाविदाला मदत केल्याचे हे दृश्य, नीतिसूत्रांमध्ये वर्णन केलेल्या आदर्श पत्नीचे गुण दृढ करते: “सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते; त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही” (नीतिसूत्रे ३१:१०-१२). विश्वासू पत्नी म्हणून मीखलची एक आशादायक सुरुवात होती.
एक अनपेक्षित वळण
पुढच्या वेळी जेव्हा आपण मीखलबद्दल ऐकतो तेव्हा आपल्याला कळते की तिच्या वडिलांनी तिला दुसऱ्या पुरुषाला, लइशाचा पुत्र पालती याला पत्नी म्हणून दिले आहे. पण दावीद तिला विसरला नाही – कालांतराने, तो तिला परत देण्याची मागणी करतो (२ शमुवेल ३:१३-१४). आणि म्हणूनच, तिला तिच्या वडिलांच्या मरणासन्न राज्यातून काढून तिच्या पतीच्या घरात तिच्या योग्य ठिकाणी परत आणले जाते. तरीही हे परतणे दाविदाचे त्याच्या आयुष्यभर “भले करत नाही.” याउलट, ते बेलगाम जिभेच्या तलवारीच्या वारांना घेऊन येते (नीतिसूत्रे १२:१८).
जेव्हा दावीद यरुशलेमच्या सिंहासनावर बसतो, तेव्हा तो पुन्हा एकदा देवाच्या शत्रूंना, पलिष्ट्यांना पराभूत करण्यासाठी आणि देवाचा कोश यरुशलेमला आणण्यासाठी स्वतःला तयार करतो. ओबेद-अदोमाच्या घरी तीन महिन्यांच्या प्रवासानंतर, दावीद शेवटी कोश शहरात आणतो:
“तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद-अदोमाच्या घरून दावीदपुरास मोठ्या आनंदाने आणला. परमेश्वराचा कोश उचलणारे सहा पावले चालून गेले तेव्हा दाविदाने एक बैल व एक पुष्ट गोर्हा ह्यांचा यज्ञ केला. दावीद सणाचे एफोद कंबरेस वेष्टून परमेश्वरासमोर आवेशाने नृत्य करत चालला. दाविदाने व सर्व इस्राएल घराण्याने परमेश्वराचा कोश जयजयकार करीत व शिंगे फुंकत वर आणला” (२ शमुवेल ६:१२-१५).
दावीद आनंदाने भरलेला आहे, तो त्याच्या सर्व शक्तीने धैर्याने परमेश्वराची उपासना करतो, इतर त्याला कसे समजतात याची त्याला पर्वा नाही. पण मीखलला इतरांच्या विचारांची आणि दृष्टिकोनाची अत्यंत काळजी आहे. तो आशीर्वाद देण्यासाठी येतो तेव्हा ती त्याच्या समोर येते:
“आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले”” (२ शमुवेल ६:२०)!
अविश्वासू जखमा
नीतिसूत्रे २७:६ आपल्याला शिकवते की विश्वासू मित्र शब्दांद्वारे एक प्रकारची जखम करू शकतो. ह्या “विश्वासू जखमा” जिभेच्या अविचारी तलवारीचे वार नाहीत, तर त्या जखमा शेवटी बरे करण्यासाठी आणि बांधण्यासाठी आहेत. मीखल दाविदाला त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीलाच त्याचे जीवन वाचवण्यासाठी तातडीने आणि विश्वासू सूचना देण्यापासून, आता एक नीतिमान टीकाकार म्हणून त्याला तिरस्कार आणि उपहासाचा फटकारा देण्यापर्यंत जाते. तिचे शब्द जखमा करण्यासाठी होते – आणि दाविदाला हे माहीत होते. तिच्या नजरेत तो “तिरस्कारयुक्त” आणि “अपमानित” मानला गेला होता (२ शमुवेल ६:२२). कदाचित तिला असे वाटले असेल की जर दावीद तिच्या टीकेशी सहमत असेल आणि ते मनावर घेत असेल तर तिचे शब्द बरे करण्यासाठी देखील आहेत.
शेवटी कदाचित तो असभ्य वाटला असता. कदाचित ते एक लाजिरवाणे दृश्य होते. कदाचित तो अशा प्रकारे नाचू शकला असता ज्यामुळे त्याच्याकडे फारसे लक्ष वेधले गेले नसते. परंतु तिने सर्वात महत्त्वाच्या गोष्टीचा विचार केला नाही:देवाला काय वाटले.
अनेक बायका त्यांच्या स्वतःच्या समजुतीनुसार त्यांच्या पतींवर टीका करतात. एक उत्तम कौटुंबिक जीवन, एक उत्तम संध्याकाळ किंवा एक उत्तम सेवाकार्य काय असेल याची त्यांची एक कल्पना असते आणि त्यांना असे वाटते की त्यांच्या पतीने ते ध्येय साध्य करण्यासाठी काय केले पाहिजे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या हे लक्षात येते की इतर काही ख्रिस्ती पती नियमित वेळापत्रक पाळतात किंवा कौटुंबिक सुट्ट्यांसाठी वेळ काढतात किंवा घरात मदत करतात किंवा दररोज कौटुंबिक उपासना करतात किंवा अंगण स्वच्छ ठेवतात किंवा मूर्ख विनोद करण्यापासून दूर राहतात. पतीसाठी काय उत्तम आहे ही त्यांची कल्पना त्यांना स्वत:च्या दैनंदिन जीवनात दिसत नाही, ज्यामुळे त्या केवळ असमाधानीच नव्हे तर स्वतःला नीतिमान बनवतात. आणि त्या विषारी हृदयातून खारे पाणी बाहेर पडते, ज्यामुळे त्यांच्या पतीवर अविश्वसनीय जखमा केल्या जातात (याकोब ३:६-१३).
क्रोधित पत्नी शांतपणे आणि कावेबाजपणे तिच्या पतीच्या संघासाठी खेळणे थांबवते आणि स्वतःचा संघ तयार करते, ती त्याच्याशी स्पर्धा करते आणि त्याला हरवण्याचा प्रयत्न करते. अधीनता ही आता पत्नीच्या हृदयाची भूमिका राहिलेली नाही, म्हणून तिच्या शब्दांनी ती स्वत:ला त्याच्या आयुष्याच्या चालकाच्या जागी बसवते. अशा प्रकारच्या पत्नीला देवासमोर भीतीने जगण्याऐवजी तिच्या हेतूंसाठी देवाचा वापर करण्याचा मोह होईल. मीखलप्रमाणेच तिचे मूल्यमापन धार्मिक वाटू शकते, जे स्पष्ट समस्या दर्शविते. तिच्या पतीने काय करावे याबद्दलची तिची भावना कदाचित बरोबर असेलही.
पण जोपर्यंत ती देवाच्या समोर तिच्या पतीसाठी खरोखरच चांगले शोधण्यासाठी तिचे हृदय सादर करत नाही तोपर्यंत ती एक निराश पत्नी असेल. तिच्या शब्दांमध्ये श्रोत्याला उभारी देण्यासाठी आवश्यक असलेली कृपा नाही.
त्याच्या सर्व दिवसांसाठी आशीर्वाद
दावीद सुदैवाने मीखलच्या अविश्वासू जखमांना बळी पडला नाही. तो तिला एकाच श्रोत्यासाठी जगणारा माणूस म्हणून प्रतिसाद देतो. “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच” (२ शमुवेल ६:२१). दुसऱ्या शब्दांत, तो तिच्या भावनांना संतुष्ट करण्यासाठी जगणार नाही. ती त्याला असभ्य मानते; त्याला माहीत आहे की तो नाही. इतर पुरुष, तरुणी किंवा अगदी त्याच्या पत्नीची मर्जी मिळवण्यासाठी तो देवाची उपासना करत नाही. तो देवाला संतुष्ट करण्यासाठी देवाची उपासना करतो आणि त्याला त्यापासून काहीही रोखणार नाही.
आपल्याला माहीत आहे की, कथेत मीखलचा शेवट आनंदी नाही. तिच्या शेवटच्या शिलालेखात, तिला “शौलाची कन्या” म्हटले आहे, “दाविदाची पत्नी” नाही – जिचे दाविदावरील प्रेम तिच्या वडिलांप्रमाणेच चुकीच्या संशयात बुडाले होते अशा स्त्रीचे हे योग्य वर्णन आहे . परंतु माझ्या ख्रिस्ती भगिनींनो, देवाच्या आत्म्याने चालणाऱ्यांसाठी आपण चांगल्या गोष्टींची खात्री बाळगू शकतो.
तुमच्या पतीशी एकनिष्ठ राहा. त्याच्यातील सर्वोत्तम पहा. तुमच्या स्वतःच्या जाणिवेने किंवा इतरांच्या समजुतींबद्दल काळजी करण्यापेक्षा, देव त्याला ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने तुमच्या पतीकडे पाहण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करा. तरच तुम्ही तुमच्या पतीला अशा प्रकारे विश्वासू शब्द देण्यास सज्ज व्हाल जे त्याचे आयुष्यभर कल्याण करतील आणि त्याचे नुकसान करणार नाही. हेच देवाला आनंद देणारे मार्ग आहेत. जेव्हा पत्नी खरोखरच तिच्या पतीसाठी असते आणि तिच्यावर त्याचा विश्वास असतो, जेव्हा तिचे हृदय देवाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टींकडे केंद्रित असते, तेव्हा तिची टीका देखील त्याच्या हाडांसाठी आरोग्य बनते.




Social